सुख थोडं दु:ख भारी दुनिया ही भलीबुरी - "द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज"

Submitted by आशूडी on 24 June, 2014 - 15:09

अरुंधती रॉय यांच्या 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या बुकर अ‍ॅवॉर्ड विजेत्या पुस्तकाचा अपर्णा वेलणकर यांनी केलेला अनुवाद (हो, मी अनुवादच वाचते. चंपकइतक्या जाडीची पुस्तकं अजून इंग्रजीतून वाचली नाहीत त्यामुळे उत्तम साहित्य वाचायचं तर सध्या भिस्त उत्तम अनुवादकावर आहे खरी.) वाचला आणि अक्षरशः झपाटून गेले. पुस्तक संपलं तेव्हा आता करण्यासारखं उरलंच काय! अशी चुटपूट मनाला लागून राहिली. एवढ्या नितळ पारदर्शी पुस्तकाबद्दल लिहायला हवंच पण तेवढी आपली पोच नाही याची प्रामाणिक जाणीव मनात होती, आहे. सकाळचा विचार रात्रीपर्यंत टिकला तर लिहायचं असं ठरवलं होतं. तेव्हा मायबोलीवर या पुस्तकाबद्दल झालेली इथली http://www.maayboli.com/node/2685?page=50 चर्चाही वाचून काढली आणि मग लिहावंसं वाटलंच.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभिप्राय वाचूनच दडपायला होतं. केरळमधली गोष्ट. कुठलाही स्थलकालाचा हिशेब न मांडता तेवीस वर्षांच्या कालखंडात स्वैर बागडते. पांढर्‍या कोर्‍या जागा वाचकाला शहाणे करुन सोडतात. कुठून कुठे आलो, ओव्हर टू ... , बॅक टू .. फटाफट खिट्ट्या पडतात रुळांचे सांधे बदलले जातात गाडी या पट्टीवरुन त्या पट्टीवर कधी गेली ते प्रवाशाला समजतही नाही आणि हळूच समजते पण.

दोन चिमुकल्यांच्या भावविश्वाची कहाणी. ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन, नथिंग इज फिल्मी सगळं सगळं एका दमात वाजवून खरं करुन दाखवणारी कहाणी. शोकांतिका; पेक्षा शोकसोहळा. वाचता वाचता कुठून तरी करुण सूर कानावर येऊ लागतात आणि ते शेवटपर्यंत पिच्छा पुरवतात. अनाम दु:ख हळूहळू घेरत जातं. तुम्ही आधीन होता त्याच्या. नियतीच्या मनात नेहमीच काहीतरी वेगळं का असतं? माणसं अशी का वागतात? सनातन प्रश्नांना कधीच उत्तरं नसतात. पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. ती कोण ठरवतं? जेवढा अपराध तेवढीच शिक्षा (पाहिजे, पण होत नाही तसं!). दोन जुळ्यांचं भावविश्व ज्या अजब रितीने गुंतलेलं असतं ते पाहून डोळे विस्फारतात. स्वच्छंद बालपणाला शिस्तीचं कुंपण घातलं तरी निरागसता उमलून येतेच. पानापानावर होणारा गोंडस कोवळ्या बाल्याचा मुक्त आविष्कार पाहून मन मुग्ध होतं आणि या बिचार्‍यांना पुढे काय सोसावं लागणारे या कल्पनेने विद्धही. इस्था आणि राहेल यांची वर्णनं वाचताना, त्यांची गोड गोड गाणी ऐकताना, त्यांचे 'उद्योग' बघताना हसू फुटतं. केसांचा कोंबडा = इस्था आणि 'लव्ह इन टोकियो' दोन मणी लावलेलं डोक्याचं कारंजं = राहेल (डम डम.) हे समीकरण पक्कं लक्षात राहतं - राहेलच्या प्लॅस्टिकच्या घड्याळावर एकदाच पक्की वेळ चिकटवलेली असते तसं - दोनला दहा कमी! त्या दोघांचं ते अबोध वय हा संपूर्ण कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. फक्त आणि फक्त, ते लहान असतात म्हणून असं सगळं घडतं!

केरळचं उतू जाणारं पावसाळी हिरवं ओलं कच्चं निसर्गसौंदर्य, गुण्गुण्णारे कीडे, टकमक बघणारे पक्षी, खारवलेल्या लोणच्यांचा तिखट आंबट वास, साउंड ऑफ म्युझिक मधलं गोड गोड चित्रण ( जे फक्त सिनेमातच असतं असं इस्था राहेलला समजतं) पावसाच्या गूढ पार्श्वसंगीतावर तोललेलं संपूर्ण घटनाचक्र. सख्ख्या नात्यांची गुंतागुंतीची वीण, स्वार्थ, असूया, हेवा, वरवरचं प्रेम, निर्व्याज प्रेम, माया समाजकारण आणि राजकारणाचे (उगीचच) व्यक्तिगत आयुष्यांवर झालेले परिणाम, फक्त एकेका चुकीच्या निर्णयाने उद्ध्वस्त झालेली वैराण आयुष्यं (मग ते पाप्पाचींच्या 'पतंगा'चा चुकीचा निवाडा असो की शिक्षणासाठी ऑक्स्फर्डला गेलेल्या चाकोने लग्न करुन बसणं असो की सोफी मॉलनं इस्था आणि राहेलच्या सोबत जाण्याचा हट्ट असो की अम्मूनं एकदाच आपल्या मनाची ऐकलेली हाक असो! ) प्रत्येक पात्र यथास्थित उभं करण्यासाठी लेखिकेने दहा दहा पानांचा ऐवज वापरला आहे आणि म्हणूनच हे सारं डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडत आहे इतकं चित्रदर्शी होऊन जातं. (मला तर बेबी कोचम्मा म्हणजे उषा नाडकर्णी आणि अम्मू म्हणजे नीना गुप्ता अगदी ठसठशीत दिसल्या. आणि वेलुथा कदाचित नसीरुद्दीन शाह) या कहाणीत पाझरणारी माया आहे, उसनं अवसान आणलेलं, मनापासून केलेलं, उत्कट, जन्मजात, निरपेक्ष अशा अनेक छटांचं प्रेम आहे, अधीर शृंगार आहे, अश्रूपात आहे, ज्यांना उफराटी उत्तरं मिळतात असे क्षुल्लक प्रश्न आहेत, यात नाट्य आहे, कपट आहे, क्रौर्य आहे, पराभव आहे आणि अखेर स्वतःच स्वतःला माफ करावं लागतं हे तात्पर्यही! मोठ्यांच्या मोठ्या जगात गुपचूप आपली अनेक छोटी छोटी जगं निर्माण करण्याचं इस्था आणि राहेलचं सामर्थ्य.. पाण्यावर वाहून गेलेली, पृथ्वीच्या पोटात रुतलेली, गाडलेली, वार्‍यासवे उडत गेलेली त्यांची लाखमोलाची गुपितं.. या सार्‍यात आपण गुंगून जातो. 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' - छोटे छोटे आनंद.. आयुष्यभर सुखाची पखरण करण्याची शक्ती असलेली इवलाली बीजं.. आपल्या ड्रॉवरमध्येही आपल्या पूर्वायुष्यातले असे क्षण गोठवून ठेवलेले दिसतात कधी कधी.. हीच बीजं क्रूरपणे उधळली गेली तर होणार्‍या नुकसानाची भरपाई शक्य नाही! द गॉड ऑफ लॉस! अपराध छोटा,शिक्षा मोठी.

इस्था आणि राहेलसाठी लेखिकेने लिहीलेले छोटे छोटे पण नंतर मोठे होऊन बसलेले तपशील हे या कादंबरीचं बलस्थान आहे. एखादी गोष्ट या दोघांच्या मनात पक्की ठरली की नंतर मनातल्या मनात म्ह्टलेलं 'डम डम' कायमचं लक्षात राहणार आहे. खूप घाबरल्यावर, ओरड्याच्या शिक्षेच्या भीतीला पळवून लावण्यासाठी म्हटलेली गाणी अतिशय गोड आहेत. कंसातली वाक्यं, अधोरेखन, बोल्ड, इटालिक टाईपचा वापर जे म्हणायचं आहे ते बरोब्बर पोचवतो. वेलुथाला पाहून फुलून येणारी राहेल अगदी आजूबाजूला बागडते आहे असं वाटतं. मानवी भावभावनांचा निर्वाणीच्या क्षणी कसा कस लागतो आणि शेवटी घाणेरड्या तेलासारखा तवंग धरुन स्वार्थच कसा वर येतो हे शेवटच्या काही प्रसंगात बेमालूमपणे दाखवले आहे. सुरुवातीपासून ओरडून ओरडून शेवट सांगत राहूनही शेवटी शेवट येतो तेव्हा घालमेल होते. कोणतेही धक्कातंत्र न वापरता, वाचकाला नक्की काय घडलं होतं तेव्हा? ते पडदा बाजूला करुन नीट दिसतं. सगळे संदर्भ लागतात, तपशील जुळतात. अनपेक्षित असं काहीच नसतं तरीही असं कसं झालं? हा प्रश्न पडतोच. घराच्या अंतर्गत राजकारणाला फुकट मिळालेले मार्क्सवादाचे, जातीयतेचे अस्तर लागते आणि भलतीच क्रांती घडून नीट घडी बसलेल्या घराची कल्पनातीत उलथापालथ होऊन झालेली वाताहत हताश करते.

प्रेम कुणी कुणावर करावं, किती करावं, कसं करावं याचे खरंच जगाने घालून दिलेले कायदे आहेत हे लख्ख जाणवतं - जेव्हा ते नियम मोडल्याची काय जबर शिक्षा असू शकते हे दिसतं तेव्हा. नियतीचे अपरिहार्य पाश आवळले जात असताना, पानापानातून शोक ठिबकत असताना शेवट कळून चुकतो तरीही तिथपर्यंत पोहोचायचे धाडस होत नाही. आयमेनेम हाऊसभोवती तेवीस वर्षं कोसळणार्‍या सरींनी भिजलेल्या झाडोर्‍यातलं प्रत्येक ओलं पान या पुस्तकाच्या पानात अवतरलं आहे. भिजलेल्या नोटेगत त्यातल्या दु:खाचं मोल जपावं..पुस्तकाच्या पानांतून अडकलेल्या इस्था आणि राहेलला पटकन बाहेर ओढून घ्यावं आणि छातीशी धरुन त्यांचे मुके घ्यावेत, त्यांना शेवटापासून दूर दूर न्यावं असं वाटत राहतं. पण तसं होणार नसतं! कारण प्रेम कुणी कुणावर करावं, किती करावं, कसं करावं याचे खरंच जगाने घालून दिलेले कायदे आहेत!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता-प्रीतिशी सहमत थोडीफार.
चिन्मय, तुला असं म्हणायचंय का की हुबेहुब मूळ भाव,छटा शक्य असूनही त्या आणण्यात अनुवादक कमी पडला? वर चर्चा झाली त्याप्रमाणे काही गोष्टी नाहीच उतरत जशाच्या तशा. निसटतच काहीतरी. पण 100% अनुवाद वाटावा म्हणून ओढूनताणून केलेलं लेखन रूक्श, परकं वाटलं तरी तसंच लिहायचं? मूळ वाचायची शक्यता जिथे कमी (म्हणून तर अनुवादाची गरज आणि जन्म!) तिथे काय करायचे?

आशू,
नाही. अनुवादक कमी पडला तरी हरकत नाही. मूळ लेखनात नसलेलं लेखन भावानुवाद म्हणून खपवण्याबद्दल माझा आक्षेप आहे. त्यापेक्षा अनुवादकानं स्वतंत्र लेखन करावं. Happy

अप्रतिम पुस्तक परिचय, आशूडी.अगदी प्रेमात पडून अपरिहार्यपणे लिहावं असं होतं खरं.ती त्या पुस्तकाची शक्ती असते.
अनुवादाबद्दल Happy आपण इंग्लिश-मराठीबद्दल मुख्यत्वे बोलत आहोत पण ( उदा.) सगळं रशियन साहित्य आपण इंग्लिश अनुवादांमधूनच वाचले एरवी या विशाल उपखंडाचं खास युरेशियन मन आपल्यासमोर उघडलं गेलंच नसतं. अज्ञात भाषांमधली साहित्यशिल्पं अनुवादातूनच समोर येतात.चित्रपटाला एक चित्रभाषा तरी असते .. शब्दसृष्टीला अनुवादाचा उ:शाप आहे.
तळमळीने केलेला अनुवाद एक समांतर प्रातिभ निर्मिती असू शकते. तरीही भावानुवादापेक्षा अर्थानुवादाच्या चौकटीत राहून कलाबीज दुसऱ्या भाषेत वाहून नेणं अनुवादकाराचा खरा कस दाखवतं असं मला वाटतं .आपल्या भूमिकेच्या मर्यादेत राहून त्यापलिकडे जाण्यातली मजा..

इथे वाचून मी लगेच लायब्ररीतून क्लेम लावून मिळवलं खरं, पण ७०,७५ पानं झाली तरी गोष्ट काही सरकत नाहीये असंच वाटतंय. अनावश्यक डिटेल्समध्ये पानंच्या पानं भरली आहेत असंही वाटलं.
त्यामुळे पूर्ण न वाचताच परत करून टाकेन असं वाटतंय. मोकळ्या वेळात पुस्तक समोर असून हातात धरावंसं वाटत नसेल तर कठीणच आहे.

सायो Happy मी वर दिलेल्या लिंकमध्ये ललिता-प्रीति, अश्विनीमामींशिवाय कुणालाच ते पुस्तक आवडलं नसल्याचं दिसेल. होऊ शकतं असं.

सायो, मी तर म्हणेन चवी चवीने रोज दोन तीनच पाने वाचा. पण परत करू नका. जरा स्टाइल वेगळी आहे. इंग्लिश ब्रिटिश इंडियन धर्तीचे आहे त्याला केरळा फोडणी आहे. डम डम.

मी बर्याच पूर्वी इंग्रजीतलं पुस्तक वाचलंय. ती कथा तितकीशी आवडली नाही आणि त्यातल्या पात्रांची तसं वागण्यातली अपरिहार्यता काही तितकीशी कळली/जाणवली नाही. पण लेखनाची शैली खूप आवडली होती. छोट्या छोट्या वाक्यांतून केलेली वातावरण निर्मिती, लहान मुलांचं भावविश्व छान उभं केलं आहे. सगळं आठवत नाही, पण एक प्रसंग... खरतर प्रसंग आठवत नाही, पण त्याचा परिणाम त्या लहान मुलीच्या मनावर मोठ्ठ दडपण येतं. त्याचं वर्णन लेखिकेने मस्त केलं आहे. "एक मोठ्ठ फुलपाखरू तिच्या हृदयावर येऊन बसलं आणि हळूहळू पंखांची उघडझाप झाली." त्याच्या नंतर बर्याच प्रसंगात जेव्हा जेव्हा ती मुलगी घाबरते, तेव्हा त्या फुलपाखराच्या पंखाची उघडझाप होते. एका लहान मुलीच्या मनाची घालमेल मस्त दाखवलीय.

ते पापाचीज मॉथ. एक इन्सेक्ट जो तिच्या बाबांनी शोधलेला असतो पण त्याचे श्रेय मिळत नाही. त्यांना. मग ते फ्रस्ट्रेट होउन राग बायको वर मुलीवर काढतात. त्याचे मेन् दड्पण अम्मुच्या मनावर असते.

आशूडी, खूप् छान लिहिलं आहेस.

मी गॉड ऑफ स्मॉल थिन्ग्सची अगदी नवीन प्रत एअरपोर्ट्वरुन घेतली होती. मला ते पुस्तक इतके बोजड वाटले कारण काहीकेल्या ह्या पुस्तकाची ईंग्रजी भाषी माझ्या आवाक्याबाहेरची वाटत होती. परत परत प्रयत्न करुन शेवटी हताश होऊन हे पुस्तक मी ग्रंथालयामधे दिले. त्यानंतर परत भारतात गेलो त्यावेळी अपर्णा वेलणकर ह्यांनी ह्या पुस्तकाचा केलेल्या अनुवादाची प्रत विकत घेतली. आपण मराठीच आहोत ना अशी शंका वाटायला लागली. मी आजवर वाचलेल्या अनुवादात अपर्णा वेलणकर ह्यांचा अनुवाद मला अतिशय कोरडा वाटला. ओळ अन ओळ पुढे न्यायला माझी दमछाक झाली. काही कळत नव्हते काय चालले आहे. हताश होऊन हेही पुस्तक मी इथल्या मराठी ग्रंथालयास दिले. परत वाचायचा मोह होतो पण परत तसेच होईल असेही वटते. म्हणून तू सारांश सांगितला तो वाचून आनंदन झाला तेही नसे थोडके.

Pages