१७६९ मध्ये ब्रिटीश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक ताहीती बेटांवर पोहोचला. इंग्लंडहून निघाल्यावर केप हॉर्नला वळसा घालून ड्रेक पॅसेजमार्गे पॅसीफीक मध्ये पोहोचण्यास त्याला जवळपास ८ महीने लागले होते. ताहीतीला येण्याचा कूकचा हेतू शुक्राच्या पृथ्वी आणि सूर्यादरम्यान होणा-या संक्रमणाचं निरीक्षण करणं हा असला तरीही टेरा ऑस्ट्रलिस इन्कॉग्नीटाचा शोध घेऊन त्यावर आपला मालकी हक्क प्रस्थापीत करण्याची ब्रिटीश रॉयल सोसायटीने कूकला सूचना दिली होती.
ताहीती बेटांवरुन निघाल्यावर कूकने न्यूझीलंड गाठलं. न्यूझीलंड बेटांभोवती फेरी पूर्ण करुन त्याने न्यूझीलंडचा नकाशा तयार केला. २३ एप्रिल १९७० ला कूकला ऑस्ट्रेलियाचं प्रथम दर्शन झालं. २९ एप्रिलला कूकने ऑस्ट्रेलियाच्या किना-यावर पाय ठेवला. पुढे ग्रेट बॅरीयर रीफमध्ये कूकच्या काफिल्यापैकी एका जहाजाचं कोरलवर आदळून अतोनात नुकसान झालं. ऑस्ट्रेलियाच्या सर्व किना-यावर कूकने ब्रिटीश साम्राज्याचा भाग म्ह्णून दावा केला. पुढे जकार्ता मार्गे केप ऑफ गुड होपला वळसा घालून कूक इंग्लंडला परतला.
न्यूझीलंड बेटं हा मोठ्या भूभागाचा एक हिस्सा असावा ही पूर्वीची समजूत निर्वीवादपणे चुकीची होती हे
कूकच्या या सफरीमुळे स्पष्ट झालं. अर्थात अॅरिस्टॉटलच्या सिध्दांतावर गाढ विश्वास असलेल्या रॉयल सोसायटीच्या सदस्यांनी कूकला पुढच्या सफरीवर आणखीन दक्षिणेला शोध घेण्याचा आदेश दिला.
कूकने पुन्हा इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. १७ जानेवारी १७७३ या दिवशी प्रचंड धुक्यात आणि झंझावाती वा-याशी मुकाबला करत कूकने अंटार्क्टीक सर्कल ( ६६ अंश दक्षिण ) ओलांडलं. ३१ जानेवारीला कूक ७१'१०'' अंश दक्षिण अक्षवृत्तावर पोहोचला, परंतु अपेक्षीत असलेला भूभाग त्याच्या दृष्टीस पडला नाही. ताहीती बेटांवरुन आवश्यक ती सामग्री घेऊन कूक पुन्हा दक्षिणेकडे निघाला, परंतु त्याला कोणताही सागरकिनारा आढळून आला नाही. परतीच्या प्रवासात कूकने सॅंडविच बेटांचा ताबा घेतला. सँडविच बेटं ही डिएगो रॅमीरेझ बेटांच्याही दक्षिणेला असलेल्याचं आढळून आलं.
अंटार्क्टीकापासून अवघ्या ७५ मैलांवरुन कूकने माघार पत्करली !
कूकच्या सफरीमुळे टेरा ऑस्ट्रलिस इन्कॉग्नीटाच्या अस्तीत्वाविषयी असलेली आशा कमी होण्यास सुरवात झाली.
( तिस-या सफरीवर हवाई बेटांवर झालेल्या संघर्षात कॅप्टन जेम्स कूक हवाईयन लोकांकडून मारला गेला ).
ब्रिटीश दर्यावर्दी मॅथ्यू फिंडलर्सने १७९९ च्या सुमाराला टास्मानिया हे छोटं बेट असल्याचा शोध लावला. आपल्या पुढच्या सफरीत फिंडलर्सने ऑस्ट्रेलियाभोवती संपूर्ण प्रदक्षिणा घातली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या किना-याचा पहिला तपशीलवार नकाशा तयार केला. न्यूझीलंडच्या उत्तर दिशेला ऑस्ट्रेलिया आढळल्याने टेरा ऑस्ट्रलिस इन्कॉग्नीटा म्हणजे हा भूभाग नव्हे याची फिंडलर्सला पक्की खात्री होती.
फिंडलर्सच्या मते दक्षिणेला आणखीन मोठा भूभाग आढळणं हे अशक्यंच होतं. इंग्लंडला परतल्यावर आपला हा सिध्दांत त्याने 'व्हॉयेज टू टेरा ऑस्ट्रलिस' या आपल्या पुस्तकात मांडला. दक्षिण महासागरात आणखीन मोठा भूप्रदेश आढळण्याची शक्यता नसल्याने फिंडलर्सने या प्रदेशाला नाव दिलं...
ऑस्ट्रेलिया !
फिंडलर्सची ही समजूत चुकीची होती हे पुढे अंटार्क्टीकाचा शोध लागल्यावर सिध्दं झालं. परंतु तोपर्यंत ऑस्ट्रेलिया हे नाव रुढ झालं होतं.
१८१९ च्या सुरवातीला कॅप्टन विल्यम स्मिथ चिलीहून इंग्लंडच्या मार्गावर होता. केप हॉर्नला वळसा घालून अटलांटीक मध्ये प्रवेश करताना ड्रेक पॅसेजमध्ये त्याने दक्षिण दिशा पकडली. १९ फेब्रुवारीला ६२ अंश दक्षिण अक्षवृत्तवर नवीन बेटं त्याच्या दृष्टीस पडली ! ६० अंश च्या दक्षिणेला दिसलेला हा पहिला भूभाग होता. पुढे दुस-या सफरीवर १६ ऑक्टोबरला तो त्या बेटावर उतरला. त्या बेटाला त्याने नाव दिलं किंग जॉर्ज ! त्या संपूर्ण बेटांच्या समुहाला त्याने स्कॉटलंडजवळच्या शेटलँड बेटांवरुन नाव दिलं...
साऊथ शेटलँड बेटं !
३० जानेवारी १८२० या दिवशी स्मिथ आणि एडवर्ड ब्रॅन्सफिल्ड यांनी अंटार्क्टीकाच्या उत्तरेकडील बेटांची प्रथम नोंद केली. ब्रॅन्सफिल्डच्या नोंदीनुसार त्याला दोन बर्फाच्छादीत शिखरं आढळून आली होती. दोनच दिवसांपूर्वी २८ जानेवारीला रशियन दर्यावर्दी वॉन बेलींग्सहौसनने याच भूभागाच्या पूर्व किना-याचं दर्शन घेतलं होतं. प्रिन्सेस मार्था बेटांपासून अवघ्या वीस मैलांपर्यंत पोहोचलेल्या बेलींग्सहौसनने ६९'२१'' अंश दक्षिण अक्षवृत्त आणि २'१४'' अंश पश्चिम रेखावृत्तावर आढळलेल्या बर्फाच्छादीत कड्यांची ( आईस शेल्फ ) नोंद केली.
१८२० च्या ऑक्टोबर महिन्यात अमेरिकन दर्यावर्दी नॅथन पामरने अंटार्क्टीकाच्या मुख्य भूभागावर असलेल्या प्रदेशाचा शोध लावला !
१८२३ मध्ये ब्रिटीश दर्यावर्दी जेम्स वॅडेलने दक्षिणेच्या सागरात प्रवेश केला. २० फ्रेब्रुवारी १८२३ रोजी वॅडेलने आपल्या जेन या जहाजातून ७४'१५'' अंश दक्षिण अक्षवृत्त गाठलं ! अंटार्क्टीकाच्या या सागराला अर्थातच नाव पडलं ते म्हणजे वॅडेल समुद्र !
१८३०-३३ च्या मोहीमेत ब्रिटीश दर्यावर्दी जॉन बिस्को याने उत्तर अंटार्क्टीकमधील भूभागाचा शोध लावला. ग्रॅहम लॅंड, बिस्को बेटं, क्वीन अॅडलेड बेटं या सर्वांचा त्याने ब्रिटीश साम्राज्यात समावेश करुन घेतला !
१८३९ मध्ये फ्रेंच मोहीमेतील ज्यूल्स ड्युमाँटने अंटार्क्टीकाच्या पश्चिम किना-यावर असलेल्या अॅडल लँडचा शोध लावला. अंटार्क्टीकाच्या पश्चिम किना-यापासून अवघ्या ४ मैलांवर असलेल्या बेटांवर त्याने पाय ठेवला.
१८४१ मध्ये ब्रिटीश दर्यावर्दी जेम्स रॉसने रॉस समुद्र आणि व्हिक्टोरिया लॅंडचा शोध लावला. अंटार्क्टीकाच्या मुख्य भूमीवर आढळलेल्या दोन ज्वालामुखीच्या पर्वतशिखरांचं त्याने आपल्या जहाजांवरुन माऊंट इरेबस आणि माऊंट टेरर असं नामकरण केलं. दक्षिणेच्या दिशेने बर्फाळ कड्यांच्या ( आईस शेल्फ ) त्याने सुमारे २५० मैल अंतर कापलं. या आईस शेल्फचं पुढे रॉस आईस शेल्फ असं नामकरण करण्यात आलं. रॉस बेटाच्या पूर्वेला असलेल्या स्नो हिल आणि सेमूर बेटांचाही त्याने शोध लावला. आपल्या मोहीमेत त्याने ७८'१०'' अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत मजल मारली होती !
रॉस आईस शेल्फ
१८९२ च्या नॉर्वेजीयन मोहीमेत कार्ल लार्सनने लार्सन आईस शेल्फचा शोध लावला. अंटार्क्टीकवर स्कीईंग करणारा तो पहिला दर्यावर्दी ! किंग ऑस्कर लँड आणि रॉबर्टसन बेटाचाही लार्सनला शोध लागला.
१८९४ मध्ये हेन्रीक बुल, कार्स्टन्स बॉर्चग्रेविन्क आणि अलेक्झांडर वॉन टन्झील्मन यांनी अंटार्क्टीकवर पाय ठेवला.
१८९७ च्या ऑगस्टमध्ये पहिल्या बेल्जीयन मोहीमेने अंटार्क्टीकाच्या मोहीमेवर जाणासाठी अँटवर्प सोडलं. अनेक आंतरराष्ट्रीय दर्यावर्दींचा सहभाग असलेल्या या मोहीमेत पुढे दक्षिण धृवाशी ज्याचं नाव कायमचं निगडीत झालं असा एक दर्यावर्दीही होता.
रोनाल्ड ऐंजल्बर्ट ग्रॅव्हनींग अॅमंडसेन !
१८९८ च्या जानेवारीत ते ग्रॅहम लँडच्या किना-यावर पोहोचले. ग्रॅहम लँडच्या किना-याने गेरलॅच सामुद्रधुनीतून मार्गक्रमणा करत त्यांनी अनेक बेटांना भेटी दिल्या. त्यांचे नकाशे तयार केले. १५ फेब्रुवारी १८९८ ला त्यांनी आर्क्टीक सर्कल ( ६६ १/२ अंश दक्षिण ) ओलांडलं. परंतु वेडेल सागरात शिरण्याचा मार्ग त्यांना सापडला नाही. २८ फेब्रुवारीला त्यांचं जहाच बर्फात अडकलं ! अंटार्क्टीकाच्या गोठवणा-या हिवाळ्याला तोंड देण्याला आता पर्याय नव्हता !
१७ मे रोजी काळोखाचं साम्राज्यं सुरू झालं, ते २३ जुलै पर्यंत टिकलं ! त्यातच स्कर्व्ही रोगाने अनेकांना ग्रासलं. ५ जूनला लेफ्टनंट डॅन्कोला मृत्यूने गाठलं. अखेर फ्रेडरीक कूक आणि रोनाल्ड अॅमंडसेन यांनी मोहीमेचा ताबा घेतला. रॉब पेरीबरोबर उत्तर धृवाच्या मोहीमेवर गेलेल्या कूकला स्कर्व्हीवर असलेला एकमेव उतार माहीत होता तो म्हणजे पेंग्वीन आणि सीलचं ताजं मांस ! ( त्यावेळेस व्हिटॅमीन सी चा शोध लागला नव्हता ). हळूहळू सर्वांची परिस्थीती सुधारली.
१८९९ च्या जानेवारीपर्यंत त्यांचं जहाज बर्फातच अडकलेलं होतं ! तातडीने हालचाल न केल्यास आणखीन एक हिवाळा अंटार्क्टीक मध्ये अडकून पडण्याची भीती होती. जहाज अडकलेल्या ठिकाणापासून जेमतेम अर्धा मैलावर खुला समुद्र होता. फ्रेडरीक कूकने जहाजापर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्याची मांडलेली कल्पना सर्वांनी उचलून धरली. अखेरीस १५ फेब्रुवारी १८९९ ला त्यांना जहाज बाहेर काढण्यात यश आलं ! परंतु बर्फाळलेल्या प्रदेशातून अवघ्या सात मैलाचं अंतर पार करण्यास त्यांना तब्बल एक महिना लागला ! ५ नोव्हेंबर १८९९ ला ते बेल्जीयमला परतले.
१८९८ मध्ये सर जॉर्ज न्यूवेन्सच्या पाठींब्याने बिटीश दर्यावर्दीं कार्स्टन बॉर्चग्रेवीन्कने लेडी सदर्न क्रॉस या नावाने अंटार्क्टीकावर मोहीम आखली. यापूर्वीच्या सर्व मोहीमांच्या तुलनेत ही मोहीम वैशीष्ट्यपूर्ण होती. या मोहीमेत बॉर्चग्रेवीन्कने प्रथमच अंटार्क्टीकावर स्लेज ( घसरगाड्या ) आणि ते ओढण्यासाठी कुत्रे आणण्याचा निर्णय घेतला होता ! २३ ऑगस्ट १९९८ रोजी त्यांनी लंडनहून मोहीमेवर कूच केलं. १९ डिसेंबरला ऑस्ट्रेलियातून जास्तीची सामग्री घेऊन त्यांनी अंटार्क्टीकाच्या दिशेने प्रस्थान केलं.
२३ जानेवारी १८९९ ला लेडी सदर्न क्रॉसने आर्क्टीक वृत्त ओलांडलं. पुढचे तीन आठवडे जहाज बर्फात अडकून पडलं होतं ! १६ फेब्रुवारीला ते केप आंद्रे इथे पोहोचले. अंटार्क्टीकवर मुक्काम करण्याच्या दृष्टीने ही जागा आदर्श होती. इथे बर्फाचा जाड थर होता आणि जवळच प्रचंड संख्येने पेंग्वीनची वस्ती होती.
१७ फेब्रुवारीला सर्वप्रथम ७६ सैबेरियन कुत्रे अंटार्क्टीकावर उतरले. त्यांच्याबरोबर त्यांचे दोन प्रशिक्षकही होते. त्या रात्री त्यांनी किना-यावरच मुक्काम केला. अंटार्क्टीकावर रात्र घालवणारे ते पहीले मानव !
( बेल्जीयन मोहीमेतील दर्यावर्दींनी एक वर्षांपेक्षा जास्तं काळ अंटार्क्टीकामध्ये घालवला असला तरीही रात्री बर्फावर मुक्काम केला नव्हता.)
पुढच्या बारा दिवसात बरचंस सामान उतरवण्यात आलं. मुक्कामाच्या दृष्टीने दोन आटोपशीर लाकडी झोपड्या उभारण्यात आल्या. अंटार्क्टीकावरील हे पहिलं बांधकाम होतं ! १४ ऑक्टॉबर १८९९ रोजी प्राणीशास्त्रज्ञ निकोलाई हॅन्सन मरण पावला. अंटार्क्टीकावर पुरण्यात आलेला तो पहीला मनुष्य !
वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर त्यांनी स्लेज आणि कुत्र्यांच्या सहाय्याने अंतर्गत भूभागात जाण्याचा बेत आखला होता, परंतु किनारपट्टीपासून काही अंतरावर असणा-या उंच पर्वतराजीने त्यांचा मार्ग रोखून धरला होता. २ फेब्रुवारीला त्यांनी रॉस समुद्रात जाण्यासाठी किनारा सोडला.
रॉस समुद्रात शिरल्यावर त्यांनी दक्षिणेची वाट धरली. रॉस बेटावर पोहोचल्यावर त्यांना प्रथम माऊंट इरेबसचं दर्शन झालं. माऊंट टेररच्या पायथ्याशी असलेल्या केप क्रॉझीयर इथे किना-यवर उतरण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. ६० वर्षांपूर्वीच्या जेम्स रॉसच्या मार्गावरुन त्यांनी रॉसने गाठलेला दक्षिणेकडील सर्वात शेवटचा टप्पा गाठला. मात्रं त्यावर समाधान न मानता, स्लेज आणि कुत्र्यांच्या सहाय्याने बॉर्चग्रेवीन्क, कॉल्बेक आणि सॅव्हीओ यांनी ग्रेट आईस बॅरीअरवर यशस्वी चढाई केली. द्क्षिणेला ७८'५०'' अंशांपर्यंत त्यांनी विक्रमी मजल मारली होती !
जून १९०० मध्ये सदर्न क्रॉस लंडनला परतलं. मात्रं कोणीही त्यांची फारशी दखल घेतली नाही. शास्त्रज्ञांचं बॉर्चग्रेवीन्कबद्द्ल मत प्रतिकूलच होतं. तसंच ब्रिटीश नौदलाच्या डिस्कव्हरी मोहीमेच्या पूर्वप्रसिध्दीमुळे बॉर्चग्रेवीन्कच्या मोहीमेच्या निष्कर्षात कोणालाही स्वारस्य उरलं नव्हतं.
रोनाल्ड अॅमंडसेनने मात्रं बॉर्चग्रेवीन्कच्या मोहीमेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तो म्हणतो,
" बॉर्चग्रेवीन्कने ग्रेट आईस बॅरीअरवर केलेल्या यशस्वी चढाईमुळेच दक्षिणेच्या मार्गातील एक मोठा अडथळा दूर झाला होता !"
ब्रिटीश नौदलाच्या डिस्कव्हरी मोहीमेने अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांच्यासह ६ ऑगस्ट १९०१ रोजी इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. दक्षिण धृवाच्या इतिहासात अजरामर झालेले दोन धुरंधर दर्यावर्दी या मोहीमेवर होते.
एर्नेस्ट शॅकल्टन !
आणि
कॅप्टन रॉबर्ट फॅल्कन स्कॉट !
स्कॉटकडे मोहीमेचं नेतृत्वं होतं. शॅकल्टन थर्ड ऑफीसर होता. ९ जानेवारी १९०२ ला ते केप आंद्रे इथे पोहोचले. बॉर्चग्रेवीन्कच्या शिल्लक असलेल्या सामग्रीचं निरीक्षण करुन त्यांनी दक्षिणेचा मार्ग पत्करला. केप क्रॉझीयरला मेसेज पॉईंटची उभारणा करुन त्यांनी पुन्हा दक्षिणेची दिशा पकडली आणि ३० जानेवारीला ते किंग एडवर्ड ७ लँडवर पोहोचले. जेम्स रॉसने या प्रदेशाचा ६० वर्षांपूर्वी वर्तवलेला अंदाज अचूक असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं !
४ फेब्रुवारीला स्कॉटने ग्रेट आईस बॅरीअरवर पदार्पण केलं. निरीक्षणासाठी खास आणलेल्या मोठ्या बलूनमधून स्कॉटने आकाशात ६०० फूट उंची गाठली ! दुस-या फेरीत शॅकल्टननेही आकाशसफर केली. दोघांच्याही दृष्टीस क्षितीजापर्यंत पसरलेला बॅरीअरचा बर्फाच्छादीत प्रदेश तेवढा दृष्टीस पडला !
८ फेब्रुवारीला त्यांनी परतून मॅकमुर्डो साऊंड मध्ये सोईस्कर ठिकाणी नांगर टाकला. साधनसामग्रीच्या सहाय्याने तिथे आटोपशीर झोपड्या उभारण्याचं काम सुरू झालं. स्कॉटने जहाजावरच मुक्काम करण्याचा निश्चय केला असला तरी झोपड्यांचा वापर सामान साठवण्यासाठी करण्याचा त्याचा विचार होता.
स्कॉटच्या तुकडीतील कोणालाही कुत्रे हाताळण्याचा आणि स्किईंगचा फारसा अनुभव नव्हता. सुरवातीचे काही दिवस कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यात अपयश आल्याने स्कॉटने स्लेजच्या मागे न लागता तुकडीतील सर्वांनी समप्रमाणात सामानाची वाहतूक करावी अशी सूचना केली. ११ मार्च रोजी केप क्रॉझीयरवरुन परतणा-या तुकडीला झंझावाती हिमवादळाचा ( ब्लिझर्ड ) सामना करावा लागला. या हिमवादळात दर्यावर्दी जॉर्ज व्हिन्सचा कड्यावरुन कोसळून मृत्यू झाला. व्हिन्सचा मृतदेह कधीच मिळाला नाही.
२ नोव्हेंबर १९०२ रोजी स्कॉट, शॅकल्टन आणि विल्सनने कुत्रे आणि सहाय्यक तुकड्यांसह दक्षिणेच्या दिशेने कूच केलं. ११ नोव्हेंबरला त्यांनी बॉर्चग्रेवीन्कचा ७८ अंश दक्षिण अक्षवृत्ताचा विक्रम मोडला. मात्रं त्यांची वाटचाल खूपच धीमेपणाने सुरु होती. बरोबर घेतलेल्या कुत्र्यांना पुरेसं खाणं न मिळाल्यामुळे ते दिवसेदिवस अशक्त होत होते. अखेर निरुपायाने विल्सनला सर्वात अशक्त कुत्र्याला मारुन त्याचं मांस इतर कुत्र्यांना खाऊ घालावं लागत होतं. ३० डिसेंबरला ते ८२'१७'' अंश दक्षिण अक्षवृत्तावर पोहोचले, परंतु पुढे जाणं अशक्यं झाल्याने त्यांनी परतीचा निर्णय घेतला. परतीच्या मार्गावर काही वेळा शॅकल्टनला स्लेजवरुन ओढून आणावं लागलं होतं. ३ फेब्रुवारी १९०३ ला ते आपल्या बोटीवर परतले.
न्यूझीलंडहून आवश्यक साधनसामग्रीसह आलेल्या मॉर्नींग या जहाजावरुन शॅकल्टन इंग्लंडला परतला. स्कॉटने आणखीन एक वर्ष अंटार्क्टीकामध्ये घालवण्याचा निर्णय घेतला होता. चुंबकीय दक्षिण धृवाच्या शोधात गेलेली स्कॉटची मोहीम तिथे पोहोचण्यात अयशस्वी झाली असली, तरीही त्यांना धृवीय पठाराचा शोध लागला होता. १० सप्टेंबर १९०४ रोजी स्कॉट लंडनला परतला.
स्कॉटच्या मोहीमेबरोबरच जर्मन, स्वीडीश आणि स्कॉटीश मोहीमाही अंटार्क्टीकावर होत्या, परंतु कोणालाही स्कॉटच्या ८२'१७'' अंश दक्षिणेच्या विक्रमापर्यंत पोहोचता आलं नाही. १९०३-१९०५ दरम्यानच्या फ्रेंच मोहीमेलाही ७४ अंश दक्षिणेपलीकडे मजल मारता आली नाही.
डिस्कव्हरी मोहीमेतून परत फिरावं लागल्याने एर्नेस्ट शॅकल्टन नाराज होता. डिस्कव्हरी मोहीमेचा वृत्तांत लिहीताना स्कॉटने शॅकल्टनच्या शारिरीक क्षमतेविषयी शंका उपस्थीत केली होती. यामुळे जिद्दीला पेटलेल्या शॅकल्टनने १९०७ मध्ये अंटार्क्टीकाच्या मोहीमेवर जाण्याची घोषणा केली !
डिस्कव्हरी मोहीमेप्रमाणेच मॅकमुर्डो साऊंड इथे मुक्काम करुन दक्षिण धृवाच्या दिशेने आणि चुंबकीय दक्षिण धृव गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची शॅकल्टनची योजना होती, परंतु या योजनेचा वास लागताच स्कॉटने त्यात पहिला खोडा घातला. मॅकमुर्डो साऊंडचा प्रदेश हा आपला स्वामित्वहक्काचा प्रदेश आहे आणि शॅकल्टनने त्यात प्रवेश करु नये असं स्कॉटने त्याला लिहीलेल्या पत्रात बजावलं. तसाच दावा त्याने रॉस बेट आणि व्हिक्टोरिया लँडवरही केला. वास्तवीक स्कॉटच्या या दमदाटीला काहीही व्यावहारीक अर्थ नव्हता. स्कॉट आणि विल्सनने आणलेल्या दडपणामुळे शॅकल्टनने मॅकमुर्डो साऊंडमध्ये न उतरण्याचं वरकरणी मान्यं केलं, तरीही प्रत्यक्षात मात्रं स्कॉटच्या सूचनेला त्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या !
निम्रॉड या जहाजाने ११ ऑगस्ट १९०७ रोजी लंडनचा किनारा सोडला. काही कामानिमीत्त मागे राहीलेल्या शॅकल्टनने काही दिवसांनी प्रस्थान केलं. १ जानेवारी १९०८ रोजी निम्रॉडने न्यूझीलंड सोडलं.
२३ जानेवारीला शॅकल्टन ग्रेट आईस बॅरीयरजवळ पोहोचला. परंतु डिस्कव्हरी मोहीमेत दिसलेली अंतर्भागाच्या दिशेने जाणारी पाण्याची चिंचोळी खाडी गायब झाली होती. शॅकल्टन किंग एडवर्ड ७ लॅंडकडे वळला, परंतु तिथे उतरणं त्याला अशक्यं झालं. आता दोनच मार्ग उरले होते. एक म्हणजे इंग्लंडला परतणं किंवा स्कॉटचा दबाव झुगारुन मॅकमुर्डो साऊंडकडे जाणं ! शॅकल्टनने दुसरा मार्ग पत्करला.
२९ जानेवारीला निम्रॉड मॅकमुर्डो साऊंडमध्ये पोहोचलं. परंतु डिस्कव्हरी मोहीमेतील पूर्वीच्या जागी जाण्याचा मार्ग गोठलेल्या बर्फामुळे बंद झाला होता. बर्फ वितळण्याची वाट पाहत ते तीन आठवडे तिथे थांबले, परंतु बर्फ वितळण्याची चिन्हं दिसेनात. अखेरिस ३ फेब्रुवारीला शॅकल्टनने केप रॉयड्स इथे उतरण्याचा निर्णय घेतला. सर्व सामान उतरवून आवश्यक त्या झोपड्या उभारण्यास २२ फेब्रुवारी उजाडला होता. मॅकमुर्डो साऊंड इथून २० मैलांवर होतं. समुद्रावर बर्फ गोठल्यावर त्यावरुन ग्रेट आईस बॅरीअर गाठण्याचा शॅकल्टनचा विचार होता.
शॅकल्टनच्या अपेक्षेप्रमाणे ग्रेट आईस बॅरीअर ( रॉस आईस शेल्फ ) वर जाण्यासाठी गोठलेल्या बर्फावरुन मार्ग नव्हता. उलट आता बर्फ वितळण्यास सुरवात झाल्याने मॅकमुर्डो साऊंडच्या दिशेने जाण्याचा मार्गच खुंटला होता ! निराश न होता, शॅकल्टनने माऊंट इरेबसवर चढाई करण्याचा निर्णय घेतला !
डिस्कव्हरी मोहीमेत फ्रँक विल्ड आणि एर्नेस्ट जॉईस यांनी इरेबसचा पायथा गाठला होता, परंतु यावेळी त्यांचा या मोहीमेत समावेश नव्हता. या मोहीमेतील मुख्य गिर्यारोहक होते एजवर्थ डेव्हीड, डग्लस मॅसन आणि अॅलीस्टर मॅक्के ! एरिक मार्शल, जेमसन बॉईड अॅडम्स आणि फिलीप ब्रॉकेलहर्स्ट त्यांना सहाय्यक भूमीकेत होते. ५ मार्च रोजी तांने चढाईला सुरवात केली. ही मोहीम संपूर्णपणे यशस्वी झाली. इरेबस वरील जागृत असलेल्या ज्वालामुखीच्या क्रेटरपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आलं. ११ मार्च रोजी ते केप रॉयड्सला परतले.
१९०८ च्या हिवाळ्यात सर्वजण दक्षिणेच्या मोहीमेच्या दृष्टीने तयारीत गुंतले होते. डिस्कव्हरी मोहीमेतील अनुभवावरुन शॅकल्टनने कुत्र्यांच्या सहाय्याने प्रवास करण्याऐवजी घोडे वापरण्याचा निर्णय घेतला होता. मात्रं ज्वालामुखीच्या उद्रेकातून उडणा-या राखेचा आणि वाळूचा प्रादुर्भाव झाल्याने हिवाळ्याअखेरीस चार घोडे मरण पावले होते ! केवळ चारच घोडे शिल्लक असल्याने शॅकल्टनने आपल्याबरोबर तीन सहका-यांना नेण्याचा निर्णय घेतला. मार्शल, अॅडम्स आणि विल्ड ! अनुभवी जॉईसला त्याच्या शारिरीक क्षमतेविषयी शंका निर्माण झाल्याने वगळण्यात आलं.
२९ ऑक्टोबर १९०८ ला दक्षिणेच्या प्रवासाला सुरवात झाली. शॅकल्टनने दक्षिण धृवापर्यंत पोहोचून परतीचा प्रवास सुमारे १७२० मैल ( २७७० कि.मी. ) असेल या हिशोबाने तीन महिन्यांची शिधासामग्री बरोबर घेतली होती. दिवसाला १८ मैलाची मजल मारण्याचा त्याचा इरादा होता, परंतु प्रतिकूल हवामान आणि घोड्यांचा हळू वेग, यामुळे त्यांची वाटचाल मंदावली. शॅकल्टनने असलेल्या सामग्रीच्या आधारे ११० दिवस मजल मारण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यासाठी दिवसाला फक्त १५ मैल अंतर कापणं शक्यं होणार होतं. ९ ते २१ नोव्हेंबरच्या दरम्यान त्यांनी चांगली प्रगती केली, परंतु चारपैकी एका घोड्याचा बळी गेला !
२६ नोव्हेंबरला त्यांनी ८२ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. डिस्कव्हरी मोहीमेत स्कॉटने प्रस्थापीत केलेला विक्रम मोडून त्यांनी आता अज्ञात भूभागात प्रवेश केला होता !
ग्रेट बॅरीअरचा पृष्ठभाग आता वाटचालीस कठीण होत चालला होता. जागोजागी बर्फात मध्येच पडलेली मोठी भगदाडं दृष्टीस पडत होती. उरलेल्या तीनपैकी आणखी दोन घोड्यांनी मान टाकली होती. पश्चिमची पर्वतराजी दक्षिणेकडे वळून त्यांचा मार्ग आडवून समोर उभी ठाकली होती. या पर्वतराजीवर चढाई करून शॅकल्टनने पलीकडे नजर टाकली आणि त्याला एक अद्भुत दृष्य दिसलं.
एकमेकांना समांतर असलेल्या दोन पर्वतरांगांच्या मध्ये पार क्षितीजापर्यंत॑ पसरलेलं ग्लेशीयर !
शॅकल्टनने या ग्लेशीयरला बिअर्डमूरचं नाव दिलं. हे ग्लेशीयर अप्रतिम सुंदर दिसत असलं, तरी त्यातून वाटचाल करणं मात्रं अत्यंत जिकीरीचं होतं. त्यातच ७ डिसेंबरला त्यांच्याजवळ असलेला एकमेव घोडा एक प्रचंड मोठ्या बर्फाच्या कपारीत ( क्रिव्हाईस ) कोसळून दिसेनासा झाला ! त्याच्यापाठोपाठ विल्डही खेचला जायचा, परंतु सुदैवाने हार्नेसची दोरी तुटल्याने तो बचावला ! मात्रं एकुलत्या एका घोड्याचा आधार संपल्याने आता सामान वाहण्याचं काम चौघांवर येऊन पडलं. चौघांतील मतभेदही आता उघडपणे समोर येऊ लागले होते.
२५ डिसेंबरला, ख्रिसमसच्या दिवशी ते ८५'५१'' अंश दक्षिण अक्षवृत्तावर होते. दक्षिण धृव अद्यापही २८७ मैल अंतरावर होता !
चौघांजवळ आता जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच अन्नसाठा शिल्लक होता. बाकीची अन्नसामग्री त्यांनी परतीच्या वाटेवर उपयोगात आणण्यासाठी ठिकठिकाणच्या कँपमध्ये ठेवली होती. परंतु या परिस्थीतीतही शॅकल्टनची हार मानण्यास तयारी नव्हती. आधीच कमी असलेल्या रोजचा अन्नपुरवठा त्याने निम्म्यावर आणला ! अनावश्यक असलेल्या सर्व वस्तू त्याने तिथेच सोडून दिल्या आणि पुन्हा दक्षिणेची वाट धरली.
२६ डिसेंबरला ग्लेशीयरवरची चढाई अखेरीस संपली. आता धृवीय पठारी प्रदेशाला सुरवात झाली. परंतु थंडीचा कडाका मात्रं वाढतच चालला होता. शॅकल्टन म्हणतो,
" हाडं गोठवणारी थंडी काय असू शकते याचा आम्ही पुरेपूर अनुभव घेत होतो. ३१ डिसेंबर इतकी भयानक थंडी मी जन्मात कधी अनुभवली नव्हती !"
१ जानेवारी १९०९ ला त्यांनी ८७ अंश अक्षवृत्त ओलांडलं. धृवीय प्रदेशातील जास्तीत जास्त अक्षवृत्त गाठण्याचा त्यांनी विक्रम केला होता ! ४ जानेवरीला शॅकल्टनने मनातून पराभव मान्य केला होता, परंतु तरीही तो पुढे जातच राहीला होता ! दक्षिण धृवापासून १०० मैल अंतराच्या आत पोहोचण्याचा त्याने मनाशी निश्चय केला होता. अख्रेरीस ९ जानेवारीला ८८'२३'' अंश दक्षिण अक्षवृत्तावरुन त्यांनी परतीचा निर्णय घेतला.
अॅडम्स, विल्ड, मार्शल - ८८'२३'' अंश दक्षिण - ( शॅकल्टनने काढलेला फोटो )
दक्षिण धृव अद्याप ९७ मैल अंतरावर होता !
७३ दिवसांच्या प्रवासानंतर अखेरीस त्यांनी परतीची वाट धरली. अपुरा अन्नसाठा असूनही ते १९ जानेवारीला बिअर्डमूर ग्लेशीयरवर पोहोचले. २८ जानेवारीला त्यांनी अन्नसाठा ठेवलेला शेवटचा कँप गाठला ! मात्रं तिथेही अन्नसाठा मर्यादीतच होता. शॅकल्टन म्हणतो,
" अन्नाच्या अभावी आम्ही आता इतके रोडावलो होतो, की बर्फावर आडवं झाल्यावर थंडीमुळे आमची हाडं जवळजवळ गोठून जात ! आमच्या देहावर मांस असं अगदीच थोडंस शिल्लक होतं !"
तशाही परिस्थीत पुढे वाटचाल सुरुच होती. २३ फेब्रुवारीला त्यांनी पुढचा कँप गाठला. सुदैवाने मागे राहीलेल्या जॉईसने या कँपवर भरपूर खाद्यपदार्थांचा साठा करुन ठेवला होता !
खाण्याची चिंता आता दूर झाली होती, परंतु तरीही १ मार्चपर्यंत हट पॉईंटला पोहोचणं त्यांच्यासाठी अत्यावश्यंक होतं. १ मार्चला तिथे निम्रॉड जहाज त्यांना घेण्यासाठी येणार होतं ! मात्रं कँपमधून निघण्यापूर्वी त्यांच्यापुढे एक वेगळीच समस्या उभी ठाकली.
ब्लिझर्ड !
जोरदार हिमवादळाला सुरवात झाली ! या वादळामुळे त्यांना आख्खा एक दिवस कँपमधे वाट पाहवी लागली ! अखेर रात्री उशीरा हिमवादळाचा जोर ओसरला.
२७ फेब्रुवारीला ते हट पॉईंटपासून ३८ मैल अंतरावर असताना मार्शल बर्फात कोसळला ! शॅकल्टनने अॅडम्सला मार्शलच्या जोडीला ठेवलं आणि जहाजाला गाठण्यासाठी विल्डच्या साथीने तो हट पॉईंटच्या दिशेने निघाला. २८ फेब्रुवारीला शॅकल्टन आणि विल्ड हट पॉईंटला पोहोचण्यात यशस्वी झाले. १ मार्चला निम्रॉड आल्यावर त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मागे अडकलेले मार्शल आणि अॅडम्स जहाजावर पोहोचेपर्यंत ४ मार्च उजाडला होता. ते दोघंही येऊन पोहोचताच शॅकल्टनने उत्तरेचा मार्ग पत्करला.
उत्तर दिशेला गेलेल्या तुकडीत एजवर्थ डेव्हीड, मॉसन आणि मॅक्केचा समावेश होता. चुंबकीय दक्षिण धृव गाठण्याची आणि इतर निरीक्षणं नोंदवण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ५ ऑक्टोबर १९०८ मध्ये त्यांनी आपल्या मोहीमेवर जाण्यासाठी केप रॉयडहून कूच केलं.
अनेक संकटांना तोंड देत डेव्हीड, मॉसन आणि मॅक्के १७ जानेवारी १९०९ ला ७२'१५'' अंश दक्षिण अक्षांश आणि १५५'१५'' अंश पूर्व रेखांशावर असलेल्या चुंबकीय धृवावर पोहोचण्यात यशस्वी झाले. २ फ्रेब्रुवारीला तिघं निम्रॉडवर परतले !
२३ मार्च १९०९ ला निम्रॉड न्यूझीलंडला पोहोचलं. १४ जूनला त्यांनी इंग्लंडचा किनारा गाठला !
रॉयल जॉग्रॉफीक सोसायटीचा भूतपूर्व अध्यक्ष क्लेमेंट्स मार्कहॅम याने शॅकल्टनने ८८ अंश अक्षवृत्त पार केल्याविषयी शंका व्यक्त केली, परंतु उपलब्ध सर्व माहीती आणि मोहीमेतील सर्वांच्या वृत्तांतामुळे ते खरोखरच ८८ अंशावर पोहोचले यावर शिक्कामोर्तब झालं !
रोनाल्ड अॅमंडसेनने शॅकल्टनची मुक्तकंठाने तारीफ केली. तो म्हणतो,
" उत्तर धृवीय संशोधनात जे स्थान फ्रिट्झॉफ नॅन्सनचं आहे तेच दक्षिण धृवाच्या बाबतीत शॅकल्टनचं !"
खुद्द नॅन्सननेही शॅकल्टनची तारीफ केली. तो म्हणतो,
" शॅकल्टन दक्षिण धृवावर पोहोचला नाही हा केवळ नशिबाचा भाग होता ! दक्षिण धृवाच्या इतिहासात त्याचं नाव कायमचं लिहीलं जाईल !"
शॅकल्टनवर कौतुकाचा वर्षाव होत असताना एक माणूस मात्र मनातून खवळला होता तो म्हणजे रॉबर्ट फॅल्कन स्कॉट ! मॅकमुर्डो साऊंड आणि व्हिक्टोरीया लँडवर न जाण्याचं आपण बजावूनही शॅकल्टनने तिकडे काणाडोळा केला याचा स्कॉटला राग आला होता. आपल्या सहका-यांशी बोलताना शॅकल्टनची त्याने गद्दार, दगाबाज या शब्दात संभावना केली !
दक्षिण धृवावर पाऊल ठेवण्यात अद्याप कोणालाही यश आलं नव्हतं !
क्रमश :
९० डिग्री साऊथ - १ ९० डिग्री साऊथ - ३
अप्रतिम. वाचतोय.
अप्रतिम. वाचतोय.
शॅकल्टनने स्कॉटबरोबर असताना
शॅकल्टनने स्कॉटबरोबर असताना प्रवासात त्याला त्रास देउन मागे फिरायला लावले कारण नंतर परत जाउन दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला मानव त्याला बनायचे होते असे तुम्हाला नाही वाटत स्पार्टॅकस?
उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव , उत्तुंग गिरिशिखरे यांच्यावर ज्या चढाया झाल्या आहेत त्यात असे बॅक स्टॅबिंग बरेच व्हायचे. अर्थात शॅकल्टनला संशयाचा फायदा देता येइल पण जर स्कॉटच्या मोहिमेत त्याने जर शारिरिक आणि मानसिक कमकुवतता दाखविली असेल तर स्कॉटचा रागही मी समजु शकते.
लेख उत्तम!
शॅकल्टनने स्कॉटबरोबर असताना
शॅकल्टनने स्कॉटबरोबर असताना प्रवासात त्याला त्रास देउन मागे फिरायला लावले कारण नंतर परत जाउन दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला मानव त्याला बनायचे होते असे तुम्हाला नाही वाटत >>>
शॅकल्टनने मुद्दामहून स्कॉटला त्रास दिला असावा अशी शक्यता मला वाटत नाही. ८२ अंश दक्षिण अक्षवृत्तावरुन स्कॉट, विल्सन आणि शॅकल्टनला मुख्यतः परत फिरावं लागलं ते अपु-या अन्नसाठ्यामुळे. तसंच कुत्र्यांना हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे. कुत्र्यांच्या बाबतीतली अढी इथेच स्कॉटच्या मनात पक्की बसली होती.
स्पार्टाकस, केवळ अप्रतिम
स्पार्टाकस,
केवळ अप्रतिम वर्णन ! शाळेत असताना केवळ म्हणून वाचलेले पण आज ज्ञान आणी जिज्ञासा म्हणून ! तेंव्हा कळत नव्हते पण आज मात्र समजते की किती धैर्याची माणसे होती ही ते ! अशा व्यक्तींचा आणी त्यांच्या धाडशी मोहिमांची आठवण ताजी करून दिल्याबद्दल आपले धन्यवाद आणी अभिनंदन ! पुढील भागाची उत्कटतेने प्रतीक्षा !!