पंचतंत्रातल्या गोष्टी ऐकता ऐकताच छोट्या सुमितचे डोळे मिटू मिटू व्हायला लागले तसं हातातलं पुस्तक विकासनं हळूच बाजूला ठेवलं. अगदी आवाज न करता तो पलंगावरून खाली उतरला. कमरेपर्यंत सरकलेलं सुमितचं मऊशार पांघरूण त्याच्या खांद्यांपर्यंत ओढलं नि त्याच्या कपाळावर येणारे केस हलकेच बाजूला सारत त्यानं भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली.
'आत्ताशी कुठे साडेनऊच होताहेत. भरपूर वेळ आहे नेहाशी बोलत बसायला...'
मनातल्या विचारानं सुखावून जात त्यानं सुमितच्या खोलीचं दार लोटलं नि तो दिवाणखान्यात आला. टी व्ही वरचा कुठलासा रटाळ कार्यक्रम बघत ती जागीच होती. विकास खोलीत आला तसा तिनं चटकन टी व्ही बंद केला नि ती कागद पेन घेऊन सरसावूनच बसली. तिच्या त्या अविर्भावानं विकासला अगदी हसूच लोटलं.
'अगदी जय्यत तयारी दिसते बाईसाहेबांची आज...'
'मग काय, दोन तीन दिवस झाले दोघं मिळून लिस्ट बनवूया म्हणतेय मी. तुझं ऑफिस, घरी आल्यावरचे कॉन्फरन्स कॉल्स नि तुझा लेक यात माझ्याशी बोलायला वेळ असतोच कुठे तुला आजकाल?'
'ए नेहा, धिस इज नॉट फेअर. मान्य आहे मी जरा जास्त बिझी आहे एवढ्यात.... पण वीकएंडला मी तुझ्यासाठी आवर्जून वेळ काढतोय हं... तरी तू....'
'जाऊ दे रे...सहज म्हटलं मी. चल, आता करायची का सुरुवात?'
'अन खरंतर भारतात जाताना कोणाला काय द्यायचं ते तूच ठरवायचंस.... मला फारसा इंटरेस्ट नसतो ग या सगळ्यात.....'
'आता तुझं नेहमीचं जाऊ दे हं पालुपद. ही बघ लिस्ट तर केलीच आहे. माई, वहिनी, अप्पा,नैनाताई, सुधीरदादा, वैशाली, रवी, रंजनाताई, भाऊकाका....'
'बापरे.... ही तर सुमितच्या लग्नातल्या वर्हाड्यांची लिस्ट वाटतेय.... इतकी मोठी? अग, आजकाल सगळं काही मिळतं भारतात.. उगाच इथून ओझी वाहून न्यायचा सोस कशाला? अन बाईसाहेब, यावेळेस एकट्याच जाताय बरं का तुम्ही. नेहमीचा हक्काचा हमाल नाहीय सोबतीला...' विकासच्या चेहर्यावर मिश्किल हसू चमकलं.
'नेईन रे मी. इतकी काही लेचीपेची नाहीय म्हटलं....' नेहा जरा वैतागलीच.
'अन राणी, मालतीकाकूचं नाव नाहीय तुझ्या यादीत...तिची एकसष्टी आहे न ?'
तोंडातून शब्द निघून गेले नि विकास मनातल्या मनात हळहळला. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच नेहाची प्रतिक्रिया होती अगदी...
'काही गरज नाहीय. साडी घेणारच आहोत ना तिथे ? नेहमी इतक्या भारी वस्तू देतोस तू...त्यांना काही त्याचं सोयरसुतक तरी असतं का? नि मागच्या वेळी तू हट्टानं नेलेला स्वेटर त्यांच्या सुनेच्या अंगावरच बघितला ना आपण ? उगाच नसता खर्च नि कौतुक शून्य...'
नेहा फणफणली.
'चालतं ग.... एकदा आपण वस्तू दिली ना... अगदी त्या व्यक्तीचा मान राखून दिली. त्यात सारं काही आलं. मग त्या व्यक्तीनं ती स्वत: वापरली काय.... नि कोणाला दिली काय.. आपल्याला काय करायचंय त्याच्याशी?'
'छे... मला नाही पटत हे तुझं तत्वज्ञान. तूच घे तुला काय घ्यायचंय ते. मी मुळीच नेणार नाही काही.... नाहीतरी नाकच मुरडणार त्या काहीही दिलं तरी....'
'कमॉन नेहा... इतक्या महागड्या वस्तू तू तुझ्या मैत्रिणींसाठी, सगळ्यांसाठी नेतेयस.... मी बोललो का काही? एका मालतीकाकूला देण्यानं तुला काही कमी पडतंय का? उगाच हट्टीपणा का करतेस? '
'ओह..ओके. माझ्या मैत्रिणींचं डोळ्यात सलतंय होय तुझ्या... ठीक आहे....'
हातातलं कागद पेन टीपॉयवर आदळत नेहा झटक्यानं बेडरूममधे निघून गेली. सुमित झोपलाय नि दाराचा आवाज करू नये इतकंही भान तिला राहिलं नाही.
तिनं आपटलेल्या दाराकडे बघत विकास बराच वेळ बसून होता. अगदी हतबुद्ध होऊन.
'किती राग येतो नेहाला मालतीकाकूचं नाव काढलं की... एरवी इतकी शहाण्यासारखी वागणारी आपली बायको...अगदी शुद्ध वैताग होते अशावेळी. आता काकूही काही फार मायेनं वागते तिच्याशी अशातला भाग नाहीय. पण ती जुन्या पिढीतली. हे दोन पिढ्यांमधलं अंतर म्हातार्या माणसांना नसेल येत ओलांडता. शरीर नि मन दोन्हीही थकलं असतं त्यांचं....पण नव्या दमाच्या लोकांनी तरी ते पार करून जावं नेटानं.. उगाच लागणार्या ठेचांचा बाऊ करू नये...'
हे असेच अनेक विचार मनात घोळवत विकास नकळत दिवाणखान्यात सोफ्यावरच आडवा झाला. मनातून मात्र त्याला कुठेतरी असंही वाटत राहिलंच, की उगाचच मालतीकाकूंचा विषय काढला आपण. इतक्या छान मूडमधे होती नेहा. आता दोन दिवस व. पुंच्या गोष्टीतल्यासारखा 'अबोलीचा सडा...'
पण सुदैवानं रात्रीच्या वादळाचा थोडाही मागमूस नव्हता नेहाच्या चेहर्यावर सकाळी. अगदी नेहमीसारखंच लोभसवाणं हसू घेऊन आली होती ती सुमित नि विकासला उठवायला. उलट विकासच्या टायची गाठ नीट करता करताच हळूच 'सॉरी. रागावू नकोस ना... घे तुला हवं ते काकूसाठी...' असं हलकेच सांगून पांढरं निशाणही फडकावून मोकळी झाली ती.
नेहानं तिच्यापुरता हा विषय संपवून टाकला खरा..पण ऑफिसला जाताजाता गाडीत विकासच्या डोक्यात विचारचक्र सुरूच होतं.
गेली काही वर्षं नेहा नि मालतीकाकू यांच्यात सुरू असलेल्या या शीतयुद्धाची झळ विकासला मधूनमधून लागत होतीच. नाही असं नाही. पण त्याच्या पुरुषी मानसिकतेप्रमाणं तो त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आला होता. दोघींपैकी कोणाचं बरोबर असा प्रश्न आला असताच... तर नेहाकडेच त्याचं पारडं झुकलं असतं. नेहा होतीच तशी.. बडबडी, लाघवी नि गोड. नि सासरच्या सगळ्यांचंही अगदी मनापासून करायची ती. एक काकू सोडली तर सार्यांशी छान जुळत होतं तिचं.
काकूच्या सगळ्या गोष्टींवर....मुख्य म्हणजे बोलण्यावर आक्षेप होता नेहाचा. काकू बोलायचीच तशी तिच्याशी. कधी तिरकं...कधी खवचट.. कधी बारीक चिमटे काढणारं... मोकळ्या मनाच्या नेहाला फार त्रास व्हायचा या सार्याचा. तसा तिचा नि काकूंचा संबंधही फार आला नव्हता. पण तेवढ्यातही सार्या काटेरी आठवणीच होत्या तिच्या मनाच्या कुपीत.
मालतीकाकू म्हणजे विकासची मधली काकू. विकासच्या आईच्या अकाली मृत्यूनंतर विकासला आपल्या मुलांमधला एक समजून वाढवला होता त्यांनी. विकासचे वडील ... म्हणजे अप्पा... आपल्या वकिलीत दंग होते. पत्नीनिधनाचं दुखः त्यांनी दिवसरात्र स्वतःला कामात बुडवून घेत हलकं करायचा प्रयत्न केला होता. तशीही घरात एकत्र कुटुंबपद्धती असल्याने विकासच्या संगोपनाची जबाबदारी त्यांना फार जड गेली नाहीच.
काकूच्या मुलांबरोबरच विकास लहानाचा मोठा झाला. काकूंचा पोटचा मुलगा रवी एका ख्रिश्चन मुलीशी लग्न करून मुंबईत स्थायिक झाला होता. गावी तो फारसा येतही नसे. मुलगी रंजना थोडी मंदबुद्धीची निपजल्यानं तिच्या लग्नाचा योग येणार नव्हताच. एकटा विकासच काय तो उत्तम शिकला. इंजिनियर झाला. भाऊकाका नि मालतीकाकूंना फार कौतुक होतं विकासचं. आपली मुलं नीट निघाली नाहीत ही खंत बाळगण्याऐवजी विकासनं आपल्याला यश दिलं हेच कायम बोलून दाखवत असत दोघं..
पण नऊ वर्षांपूर्वी नेहाचं स्थळ सांगून आलं नि या सार्या मायेच्या नात्यात एक जाणवणारा, काचणारा ताण जाणवायला लागला. नेहाला वडील नव्हते. घरी एक लहान बहीण नि आईच. तेव्हा लग्न जमेल तसं ते करून देणार हे उघडच होतं. त्यात कोणाला काही आक्षेप असायचं कारणच नव्हतं. पण लग्नानंतर तीन वर्षांनी अमेरिकेला जायचा योग आला नि सगळं चित्र पालटल्यासारखं झालं. काकू नेहाशी विचित्रपणे वागतेय हे विकासला कळत नव्हतं असं नाही. पण घरगुती, बायकी वादात पडायचा त्याचा स्वभावच नव्हता. शिवाय आता परदेशात गेल्यावर असा किती संबंध येणार... कार्यप्रसंग नि सणासमारंभांपुरताच... मग उगाच मनं कशाला दुखवा असा विचार करून तो गप्प बसत असे.
कधीकधी मात्र हे गप्प बसणं चुकीचं तर नाही असं विकासलाही वाटण्याइतकी परिस्थिती अमेरिकेला येण्याआधीच्या त्या सहा महिन्यात निर्माण व्हायची. अशाच एका संध्याकाळी घरी हळदीकुंकू होतं. इतर पुरुषमंडळी तालुक्याच्या गावी गेलेली. माडीवर विकास एकटाच होता. तोच दार ढकलून नेहा एखाद्या वादळासारखी आत शिरली. भरून आलेले डोळे नि रडवेला चेहरा.
'काय झालं ग?' विकास धास्तावलाच एकदम.
तिच्या रडण्याचा धबधबा ओसरल्यावर, तिला शांत करून सारं काढून घेतलं तेव्हा विकासला कळलं की सगळ्या आलेल्या बायकांसमोर.....लग्नाला तीन वर्षं झाली तरी अजून चिमणी पावलं न उमटल्याबद्दल काकूनं तिला काहीतरी टोमणा मारला होता.
अन त्याबद्दल पश्चात्ताप सोडाच... उलट समारंभाच्या मधेच असं उठून गेल्याबद्दल रात्रीच्या जेवणाच्यावेळीही तिनं नेहावर ताशेरे ओढले होते.
नेहाचं दुखावलेलं मन हळूहळू संतप्त होतं गेलं. काकूला ती काही बोलत नसे पण तिचा चेहरा सारं सांगून जायचा. त्या सहा महिन्यात काकूबद्दल एक विलक्षण अढी तिच्या मनात निर्माण झाली होती. अन विकास तरी कोणत्या तोंडानं काकूची बाजू घेणार होता? जीवनदात्री नि जीवनसंगिनी यांच्यातला हा प्रत्येक घरात होणारा अटळ संघर्ष नि त्यात अडकलेला पुरुष ही त्याच्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडणं एवढंच त्याच्या हाती होतं.
अमेरिकेला आल्यानंतर.. छोट्या सुमितच्या जन्मानंतर दर वर्षी भारतात जाऊन येणार्या नेहाच्या कटु अनुभवांच्या गाठोडीत भरच पडत गेली होती. दर तीन वर्षांनी कामातून सवड काढून विकासही जाऊन येत असे तिच्याबरोबर. पण काकूच्या जिभेची धार कमी होण्याऐवजी वाढलेलीच जाणवायची त्याला.
अन यावेळी काकूच्या एकसष्टीच्या निमित्ताने जायचा योग आला होता नेहाला. विकास नंतर येणार होता.
'कोणी काही म्हणो, मी आईकडेच राहणार यावेळी. तू आलास की मगच घरी येणार.'
नेहानं आधीच जाहीर केलं होतं.
'अन साडीबिडी तूच घे आल्यावर. नाहीतरी मी घेतली तर नावंच ठेवतात त्या..'
तिचं सारं म्हणणं विकासनं अगदी विनातक्रार मान्य केलं होतं. एकतर उगाच वादविवाद नकोत म्हणून.. अन शिवाय काकूकडून नेहावर बराच अन्याय होत असल्याचं त्याला दिसत होतं...त्याची थोडीतरी भरपाई आपल्याकडून व्हावी हा प्रयत्न होता त्याचा.
नेहा नि सुमित भारतात गेल्यानंतर दोन आठवड्यांनी पोचलेल्या विकासला एकदम फुललेली, खुशीत असलेली भेटली नेहा. एकतर आईकडे राहिल्यानं छोट्या सुमितची जबाबदारी नव्हतीच. भरपूर झोप, मनासारखी खरेदी नि बर्याच दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणी या सार्याचा उत्साह तिच्या वागण्याबोलण्यातून जणू ओसंडून वाहत होता. तिला असं उत्फुल्ल बघून विकासलाही बरं वाटलं.
दोन दिवसांनीच एकसष्टीचा कार्यक्रम होता. साडीखरेदीसाठी सकाळीच दोघं बाहेर पडले. सुमित आजीजवळ राहणार होता.
मस्तपैकी नाटक बघून, हॉटेलात जेवून,मग आरामात खरेदी करून घरी जायचा बेत ठरला होता.
नेहाला आवडणार्या खास मराठमोळ्या थाळीची ऑर्डर देऊन दोघं निवांत बसले.
'कितीपर्यंत घेऊया ग काकूला साडी?'
मघापासून मनात खदखदणारा प्रश्न बाहेर पडला तसं विकासला बरं वाटलं.
'तूच ठरव. मला काय.. '
'नेहा, असं बरं नाही हं. जरा इन्टरेस्ट घेऊन बोल की.'
'........'
'काकूनं खूप केलंय ग माझ्यासाठी...'
'कितीदा तेच ऐकवणार आहेस मला? नेहमीच सांगतोस तू... अन मला? माझ्याशी त्या कशा वागतात हे काय तुला दिसलं नाही इतक्या वर्षात?'
नेहाचा राग पुन्हा उफाळून बाहेर आला.
'दिसतं मला नेहा..सगळं दिसतं. पण याच काकूनं माझ्यावर एकेकाळी जिवापाड माया केलीय ग. आईवेगळा म्हणून वाढलोच नाही मी कधी. उलट रवी, रंजनावर लावला नाही इतका जीव तिनं मला लावलाय ग. मी लहान होतो तेव्हा खूप आजारी झालो होतो. टायफॉईड झाला होता मला. अप्पा नि भाऊकाकांनी तालुक्याहून डॉक्टर आणला होता. त्यानंही हात वर केले होते. काकू मात्र रात्रंदिवस उशाशी बसून होती. तिच्या लेकरांना गडीमाणसांवर सोपवून....'
विकासचा गळा भरून आला.
'तापाच्या ग्लानीतून मला एकदा अर्धवट जाग आली... तर नेहा, काकू आईच्या फोटोजवळ बसली होती. रडत होती नि म्हणत होती, 'वहिनी, लेकरू ओटीत घातलंत... ते नेऊ नका हो...'
'माझ्यासाठी मला खास आवडतं म्हणून चांदीच्या वाटीत दही विरजणारी काकू, माझ्या वाढदिवसाला तापात चक्कर येत असतानाही माझी आवडती खांडवी करणारी काकू, भाऊकाकांच्या खिशातून रविनं पैसे चोरले नि माझ्यावर आळ घेतला तेव्हा रागानं लालेलाल होऊन त्याला चिंचेच्या फोकानं मारणारी काकू....किती रूपं आठवू या काकूची...आई तर अजाण वयातच गमावून बसलो ग...पण ही दुसरी माझी आईच आहे नेहा... ती तुझ्याशी असं वागते त्यात असलाच तर तिच्या वयाचा दोष नि बरंच काही घालवून बसल्याचा उद्वेग आहे...'
'घालवून बसल्याचा? म्हणजे?'
'मी तिचा सगळ्यात लाडका होतो नेहा. रवी तिच्याशी कधी धड वागलाच नाही. आताही तो नि जूली तिच्याशी कसे वागतात ते तू बघतेसच. रंजना बिचारी डोक्यानं हल्लक. माझ्यावर तिच्या सगळ्या आशा असल्या तर नवल नाही. त्यात मीसुद्धा परदेशात जायचा निर्णय घेतला. म्हातारपणी ती अगदी एकटी झालीय ग. कुठेतरी मनाला वाटत असेल का ग तिच्या.. की पोटच्या पोरापेक्षा याला माया लावली मी... नि आज मला सोडून गेला हा म्हातारपणात.'
'हे तिचं वागणं, तिची चिडचिड, तुझ्यावर काढलेला राग या कशाचंच समर्थन नाही करायचं मला. ते योग्यच नाहीय. ..पण सगळ्यात जास्त तिच्या मायेचा वाटा मिळवलाय मी एकेकाळी...मग आता सगळ्यात जास्त तिला मीच समजून घ्यायला नको का?'
'आयुष्यभर उन्हाची ऊब अनुभवल्यावर काही कारणानं ते ऊन कमी व्हायला लागलं, तरी त्या उन्हाचा एखादाच वाट्याला येणारा कवडसा जपून ठेवायचा असतो राणी काळजाशी. पुढच्या वाटचालीसाठी सोबत म्हणून...'
एका दमात सारं बोलून झाल्यावर विकास थांबला. नेहाच्या कपाळावरच्या आठ्या अजूनच गडद झाल्या असतील या अपेक्षेनं त्यानं तिच्याकडे बघितलं. तिचा चेहरा कमालीचा शांत होता. किंचितसा विचारात गढल्यासारखा.
'रागावलीस नेहा?'
नेहानं काहीच उत्तर दिलं नाही. जेवण उरकून, दोघं बाजाराच्या रस्त्याला लागले तरीही ती काही बोलायच्या मूडमधे नव्हती. विकासला भयंकर अस्वस्थ वाटत होतं. हा इतका शांतपणा म्हणजे ती प्रचंड चिडल्याचं लक्षण हे त्याला नऊ वर्षात सवयीनं ठाऊक झालं होतं.
'या या साहेब...काय दाखवू?'
दुकानदारानं तोंड भरून स्वागत केलं.
विकास काही बोलण्याआधीच सराईत गिर्हाईकासारखं ठसक्यात खाली बिछायतीवर बस्तान बसवीत नेहानं फर्मान सोडलं...
'पैठणी दाखवा बरं. अन छान गडद रंग काढा. एकदम गोर्यापान आहेत माझ्या सासूबाई....'
तिरप्या नजरेनं विकासकडे बघणार्या तिच्या गोबर्या गालांवर सांडलेलं हसू बघून विकासला समोरच्या दुकानदाराच्या उपस्थितीचा एक क्षणभर भयंकर राग आला.
-समाप्त
'
'आयुष्यभर
'आयुष्यभर उन्हाची ऊब अनुभवल्यावर काही कारणानं ते ऊन कमी व्हायला लागलं, तरी त्या उन्हाचा एखादाच वाट्याला येणारा कवडसा जपून ठेवायचा असतो राणी काळजाशी. पुढच्या वाटचालीसाठी सोबत म्हणून...'
सुंदर! फार लोभसवाणा आहे कवडसा..
हे दोन
हे दोन पिढ्यांमधलं अंतर म्हातार्या माणसांना नसेल येत ओलांडता. शरीर नि मन दोन्हीही थकलं असतं त्यांचं....पण नव्या दमाच्या लोकांनी तरी ते पार करून जावं नेटानं.. उगाच लागणार्या ठेचांचा बाऊ करू नये...'
'हे तिचं वागणं, तिची चिडचिड, तुझ्यावर काढलेला राग या कशाचंच समर्थन नाही करायचं मला. ते योग्यच नाहीय. ..पण सगळ्यात जास्त तिच्या मायेचा वाटा मिळवलाय मी एकेकाळी...मग आता सगळ्यात जास्त तिला मीच समजून घ्यायला नको का?'
'आयुष्यभर उन्हाची ऊब अनुभवल्यावर काही कारणानं ते ऊन कमी व्हायला लागलं, तरी त्या उन्हाचा एखादाच वाट्याला येणारा कवडसा जपून ठेवायचा असतो राणी काळजाशी. पुढच्या वाटचालीसाठी सोबत म्हणून...'
********कथा आवडली. अशी समजुतदार माणस विरळ असली तरी ती आहेत्....तुमच्या कथामधुन भेटतात्......सुरेख...लिहत रहा.......
छान आहे
छान आहे कथा... संवाद तर खूपच छान लिहिले आहेत...
सुमॉ, किती
सुमॉ, किती दिवसांनी बाई?
****'आयुष्यभर उन्हाची ऊब अनुभवल्यावर काही कारणानं ते ऊन कमी व्हायला लागलं, तरी त्या उन्हाचा एखादाच वाट्याला येणारा कवडसा जपून ठेवायचा असतो राणी काळजाशी. पुढच्या वाटचालीसाठी सोबत म्हणून...' *****
हे असं आतलं भिडणारं तूच लिहावस...
(नवीन वर्षाच्या तुला आणि तुझ्या जिवलगांना अतीव सुख्-समाधानाचे जावो, बाये)
सुमॉ, तुझ्य
सुमॉ,

तुझ्या कथेतले लोक नेहमी विचार करुन वागणारे समजुतदार निघतात, ही कथा पण त्याला अपवाद नाही.
संवाद नेहमीसारखेच छान. कथा आवडली.
नेहा काय विचार करतेय हे दाखवले असतेस तर तिच्या वागण्यातला बदल नैसर्गिक वाटला असता. इथे ती नवर्याचे पटले म्हणुन बदलली की आता पटवुन घेतल्याशिवाय काही इलाज नाही असा विचार करुन म्हणुन बदलली हे कळत नाही (म्हणजे मला कळले नाही). अर्थात एन्ड रीझल्ट ती बदलली असा आहे, कुठल्या मार्गाने हे त्या नंतर.
कथा आवडली,
कथा आवडली, ती त्यातल्या विकास नि नेहा मुळे...पण खरचं मनातील अढी अशी पटकन निघून जातात क????
संवाद नि सोपी पण मार्मक भाषा खुप छान व्वपरले आहे... =================================================
Write your Sad times in Sand, Write your Good times in Stone.
--GEORGE BERNARD SHAW
सुमॉ खुप
सुमॉ खुप दिवसांनी टाकलीत कथा. खुपच आवड्ली. अजुन टाकत राहा. तुमच्या अशा कथांची खुप आवश्यकता आहे आजच्या पिढिला.
खुप छान
खुप छान आहे कथा. खुपच छान.
सागर आढाव
औरंगाबाद.
अरे वा ,
अरे वा , बरेच दिवसांनी सुमॉकथा...!
नेहमीप्रमाणेच छान. अशी समजुतदार माणसं फक्त कथेतच असतात का खरीही भेटतात तुम्हांला?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही शुभेच्छा!
आयुष्यभर
आयुष्यभर उन्हाची ऊब अनुभवल्यावर काही कारणानं ते ऊन कमी व्हायला लागलं, तरी त्या उन्हाचा एखादाच वाट्याला येणारा कवडसा जपून ठेवायचा असतो राणी काळजाशी. पुढच्या वाटचालीसाठी सोबत
सुमॉ........ हे मात्र अगदी तुझंच वाक्य हं
तुझी पात्रं फार समंजस असतात गं........खूप खूप छान !!
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना. आणि नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छापण.
प्राची, अगदी असतात अशी समजूतदार माणसं जगात. फार दूरचं कशाला सांगू...माझी आईच अशी एक सून आहे त्यातली. माझी आजी... म्हणजे तिची सासू या दोघींचेही वाद व्हायचे. कधीकधी तर इतकं टोचून बोलायची आजी. की आम्हा मुलींना वाटायचं, आई उत्तर का देत नाही?
पण आई नेहमीच म्हणायची, 'नवर्याच्या(आजोबांच्या) माघारी कठीण परिस्थितीत त्यांनी मुलं वाढवली. एक प्रकारे तपस्विनीसारखं आयुष्य जगल्या. आता या वयात कशाला दुखवायचं? दुर्लक्ष करायचं झालं..'
कधीकधी रडूनही द्यायची आई आजीच्या बोलण्यानं. पण यावर कुणाचा विश्वास बसो न बसो, मृत्युच्या दोन दिवस आधी आजीनं आईला जवळ बोलावलं नि म्हणाली, 'बेटा, माझा आशिर्वाद आहे....आयुष्यात कधी कमी पडायचं नाही तुला...'
आजही आईच्या आयुष्यात काही चांगलं झालं की आई म्हणते, 'त्यांच्या आत्म्यानं नेहमी आशिर्वादच दिले मला...म्हणून आज माझं सगळं ठीक झालं...'
अर्थात प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीतून जातो, प्रत्येकाचा स्वभाव, आलेले अनुभव हे व्यक्तिसापेक्ष असतात. त्यामुळे समजूतदारपणाची व्याख्या ही देखिल प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते.
खूप आवडली
खूप आवडली कथा.
सुरेख जमली
सुरेख जमली आहे कथा सुमॉ! सगळे संवाद, पात्रांचे विचार छान मांडले आहेस. शेवटचे वाक्य पण छान आहे.

खूप दिवसांनी कथा लिहिलीस, पण 'देर आये दुरुस्त आये'
छानच गं सु.
छानच गं सु. मॉ.!
छान! 'आयुष्
छान!
'आयुष्यभर उन्हाची ऊब अनुभवल्यावर काही कारणानं ते ऊन कमी व्हायला लागलं, तरी त्या उन्हाचा एखादाच वाट्याला येणारा कवडसा जपून ठेवायचा असतो राणी काळजाशी. पुढच्या वाटचालीसाठी सोबत म्हणून...'
>>>> हा डायलॉग अगदी 'सुमॉ स्पेशल'!!
काय सुमॉ
काय सुमॉ बरेच दिवसांनी.
ह्म्म... मस्तच रंगवलय.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
मी जर चुकत
मी जर चुकत नसेन तर तुमच्या मोठ्या जावेची कथाही तुम्ही लिहिली होती. अशी माणसं तुमच्या आसपास आहेत.. खरंच खुप भाग्यवान आहात तुम्ही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही शुभेच्छा!
आवडला
आवडला कवडसा.
खरंच अशी माणसं बदलताना पाहिली आहेत मी. पण त्यावेळेस वाटतं, की हे किती दिवस टिकणार? की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न?
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
सुमॉ,
सुमॉ, तुझ्या गोष्टी नेहेमी +ve note वर संपतात. मला पुष्कळदा वाटतं की लेखकाच्या लिखाणावरून त्याची मानसिकता कळते. तुझ्या पात्रातला चांगुलपणा तू उलगडतेस. आणि कुठेतरी त्याचा +ve impact वाचकावर होतो. अशीच लिहित रहा.
मी अर्च
मी अर्च च्या मताशि सहमत आहे ....
मस्त कथा आहे
सुमॉ, तुझ्य
सुमॉ,
तुझ्या कथा मला खुप आवडतात. त्या नेहमीच जीवनाकडे सकारत्मक दृष्टीकोनातून पहायला शिकवतात. आर्चला अनुमोदन.
हे दोन पिढ्यांमधलं अंतर म्हातार्या माणसांना नसेल येत ओलांडता. शरीर नि मन दोन्हीही थकलं असतं त्यांचं....पण नव्या दमाच्या लोकांनी तरी ते पार करून जावं नेटानं.. उगाच लागणार्या ठेचांचा बाऊ करू नये...'>>>> १००% खरय.
आपण त्यांच्यासाठी हे अंतर ओलांडायला सुरवात केली, हे का एकदा त्यांच्या ध्यानी आले की तेही धावुन येतात. माझी (ठम्मा) सासू आणि (आजी ) आजे सासू माझ्यासाठी हे सगळं अंतर पार करुन आल्या. आजी तर सगळे गप्पा मारायला बसले की मला त्यांच्या मांडीवर डोकं ठेवुन, केसातुन हात फिरवत झोपायला लावत. वरून म्हणायच्या दमली असशील, तू घे झोपुन, यांच्या गप्पा काय संपायच्यात?
(दुसरी आजे सासू) सासूची आई तशी खाष्ठ म्हणूनच प्रसिद्ध पण माझ्या वाट्याला नेहमीच त्यांचा मवाळपणा आला. मला तर त्यांनी गुळाच्या ठेपेची उपमा दिली एकदा. ठेपेला जसे मुंगळे चिकटतात तसे मला नातेवाईक चिकटतात म्हणे. त्यांचीही गणती त्या मुंगळ्यात होते.
खरच खुपच
खरच खुपच छान आहे कथा. परदेशी राहत अस्ल्यानि आणी भारतात अस्लेल्या नातेवइकान्चा असाच अनुभव अस्ल्यने , कथा खुपच जवळची वाटली.
एकदम मस्त--
एकदम मस्त-- हळवी कथा !!! मनापासुन आवडली......
मनाला पडलेल्या गाठी अशा सुटल्या वर, एकदम छान वाटतं...
---------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
"समजावणे
"समजावणे आणि समजुन घेणे "
खूप छान कथा!!!!!!!!!!
~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू
मस्त जमली
मस्त जमली आहे कथा... आवडली...
शिवाय, शेवटचं वाक्यही जबरदस्त!
>तिच्या गोबर्या गालांवर सांडलेलं हसू बघून विकासला समोरच्या दुकानदाराच्या उपस्थितीचा एक क्षणभर भयंकर राग आला!
मस्तच
मस्तच मस्त.
......................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
छान....
छान....
सुमा, छान
सुमा,
छान काळजाला भिडणारं लिहिलय.
कथा वाचताना मी विचार करत होतो - भारतात येताना कुणाला काय घ्यावं याचे खूप बरे-वाईट अनुभव असतील ना तुम्हा लोकांकडे? रुसवे-फुगवे आहेतच; पण वस्तु आणल्यानंतर ती वापरायची कुवत नसल्याने जर तिची हेळसांड झाली तर किती वाईट वाटत असेल! असो.
कथा मस्तच आहे.
शरद
.............................
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
............................
एकदम छान
एकदम छान कथा!
एकदम सुमॉ
एकदम सुमॉ स्टाईल! अशाच छान छान कथा येवु दे बर!
Pages