सॅव्हेज माऊंटन - ८

Submitted by स्पार्टाकस on 13 January, 2014 - 19:05

 
पहाटे ५.००

मार्को कन्फर्टोला, विल्को वॅन रूजेन आणि जेरार्ड मॅक्डोनेल उजाडण्याची वाट पाहत एकमेकाला चिकटून बसले होते. खाली जाण्यासाठी ते उतावीळ झाले होते. गेले ३६ तास ते २६००० फूट उंचीवर डेथ झोनमध्ये वावरत होते, त्यामुळे लवकरात लवकर खाली न उतरल्यास आपल्याला पल्मनरी आणि सेरेब्रल एडेमा आणि फ्रॉस्टबाईट होण्याची शक्यता आहे याची तिघांनाही कल्पना होती.

पूर्वेला दिवस उजाडण्याची चिन्हं दिसू लागताच कन्फर्टोला, रूजेन आणि मॅक्डोनेलने हालचाल करण्याचा निर्णय घेतला. मॅक्डोनेल आणि रूजेनला सोडून कन्फर्टोला बॉटलनेकच्या वर असलेल्या सीरॅकवरुन पुढे वाकून खाली जाण्याचा मार्ग दिसतो का हे पाहण्याचा प्रयत्न करु लागला. खाली जाण्याचा कोणताही मार्ग त्याला दिसला नाहीच, पण दोराला लटकलेले जुमीक भोटे आणि इतर कोरीयन गिर्यारोहकही त्याला दिसून आले नाहीत. कन्फर्टोला परतून रुजेन आणि मॅक्डोनेलपाशी आला. ते दोघंही निराळ्या दिशांना खाली जाण्याचा मार्ग शोधून परत आपल्या जागेवर आले होते. सुमारे अर्धा-पाऊण तास शोधाशोध करूनही त्यांना खाली जाण्याचा मार्ग दिसू शकला नव्हता.

काही वेळाने रूजेन उठला आणि त्याने आदल्या रात्री उतरून आलेल्या पर्वताची धार गाठली.

पहाटे ५.३०

कँप ४ वरुन चिरींग भोटे आणि मोठा पसांग भोटे पुन्हा बॉटलनेकच्या मार्गाला लागले होते !

रात्रभर दोघांचे इतर गिर्यारोहकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु होते. गो मी यंगला सुरक्षीत कँप ४ वर आणल्यावर ते पुन्हा बाहेर पडले होते ! पेम्बा ग्याल्जेने त्यांना पुन्हा बॉटलनेकमध्ये जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा नातेवाईक असलेल्या जुमीक भोटेच्या काळजीने त्यांनी पुन्हा चढाईस सुरवात केली !

सकाळी ६.००

ग्लेशीयरवरुन थेट खाली जाणा-या उताराने रुजेनने उतरण्यास सुरवात केली. सकाळी खाली जाण्याचा मार्ग शोधत असताना आपली दृष्टी मंद होत असल्याची त्याला कल्पना आली होती. कित्येक तासांत कोणताही द्रवपदार्थ पोटात न गेल्याने त्याला डी-हायड्रेशन झालं होतं, त्यामुळे त्याच्या नजरेवर परिणाम झाला होता. लवकरात लवकर खाली जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही याची त्याला जाणिव झाली.

रुजेनने खाली उतरण्यास सुरवात केली. मॅक्डोनेल, कन्फर्टोला आणि आपण वाट चुकल्याने ट्रॅव्हर्स आणि बॉटलनेकची वाट चुकून भलत्याच मार्गाला लागल्याची त्याची जवळपास खात्री पटली होती. सुमारे तीनशे फूट उतरल्यावर त्याला सुरक्षा दोर दिसला. खाली जाण्याचा मार्ग सापडल्याच्या आनंदात त्याने आपली कॅराबिनर दोराला लावली आणि खाली उतरण्यापूर्वी सहजच उजवीकडे नजर टाकली आणि....

... जेमतेम चार-पाच यार्ड अंतरावर दोराला अडकून लटकणारे तीन गिर्यारोहक त्याच्या नजरेस पडले !

त्या तिघा गिर्यारोहकांना पाहून रुजेन इतका हादरला होता की काय करावं त्याला समजेना. ते गिर्यारोहक एका सुरक्षा दोराच्या सहाय्याने लटकत होते. त्यांच्यापैकी एकाचा चेहरा रक्ताने माखला होता. तो पूर्णपणे उलटा लटकत होता. त्याच्यापेक्षा खाली तीसेक फूटावर दुसरा गिर्यारोहक होता. तो देखील बेशुध्दावस्थेत होता. त्याच्या खाली तिसरा गिर्यारोहक मात्रं पूर्ण शुध्दीत होता. रुजेनला पाहताच त्याने त्याला मदत करण्याची विनंती केली. रुजेनने आपल्याजवळचे हातमोजे त्याला दिले.

दोराला लटकलेले ते गिर्यारोहक म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून जुमीक भोटे आणि त्याच्याबरोबर असलेले कोरीयन होते.

" माझी नजर मंद होत चालली आहे ! मला खाली जाणं आवश्यक आहे !" रुजेन म्हणाला.
" मी रेडीओवर मदत मागीतली आहे !" जुमीक उत्तरला, " खालून मदत येते आहे !"

रुजेनने काही क्षण विचार केला आणि पुन्हा खाली उतरण्यास सुरवात केली.

काही अंतर सावधपणे उतरल्यावर रुजेनचा पाय अचानक घसरला. अगदी शेवटच्या क्षणी पर्वताच्या कडेला गोठलेल्या बर्फाचा तुकडा पकडून स्वतःला घसरण्यापासून वाचवण्यात तो यशस्वी झाला !

सुमारे तीनशे फूट उतरल्यावर सुरक्षा दोर संपला. दोराविना खाली उतरणं आणखीनच कठीण झालं होतं. आणखीन काही फूट उतरल्यावर तो एका खडकाच्या उभ्या भिंतीवर पोहोचला ! अर्थात तिथून खाली उतरणं अशक्यंच होतं. निरुपायाने त्याने मागे फिरुन पुन्हा वर जाणारी वाट पकडली, पण आता चढाई करणं अधिकाधीक कठीण होत होतं.

रुजेनने वर नजर टाकली आणि त्याला मॅक्डोनेल आणि कन्फर्टोला त्या तिघा गिर्यारोहकांपाशी पोहोचलेले दिसले.

" मार्को ! जेरार्ड ! खालचा मार्ग कोणत्या बाजूला आहे ?"

रुजेनचा आवाज इतका क्षीण झाला होता, की वर असलेल्या कन्फर्टोला आणि मॅक्डोनेल पर्यंत त्याचा आवाज पोहोचणं अशक्यच होतं.

रुजेनने उजव्या हाताला असलेल्या असलेल्या सीरॅकच्या दिशेने मोर्चा वळवला.

सकाळी ७.००

मार्को कन्फर्टोला आणि जेरार्ड मॅक्डोनेलने रुजेनने पकडलेल्या वाटेवरुनच खाली उतरण्यास सुरवात केली. रुजेनप्रमाणेच त्यांनाही सुरक्षा दोर आढळला. दोरावरून काही फूट खाली येताच कन्फर्टोलाला जुमीक भोटे आणि दोन कोरीयन गिर्यारोहक नजरेस पडले. रूजेन त्यांना ओळखू शकत नसला तरी त्याने मात्र जुमीक आणि कोरीयन गिर्यारोहकांना ओळखलं होतं.

" जेरार्ड," कन्फर्टोलाने मॅक्डोनेलला आवाज दिला, " खाली ये, लवकर !"

कन्फर्टोलाने खाली पाहीलं तेव्हा त्याला खडकाच्या उभ्या भींतीच्या माथ्यावर पोहोचलेला रुजेन दिसला. एव्हाना मॅक्डोनेल त्याच्याजवळ पोहोचला होता. दोघांनीही रूजेनला हाका मारण्याचा आणि त्याचं लक्षं वेधून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नव्हता.

मॅक्डोनेल येऊन पोहोचताच त्याने आणि कन्फर्टोलाने कोरीयन गिर्यारोहकांच्या मदतीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सुरवात केली.

मॅक्डोनेलने सर्वात वर असलेल्या आणि शीर्षासनात लटकलेल्या कोरीयन गिर्यारोहकाला सरळ उभा करण्यास सुरवात केली. त्याच्या भोवती असलेल्या दोरांचा विळखा सोडवल्यावर त्याला जुमीक बसला होता तिथपर्यंत आणण्यास कोणतीच अडचण येणार नव्हती.

अर्थात मॅक्डोनेल आणि कन्फर्टोलाचं काम तसं कठीणच होतं. अनेक दोरांच्या वेटोळ्यात ते तिघं गिर्यारोहक इतके गुंतलेले होते, की एकाला सोडवण्याचा प्रयत्न करताना दुसरा धोकादायक रितीने लटकून तिघांनाही खाली खेचण्याच्या अवस्थेत येत होता. कन्फर्टोलाने दोर तोडण्याचा विचार केला, परंतु तसं केल्यास तिघंही खाली कोसळण्याची दाट शक्यता होती. अखेर एका आईस एक्सला तिघांना जोडणारा दोर त्याने सुरक्षीतपणे बांधला आणि कोरीयन गिर्यारोहकाला सरळ अवस्थेत उभा करण्यास तो मॅक्डोनेलला मदत करू लागला.

कँप ३ वर असलेल्या अल्बर्टो झरीनने बेस कँपच्या दिशेने खाली उतरण्यास सुरवात केली ! निक राईसही कँप ३ वर होता. त्याला कॅलीफोर्नीयातून आलेल्या संदेशामुळे के २ वरच्या अपघाताची माहीती मिळाली होती !

सकाळी ८.००

उजवीकडे निघालेल्या विल्को वॅन रुजेनला सुमारे शंभर फूट अंतरावर अ‍ॅन्करला बांधलेला दोर दिसला. दोराच्या सहाय्याने त्याने खाली उतरण्यास सुरवात केली.

ही निश्चीतच खाली जाणारी वाट दिसत होती. काही वेळाने रुजेनला अ‍ॅन्करला लटकावलेले ऑक्सीजन सिलेंडर्स दिसले आणि आपण साधारण कुठे आहोत याचा त्याला अंदाज येऊ लागला. आदल्या दिवशी कोरीयन गिर्यारोहकांनी ते रिकामे सिलेंडर्स तिथे ठेवलेले होते.

कँप ४ वर पेम्बा ग्याल्जे एरीक मेयर आणि फ्रेड्रीक स्ट्रँगच्या तंबूत आला. पेम्बा प्रचंड थकला होता. आदल्या रात्री सुमारे १.३० च्या सुमाराला पेम्बा कँप ४ वर परतला होता. मात्रं आल्यावर जवळपास सगळी रात्र तो जागाच होता. तो स्वतः सुरक्षीत असला तरी जेरार्ड मॅक्डोनेल आणि विल्को वॅन रुजेन हे अद्याप न परतल्याने तो काळजीत होता. मॅक्डोनेल त्याचा जिवलग मित्र होता.

" आपण सर्वांनी खाली जाणं आवश्यक आहे !" पेम्बा म्हणाला, " इथे राहून आणखीन शक्ती खर्च होण्यापेक्षा खाली गेलेलं चांगलं ! शिवाय हवामानही बिघडत चाललं आहे !"

सेसील स्कॉग, लार्स नेसा आणि ऑयस्टीन स्टँगलँडने कँप ४ सोडला आणि परतीची वाट धरली. निघण्यापूर्वी स्कॉगने नॉर्वेतील आपल्या मॅनेजरला बेईच्या मृत्यूची बातमी दिली होती.

बेस कँपवर असलेल्या रोलँड वॅन ऑस आणि क्रिस किंकल यांनी आतापर्यंत मिळालेली सर्व माहीती एकत्र केली. कँप ४ वरील गिर्यारोहकांशी संपर्क साधून त्यांनी सुटकेचा प्रयत्न करावा म्हणून दोघांनी त्यांची मनधरणी केली, परंतु ठोस माहितीविना कोणाचीही पुन्हा बॉटलनेकमध्ये पाय टाकण्याची तयारी नव्हती. कँप ४ वर एकही सुरक्षा दोर शिल्लक नव्हता. चिरींग दोर्जेचा एकमेव ऑक्सीजन सिलेंडर तिथे उपलब्ध होता !

सकाळी ९.००

मॅक्डोनेल आणि कन्फर्टोला अद्यापही कोरीयन गिर्यारोहक आणि जुमीक भोटेची दोरांच्या जंजाळातून सुटका करण्याच्या मागे होते. काही वेळाने अनपेक्षीतपणे मॅक्डोनेलने वरच्या खडकावर चढाईला सुरवात केली आणि एका वळणाआड तो दिसेनासा झाला !

" जेरार्ड ! परत ये !" कन्फर्टोला ओरडत होता, " कम् बॅक जीझस् ! कम बॅक !"

मॅक्डोनेलने एकदाही मागे वळून पाहीलं नाही.

मॅक्डोनेलला वर गेलेला पाहून कन्फर्टोला पार हादरला होता. जेरार्डच्या मनावरचा ताबा उडाला असल्याची त्याची खात्री झाली. त्याच्यासारखी आपली अवस्था झाली तर ! कल्पनेनेच कन्फर्टोलाला धडकी भरली.

कन्फर्टोला जुमीक भोटेपाशी आला. जुमीकने रेडीओवरून मदत मागीतल्याची त्याला कल्पना दिली. जुमीकच्या पायातील बूट गायब झाला होता. कन्फर्टोलाने आपल्याजवळची मोज्याची जोडी त्याला दिली आणि खालचा मार्ग पत्करला.

खालच्या मार्गाला लागलेला रुजेन एका दगडी उतारावरुन रॅपलींग करुन खाली आला. काही मिनीटांतच त्याला ५ मीमी जाडीचा एक विशीष्ट सुरक्षा दोर बांधलेला दिसला. हा दोर जेरार्ड मॅक्डोनेलचा होता. के २ च्या मोहीमेसाठी त्याने मुद्दाम अलास्कातून तो दोर आणला होता !

तो दोर दिसताच आपण योग्य मार्गावर असल्याची रु़जेनची पक्की खात्री झाली. त्या दोरावरुन खाली येताच त्याला बॉटलनेकचा उतार दिसला !

कँप ४ वरील गिर्यारोहक बॉटलनेकच्या उतारांवर नजर लावून होते. त्यांना बॉटलनेकच्या उतारांवर असलेला एक गिर्यारोहक दिसत होता, परंतु तो नेमका कोण आहे याची कल्पना येत नव्हती ! कॅस वॅन डी गेवेलने मॅक्डोनेल आणि रुजेनच्या सुटकेसाठी पुन्हा चढाई करण्याचा विचार बोलून दाखवला परंतु कोणत्याही माहीतीविना चढाई करण्यात काहीच अर्थ नव्हता.

" एक दोन गिर्यारोहकांचा प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती कॅस !" मेयर म्हणाला, " अद्याप नऊ जणांचा पत्ता लागलेला नाही !"

सकाळी ९.३०

कन्फर्टोलाने तिघा गिर्यारोहकांना सोडण्यापूर्वी आईस एक्सच्या सहाय्याने त्यांना बर्फाशी सुरक्षीतपणे बांधून टाकलं होतं. त्यांना सोडून तो निघाला आणि बॉटलनेकच्या ट्रॅव्हर्सच्या मार्गाला लागला. एकेक पाऊल सावधपणे टाकत शक्य तितक्या लवकर सीरॅकच्या समोरून पार होण्याचा त्याचा प्रयत्न होता.

रुजेन बॉटलनेकच्या उताराला लागला होता. परंतु काही वेळातच आपल्या भोवती धुक्याचं साम्राज्यं पसरत चालल्याचं त्याच्या ध्यानात आलं. धुक्यातून मार्ग काढत तो काही वेळ उतरत होता, परंतु अखेर एकही पाऊल पुढे टाकण्याइतकंही त्याला दिसेना ! अखेरीस त्याने तिथेच बैठक मारली !

सकाळी १०.००

जेरार्ड मॅक्डोनेल कोरीयन गिर्यारोहक आणि जुमीक भोटे यांच्यापाशी परतला !

कन्फर्टोलाची समजूत झाली होती त्याप्रमाणे जेरार्डच्या मनावरचा ताबा उडाला नव्हता ! जेरार्ड सर्वात जवळच्या अ‍ॅन्करपाशी दोराच्या सहाय्याने वजन ट्रान्स्फर करण्याच्या उद्देशाने वर गेला होता. कन्फर्टोला खाली निघून गेल्याचं दिसून आल्यावर मॅक्डोनेलने तिघा गिर्यारोहकांच्या सुटकेचं काम आपल्या अंगावर घेतलं.

रुजेनने आपल्या सॅटेलाईट फोनवरुन मार्टीन वॅन एकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा संपर्क झाला नाही. अखेर त्याने आपल्या घरचा नंबर फिरवला आणि त्याच्या पत्नीने हेलीनने फोन उचलला !

" विल्को !"
" मी ठीक आहे ! मी जिवंत आहे !"
" पण तू नक्की आहेस कुठे ?"
" मला माहीत नाही ! मी साफ हरवलो आहे ! मी सुमारे ७८०० मी पेक्षा उंचीवर बेस कँप पासून सुमारे सहाशे फूट उंचीवर दक्षिण बाजूला आहे ! बेस कँपवर कळवण्याची व्यवस्था कर !"

बॉटलनेकचा परिसर धुक्यात गडप झाला !

रुजेनशी बोलणं होताच हेलीनने वॅन एकशी संपर्क साधला. वॅन एकने बेस कँपवर रोलँड वॅन ऑसशी संपर्क साधून रुजेनच्या शोधाची व्यवस्था करण्याची सूचना दिली.

सकाळी १०.३०

मार्को कन्फर्टोला अखेर सीरॅकसमोरून ट्रॅव्हर्स पार करण्यात यशस्वी झाला ! सुटकेचा नि:श्वास टाकून काही क्षण त्याने विश्रांती घेतली. समोरच असलेल्या सुरक्षा दोरावरुन तो बॉटलनेकमध्ये उतरु लागला. दोर संपताच काही अंतरावर खाली बर्फात पडलेली आईस एक्स त्याच्या नजरेस पडली.

कन्फर्टोलाची आईस एक्स कोरीयन गिर्यारोहकांच्या सुटकेच्या नादात वर राहीली होती. या आईस एक्सचा त्याला खाली उतरण्यासाठी निश्चीतच उपयोग करता येणार होता. मात्रं ती आईस एक्स मिळवण्यच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो घसरु लागला !

सुदैवाने सुमारे तीसेक फूटांवर कन्फर्टोलाची घसरगुंडी थांबली ! त्याच्या हाता-पायांना मार बसला होता, पण नशीबानेच कोणतीही मोठी जखम झालेली नव्हती ! स्वतःला सावरत त्याने आईस एक्सचा नाद सोडला आणि पुन्हा खालच्या दिशेने उतरण्यास सुरवात केली. तो खाली उतरत असतानाच वरती आभाळ कोसळल्यासारखा आवाज झाला !

बर्फाची एक प्रचंड लादी कड्यापासून सुटी होऊन खाली झेपावली होती !
बॉटलनेकवर बर्फाच्या तुकड्यांचा वर्षाव करत ते अ‍ॅव्हलॉन्च खाली झेपावत होतं !

अ‍ॅव्हलाँच पाहताच कन्फर्टोला खिळल्यासारखा उभा राहीला. झंझावाती वेगाने झेपावणा-या बर्फापासून वाचणार तरी कसं ? आपला अंत जवळ आला याची त्याला पक्की खात्री पटली !

त्याच्यापासून सुमारे तीस फूट अंतरावर येऊन बर्फाचा तो लोंढा स्थिरावला ! कन्फर्टोलाचं नशीब भलतंच जोरावर होतं !

स्वतःला सावरत त्याने अ‍ॅव्हलाँचच्या अवशेषांवरून नजर फिरवली आणि त्याला एका गिर्यारोहकाचे अवशेष दिसले. नीट निरखून पाहील्यावर त्याला ते अवशेष कोणाचे असावेत याची कल्पना आली.

जेरार्ड मॅक्डोनेल !

मॅक्डोनेलचा दुर्दैवी अंत झालेला पाहताच कन्फर्टोला विलक्षण खिन्न झाला. के २ चा त्याला आता विलक्षण तिरस्कार वाटू लागला होता. काही अंतर चालून जाताच अतीश्रमाने तो बर्फातच आडवा झाला, आणि त्याला झोप लागली.

कन्फर्टोलाचा जेरार्ड मॅक्डोनेलच्या बाबतीत दुस-यांदा घोटाळा झाला होता. मॅक्डोनेल अद्यापही जुमीक आणि त्याच्याबरोबर असलेल्या कोरीयन गिर्यारोहकांना सोडवण्याचा प्रयत्न करत होता. तो अजूनही ठणठणीत जिवंत होता. मग कन्फर्टोलाने पाहीलेला मृतदेह कोणाचा होता ?

मेहेरबान करीम !

ह्यूजेस डी'ऑब्रेडचा पोर्टर मेहेरबान करीम !

करीमने रुजेन, मॅक्डोनेल आणि कन्फर्टोला यांच्याही वर रात्री मुक्काम ठोकला होता ! सकाळी खाली येण्याच्या प्रयत्नात तो कोसळला होता ! कदाचीत त्याच्या हालचालींमुळेही एखादा सीरॅक कोसळला असावा !

बेस कँपवर क्रिस किंकलने बेपत्ता असलेल्या आणि खात्रीलायक रितीने मरण पावलेल्या गिर्यारोहकांची यादी तयार केली होती. रॉल्फ बेई, ड्रेन मँडीक, जेहान बेग यांचा मृतांमध्ये समावेश होता. अल्बर्टो झरीनसह बेस कँपवर अद्याप न परतलेल्या गिर्यारोहकांचा बेपत्ता यादीत समावेश होता !

दुपारी १२.००

अमेरीकन गिर्यारोहकांनी कँप ४ सोडून बेस कँपवर परतण्याचा निर्णय घेतला ! चिरींग दोर्जेचा ऑक्सीजन सिलेंडर त्यांनी पेम्बा ग्याल्जेकडे दिला. पेम्बा मॅक्डोनेल आणि रुजेनची वाट पाहत आणखीन काही तास तिथे थांबणार होता. पेम्बाप्रमाणे डी गेवेलनेही इतक्यात कँप ४ वरुन न परतण्याचा निर्णय घेतला. कोरीयन गिर्यारोहकही थांबले होते.

जेरार्ड मॅक्डोनेल अद्यापही जुमीक भोटे आणि कोरीयन गिर्यारोहकांना मोकळं करण्यासाठी धडपड करत होता !

विल्को वॅन रुजेन पूर्ण भरकटला होता. आपण नक्की कुठल्या दिशेने उतरतो आहोत याची त्याला काहीही कल्पना येत नव्हती. पाय नेतील त्या दिशेने तो खाली उतरत होता !

दुपारी १२.३०

पेम्बा ग्याल्जेच्या रेडीओवर संदेश आला !

पहाटे जुमीक भोटेच्या शोधात बाहेर पडलेल्या चिरींग आणि मोठा पसांग भोटेला बॉटलनेकच्या खालच्या भागात हाता-पायांवर रांगत असलेला एक गिर्यारोहक दिसला होता. त्याच्या हिरव्या-काळ्या गिर्यारोहणाच्या पोशाखाचं वर्णन ऐकताच तो कोण असावा याची पेम्बाला कल्पना आली.

मार्को कन्फर्टोला !

" तुम्ही दोघे त्याला घेऊन परत या !" पेम्बा पसांगला म्हणाला.
" आम्ही जुमीक आणि कोरीयनांच्या शोधात वर जात आहोत ! तू कोणाला तरी घेऊन ये !" पसांग.

पेम्बाने काही क्षण विचार केला. रुजेन आणि मॅक्डोनेलचा अद्याप पत्ता नव्हता. त्याला त्यांचाही शोध घेण्यास जावं लागणार होतंच !

" ठीक आहे ! मी जातो !" पेम्बा म्हणाला. पसांग आणि चिरींग वर निघाले.

पेम्बा आणि डी गेवेल ऑक्सीजन, पाणी आणि खाद्यपदार्थांसह बाहेर पडले.

दुपारी १.३०

पेम्बा आणि डी गेवेल बॉटलनेकच्या मार्गाला लागले होते, परंतु आपल्याला आणखीन पुढे जाणं अशक्यं असल्याचं गेवेलला जाणवलं.

" तू पुढे जा !" गेवेल पेम्बाला म्हणाला," मी तुझी इथेच वाट पाहतो !"

पेम्बाने मान डोलवली आणि तो पुढे निघाला. दोघांकडेही रेडीओ होते. काहीही झालं तर ते एकमेकाला सूचना देऊ शकणार होते.

रुजेनने हेलीनशी संपर्क साधला !

" तू नक्की कुठे आहेस ?" तिने विचारलं, " तुला इतर कोणती शिखरं दिसत आहेत ? ब्रॉड पीक दिसतं आहे ?"
" मी नक्की कँप ४ च्या जवळ आहे !"

हेलीनने पुन्हा वॅन एकशी संपर्क साधला. वॅन एकच्या डोक्यात रुजेनच्या सॅटेलाईट फोनच्या जी.पी.एस्. वरुन त्याचा शोध घेण्याची कल्पना चमकली. त्याप्रमाणे आपला अंदाज त्याने बेस कँपला कळवला.

दुपारी २.००

पेम्बा ग्याल्जेने अखेर मार्को कन्फर्टोलाला गाठलं ! आपल्याजवळचा ऑक्सीजन सिलेंडर काढून त्याने कन्फर्टोलाच्या तोंडावर मास्क चढवला. आधी विरोध करणा-या कन्फर्टोलाने ऑक्सीजन सिलेंडरच्या सहाय्याने श्वास घेण्यास सुरवात केली.

पेम्बाने कन्फर्टोलाला सावरत कँप ४ च्या दिशेने आणण्यास सुरवात केली. अद्यापही सीरॅकवरुन येणा-या अ‍ॅव्हलाँचचा धोका पूर्णपणे टळला नव्हता. पेम्बा भराभर पावलं उचलण्याची घाई करत होता.

पेम्बाच्या रेडीओवर संदेश आला !

मोठा पसांग भोटे अखेर जुमीक आणि कोरीयन गिर्यारोहकांपर्यंत पोहोचला होता ! जेरार्ड मॅक्डोनेलने त्यांची दोराच्या जंजाळातून जवळपास मुक्तता केली होती.

" आम्ही चौघंजण खाली येतो आहोत ! दोन कोरीयन, जुमीक आणि मी !" पसांगने संदेश दिला.

पेम्बाचा आपल्या कानांवर विश्वास बसेना ! कोरीयन गिर्यारोहक आणि जुमीक वाचले होते ! त्याचा आनंद गगनात मावेना.

" आमच्या मागे आणखीन एकजण होता ! पण आताच एका सीरॅकने त्याला खाली उडवलं !" पसांगने पुन्हा बातमी दिली.
" कोण होता तो ?"

पसांग कडून मिळालेल्या त्या गिर्यारोहकाच्या लाल आणि काळ्या रंगाच्या गिर्यारोहण पोशाखाचं वर्णन कळताच पेम्बा खिन्न झाला. तो गिर्यारोहक कोण असावा याची त्याला कल्पना आली होती.

जेरार्ड मॅक्डोनेल !

कोरीयन गिर्यारोहक आणि जुमीकची सुटका करण्यात जेरार्डने स्वत:चा जीव धोक्यात घालून अविश्रांत धडपड केली होती. त्यांची सुटका करण्यात तो यशस्वीही झाला होता, पण के २ च्या सीरॅकने त्याचाच बळी घेतला होता.

दुपारी २.३०

पसांगचा संदेश आल्याला जेमतेम दहा मिनीटं झाली असावी. मार्को कन्फर्टोला बॉटलनेकच्या खालचा उतार उतरत होता. अचानक पेम्बाचा आवाज त्याच्या कानांवर आला,

" पळ ! जोरात ! लवकर !"

कन्फर्टोलाने आपल्या दमल्याभागल्या पायांनी शक्य तितक्या त्वरेने पळण्याचा प्रयत्न केला. पेम्बा त्याच्या पाठीशी होताच.

..... आणि दुस-याच क्षणी आभाळ फाटलं !

सीरॅक !

बॉटलनेकवरील सीरॅक पुन्हा कोसळू लागले होते !

संपूर्ण परिसर धुक्यात हरवल्याने दोघांना काहीही दिसत नव्हतं. परंतु हिमखंड कोसळताना होणारा गर्जल्यासारखा आवाज त्यांच्या कानावर येत होता.

मार्को कन्फर्टोलाच्या डोक्यावर काहीतरी येऊन आदळलं ! अ‍ॅव्हलाँचमध्ये एक ऑक्सीजन सिलेंडर खाली उडून आला होता आणि त्याचा फटका त्याच्या डोक्यावर बसला होता. त्या आघातामुळे कन्फर्टोलाचा तोल गेला. आता आपण वाचत नाही याची त्याला खात्रीच पटली. खाली पडणा-या कन्फर्टोलाच्या कमरेला अचानक एक हिसका बसला आणि तो पुन्हा उतारावरील बर्फाच्या दिशेने खेचला गेला !

पेम्बा ग्याल्जेने प्रसंगावधानाने कन्फर्टोलाला मागे खेचलं होतं. आपल्या देहाखाली त्याला झाकून टाकत पेम्बाने बर्फाच्या चु-याचा मारा आपल्या अंगावर घेतला !

पेम्बामुळे कन्फर्टोलाचा जीव वाचला होता !

दोघांपासून अवघ्या पाच फूट अंतरावरुन बर्फाचा लोंढा पुढे सरकला होता !

अ‍ॅव्हलाँच ओसरल्यावर खाली दिसलेलं दृष्यं पाहून पेम्बा हादरुन गेला ! त्यांच्यापासून सुमारे शंभर फूट खाली चार मृतदेह पडले होते !

सावधपणे खाली उतरुन दोघं त्यांच्याजवळ पोहोचले.

कन्फर्टोलाने त्यांना लगेच ओळखलं. दोन कोरीयन आणि जुमीक भोटे ! काही तासांपूर्वीच त्याने आणि मॅक्डोनेलने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मोठा पसांग भोटेही मृत्यूमुखी पडला होता. अवघ्या काही मिनीटांपूर्वी पेम्बाचं त्याच्याशी बोलणं झालं होतं ! आता त्याचा मृतदेह पेम्बासमोर पडला होता.

दुपारी ३.००

पेम्बा आणि कन्फर्टोला खाली उतरत असतानाच त्यांना मागून मारलेल्या हाका ऐकू आल्या. बॉटलनेकच्या दिशेन कोणीतरी खाली उतरत होतं.

चिरींग भोटे !

पसांग बरोबर चिरींगही सुटकेसाठी बॉटलनेकमध्ये गेला होता. परंतु गिर्यारोहकांना खाली आणण्यासाठी तो सुरक्षा दोर जमवत मागे राहीला होता. सुदैवाने त्यामुळेच त्याचा जीव वाचला होता. जुमीक आणि पसांगच्या मृत्यूचा त्याला प्रचंड धक्का बसला होता. पेम्बाने त्याची समजूत घातली. तिघे कँप ४ च्या मार्गाला लागले.

अल्बर्टो झरीन बेस कँपवर पोहोचला ! त्याला अद्याप कोणतीही कल्पना नव्हती ! मात्र बेस कँपवर पोहोचताच त्याच्या ध्यानात सगळा प्रकार आला. त्याला विश्रांतीची आवश्यकता होती. बेस कँपवर थांबण्यापेक्षा त्याने एक मैलावर असलेल्या ब्रॉड पीकच्या बेस कँपकडे रात्रीच्या मुक्कामासाठी मोर्चा वळवला !

कॅस वॅन डी गेवेलकडून वॅन ऑसला ह्यूजेस डी'ऑब्रेडच्या मृत्यूची बातमी कळली. किंकलने डी'ऑब्रेडचा मृतांच्या यादीत समावेश केला.

दुपारी ४.००

कँप ४ च्या मार्गावर असताना दोन कोरीयन गिर्यारोहक आणि छोटा पसांगशी पेम्बा, चिरींग आणि कन्फर्टोलाची गाठ पडली. कँप ४ जवळ गेवेलही त्यांना भेटला.

कँप ४ वरुन निघालेले एरीक मेयर, फ्रेड्रीक स्ट्रँग, मार्क शीन, चिरींग दोर्जे आणि पॉल वॉल्टर्स कँप १ च्या वर असलेल्या ५० डिग्रीच्या उतारावरुन खाली उतरत होते. त्या उतारावर दोन सुरक्षा दोर आधीच बांधण्यात आले होते.

मार्क शीन झपाट्याने रॅपलींग करून १५० फूट खोल असलेल्या अँकरपाशी पोहोचला. त्याच्यापाठोपाठ मेयरने खाली उतरण्यास सुरवात केली.

सुमारे एकशे वीस फूट अंतर पार केल्यावर दोन पैकी एक सुरक्षा दोर अचानक तुटला !

या अनपेक्षीत प्रकारामुळे मेयर खाली फेकला गेला. खाली डोकं - वर पाय अशा अवस्थेत ब्रॉड पीक, गशेर्ब्रम आणि काराकोरमची इतर शिखरं त्याच्या समोर उभी राहीली.

'आपला खेळ खलास !' मेयरच्या मनात आलं.

आ SS वासून पाहत असलेल्या मार्क शीन पासून अवघ्या दहा फूट अंतरावर मेयर थांबला !

खाली उतरण्यास सुरवात करण्यापूर्वी मेयरने आपल्या जवळचा दोन फूट लांबीचा सुरक्षा दोर दुस-या दोराशी जोडला होता. या दोन फुटांच्या दोरानेच मेयरचा जीव वाचला ! अन्यथा तो किमान ४००० फूट खाली कोसळला असता !

" मला वाटलं तू खाली जाणार सरळ !" शीन म्हणाला.
" मी अद्याप जिवंत आहे ! विश्वास नाही बसत !" मेयर.

मेयरच्या सूचनेनुसार सावधपणे चिरींग, स्ट्रँग आणि वॉल्टर्स खाली उतरले. आणखीन एक अपघात टळला होता .

मार्टीन वॅन एकने रोलँड वॅन ऑसशी संपर्क साधून रुजेन ब्लॅक पिरॅमीडच्या वर असल्याचं त्याला खात्रीपूर्वक सांगीतलं होतं !

संध्याकाळी ५.००

मार्को कन्फर्टोला कँप ४ वर परतला होता. किम जे सू आणि गो मी यंगची भेट घेऊन त्याने सगळी कथा त्यांना सांगीतली. चिरींग भोटे एव्हाना सावरला होता, परंतु जुमीकच्या मृत्यूची बातमी आपल्या आईला आणि त्याच्या पत्नीला कशी सांगावी हे त्याला समजत नव्हतं.

निक राईस बेस कँपवर परतला होता.

लार्स नेसा, सेसील स्कॉग आणि ऑयस्टीन स्टँगलँड कँप २ वर पोहोचले होते. स्कॉगने बेईच्या घरी संपर्क साधून दुर्दैवी अपघाताची कल्पना दिली.

कँप २ वर न थांबता ते अ‍ॅडव्हान्स बेस कँपच्या मार्गाला लागले. तिथे रात्रीचा मुक्काम करण्याचा त्यांचा विचार होता.

क्रिस किंकलच्या मृत गिर्यारोहकांच्या यादीत आतापर्यंत नऊ गिर्यारोहकांची नावं समाविष्ट झाली होती. रॉल्फ बेई, ड्रेन मँडीक, जेहान बेग, ह्यूजेस डी'ऑब्रेड, किम ह्यो गियाँग, पार्क कियाँग हो, हवांग डाँग जिन, जुमीक भोटे आणि मोठा पसांग भोटे हे मरण पावले होते. जेरार्ड मॅक्डोनेल, मेहेरबान करीम आणि विल्को वॅन रुजेन बेपत्ता होते.

पेम्बा ग्याल्जेला मॅक्डोनेल मरण पावल्याची कल्पना आली होती, पण किंकलला त्याची काहीच कल्पना नव्हती.

संध्याकाळी ५.३०

बेस कँपवर असलेल्या क्रिस किंकलला के २ च्या दक्षिण उतारावरुन उतरणारा एक ठिपका दिसला. कोणत्याही मार्गावर नसलेल्या या भागात असलेला गिर्यारोहक कोण असावा ?

सेसन मार्गाच्या सुमारे १५०० फूट पश्चिमेला आणि कँप ४ पासून सुमारे १८०० फूट खाली उतरत असलेला तो गिर्यारोहक कोण होता याची बेस कँपवर कोणालाच कल्पना नव्हती. रुजेन ? मॅक्डोनेल ? करीम ?

मॅक्डोनेल आणि करीम मृत्यूमुखी पडल्याची बातमी बेस कँपवर आली नव्हती.

तो विल्को वॅन रुजेन होता. मार्टीन वॅन एकने खात्रीपूर्वक सांगीतलेल्या ठिकाणापासून तो कितीतरी दूर होता !

संध्याकाळी ६.३०

ढगांचा पडदा पुन्हा दूर झाला. बेस कँपवरुन सेसन मार्गाच्या पश्चिमेला असलेला तो गिर्यारोहक पुन्हा सर्वांच्या नजरेस पडला. तो अद्यापही त्याच जागी होता. आता तो खाली बसला होता !

त्या गिर्यारोहकाला बेस कँपवर आणणं हे आता सर्वात मोठं आव्हान होतं.

वॅन ऑसने कँप ४ वर असलेल्या पेम्बा ग्याल्जे आणि कॅस वॅन डी गेवेलशी संपर्क साधला.

" पेम्बा - कॅस, सेसन मार्गापासून जवळ एक गिर्यारोहक अडकला आहे. तो बहुतेक रुजेन असावा ! तुम्ही सेसन मार्गाने खाली उतरुन त्याला गाठण्याचा प्रयत्न करा !"

पेम्बा आणि गेवेल प्रचंड थकलेले होते. त्यांना विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. सेसन मार्गाच्या तीव्र उतारावरुन खाली उतरणं अतिशय धोकादायक होतं. रात्रीच्या अंधारात तसा प्रयत्नं करणं म्हणजे सरळ सरळ आत्महत्या ठरण्याची शक्यता होती.

" ठीक आहे ! आम्ही जातो !" पेम्बा उत्तरला !

संध्याकाळी ७.००

दगडाच्या कडेला सुमारे २५३०० फूट उंचीवर झोपलेल्या विल्को वॅन रुजेनला जाग आली !

रुजेनने सॅटेलाईट फोनवर पुन्हा हेलीनशी संपर्क साधला. काही वेळातच अखेर मार्टीन वॅन एकचा रुजेनशी संपर्क झाला ! रुजेनला प्रचंड तहान लागली होती. आपल्याला प्रचंड झोप येत असल्याचंही त्याने वॅन एकला सांगीतलं.

" झोपू नकोस !" वॅन एकने त्याला बजावलं, " तुझ्या डाव्या बाजूला जा. सेसन मार्ग पकड ! खाली जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे !"

फोन बंद करुन रुजेन काही वेळ तसाच बसून राहीला. विरळ ढगांमधून त्याला सुमारे दोन-तीनशे यार्ड अंतरावर डाव्या हाताला असलेली एक घळ दिसली. त्या घळीतून उतरणा-या मार्गाने रुजेन सुमारे सहाशे फूट खाली उतरुन आला. मात्रं घळीच्या खालीच असलेली अक्राळ-विक्राळ कपार ( क्रिव्हाईस ) पाहून त्याला धडकी भरली.

रुजेनने पूर्वेचा मार्ग धरला. त्या मार्गाला असलेल्या प्रचंड मोठ्य खडकांवर तो पोहोचला. परंतु पुढे कुठल्या दिशेने जावं त्याला काही कळेना.

एव्हाना अंधार पडला होता. रुजेनचा हेडलँप गायब झाला होता. अंधारात कोणतीही हालचाल केली तर आपण एखाद्या कपारीत कोसळण्याची शक्यता आहे याची त्याला कल्पना होती.

रुजेनसमोर आता एकच मार्ग होता.

बायव्हॉक !

संध्याकाळी ७.३०

पेम्बा ग्याल्जे आणि कॅस वॅन डी गेवेल चिरींग दोर्जेचा ऑक्सीजन सिलेंडर, पाणी आणि थोडेफार खाद्यपदार्थ घेञ्न हेडलँपच्या उजेडात सेसन मार्गाला लागले होते.

आणखीन एक रात्र बायव्हॉक करण्याच्या कल्पनेने रुजेनच्या पोटात खड्डा पडला. आदल्या रात्री त्याच्याबरोबर मॅक्डोनेल आणि कन्फर्टोला होते आणि मध्यरात्रीनंतर काही तासच त्यांना वाट पाहवी लागली होती. यावेळी मात्र तो एकटा होता आणि संपूर्ण रात्र त्याला तिथे काढावी लागणार होती !

खडकांच्या दिशेने वाटचाल करताना रुजेनच्या नजरेस दोन गिर्यारोहकांचे मृतदेह पडले ! अर्थात ते कोण असावे याची त्याला कल्पना आली नाही. त्यांच्याजवळून पुढे जात त्याने रात्र काढण्यासाठी सोईस्कर जागा शोधून काढली. वा-याला तोंड देत तो तिथेच बसून राहीला. मधून मधून हात-पाय घासून त्यात उर्जा निर्माण करण्याचं काम त्याने चालू ठेवलं होतं.

रात्री ८.००

कँप ४ वरुन निघालेल्या पेम्बा आणि डी गेवेलने सेसन मार्ग पकडला होता. मात्रं अतीश्रमाने गेवेल लवकरच मागे पडला होता. शक्यं तितक्या लवकर रुजेनला गाठण्याच्या इराद्याने पेम्बा झपाट्याने खाली उतरत होता.

मागे पडलेल्या गेवेलने रुजेनला हाका मारण्याचा सपाटा लावला होता.

" विल्को ! विल्को !"

काही अंतरावर गेवेलच्या हेडलँपच्या बॅटरीने 'राम' म्हटला. गेवेलजवळ रेडीओ होता. गेवेलने रेडीओवर पेम्बाशी संपर्क साधला आणि आपण रेडीओच्या बॅट-या हेडलँपला वापरत असल्याची कल्पना दिली. त्याने रेडीओतून बॅट-या बाहेर काढल्या, परंतु त्याच्या दुर्दैवाने त्या हातातून निसटल्या आणि पहाडाच्या उतारावरुन खाली जात गडप झाल्या !

हार न मानता, गेवेलने सुरक्षा दोरावरुन खाली उतरण्यास सुरवात केली. मात्रं काही अंतर उतरुन गेल्यावर दोर संपला आणि त्याबरोबर गेवेल थांबला. अखेरीस त्यानेही सकाळ उजाडेपर्यंत तिथेच वाट पाहण्याचा निर्णय घेतला. जवळची स्लीपींग बॅग पांघरून तो तिथेच आडवा झाला !

विल्को वॅन रुजेन सेसन मार्गाच्या बाजूच्या धारेवर गाढ झोपेत होता !

रात्री ९.००

कॅस वॅन डी गेवेलला जाग आली. त्याच्या हातातून तीव्र वेदनेची लहर सरसरत गेली. स्लीपींग बॅग उघडल्यावर पुन्हा हातात ग्लव्हज् घालायला तो पार विसरला होता ! त्याच्या बोटांना फ्रॉस्टबाईटने ग्रासलं होतं.

गेवेल विचार करत होता. आपण रुजेनला मदत करण्यासाठी निघालो होतो, पण आता स्वतःच अडकून पडल्याची त्याला जाणीव झाली. तो कुठे होता हे कोणालाही माहीत नव्हतं. त्याच्याजवळ रेडीओ नव्हता ! सकाळ होण्याची वाट पाहण्यापलीकडे त्याच्या हाती काही उरलं नव्हतं. 'पेम्बा बहुधा कँप ३ वर पोहोचला असावा!' गेवेलच्या मनात आलं.

गेवेलच्या अंदाजाप्रमाणेच पेम्बा कँप ३ वर पोहोचला होता. गेवेल पोहोचण्याची तो वाट पाहत होता, परंतु गेवेलचा पत्ता नव्हता !

रात्री १०.००

बेस कँपवरुन क्रिस किंकल आणि रोलँड वॅन ऑस सेसन मार्गावर खाली उतरणा-या गिर्यारोहकांवर नजर ठेवून होते. अंधार पडण्यापूर्वी लाल कपड्यातील गिर्यारोहकापर्यंत पोहोचण्यात पेम्बा-गेवेल अयशस्वी झाल्याची त्यांना कल्पना आली होती. त्यातच गेवेलचा हेडलँप अचानक दिसेनासा झाल्यावर तर बेस कँपवर हलकल्लोळ माजला होता.

पेम्बाने किंकलशी रेडीओवर संपर्क साधला.

" मी कँप ३ वर आलो आहे !" पेम्बा म्हणाला, " पण कॅस मात्रं गायब आहे ! तो अद्याप इथे पोहोचला नाही ! मला सॅटेलाईट फोनचा आवाज ऐकू आला, परंतु अंधारात काही दिसत नाही. तिथे अ‍ॅव्हलाँचचाही धोका आहे ! मी पुन्हा तपास करुन येऊ का ?"
" नको !" किंकल उद्गारला, " रुजेनचा पत्ता नाही ! गेवेलचा हेडलँप दिसेनासा झाला आहे ! आता तू कुठे जाऊ नकोस ! आहेस तिथेच थांब आणि झोप काढ !"

बेपत्ता गिर्यारोहकांच्या यादीत आता गेवेलचाही समावेश झाला !

३ ऑगस्ट

रात्री १.००

एरीक मेयर, फ्रेड्रीक स्ट्रँग, चिरींग दोर्जे, पॉल वॉल्टर्स आणि मार्क शीन अखेर बेस कँपवर पोहोचले ! किंकलकडून त्यांना रुजेन सेसन मार्गाच्या बाजूला असल्याचं कळून आलं होतं.

मार्को कन्फर्टोला कँप ४ वर होता.
विल्को वॅन रुजेन सेसन मार्गाच्या बाजूला होता.
कॅस वॅन डी गेवेल सेसन मार्गावरच कँप ४ आणि ३ च्या दरम्यान होता.
पेम्बा ग्याल्जे कँप ३ वर पोहोचला होता.

येणारा दिवस काय दाखवणार होता ?

क्रमश :

सॅव्हेज माऊंटन - ७                                                                                                            सॅव्हेज माऊंटन - ९

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users