बिझिनेस अ‍ॅन्ड सिस्टीम्स

Submitted by बेफ़िकीर on 22 October, 2013 - 07:01

आय एस ओ सर्टिफिकेशन ही बाब अधिकाधिक स्वीकारार्ह ठरू लागली त्या काळापासून उद्योगांमध्ये एक वेगळा विचारप्रवाह निर्माण झाला. उद्योगातील प्रत्येक लहानसहान क्रिया / प्रक्रिया ही ठराविक नियमावलीनुसार केली जावी व तशी केली गेल्यास चुका आपोआप टळतील व उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, विक्रीपश्चात सेवा तसेच इतर कित्येक बाबी या अधिक ग्राहकाभिमुख व दर्जेदार होतील. हा विचारप्रवाह स्तुत्य होता. आजवर पारंपारिक रीतीने विक्री वाढवण्याचे, ग्राहकाला समाधानी करण्याचे व ग्राहकाला आपल्याशीच निगडीत ठेवण्याचे प्रयत्न होत असत. ते सफल वा असफल होणे हे नानाविध घटकांवर अवलंबून असे व त्याचे पुरेसे किंवा व्यवस्थितपणे 'अ‍ॅनॅलिसीस' होत नसे. (पराजयाप्रमाणेच विजयाचेही अ‍ॅनॅलिसीस व्हावे - हा विचारही महत्वाचा).

मात्र १९९० च्या पुढे हे प्रयत्न 'स्ट्रक्चर' करण्यात आले. किंबहुना, संपूर्ण बिझिनेस प्रोसेसच शिस्तबद्ध बनवण्याकडे कल वाढू लागला. यात पर्चेस, एकुण सप्लाय चेन, एच आर, सेल्स, प्रॉडक्शन, आफ्टर सेल्स, डिझाईन, टुलिंग, मेंटेनन्स, मार्केटिंग, अ‍ॅडव्हर्टायझिंग, आय टी सपोर्ट, स्टोअर्स ही व इतर सर्वच अंगे कशी कार्यान्वित व्हावीत व राहावीत याच्या घटना छापल्या जाऊ लागल्या. या घटनानिर्मीतीसाठी सुरुवातीला सहसा तज्ञ कन्सल्टंट्स बाहेरून बोलावले जायचे व नंतर स्वतःच्याच कंपनीत असे तज्ञ शोधले जायचे.

एकुण, १९९६ ते १९९७ पर्यंत भारतीय उद्योगाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तींनी हे मनोमन मान्य केलेले होते की संगणकीकरण व सिस्टीम्स निर्माण होणे व पाळले जाणे हे सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आहे. ते सेफ होते, ग्राहकाभिमुख होते, फायदेशीर होते, खर्च कमी करणारे होते, अनावश्यक क्रिया टाळणारे होते, मानवी चुकांची संख्या घटवणारे होते. लिहाल तसे करा व कराल ते लिहा हा विचार झिरपू लागला. उद्योगांमध्ये आजवर कमी महत्वाचे असलेल्या व्यक्तींना 'सिस्टीम ऑडिटर' म्हणून अचानक बरेच जास्त महत्व प्राप्त होऊ लागले. त्यांचे संबंध थेट उच्चपदस्थांशी येऊ लागले व त्यांना इतर लोक वचकू लागले.

आजवर अंदाजपंचे दाहोदरसे चालणार्‍या कामांमधील रिलॅक्स्ड अ‍ॅप्रोच अचानक स्कॅनिंगखाली आला. भली मोठी बाडे वागवणार्‍यांच्या हाताची कोपरे टेबलटॉपवर आणि नजर स्क्रीनवर खिळू लागली. कॉन रॉड असेंब्ली असे प्रचलीत नांव असलेल्या आयटेमला आता पार्ट नंबर मिळाला. बारा बारा, सोळा सोळा आकडी पार्ट नंबर्स पाठ होऊ लागले. एरवी आरामात एकाच दिवसात पी ओ काढून त्याच दिवशी रॉ मटेरिअल आल्याचे दाखवून, त्याच दिवशी त्याचे उत्पादन दाखवून शेवटी विक्रीही दाखवणार्‍या कर्मचार्‍यांना आता नुसता एक तीनचाकी टेंपो कंपनीच्या गेटमधून आत येऊ द्यायला चार चार अ‍ॅप्रूव्हल्स घ्यायला लागायला लागली.

उच्चपदस्थ आणि दुसर्‍या फळीतील व्यवस्थापन (उच्च व्यवस्थापन) हे त्यांच्याखालील सर्व पातळ्यांवरील लोकांवर दबाव आणू लागले की सुरुवातीला कितीही अडचणी आल्या तरीही हीच सिस्टीम फॉलो करायची आहे. खालच्या पातळीमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला. बदलाला विरोध करणे ही मानवी स्वभावातील नैसर्गीक प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर आढळू लागली.

हे नेमके काय होत होते? यातून साध्य काय करायचे होते आणि नष्ट काय करायचे होते? हा विचारप्रवाह कुठून येऊन आपले उद्योगविश्व घुसळवू लागला होता?

ऑटोमेशन म्हणजे बेकारीची कुर्‍हाड असे चुकीचे समीकरण मनात ठेवून एक पिढी निवृत्त झाली होती, होत होती. या पिढीने कामावर दाखवलेली निष्ठा, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नोकरी करण्याचा दाखवलेला पेशन्स या घटकांमुळे लहानातील लहान पदावरून निवृत्त झालेली व्यक्तीही निवृत्त होताना कार्यसाखळीतील अत्यंत महत्वाची कडी ठरायची. एका स्टोअरच्या प्रमुखाला गेल्या तीस वर्षात डिसपॅचचा इतका प्रचंड अनुभव मिळालेला असायचा की कोट्यावधीचे डिसपॅच नुसते तो सांगेल तसे होत असत. तो स्टोअरचा हेड असूनही त्याचे यच्चयावत ग्राहकांशी संबंध येऊ लागत. मार्केटिंगच्या माणसापेक्षा प्रत्यक्ष जो आपल्यासाठी वाहनातून माल पाठवत आहे त्यालाच फोन करून माहिती विचारू असा विचार ग्राहकही करत. सेल्स व्हॅल्यू किती झाली हे व्हाईस प्रेसिडेंट एखाद्या सेल्सच्या माणसाला विचारण्याऐवजी त्या स्टोअरच्या प्रमुखालाच विचारत कारण तेथे सर्वात ताजी व अचूक माहिती मिळणार हे त्यांना माहीत असे. या स्टोअरच्या प्रमुखाला क्षुल्लक अन् क्षुल्लक बाब मुखोद्गत असे. त्याचे नुसते जागेवर असणे हेच इतर सर्व टीमसाठी 'काम करत राहण्याचे' कारण असे. तो राऊंडला गेला की गप्पा सुरू होऊ शकत. तो जागेवर नसला तर अनेकांचे अनेक ठिकाणी अडत असे. त्याची सही झाल्यावर वरचे अधिकारी बिनदिक्कत सही करत, त्याची सही नसलेला कागद आणि भेळेचा कागद यात फरक नसे.

स्टोअरचा हा प्रमुख जसा असे तसाच फायनान्सचा प्रमुख, डिझाईनचा प्रमुख, सेल्सचा प्रमुख आणि प्रत्येक पोझिशनवरील प्रत्येक व्यक्ती ही त्या त्या जागी साच्यात बसवल्यासारखी असे. 'हे म्हणजे त्याचे काम आणि ते म्हणजे माझे काम' हे अगदी भिनलेले असे. प्रत्येकाकडून पुढच्या फळीसाठी एकेक उमेदवार जणू घराणेशाहीसारखा निर्माण केला जात असे, तयार करून घेतला जात असे. हळूहळू टुलिंगच्या जी एम ना जे क्वेश्चनिंग व्हायचे ते टुलिंगच्या सिनियर मॅनेजरलाही विचारता येईल हे उच्चपदस्थांना लक्षात येऊ लागे. आपोआपच दुसरी, तिसरी फळी तयार होई.

आणि अचानक... अचानकच एखादा सुटाबुटातला, त्या कंपनीमधील सर्व कर्मचार्‍यांपेक्षा दिसायलाच वेगळा असणारा, वेगळा राहणारा, अंतर ठेवून वागणारा, डोळ्यात अधिकार व माज अशी विचित्र झाक असलेला एखादा मध्यमवयीन गृहस्थ कंपनीत वारंवार दिसू लागे.

'हा कोण बुवा' या प्रश्नाचे उत्तर शेवटी वरपासून खालपर्यंत आठवडाभरात झिरपे. 'हा म्हणे असा असा, डायरेक्टर साहेबांना भेटायला येतो सारखा'! आणि एक दिवस सिनियर मॅनेजमेन्ट, मिडल मॅनेजमेन्ट या सर्वांना एक निरोप येई. 'येत्या शनिवारी चार ते सहा कॉन्फरन्स रूममध्ये जमावे'. सगळ्यांची मिळून मीटिंग म्हंटली की खूप जण उत्साहात असत. कारण पांडित्य दाखवता येते हे तर आहेच, पण कोणा एकाला नेमके टारगेट केले जाणार नसते. मार खाल्ला तर सगळ्यांनी मिळून खाल्ला!

आणि त्या मीटिंगमधून परतणारा प्रत्येक चेहरा खर्रकन उतरलेला असे! निवृत्तीच्या टप्प्यात असलेले छद्मी हासत असत. निवृत्ती पाचसात वर्षांवर असलेले कडवटपणे बोलू लागलेले असत. चाळीस ते पन्नास वयोगटातील अधिकारी चेहर्‍यावर नकारात्मकता येणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करता दिसत. तीस ते चाळीस वयोगटातील कर्मचारी वरिष्ठांकडे पाहून आपापसात हसत. त्याहीपेक्षा लहान वयाचे कर्मचारी 'काय होईल ते पाहू, आला तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम येणार ना' असा विचार करून मोटरसायकलला किक मारत.

काय झालेले असे त्या मीटिंगमध्ये?

एक व्याख्यान! एक लेक्चर! एक प्रेझेंटेशन!

संपूर्ण बिझिनेस प्रोसेस रि-इंजिनिअर करणारी सिस्टीम लवकरच इन्स्टॉल होत असून तुमची कार्यशैली आमूलाग्र बदलावी लागणार आहे हा संदेश त्या मीटिंगमध्ये सर्वोच्च पदावरील व्यक्ती प्रत्येक पातळीवरच्या व्यवस्थापकाला देत असे! त्या सिस्टीमचे महान फायदे समजावून सांगितले जात. कोणत्या नकोश्या बाबी टळतील हे सांगताना 'आज त्या बाबी होत आहेत' हे ठळकपणे नोंदवले जाई, ज्यामुळे भल्याभल्यांच्या पायाखालची वाळू सरके. आजवर ज्या माणसाने पंधरा लाखाच्या इंडेंटला एकहाती क्लीअरन्स दिलेला आहे आणि व्यवस्थापनानेही त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याला उद्यापासून साठ हजारापेक्षा अधिक रकमेचा इंडेंट रेज करायचा असेल तर व्ही पी च्या केबीनबाहेर ताटकळावे लागणार हे सांगितले जाई. ज्या स्टोअरच्या प्रमुखाच्या निव्वळ सांगण्यावरून ठरलेल्या क्वाँटिटीपेक्षा पंचवीस टक्के अधिक माल डिसपॅच केला जात असे, त्याला आता प्रत्येक डिसपॅच करण्यापूर्वी मार्केटिंगचा क्लीअरन्स लागेल हे सांगितले जाई. कस्टमरकडून येणे असलेले सगळे पैसे आलेले असले तरच माल पाठवण्याची परवानगी मार्केटिंग देईल हे सांगितले जाई.

नो वंडर, निवृत्तीच्या उंबर्‍यात असलेले छद्मी हासत. याचे कारण त्यांचा स्वतःच्या कार्यशैलीबाबतचा दुराभिमान असे, जो त्यांना सांगे की अशी कोणती सिस्टीम असणार आहे जी माझ्यापेक्षा अचूक निर्णय घेईल? आणि मुळात अशी सिस्टीम इन्स्टॉल केली तरी महिन्यादोनमहिन्यात तिचा धुव्वा उडेल या कंपनीत! असल्या सिस्टीम पाळून कुठे धंदे होत असतात का? पावलापावलाला अ‍ॅप्रूव्हल्स लागणार असली तर त्या कन्सल्टंटला म्हणाव तू सिस्टीमकडूनच कामे करून घे, माणसे हवीयत कशाला? चोर साले, पैसे मिळावेत म्हणून आमच्या डायरेक्टरला भुरळ पडेल अशी स्वप्ने दाखवतात आणि कन्सल्टन्सीच्या फिया आकारून गाड्या घेऊन हिंडतात. दहा लाखाचा सेल करून दाखवा म्हणाव अल्फा लाव्हलला, मग कळेल सिस्टीम पाहिजे की माणूस ते! वगैरे वगैरे!

माणूस जेव्हाकेव्हा बदल घडताना पाहतो तेव्हा नैसर्गीकपणे तो त्यातील न रुचणार्‍या गोष्टींची सर्वात आधी नोंद घेतो. त्या बदलामुळे त्याचे काय नुकसान होणार आहे हे तो सर्वात आधी ध्यानात घेतो आणि विरोध करतो.

सिस्टीम इन्स्टॉलेशन अजून खूप लांब आहे या भ्रमात नुसतीच सिस्टिमची टिंगलटवाळी चालू होई. पण काहीच दिवसात एक फतवा निघे. 'प्रशिक्षण'! पायरीपायरीने हे प्रशिक्षण प्रत्येका दिले जाई. प्रशिक्षण घेणारे कडवटपणे बोलू लागत. कन्सल्टंटच्या प्रतिनिधीला शंका विचारून हैराण करत. हे फंक्शन कसे होणार, कित्येकदा हे असे असे होते, ते सिस्टिममध्ये कसे बसणार? संध्याकाळी पांगापांग होताना सर्वांनी मनामध्ये बिंबवलेले असे, सिस्टीमचा बोर्‍या वाजणार यात शंका नाही. एक पातळी अशी येई की प्रशिक्षण तर बहुतेकांना मिळालेले आहे, पण अजून सिस्टीम इन्स्टॉल करण्यात आलेली नाही आणि कामे आधीसारखीच चालू आहेत. हा काळ फार उत्सुकतेचा असे. अनेकांच्या मनात येई की बहुधा सिस्टीम लागू करणे यडचापपणाचे असल्याचे व्यवस्थापनाला समजलेले असावे. पुन्हा टिंगलटवाळीला ऊत येई. आणि अशातच दुसरा फतवा निघे. 'या या तारखेपासून समांतर प्रक्रिया राबवायला सुरुवात होईल'! हा फतवा मात्र खरंच हादरवणारा असे! उत्तम प्रशिक्षित असे काही जण आणि ज्यांना पुढे केवळ या सिस्टीमच्या लागू होण्यामुळेच महत्व मिळणार आहे असे काही जण आनंदाच्या शिखरावर असत. इतरांची मजा बघत असत. इतरांच्या चार पावले पुढे असत.

समांतर प्रक्रिया! जे केले ते रोज संध्याकाळी जाण्याआधी सिस्टीममध्ये फीड करून जायचे. म्हणजे मोठमोठाल्ली बाडे तर मेंटेन करायचीच, पण सिस्टीमही मेंटेन करायची. ही मेहनत कोणालाच नको असे! कामे टाळण्याकडे कल निर्माण होई. बॅकलॉग्ज निर्माण होत. आणि एक दिवस असा येई की बहुतेक कर्मचार्‍यांच्या मनात असलेलीच गोष्ट घडे!

ती म्हणजे महिनाअखेरीला सिस्टीमने दाखवलेला सेल आणि प्रत्यक्षात झालेला सेल तसेच सर्वच फंक्शन्समधील डेटामधील फरक! काहीच्याकाही फरक असे तो! उदाहरणार्थ जर बावीस कन्साईनमेंट्स प्रत्यक्षात गेलेल्या असतील तर छत्तीस हजार गेल्याचे सिस्टीम दाखवे. हसून हसून पुरेवाट! अकरा लाखाचे स्टील प्रत्यक्षात खरेदी झाले असेल तर दोन हजाराचीच एंट्री सिस्टीममध्ये सापडे! थोडक्यात, सिस्टीम केराच्या टोपलीत फेकण्याची घटिका समीप आलेली आहे हे प्रत्येकालाच वाटू लागे. आणि मग कन्सल्टंटचे प्रतिनिधी घाऊक प्रमाणावर झालेल्या चुका शोधून सर्वांना दाखवून देत! 'तुम्ही हे असे असे केलेत म्हणून हा असा डेटा मिळाला'! 'चूक तुमची आहे, सिस्टीमची नाही'!

मग त्या सिस्टीमला आणि कन्सल्टंटला मनातल्या मनात शिव्या घातल्या जात. माझ्यासमोर जितक्या एंट्रीज आल्या तितक्याच मी प्रोसेस करणार ना, असे प्रतिप्रश्न विचारले जात. आपले काम कोणाच्यातरी कामावर अवलंबून असल्याचा निराळाच साक्षात्कार घडत असे. आजवर 'स्टील आण रे' अश्या तीनशब्दीय तोंडी आज्ञेवर पर्चेसवाले स्टील आणत असत, आता जस्टिफाय करायला लागे. आधी होते त्यातील किती स्टील प्रोसेस झाले? उरलेल्याचा हिशोब काय? वेस्ट किती झाले? रिजेक्शन परसेंटेज इतके कसे? का? इतके रिजेक्शन झाले त्यावर हेड ऑफ प्रॉडक्शनचे अ‍ॅप्रूव्हल आहे का?

येथे माणूस पूर्णपणे निगेटिव्ह बनू लागे. 'साली ही सिस्टीम आपल्यासाठी आहे का आपण तिच्यासाठी' हा प्रश्न कंपनीचा वॉचमनही विचारू लागे. आणि दुसर्‍याही महिन्यात आणि तिसर्‍याही महिन्यात हेच काही प्रमाणात रीपिट झाल्यावर मग मात्र एक जबरदस्त झाप पडे! मॅनेजमेन्ट खवळून उठे. जाहीर झापले जात असे संबंधितांना! मग संबंधित नोकरी टिकावी म्हणून माना मोडून सिस्टीम डेटा करेक्ट करण्यावर तासनतास घालवू लागत. 'काम राहिले बाजूला आणि सिस्टीम करा दुरुस्त' अशी शेरेबाजी पुटपुटत्या स्वरात केली जाई. खरोखरच काम मागे पडून सिस्टीमचे महत्व पुढे जाई.

एकुणच संघटनेच्या मानसिकतेवर परिणाम होई.

यातच अनेकदा खरोखरच सिस्टीममध्ये काही त्रुटी असत. त्या दुरुस्त केल्या जात. त्यामुळेही स्टाफ चिडचिडा बने!

एक वर्ष, दोन वर्षे, अडीच वर्षे! एखादी पिढी निवृत्त होई. कोणाचे डोळे पाणावत. कोणाचा सेंड ऑफ होई. सेंड ऑफमध्ये सोडून जाणारा सिस्टीमबाबत निराशाजनक बोलून जाई. त्याचवेळी, एक पिढी सिस्टीममध्येच तयार होऊ लागे. एक पिढी ट्रान्झिशन हेच डेस्टिनेशन असल्याप्रमाणे लवचिक बने!

मग एक फतवा निघे! गेल्या तीन आर्थिक वर्षातील डेटा आता जुन्या सर्व्हरवर जाईल, नवीन सर्व्हरमध्ये हा डेटा अ‍ॅक्सेस करता येणार नाही. हा फतवा अक्षरशः 'घुसे'! त्याचा अर्थच कित्येकांना समजत नसे, तो समजल्यावर 'कशाला हा अर्थ समजला' असे वाटे. माणसे सर्व काही सोडून क्लोझिंगच्या मागे लागत. नाही नाही ते गढे मुडदे उकरून ते सेटल करायच्या मागे लागत. ज्या तक्रारी कस्टमरही विसरून गेला आहे त्यांची त्यालाच आठवण करून देऊन त्या आम्ही का सोडवू शकलो नाहीत हे कळवून आता त्याची काहीही तक्रार उरलेली नाही हे रायटिंगमध्ये घेऊन ग्रिएव्हन्सेस क्लोज केले जात. फायनान्शिअल क्लेम्सचे तर विचारूच नका.

एकुण, हे सिस्टिमचे भूत अधिकाधिकच भयावह होत जाई.

मात्र, आणखीन काहीच काळात, किंबहुना अनेकदा त्या आधीच, त्याचे खरे फायदे लक्षात येऊ लागत.

चूका होणारच नाहीत अशी ही सिस्टीम आहे, मानवी निर्णय, धोरणे, कृती यांच्यामुळे उद्योगाला काहीही फटका सहन करावा लागू नये यासाठी ही सिस्टिम आहे, ग्राहकांची, सप्लायर्सची गैरसोय होऊ नये, कनेक्टिव्हिटी सुधारावी यासाठी ही सिस्टिम आहे हे समजू लागे. सर्व रिपोर्ट्स बरोबर येऊ शकतात हे कळू लागे. पेपरलेस ऑफीस आवडू लागे. एकदा सिस्टीमप्रमाणे काम केले की कोणाचा बा सवाल करू शकत नाही हे समजू लागे.

नाके मुरडणारे, छद्मी हासणारे, कडवटपणे टीका करणारे चूक होते हे समजू लागे. जे नकारात्मक होते ते आता सिस्टीमची भाषा बोलू लागत. कालपर्यंत जी माणसे शांत डोक्याने गुणवत्ता तपासत बसत ती आज अचानक ऑडिटर्स झाल्याने त्यांची शान वाढलेली असे. सिस्टिम सपोर्ट फंक्शनमधील माणसे सेलिब्रिटी बनत. पण त्यांचा जळफळाट वाटण्यापेक्षा त्यांचे महत्व समजून येई. अनेकदा सप्लायर्सची पेमेंट्स थकत, कामे अडत, पण शेवटी चेनमधील सर्वच घटकांना या सिस्टीमचे महत्व समजू लागे.

सर्वात मुख्य म्हणजे एम आय एस! हवा तो डेटा हवा त्या फॉर्ममध्ये सहजगत्या उपलब्ध होत असल्यामुळे निर्णयप्रक्रिया सुधारणे हे सिस्टीमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ध्यानी येऊ लागे.

आज बहुतेक सर्वच उद्योग अश्या सिस्टिम्स पाळतात. या सिस्टिम्सच्या अनेक फायद्यांपैकी महत्वाचे फायदे:

१. चुकांची शक्यता नष्ट / खूपच कमी होणे
२. योग्य निर्णय घेणे शक्य होणे
३. तोटा व तोट्यास कारणीभूत ठरणारे घटक नष्ट होणे किंवा फोकसमध्ये येणे व त्यावर कार्यवाही होणे
४. फायदा वाढणे
५. ग्राहक समाधानी होणे
६. पारदर्शकता येणे
७. व्यक्तीकेंद्रीत प्रक्रियेच्याजागी धोरणकेंद्रीत प्रक्रिया निर्माण होणे

मात्र......!!!!!!

आजही अनेक उद्योगांमध्ये या सिस्टीम्सनी वात आणलेला आहे. सिस्टिम बिझिनेससाठी आहे की बिझिनेस सिस्टिमसाठी असे वाटावे अशी परिस्थिती खरोखरच अनेक कंपन्यांमध्ये आहे. याचे कारण इतके क्षुल्लक नाही की सिस्टिम नीट पाळली जात नाही आहे. सिस्टिमचे महत्व वाढल्यामुळे स्वतःचे महत्व वाढेल हे जाणणारी काही मंडळी हा बागुलबुवा मोठा करू पाहतात. एखाद्या एक कोटी रुपायाच्या ग्राहकाला आणि एखाद्या एक रुपयाच्या ग्राहकाला ही सिस्टिम एकाच शैलीने वागवते. त्यांना वेगवेगळी वागणूक मिळावी याचे प्रयत्न मग माणसाकडून केले जातात.

पण ते काही असले तरी बँकिंग, इन्शुअरन्स, रेल्वे, फोन, वीज, सिनेमागृहे, चितळे बंधू आणि हजारो प्रकारच्या ठिकाणी या ग्राहकाभिमुख सिस्टिम्समुळे आपण आधीपेक्षा अधिक समाधानी होत आहोत हे नाकारता येणार नाही.

पण एक देश म्हणून आपण या अश्या सिस्टिम्स आपल्या शासनपद्धतीला, 'गव्हर्नन्सला' लावण्यात अपयशी ठरत आहोत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला, अशिक्षित व कोणतेही सामाजिक कार्य न केलेला माणूस पुढारी होऊ शकणार नाही असे लॉक सिस्टिम लावू शकेलही, पण ती सिस्टिम माणसाने, समाजाने आधी स्वतः स्वीकारायला हवी. ती स्वीकारण्यास आपण तयार नाही. मग अश्या सिस्टिम्स लाखोंनी तयार होऊन उपयोग काय?

या सिस्टिम्स रात्रंदिवस वापरणारा एक वर्ग एकीकडे आणि या असल्या कशाशीही काहीही संबंध न येणारा, अशिक्षित, शॉर्टकट्स घेण्याची प्रवृत्ती भिनलेला वर्ग दुसरीकडे! जन्मतःच मिळालेल्या गरीबीला कोण दोष देईल? पण पारदर्शक कारभाराची अपेक्षाही तोच करू शकतो जो स्वतः तसा कारभार करू इच्छित असतो. वाढलेल्या लोकसंख्येलाही कसा दोष देणार? पण सुधारणेची ओढच नसलेल्यांना दोष द्यावाच लागणार.

माणसानेच निर्माण केलेल्या या सिस्टिम्समुळे मेहनत कमी झाली आहे, शरीरे आखडत आहेत, डोळे दुखत आहेत, पारदर्शकता येत आहे, भोंगळपणा कमी होत आहे आणि आपल्याकडील गव्हर्नन्स किती कमकुवत आहे हेही लक्षात येत आहे.

देश जर एखाद्या बिझिनेसप्रमाणे चालवला तर पुढे कधीतरी ते शक्य होईलही. कोणास माहिती, आजच्या राजकारण्यांची पुढची पिढी विकासाभिमुख, पारदर्शकतेची कास धरणारी, अशी घडेलही.

पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे मात्र लवकरच आपल्याला एक शिस्तबद्ध देश म्हणून अवतरावे लागेल, इन फॅक्ट त्या ट्रान्झिशनमध्येच आपण आत्ता असू हे निश्चीत! अन्यथा, टिकाव लागणे अशक्य आहे.

विषय वाहवत गेल्याचे समजत आहे, पण मला वाटते शेवटी सगळेच एकमेकांशी घनिष्टपणे निगडीत असलेले विषय आहेत.

आपले काय मत?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते टायटल बदला . टायटलवरून वाटतं कि निरनिराळ्या बिझनेस हाऊस मधे वापरल्या जाणा-या सिस्टीम्स यांची माहिती देणारा लेख असेल. लेखात एका कंपनीत सिस्टीम इन्स्टॉलेशन दरम्यान आलेले अनुभव हा विषय आहे. शेवटच्या चार पॅरांची ठिगळं बळंबळंच आहेत.

"या सिस्टिम्स रात्रंदिवस वापरणारा एक वर्ग एकीकडे आणि या असल्या कशाशीही काहीही संबंध न येणारा, अशिक्षित, शॉर्टकट्स घेण्याची प्रवृत्ती भिनलेला वर्ग दुसरीकडे! जन्मतःच मिळालेल्या गरीबीला कोण दोष देईल? पण पारदर्शक कारभाराची अपेक्षाही तोच करू शकतो जो स्वतः तसा कारभार करू इच्छित असतो. वाढलेल्या लोकसंख्येलाही कसा दोष देणार? पण सुधारणेची ओढच नसलेल्यांना दोष द्यावाच लागणार. "

एकीकडे इन्स्टॉलेशन व्हायच्या आधी कुणालाच माहिती नव्हती हे लेखात म्हटलय. मग बाहेरच्या लोकांना स्वखर्चाने एक्स्पोजर नसेल हे स्पष्टच आहे. त्याचा लोकसंख्या वाढीचा, पारदर्शक कारभाराचा संबंधही स्पष्ट नाही. सरसकट विधानं करताना मुंबईचा डबेवाला सिक्स सिग्मा सरर्टिफिकेट मिरवतो. निरनिराळ्या सिस्टीम्स बनवणा-या कंपन्या, मॅनेजमेंट गुरू यांचं व्याख्यान मुंबईच्या डबेवाल्याशिवाय पूर्ण होत नाही हे विसरले का ? इंग्लडचा युवराज त्यांना भेटून गेला. पश्मिना शाल आणि गालिचे बनवणा-या कारागिरांसाठी क्वालिटी गुरूंनी आपल्या सिस्टीम्स मधे बदल केला हे पण लक्षात घ्या कि.

अनुभव मात्र कुणालाही रिलेट करता येतील असेच आहेत. तोच विषय असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे सुटेबल टायटल द्या. आमची तक्रार राहणार नाही.

<<ते टायटल बदला . टायटलवरून वाटतं कि निरनिराळ्या बिझनेस हाऊस मधे वापरल्या जाणा-या सिस्टीम्स यांची माहिती देणारा लेख असेल. लेखात एका कंपनीत सिस्टीम इन्स्टॉलेशन दरम्यान आलेले अनुभव हा विषय आहे. शेवटच्या चार पॅरांची ठिगळं बळंबळंच आहेत. >> अनुमोदन

वा, वा. छान विश्लेषण.

जसजशी या बाबतीत प्रगति होऊ लागेल तसतशी भारताची प्रगति होईल.
सुरुवात केल्यावर जर काही अडचणी आल्या तर त्या सोडवणे, त्यातून मार्ग काढणारी सिस्टीम तयार करता येईल. साधारण वीस वर्षे याच विषयात संपूर्णपणे बुडून जाऊन नोकरी केली म्हणून आता मी स्वस्थ बसू शकतो. खूप ऑटॉमेशन केली, बेकारी झाली नाही, कारण नवनवीन कल्पना काढून नवनवीन धंदे काढून लोकांना नोकर्‍या देणे व स्वतः पैसे कमावणे हे या देशात अव्याहत चालू असते - म्हणूनच फेसबूक, सारखे फालतू धंदे काढून बर्‍याच प्रोग्रॅमर्स लोकांची सोय केली. व्हिडियो गेम आहेतच, त्यातहि प्रगति करणे चालूच आहे नि हे सगळे केवळ प्रोग्रॅमर्स मुळे नाही तर इतर अन्य व्यावसिकांचीहि मदत लागतेच, नि ते सगळेच चीन, भारतातून आणता येत नाहीत, तेव्हढा अनुभव नसतो त्यांना, इथे येऊन त्यांना अनुभव झाला तर तोपर्यंत इथले लोक काही नवीनच कल्पना काढतील.

तुम्ही यात मनुष्यस्वभावा मुळे काय अडचणी येतात याचेहि योग्य वर्णन केले आहे ते काही फक्त भारतातच होते असे नव्हेच. सगळ्या जगात होते, निघतो त्यातून हळू हळू मार्ग.

नवीन पद्धती आत्मसात करायला वेळच लागतो.

अमेरिकेत व भारतात दोन्हीकडे यशस्वी धंदा केल्यावर एका भारतीय उद्योगपतीने ३० वर्षांपूर्वी भाषणात सांगितले की अमेरिकेत सिस्टीम वगैरे आहे तश्शीच भारतात नसली तरी तिथेहि कामे होतातच. हे गृहस्थ कै. राजीव गांधी यांचे सल्लागार होते.
भारतीयांची अडचण अशी की आपल्याच पद्धतीवर अभ्यास करून त्या सुधारण्या ऐवजी परदेशातून आयते काही तरी मिळाले तर बरे.
आता पैसे आहेत तर तसे जमेलहि. इथे आय बी एमची ऑपेरेटिंग सिस्टीम काय, ,मायक्रोसॉफ्ट काय युनिक्स काय, कम्युनिकेशन काय यातले काहीहि भारतीयांनी शोधले नाही, पण अनेक भारतीय आता त्यात तज्ञ आहेतच.

तसेच हेहि होईल. हळू हळू, वेद, आयुर्वेद, चाणक्य, गीता वगैरे सगळे विसरून भारत एकदम परदेशीयांनाच त्यांचे ज्ञान शिकवेल - जसे पूर्वी युरोपियन लोकांनी भारताचा इतिहास लिहीला, वेद, संस्कृत यावर लेख लिहीले तसे.

Pages