कित्येक वर्षांनंतर आज सकाळी आमच्याकडे 'येईऽ कल्हईऽ वालेऽ' अशी हाळी ऐकू आली.
लहानपणी कल्हईवाले दर ८-१५ दिवसांत येत असत, अन अंगणातल्या झाडाखाली त्यांचा वर्कशॉप मांडून शेजारपाजारच्या अनेक घरांतील भांडी कल्हई लावून चकाचक करुन देत असत. आम्ही लहान मुले रिंगण करून कल्हई करण्याची गम्मत पहात असू. आजकाल तांब्या पितळेची भांडी इतिहासजमा झालीत तसेच घरोघरी येणारे कल्हईवाले देखिल. आजकालच्या मुलांना दाखवता यावे म्हणून कल्हई करण्याचे फोटो, व्हिडिओ काढून ठेवावेत, म्हणून मुद्दाम कल्हईवाल्यांना बोलावून घेतले. अन मायबोलीवरच्या मुलांनाही दिसावे म्हणून इथे लिहितो आहे.
कल्हई :
म्हणजे पितळेच्या वा तांब्याच्या भांड्याला आतून कथील नामक धातूचा (टिन. Sn) पातळ थर देण्याची प्रक्रिया. कथिल गंजत नाही, व या थरामुळे भांड्यांत ठेवलेले आंबट पदार्थ, वा इतरही खाद्यपदार्थ 'कावळून' खराब होत नाहीत.
तर हे कल्हईवाले सुभाष देवरे, अन त्यांचं पोर्टेबल वर्कशॉप :
अंगणातल्या झाडाखाली एक छोटा खड्डा खणून त्यात एक हँडलवाल्या पंख्याची नळी सोडली आहे. पूर्वी कॅनव्हासच्या पिशवीचा भाता असे. समोर मांडलेल्या भांड्यांची 'ऑपरेशन पूर्वी' स्थिती पाहून ठेवा.
*
कल्हईसाठीचे मुख्य रासायनिक घटक.
चौकोनी पांढरी वडी दिसतेय तो नवसागर. अन शेजारी चकचकीत धातूची पट्टी आहे, ते कथिल.
नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड. (NH4Cl). गरम भांड्यावर नवसागराची पूड टाकली, की त्याचे विघटन होऊन हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होते. यामुळे भांडे स्वच्छ होण्यास मदत होते, तसेच नवसागरामुळे कथिल लवकर वितळते व पातळ होते. पातळ झालेल्या कथिलाचा थर कापडी बोळ्याने भांड्याला आतून पसरवतात.
*
भांडे आधी चांगले तापवायचे :
*
मग त्यात टाकायचा नवसागर, अन भांडे स्वच्छ करून घ्यायचे :
नवसागराचे अपघटन होऊन अमोनिया वेगळा होतो. तापलेल्या भांड्यावर किंचित जळलेल्या चिंध्यांच्या वासात मिक्स होऊन त्याचा एक स्पेशल वास तयार होतो. हा कल्हईचा वास ज्यांनी कल्हई पाहिली आहे ते कधीच विसरणार नाहीत.
*
या ठिकाणी तापलेल्या भांड्यातून नवसागराचा धूर येत असतानाच कथिलाची काडी त्या भांड्याच्या बुडाशी घासतात. कथिल वितळून भांड्यात रहाते. पितळेचे पिवळे भांडे तापून लाल झालेय हे नोट करा.
*
वितळलेल्या कथिलाचा थर भांड्यात पसरवताना :
मोठं भांडं असेल तर अधून मधून नवसागर टाकत रहातात, ज्याने कथलाच्या गोळ्या न होता ते पातळ रहाते, तसेच भांडे तापवत रहातात.
*
कल्हई करून पूर्ण झाली.
आता हे भांडे पट्कन पाण्यात बुडवायचे. अचानक थंड केल्याने कल्हईला चमक येते. नाहीतर ती चमकत नाही.
(कल्हईचे फोटो काढण्याच्या नादात मी बादली जवळ उभा होतो, भसकन भांडे पाण्यात बुडवणे हा प्रकार माझ्या पायापाशीच झाल्याने नेमका तो फोटो हलला.)
*
हा आहे "ऑपरेशन नंतरचा" फायनल रिझल्ट :
याला म्हणतात कल्हई! इतकी चमक असल्यावर हे भांडे आतून दिसायला चांदीला भारी पडते, अन चांदीसारखे कळकत नाही हा वेगळा फायदा.
(माबोवर इतिहास शोधला तेव्हा कल्हईवरचा हा एक छान लेख सापडला.)
ता.क.
कल्हईचा व्हिडिओ. खाली प्रतिसादात दिलेला आहे, तो सगळ्यांना दिसला नसेल.
मस्तच! मी कधीच ही प्रोसेस
मस्तच! मी कधीच ही प्रोसेस पाहिलेली नाही.
मस्तच! मी कधीच ही प्रोसेस
मस्तच! मी कधीच ही प्रोसेस पाहिलेली नाही.+11
गॅस शेगडीला क्रोमियम कल्हई :
गॅस शेगडीला क्रोमियम कल्हई : हे इलेक्ट्रोप्लेटिंग असते. कल्हई वेगळी प्रोसिजर.
मी सासूबाईंकडून आणला आहे
मी सासूबाईंकडून आणला आहे पितळेचे पातेले. भांड्याच्या दुकानातून कल्हई करून घेणारे.
मागच्या आठवड्यात कल्हई करायला
मागच्या आठवड्यात कल्हई करायला दिला होता.
180rs घेतले दुकानदाराने. त्यानेही outsource केला होता.
1961 सालचा आहे, आज्जेसासर्यांचा नाव आहे त्यावर.
2 litre चा आहे
हे साल कोरलेला आहे
Pages