विषय क्र. २) कलाकार रिक्षावाले नाना

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 July, 2014 - 15:47

एखादी व्यक्ती जन्माला येते ती कलाकार बनूनच. असेच एक म्हणजे विश्वनाथ राघो पाटील उर्फ नाना!

नानांचा जन्म पनवेल तालुक्यातील उलवे ह्या गावातील एका अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात झाला. नानांना चार भाऊ. पण शिकण्याची आवड किंवा कला ही फक्त नानांमध्येच होती म्हणून गरीब परिस्थितीतही त्यांनी दहावी पर्यंत शिक्षणाची मजल मारली. शाळेतील पौराणिक नाटकांत नाना हिरीरीने भाग घ्यायचे. त्यात कधी राम तर कधी हनुमंताची वेषभूषा परिधान करून ते आपली भूमिका गाजवायचे. नानांच्या नकला करण्याने ते पात्र स्टेजवर जिवंत उभे राहत असे व टाळ्यांच्या गडगडाटात नानांचे अभिनंदन होत असे.

आपल्या गोठ्यातील बैल नाना डोंगरावर चरायला न्यायचे तेव्हा चाळा म्हणून ते मातीचे बैल, विविध प्राणी व गणपतीच्या मूर्ती बनवू लागले. आजूबाजूचे लोक नानांच्या ह्या कलाकृतींची प्रशंसा करू लागले त्यामुळे नानांना अजून प्रोत्साहन येऊन ते अधिकाधिक चांगली कलाकुसर करण्याचा प्रयत्न करू लागले.

गणपती विसर्जनानंतर तलावात जी चिकण माती किनार्‍याला येत असे त्यापासून एकदा नानांनी दुर्गादेवीची मूर्ती साकारली. नानांच्या मित्रांना, गावकर्‍यांना ती मूर्ती आवडली त्यामुळे लगेच सगळ्यांनी ह्या मूर्तीला रंगरंगोटी करण्याची कल्पना दिली. नानांनाही ही कल्पना फार आवडली व त्यांनी रंगसंगतीत नटलेली जणुकाही सजीव भासणारी दुर्गा मातेची मूर्ती ऐन नवरात्रीच्या दिवसांत प्रकट केली. लगेच नानांच्या आप्त परीवाराने त्यांना ह्या दुर्गा मातेची पुजा करण्याविषयी सुचविले. नवरात्रीचे दिवस तर संपत आले होते पण दसर्‍याच्या मुहूर्तावर नानांनी ह्या दुर्गा मातेची पुजा गावकर्‍यांसोबत केली व नाना हे अत्यंत अभिमानाने सांगतात की तेव्हापासून उलवा ह्या गावात नानांच्या हस्ते नवरात्रोत्सवाची स्थापना झाली ती अजून पर्यंत चालू आहे.

पहिल्यापासून नानांना लहान मुलांमध्ये मिसळायला फार आवडायचे. लहान मुलांशी खेळत, त्यांना कलाकुसरी दाखवत नाना गुंग व्हायचे. आपला शांत व मनमिळाऊ स्वभाव, तसेच आपल्या कलाकुसरीमुळे ते लहान मुलांचे तसेच इतरांचेही मन जिंकायचे.

दहावीनंतरच्या शिक्षणानंतर नानांनी उरण येथे आय.टी.आय. मध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. हे शिक्षण घेण्यासाठी नाना उरण मध्ये एका नातेवाईकांकडे राहत होते. नानांची गरिबी व त्यांचा प्रामाणिकपण, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द पाहून त्याने नानांना आपली रिक्षा चालवायला देऊन रोजी-रोटी कमाविण्याची संधी दिली. नानांच्या जीवनाला इथे महत्त्वाचे वळण मिळाले.

नानांना आधीच लहान मुलांची आवड! त्यामुळे ज्या कॉलनीत ते राहायचे तेथील बच्चेकंपनीला शाळेत सोडायची जबाबदारी आवडीने नानांनी स्वीकारली. कॉलनीतल्या पालकांनीही ही जबाबदारी अगदी निश्चिंत मनाने नानांवर सोपवली. तेव्हापासून ते आजपर्यंत नाना आपल्या रिक्षातून शालेय विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करतात.

काही वर्षातच थोडे पैसे जमा झाल्यावर नानांनी कर्ज काढून आपली स्वतःची रिक्षा घेतली. ह्यावेळी नानांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गरिबीतून वाट काढत आपले भाग्य रिक्षामार्फेत उजळवण्याचा केलेला हा नानांचा प्रामाणिक प्रयत्न होता व तो त्यांनी यशस्वी रित्या पार पाडला. आपल्या पंचवीस वर्षांच्या रिक्षा व्यवसायात त्यांनी तीन रिक्षांचे पालनपोषण करून दोन रिक्षांना सेवानिवृत्त केल्या आहेत. सध्या आपल्या तिसर्‍या रिक्षाला (टाटा मॅजिक) प्रेमाने जोपासून आपल्या व्यवसायासाठी, जनसेवेसाठी तिचा वापर करत आहेत. रिक्षावाले नाना म्हणून उरणमध्ये नानांची ओळख आहे.

सन १९८३ साली नानांचे लग्न झाले. एका सालस, हौशी, मनमिळावू, कष्टाळू, नानांवर जीवापाड प्रेम करणारी, नानांच्या मागे प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे उभी राहणारी अशी अर्धांगीनी, सौ. प्रतिभा पाटील, नानांना लाभली. प्रतिभा ताई नानांच्या नुसत्या बायको म्हणून संसार न करता खर्‍या अर्थाने नानांच्या कलेत त्यांना सोबत करून अर्धांगिनी असल्याचे सिद्ध करतात.

नानांची रिक्षा ही नेहमी टापटिप असते, नाना प्रत्येक मुलाची जातीने काळजी घेतात तसेच क्वचित एखादे वेळी होणार्‍या रिक्षाच्या तांत्रिक बिघाडाशिवाय मुलांना शाळेत पोहोचायला उशीर होत नाही म्हणून पालकही बिनधास्तपणे आपल्या मुलांचा शाळेचा प्रवास नानांवर सोपवतात.

आपल्या रिक्षाच्या व्यवसायाला नाना फक्त रोजगाराच्या चौकटीत न ठेवता लोकांची सेवाही करतात. शाळेतल्या मुलांची फी भरणे, मुलांच्या पालकांना बाजारातून आवश्यक वस्तू आणून देणे, पावसाळ्यात लहान मुलांना रेनकोट चढवण्यापासून बारीक सारीक कामे मुलांवर कधीही न रागावता, हसत मुखाने करतात. अपंग मुलांना उचलून रिक्षात बसवून ते शाळेत पोहोचल्यावर शाळेपर्यंत उचलून नेण्याची सेवाही नानांनी केली आहे. नानांच्या रिक्षात बसणारी मोठी झालेली, मार्गाला लागलेली दिसतात तेंव्हा नाना मनोमन धन्य होतात.

मुलांना शाळेत नेण्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या छोट्या सहलीसाठीही नानांची रिक्षा वापरली जाते. रविवारी नाना फक्त स्पेशल भाडे असेल तर घेतात किंवा एखाद्याच्या अडीअडचीणीसाठी तिचा उपयोग करतात. 'फक्त शाळेच्या मुलांची ने-आण करून तुमचे भागते का?' असे नानांना विचारले तेंव्हा अगदी समाधानी चेहर्‍याने नानांनी सांगितले, "हो. माझे शाळेतल्या मुलांना ने-आण करून मिळणार्‍या कमाईतून भागते." असे बोलणारी समाधानी व्यक्ती मी प्रथमच पाहीली. ते दिवसाला तीस फेर्‍या मारतात.

साधी राहणी, समाधानी वृत्ती व मर्यादित गरजांमध्ये आनंद मानणारे हे कुटूंब असल्याने, नाना रिक्षाच्या बळावर आपल्या रोजच्या गरजा भागवून पैसा शिल्लकही ठेवतात. हे पैसे ते नुसते जमा करून ठेवत नाहीत तर आपल्या दयाळू वृत्तीमुळे आपल्या आप्तांच्या अडल्यानडल्याला मदतीला धावून जातात. त्यांनी बर्‍याच जवळच्या माणसांच्या घरासाठी, धंद्यासाठी, लग्नासाठी बिनाव्याज पैसे पुरविले आहेत. त्यांचे काही पैसे बुडीत खात्यातही जमा झाले आहेत पण याबाबतही नाना उदासीन आहेत.

नाना आपली कला कायम जोपासत आले आहेत. लग्न झाल्यावर नाना उरण येथीलच मुळेखंड ह्या गावी भाड्याने राहत होते. त्यावेळी उरण येथील बोरी गावात नवरात्रीच्या दिवसांत गरबा स्पर्धा असते हे नानांना कळले. तेव्हा नानांनी स्वतःकरता व पत्नीकरता पुठ्ठ्याचे मुकुट बनवले व पत्नीला ओढणीचा साज चढवून राधा-कृष्णाचे गरबा नृत्य सादर केले. हे नृत्य पाहण्यासाठी खूप गर्दी जमली. अनेक मान्यवरांनी व तेथील उपस्थितांनी ह्या जोडप्याची प्रशंसा करून त्यांना पारितोषिक प्रदान केले. ह्या प्रशंसेनंतर नानांची कला अधिक बहरत गेली. तेव्हापासून नाना दरवर्षी ठिकठिकाणच्या नवरात्रोत्सवातील गरबा स्पर्धेमध्य भाग घेऊन वेगवेगळ्या वेषभूषा परीधान करतात. वेशभुषेमध्ये कुठल्याच बाबीची कमतरता नसल्याने व नानांचा उत्साह त्यात मिसळल्याने हुबेहुब वठलेली वेषभूषा पात्रात चैतन्य आणते. लोकांच्या नजरा आपोआप ह्या पात्रांवर खिळून राहतात.

वेषभूषेसाठी लागणारे सुदर्शन चक्र, गदा, मुकुट, तलवार, ढाल व अशा अनेक विविध वस्तू नाना टाकाऊ सामानातून व थर्माकोलचा आधार घेऊन स्वतः मेहनत करून बनवतात. शंकर-पार्वती, लक्ष्मी-नारायण, राधा-कृष्ण, हनुमान, राम-सीता, गाडगेबाबा, शिवाजी महाराज, वासुदेव, गारूडी अशा अनेक वेषभूषा नानांनी आतापर्यंत केल्या आहेत. नानांनी पुंगी वाजवण्याचीही कला आत्मसात केली आहे.

(खालील फोटो नानांच्या परवानगीने इथे देत आहे.)

नाना म्हणतात की फक्त साईबाबांची वेषभूषा बाकी आहे. इतर सगळ्या देवी-देवतांच्या वेषभूषा केल्या आहेत. उरणचे वेषभूषा कपल म्हणून हे पतिपत्नी उरणमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांना मान्यवरांनी ठिकठिकाणी अनेक पारितोषिके मिळाली आहेत. एकापेक्षा अधिक वस्तू रुपाने मिळणारी घड्याळे, लेमन सेट, कपसेट सारख्या वस्तू नाना इतर लोकांना भेट म्हणून देतात. नानांची घरची शोकेस विविध आकाराच्या ट्रॉफ्यांनी भरलेली आहे. त्यांचे एक कपाट व सोफ्याचा कप्पा वेषभूषेच्या साहित्याने भरलेला आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उरणला आलेले नाना पाटेकर, प्रदिप पटवर्धन, पुष्कर क्षोत्री यांसारख्या दिग्गज कलाकारांनी नानांचा गौरव करून त्यांना सिनेमा-नाटकात कामाची संधी देण्याचे आश्वासनही दिले. परंतू त्यातून आपले कायमस्वरूपी भागणार नाही ह्या भविष्य चिंतेने नानांनी आपल्या प्रसिद्धीवर पाणी सोडले. नानांच्या वेषभूषा केलेले अनेक फोटो व बातम्याही लोकल वर्तमानपत्रे व मासिकात छापून येतात. पण नानांच्या बोलण्यात कधीच त्याबाबतचा गर्व जाणवत नाही.

नानांनी ही कला इतकी आत्मसात केली आहे पण फक्त स्वतःपुरतीच मर्यादित ठेवलेली नाही. ते शालेय मुलांच्या वेषभूषेसाठी व इतर सार्वजनिक कार्यक्रमासाठीही मुलांना तसेच मोठ्यांनाही वेषभूषा करून मेकअप करून देतात. त्यांनी वेशभुषा केलेल्या प्रत्येक पात्राला बक्षिस मिळालेले आहे. सुरुवातीला ते ही कलेची सेवा विनामुल्य करत होते पण मेकअप साठी लागणारे सामान हे महाग होते त्यामुळे केवळ पन्नास रुपये घेऊन ते हुबेहुब वेषभूषा साकारून द्यायचे. आताही ते नाटकांना, वेषभूषा स्पर्धेसाठी अगदी क्षुल्लक रकमेवर वेषभुषेचे सामान भाड्याने देतात. काही अगदीच गरीब व आप्तांकडून नाना त्यांच्या कलेचा मोबदला घेत नाहीत अशा वेळेस हे आप्त कुठल्या ना कुठल्या सुदाम्याच्या भेटीच्या स्वरूपात नानांवरील कृतज्ञता व्यक्त करतात. नानांना शाळेतही स्नेहसंम्मेलन व कोणत्याही वेषभूषेच्या कार्यक्रमाच्या दिवशी मेकअपसाठी बोलावले जाते. अशा प्रकारे नाना आपली कला जोपासत आपल्या कलेची सेवाही करतात.

खुप लोकांनी नानांना वेषभूषेच्या साहित्याचे दुकान काढण्याविषयी सुचविले. पण दोन दगडावर पाय दिल्यावर कुठल्याही एका दगडाला न्याय न मिळता दोन्ही दगडांवर अन्याय होतो, म्हणून नानांनी आपल्या रिक्षाच्या व्यवसायासोबत प्रामाणिकपणा दाखवला आहे.

"मी कोणाचेही काही वाईट केले नाही, इतके वर्षे लहान मुलांची सेवा करत आलो आहे, जनतेची सेवा करत आलो आहे, कोणाचे वाईट चिंतले नाही त्यामुळे माझ्या बाबतीत नेहमीच चांगले घडत आले आहे" हे अगदी प्रसन्न चित्ताने नाना सांगतात.

नानांनी एक स्वतःचे घर विकत घेतले आहे. नानांना काही वर्षापूर्वी कॅन्सरचा भयानक आजार झाला होता त्यातूनही ते ईश्वरी चमत्काराप्रमाणे पूर्णपणे बरे झाले आहेत. नानांना एक मुलगा आहे. त्याला नानांनी ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण दिले आहे. तो आता एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. त्याला एक सुलक्षणी, सालस बायको आहे. ही सून देखील आपल्या सासू-सासर्‍यांच्या या कलाप्रेमाचा आदर राखते. घरात नानांची दीड वर्षांची नात दुडूदूडू पावले टाकते. तिच्या आगमनाने नानांच्या जीवनात आनंदी रंगांची उधळण झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच नानांच्या व त्यांच्या पत्नीच्या आग्रहाखातर मी व माझ्या पतीने नानांच्या घराला भेट दिली. नानांच्या पुर्ण कुटूंबाने हसतमुखाने आमचे स्वागत केले. स्वतःच्या कलेचा परीचय करून देताना नाना व त्यांची पत्नी भरभरून बोलत होते. आपली बक्षिसे आठवणींच्या झुळूकेवर कधी, कुठे, कोणी दिली हे सविस्तर सांगतांना नानांचा आनंद चेहर्‍यावर झळकत होता. मिळणारी प्रशंसापत्रे व फोटो व नानांच्या वेषभुषेच्या बातम्या आलेली वर्तमानपत्रे दाखवता नानांच्या पत्नीला आपल्या नवर्‍याचे किती कौतुक आहे हे जाणवत होते. नानांकडे त्यांनी वेषभूषा साकारलेल्या फोटो़ंचे तीन आल्बम आहेत. हे फोटो पाहताना व त्याचे फोटो काढताना कुठला, कुठला घेऊ अशी माझी अवस्था झाली होती.

तर असे हे उरणचे बच्चाकंपनीचे आवडते, वेषभुषेचे अनोखे कारागीर नाना आपली कला नुसती जपत, त्यावर प्रेम करत नाहीत तर ह्या कलेला आपल्या अंगा-खांद्यावर नांदवत आहेत. ह्या कलेमार्फत, व्यवसायामार्फत नानांचे दयाळू, परोपकारी, कष्टाळू, प्रेमळ, समाधानी असे विविधरूपी व्यक्तिमत्व दिसून येते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु कोकणातली माणसे हरहुन्नरी असतात हेच खरे. मला खूप आवडते कोकण आणी तेथिल माणसे, निसर्ग सगळेच.

मस्त व्यक्तीचित्रण केलेस नानान्चे. त्यान्चे फोटो जरा राजा मयेकर आणी एक अशाच कोकणी व्यक्तीचित्राशी साधर्म्य दान्गते, पण दुसरे कोण ते मला आठवत नाही.

किती साधे पण संपन्न व्यक्तिमत्व !
>>आपल्या रिक्षाच्या व्यवसायाला नाना फक्त रोजगाराच्या चौकटीत न ठेवता लोकांची सेवाही करतात. शाळेतल्या मुलांची फी भरणे, मुलांच्या पालकांना बाजारातून आवश्यक वस्तू आणून देणे, पावसाळ्यात लहान मुलांना रेनकोट चढवण्यापासून बारीक सारीक कामे मुलांवर कधीही न रागावता, हसत मुखाने करतात. अपंग मुलांना उचलून रिक्षात बसवून ते शाळेत पोहोचल्यावर शाळेपर्यंत उचलून नेण्याची सेवाही नानांनी केली आहे.>>
सलाम त्यांना.छान लिहिलेय जागू.

Pages