प्रवास - कनकेश्वर - कोर्लाई गड पर्यंत !

Submitted by Yo.Rocks on 4 January, 2009 - 13:03

बरेचदा असे होते आपण ठरवतो भरपुर... इकडे तिकडे जायचा प्लॅन करतो नि शेवटच्या क्षणी फ्लॉप शो होउन जातो.. आमच्या ट्रेकींगचे देखील असेच झाले.. जिकडे जायचे होते ते ऐनवेळी कॅन्सल झाले..
पण शेवटी आदल्या रात्री पावणेबाराच्या सुमारास फोनाफोनी करुन एका मित्रास तयार केले.. नि कोर्लाई गड गाठायचे ठरवले..!
ठरल्याप्रंमाणे सकाळीच साडेसातच्या सुमारास गेट वे गाठले.. गेट वे ऑफ इंडीया हा माझा आवडता परिसर.. तिकडे जाताना लागणारे मुंबई विद्यापीठची इमारत, समोरील हिरवेगार मैदान, मैदानावरील पांढर्‍या रंगाचे मानवी बगळ्यांचा चाललेला खेळ, काळा घोडा चौक, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, आर्ट स्कुल इ. मागे टाकत रीगल सिनेमागृह नि पोलिस मुख्यालय येते.. इकडे येताच ताजची नविन इमारत, जुनी इमारत पाहुन खुप बरे वाटले.. बर्‍याच वर्षांनी नि पहिल्यांदाच इतक्या सकाळी गेल्याने मन एकदम खुष झाले.. सुर्यकिरणांच्या तांबड्या कोवळ्या किरणांमध्ये गेट वे परिसर नाहुन निघत होता..
Image005_0.jpgImage006_0.jpg
वेळ न दवडता आम्ही मांडवा लाँच ची तिकीट काढली नि बोटीत जाउन बसलो..
गेट वे ते मांडवा चा बोटीतुन सफर एकदातरी करावा असा आहे.. नि अगदी सकाळी म्हणजे मस्तच.. बोट जशी धक्क्यापासुन दुर जाते तेव्हा बोटीतुन दिसणारा गेट वे परिसर नि धक्क्याला लागुन असणार्‍या लाँचेसची माळ सुंदरच वाटते.. पण या सफरीतला आनंददायी क्षण म्हणजे जेव्हा सागरपक्ष्यांचा थवा आमच्या बोटीभोवती उडु लागला तो.. पांढरा रंग, पंखाच्या कडांना काळ्या रंगाची गडद छटा, लालभडक चोच नि कुशीत घेतलेले पाय नि ते काळे टपोरे डोळे.. प्रेमात पडावा असा हा एक पक्षी.. नि अशा पक्ष्यांचा थवा आपल्या हाताच्या अतरावर आपल्या नजरेसमोर उडत असेल तर याहुन सुखद अनुभव कोणता... !!
Image013_0.jpgIMG_0027_0.jpg
त्यात काही पक्षी मस्तपैकी पाण्यातले मासे टिपत होते तर काही पक्षी बोटीतली काहि प्रवासी उडवत असलेले खाद्य टिपत होते.. सहि, मस्त, सुपर्ब, वॉव, सेक्सी असे शब्द कानी वारंवार पडत नसतील तर नवलच.. !
तासभरातच मांडवा गाठले नि आम्ही कनकेश्वर गडा बाबत चौकशी केली.. जायचे होते कोर्लाई गडावर पण माझ्या मित्राने पेपरमधले कटिंग घेउन आला होता नि अलिबागजवळच कुठेतरी आहे म्हणुन दोन्ही एकच दिवसात करण्याचे ठरवले होते.. !!!
चौकशी केली असता कळले दोन्ही ठिकाणं (कोर्लाई नि कनकेश्वर) एका दिवसात करणे कठीण आहे.. तेव्हाच ठरवले आता दोन्ही गड सर करायचे..
कनकेश्वर गडावर जाण्यासाठी चोंडी थांब्यावर उतरावे लागते.. पण इथेही घोळ झाला.. एकजण म्हणाला चोंडी.. एक जण म्हणाला कनकेश्वर फाटा.. शेवटी एका गृहस्थानेच(मुंबईकरच होता तो, पण त्याचे गाव इथे) चोंडीला उतरा.. मी पण तिकडे जातोय सांगितले.. नि एकदा मार्गी लागलो.. आम्ही खास भटकंतीसाठी हापिसमधुन सुट्टी घेतल्याचे कळताच त्याला नवलच नि तितकेच कौतुक वाटले..!!

कनकेश्वर गड म्हणजे खरे तर शंकराचे प्राचिन देवस्थान आहे.. डोंगरातील जंगलात विसावलेले हे मंदीर १७६४ साली बांधलेले आहे.. ब्रिटीश राज्यात मराठी नौदलाची धुरा सांभाळणारे कान्होजी आंग्रे इथे दर्शनासाठी येत असत इतकीच आम्हाला माहिती होती.. चोंडीला उतरुन मापगावसाठी रिक्षा पकडली.. छोटी शेती,गावातली घरे मागे सरली नि राष्ट्रिय केमिकल फर्टिलायझर च्या असलेल्या रेल्वे ट्रेकपाशी उतरलो.. तर समोरच झाडी नसलेला , पायर्‍यांची वाट असलेला डोंगर उभा दिसला.. प्रथमदर्शनी तसा छोटाच वाटला नि डोंगराच्या डोक्यावर झाडांची दाटी दिसली म्हणजे तिथेच असावे मंदीर.. असा अंदाज धरुन चढाई सुरु केली.. तिथेच पाटी दिसली "पायर्‍या ६५०, अंतर ३००० फुट"..
पहिल्या काही पायर्‍या चढताच धापा लागल्या.. तेव्हा वाटले काहि खरे नाहि आज.. पायांची जबरदस्त कत्तल होणार असे वाटले.. काय करणार प्रारंभीची वाटच तशी आहे.. आजुबाजुला झाडेसुध्दा म्हणावी तशी नाहित.. डोंगर ही बराचसा चढणीचा आहे..
नाही म्हणता म्हणता डोंग़राच्या डोक्यावरील झाडे जवळ येउ लागली तसे हायसे वाटले.. पण ते तात्पुरते होते.. त्याचा प्रत्यय तिकडे पोहोचल्यावर आला कारण तिथे मंदिराचा मागमुसही नव्हता.. तिकडुन उतरणीची वाट होती नि याच डोंगराआड लपलेल्या डोंगरात जात होती..!!! पण इथुन मागे वळुन पाहिले तर भला मोठा परिसर नजरेत भरला.. त्यात थळ शेतीच्या काराखानाचे तीन मोठे खांब लक्ष वेधुन घेत होते..
आता वाट चालताना अडचण नव्हती.. आजुबाजूस झाडे होती.. अधुन मधुन सरडे सळसळत आडवे जात होते.. अधुन मधून अमुक पायर्‍या बाकी अशा पाट्या दिसत होत्या पण त्यांची संख्या २०० च्या खाली काही येत नव्हती.. !! अशाच पायर्‍या चढताना एक देवाची पायरी लागते.. देउळ नि पायर्‍यांचे बांधकाम झाल्यानंतर इथे देव अवतरले होते असे म्हणतात..!! आता खर्‍या अर्थाने जंगल सुरु झाले होते.. न ऐकलेल्या पक्ष्यांच्या आवाज कानी पडु लागला होता..दोन डोंगर पार केल्यानंतर तिसर्‍या डोंगरात मध्यावर एक छोटुसे व्याग्रेश्वर नावाचे शिवलिंगाचे मंदीर लागते.. त्याचे दर्शन घेउन पुधे पायपीट चालु ठेवली.. काही अंतरावरच मारुतीचे मंदीर लागते.. बरी मोठी नि छान मुर्ती आहे.. नि बाजुलाच जुने कुंडदेखील आहे.. खुप छान बांधणी आहे.. पण कुंडातील पाणी वापरण्यायोग्य नाही... पुढे काही अंतरातच मंदीराचा परिसर दिसतो.. सुरवातीलाच बाजुलाच श्रीकृष्ण नि बलराम (!!!!!) यांच्या एकत्र असलेल्या मुर्तींचे मंदीर लागते.. असे मंदीर मी पहिल्यांदाच पाहिले जिथे राधा नाही पण बलराम आहे.. गाभार्‍याला असलेली वलयांकीत रचना तर छानच वाटते.. तिथुन बाहेर आल्यावर मोठे कुंड नजरेस पडते.. अष्टकोनी पुष्पकरणी असे नाव.. बारामाही पाणी असते.. तिकडुनच आम्ही मुख्य मंदिराकडे वळालो..
Picture_31__0_0.jpgIMG_0036_0.jpg
गाभार्‍याचा भाग पांढरा नि खालील भाग काळा... नि त्यात बसविलेल्या छोट्या मुर्ती छानच वाटतात ! या मंदिरात असलेले शिवलिंग फार छान आहे.. सभोवताली असलेल्या शांततामय परिसरामुळे ह्या मंदिराची शोभा आणखिनच खुलते..! या मुख्य मंदिराभोवती अनेक छोटी देउळ दिसतात.. याच परिसरात जे श्रीगणेशाचे मंदीर आहे त्यात असणार्‍या संगमरवरी मुर्त्या फार प्राचिन आहेत पण बघताक्षणी वाटत नाही नसे हेच कौतुकास्पद !! या मंदिराच्या अंगणातच शेषनागाच्या डोईवर पृथ्वी अशा प्रकारची पाण्याची टाकी आहे.. ही कल्पना खासच !! इतक्या उंचीवर विसावलेला हा शांत नि स्वच्छ परिसर पाहुन थक्क व्हायला होते.. सभोवतालचा परिसर पुर्ण पाहुन झाल्यावर तिथेच वस्तीला असलेल्या गुरव यांच्या घरातील अंगणात कांदेपोह्यांचा नाश्ता घेतला.. तेव्हा कळले इथे रहाण्याची पण सोय आहे.. नि खरच अशा जंगलानी वेढलेल्या रम्य परिसरात रहायला खुपच छान.. पण आम्हाला शक्य नव्हते.. कोर्लाई गड जो बाकी होता.. नि एका दिवसात आटपायचे होते.. तेव्हा नाश्ता करुन जवळ असलेल्या गोमुखाच्या वाटेने गेलो.. ही वाट घनदाट जंगलातुन जाते.. हे गोमुख खुपच जवळ आहे.. पण चांगल्या स्थितीत नाही.. तिकडुनच माघारी फिरलो नि गड पटापट उतरायला सुरवात केली.. (याच वाटेत कुठंतरी नागोबाचा कप्पा (सापांची जागा) असल्याचे दुसर्‍या दिवशी कळले.. राहीलेच ते१) दुपारचे १ वाजले होते..
पुन्हा चोंडीला येउन तिकडुन अलिबागसाठी सिक्स सिटर पकडली.. पाउणतासात अलिबाग गाठले नि तिकडे कोर्लाई किल्ल्यास जाण्यासाठी चौकशी केली..
कोर्लाई किल्ला हा कोर्लाई गावाच्या टोकाशी आहे.. आदल्या रात्री तिकडे जायचा मार्ग नेटवरुन काढला होता.. जसे "अलिबाग ते रेवदांडा (सव्वा एक तास) नि रेवदांडा ते कोर्लाई (१५-२० मिनीटे)... तिकडुन पुढे २०-२५ मिनीटे चालत.. " पण नेमके एका दुकानदाराने "भेटलीच तर मुरुड पकडा म्हणजे थेट कोर्लाई गावाजवळ उतरता येईल" असे सुचवले नि सुदैवाने स्टँडवर मुरुड ला जाणारी उभीच होती.. एक दिड तासातच कुंडलिका खाडीचा पुल पार करुन कोर्लाई गावाच्या थांब्यावर उतरलो नि किल्ल्याकडे जाणारी वाट विचारली.. त्याचक्षणी शेवटची मुंबईला जाणारी गाडी किती वाजता येते हे आवर्जुन विचारले नि संध्या. सहा ची आहे कळताच सुटकेचा निश्वास टाकला.. किल्ला फार मोठा आहे असे वाचले नव्हते कुठे.. त्यामुळे आमच्याकडे असलेल्या अडीच तीन तासात किल्ला बघुन होईल असे म्हणत आम्ही वाट धरली.. ही वाट कोर्लाई गावातुनच जाते.. इकडे म्हणे अजुनही काही ठिकाणी पोर्तुगीज भाषेत व्यवहार होतात.. मी व माझा मित्र आजुबाजुस भिंतीवर असलेले सुविचार(!!!) वाचत नि सा रे ग म पा फेम मुग्धा (अलिबागची) हीची दुरवरुन ऐकु येणारी गाणी ऐकत चालु लागलो.. गावातुन जाताना ख्रिस्ती, मराठी नि मुस्लिमांची वस्ती नजरेस आढळत होती... येणारे जाणारे आम्हा बॅगधारी दोघांना कुतुहलाने बघत होते.. नि आम्ही कोर्लाई गडाला इकडुनच का विचारत पुढे जात होतो.. काहि मिनीटातच दुरवर डोंगर दिसला नि त्यावर किल्लासदृश भिंत दिसली.. आम्ही अधिक उत्साहाने चालु लागलो नि क्षणातच खाडी लागली.. मोठ्या प्रमाणात होड्या उभ्या होत्या.. शेवटी गावाच्या टोकाशी (डोंगराच्या पायथ्याशी) आलो नि "lets start" म्हणत सुरवात केली.. कुठून सुरवात करावी कळत नव्हती नि जवळपासही कोणीच नव्हते त्यांमुळे एका पाउलवाटेला धरुन चढाई सुरु केली.. ज्याने ही पाउलवाट शोधली तो ग्रेट असावा.. कसली पाउलवाट आहे.. डोंगराच्या पुर्ण एका बाजुला वळसे घेत ही वाट जात होती.. झाडाझुडुपातुन जाताना खाली असलेली खाडी नि त्यात उभ्या असलेल्या झेंडेधारी नौका मस्तच वाटत होत्या..
Image027.jpg
जशी जशी वाट पुढे जात होती तसा हळुहळु समुद्र नजरेत भरत होता.. खाडी नि समुद्र यांची एकी झालेली दिसत होती.. काही अंतरानेच मध्यावर खाली पायथ्याला बांधलेली छोटेखानी जेट्टी दिसली जिचा वापर माल उतरण्यासाठी केला जात असावा.. आम्ही "वॉव, सही" करत पुढे जात होतो.. पण पाउलवाटही सरळच जात होती.. किल्ला नजरेत आला होता पण वाट काही त्याबाजुने सरकतच नव्हती..
"आधी डोंगर जाणुन घ्या.. कोनाकोनातुन दिसणारे दृश्य टिपुन घ्या" असेच काही ती वाट सांगत असावी..
शेवटी वेळेअभावी आम्ही माघार घेतली नि त्या वाटेला बगल देत सरळ रेषेत किल्ल्याचा कडा गाठ्ण्यासाठी चढाई सुरु केली.. तसा डोंगर साधा असल्याने धोका नव्हता पण घसरलो तर पंचाईत होती पण एक जरा थरार म्हणुन ह्या चढाईची मजा घेतली.. छोटी झाडे, दगड यांचा आधार घेत कडा गाठला, उडी मारुन आत शिरलो नि आनंदाचे चित्कार बाहेर पडले..
कोर्लाई गड हा खास पोर्तुगीज धाटणीचा पण फारसा न नावाजलेला किल्ला.. ज्याच्या प्रवेशद्वारातुन न शिरता आम्ही थेट कठड्यावरुन चढल्याचा आनंद होता.. आम्ही बरोबर मध्यभागी चढाई केली होती.. सुटलेला वारा, खाडीवरील मोटारबोटांची ऐकु येणारी फटफट, समुद्रलाटांमध्ये स्वार झालेल्या झेंडेधारी होड्या, लाटांचा आवाज नि अस्ताला चाललेला सुर्य नि त्याच्या किरणांनी उजाळलेला विशाल समुद्र सारे काही अफलातुन.. एका बाजुला किल्ल्यावरील वाट उतरती होती जिथे सुंदर अशी तटबंदी दिसली..
Image035.jpg
तिथेच दारुकोठारं आहेत.. तिथुन समुद्र खुपच जवळ आहे.. जवळपास समुद्रातील खडकांवर उतरता येते..
IMG_0054.jpg
नि दुसर्‍या बाजुला वाट चढणीची होती जी बालेकिल्ल्याकडे जाणारी होती.. आम्ही पहिली उतरती वाट धरली कारण वरतूनच ती तटबंदी लक्ष वेधुन घेत होती.. तिथे जाइस्तोवर ५-६ तोफ नजरेस पडल्या.. सार्‍या तोफा किल्ल्याच्या तटबंदीतुन बाहेर समुद्रात डोकावत होत्या.. ती कोठारे धुंडाळुन तिकडेच वार्‍यावर लाटांच्या साक्षीने थोडीफार पेटपुजा केली नि माघारी फिरुन चढणीची वाट धरली.. तिन्ही बाजुस विस्तारलेला समुद्र न्याहाळत वर पोहोचलो तर अजुनच विहंगमय दृश्य नजरेस पडले.. अलिबागचा भल्ला मोठा किनारा(किहीम बीच असावा कदाचित), दुरवर खाडीमधील गाळसदृश छोटुश्या बेटावर विसावलेले सागरपक्षी,कुंडलिका खाडी नि त्यावरील पुल, त्याच्यामागे उभी असलेली डोंगररांग... सुंदर देखावाच दिसतो.. वरती गेल्यावर बालेकिल्ला नजरेस पडला..
Image038_0_0.jpgIMG_0048_2_0.jpg
तिथुनच डोंगराच्या दुसर्‍या बाजुस खाली डोकावुन पाहिले तर समुद्राच्या समिप असलेले दिपगृह दिसले.. नि खरे तर तिकडुन वर किल्ल्यावर येण्यासाठी ठोकळ्याच्या पायर्‍याही होत्या..!!
असो एव्हाना ५ वाजले होते नि अजुन बरेच बघायचे बाकी होते ! त्या किल्ल्याजवळ पुढे छोटुसे मंदिर बांधलेले आहे.. पाण्याची विहीरही आहे बाजुला.. तेव्हा वाटले इथेच मुक्काम करावा..!! शेवटी पटापट पुढे गेले असता मोडकळीस आलेल्या खोल्या नजरेस पडल्या.. किल्ल्याचा बराचसा भाग झाडांच्या रोपटांमुळे खचलेला आहे.. उशीराने का होईना पण पुरात्व खात्याच्या ह्या किल्ल्याचे महत्व लक्षात आले आहे त्यामुळेच दुरुस्तीचे काम सुरु झाल्याचे दिसत होते.. पण जुन्या अवस्थेतील किल्ला पाहणेच खरी मजा !
शेवटी आम्ही आटोपते घेतले.. पण दिपगृह पाहुन तिकडुनच किनार्‍यावरुन परतीची वाट पकडण्याचे ठरवले.. फक्त वेळेअभावी समुद्राच्या पाण्यातुन चालण्याची मजा राहुन गेली..
बाहेर येइस्तोवर मुंबई सेंट्रलची असलेली ६ ची एस टी निघुन घेली होती.. पण चौकशी केली असता मागुनच १०-१५ मिनिटात ठाणा गाडी येणार होती.. नि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला..! मनात आले जर का २-३ दिवसाच्या मुक्कामाच्या पुर्ण तयारनिशी आलो असतो तर कर्नाळा, जंजिरा, खांदेरी-उंदेरी करताही आले असते !! पण अचानक ठरवुन एका दिवसात खुप काही बघितल्याचा, फिरल्याचा आनंद काहि औरच..!

गुलमोहर: 

छान लिहिले आहेस योगी Happy
कनकेश्वराच्या इथल्या देवळांचे फोटो काढलेस की नाही?

योगी, मस्त रे !
तुझे हे प्रवासवर्णनपर लेख छानच असतात. ते वाचले की तिथे जाताना गाईडची गरज पडत नाही.
आणखी नवनवीन स्थळांची वर्णने येवु देत. वाट पाहतोय.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

वा योगी, सुरेख वर्णन आहे आमच्या कनकेश्वराच! माझ लहाणपनापासून हे अत्यंत आवडत ठिकाण! मापगावच्या शेजारी बहिरोळे म्हणुन गाव आहे तिथे आमच घर आहे. अलिबाग ला मागच्या शनि-रवि गेलो होतो तेव्हा कनकेश्वरास जायचा मानस होता - पण राहीलं.
कोरलई गावच वैशिष्ट्य राहील लेखात - हे माझ्या माहीतीप्रमाणे भारतातल एकमेव गाव जिथे पोर्तुगीज भाषेत व्यवहार होतात! कोरलइला आम्ही मित्र ११ वी च्या सुट्टीत अलिबाग हून सायकल वरुन गेलो होतो त्याची आठवण ताजी झाली! धन्यवाद! Happy