यडपट राजू (भाग३)

Submitted by संतोष वाटपाडे on 30 January, 2014 - 21:46

यडपट राजू जेव्हा नवीन सैन्यामध्ये भरती झाला,
गावामध्ये त्याच्या छोट्या गावकर्‍यांनी कल्ला केला....

कशास जातो यड्या मराया भलता त्याला बोलून गेला,
तरी थांबला नाही राजू भरती होऊन दलात ठेला....

पूर आला कि राजू तत्पर दंगल होता राजू फ़िरला,
नेत्यांचाही बचाव करण्या राजू फ़डकत उभा राहिला....

घरी आईची बापाचीही चिंता कधीच नव्हती त्याला,
राजू बायकोपोरं सोडून युध्दभूमीवर सदा हासला....

घेत उशाशी जळती ज्वाला जमीन जखमी अंथरण्याला,
डोळे उघडे ठेवून निजता बंदूक होती पांघरण्याला...

खिंडी लढवत राजू यडपट तोफ़ेवाणी सदा वाजला,
भारत देशासाठी झगडत सीमेवरती खूप गाजला....

आले जेव्हा हरामजादे राजू चिडला खूप बरसला ,
वेडा अविरत तळपत होता जरी कितीही जखमी झाला,

छातीमध्ये गोळ्या झेलून मायभुमीच्या कुशीत निजला....
झुंज अघोरी बघायला ती कुणी शहाणा नाही धजला....

यडपट राजू यडपट होता देशासाठी जगला खपला,
पुष्पसुशोभित पेटीमध्ये शांत अखेरी घरी परतला.....

गाव नपुंसक हासत होता खिदळत होता क्षणाक्षणाला,
अन ऐकत होता लाज फ़ेकूनी रडणार्‍या या राष्ट्रगीताला.....

--- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users