सचिन पिळगावकर या अभिनेत्याविषयी मला प्रचंड आकर्षण कम कुतूहल आहे. ईश्वरकृपेने एकदाच मिळालेल्या मनुष्यजन्माची पुरेपूर वसुली करण्याचं कसब मात्र सचिनला पहिल्यापासूनच जमलंय. याला अभिनेता पण व्हायचं असतं सेम टाइम त्याच चित्रपटात गायक पण व्हायचं असतं सेम टाईम त्या चित्रपटाचा निर्माता - दिग्दर्शक पण व्हायचं असतं आणि त्याला तो चित्रपट यशस्वी पण करायचा असतो.यात भर म्हणजे साहेब हल्ली महागुरू पण झाले आहेत. आपल्याला नाय जमत बुवा येवढं सगळं !!!
या महापुरुषाचे सगळेच चित्रपट दुस-या चित्रपटांवरून "प्रेरित" असतात. पण "बनवाबनवी" मात्र त्याला जब्बरदस्त अपवाद ठरला. अर्थात हा चित्रपट देखील १९६६ च्या हिंदी "बिवी और मकान" वर बेतलेला. पण भट्टी जमवली की जमते त्यातला हा प्रकार. १९८९ मध्ये रिलीज झालेल्या शांतारामबापूंच्या या अजरामर चित्रपटाने नुसता इतिहासच रचला नाही तर प्रत्येक अभिनेत्याला एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवलं…. प्रत्येकाची विनोदी अभिनेता म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली आणि निखळ मनोरंजन आणि "विनोद" म्हणजे काय याचा आदर्श वस्तुपाठच घालून दिला.

चित्रपटाची कथा आपल्या सगळ्यांना तोंडपाठ असेलच. कारण मराठीत बनवाबनवी आणि हिंदीत शोले पहिला नाही असा एकही माणूस मला आजपर्यंत सापडलेला नाही (सापडूही नये !!!). चार मित्र. एक नोकरीनिमित्त शहरात राहतोय. त्याचा सख्खा भाऊ (सुशांत रे ) डॉक्टर होण्यासाठी शिकायला त्याच्याच बरोबर राहतोय. कालांतराने मालकाने नोकरीवरून हाकललेला परश्या (लक्ष्मीकांत बेर्डे) आणि काकाने घराबाहेर काढलेला सुध्या (सचिन) हे दोघेही त्यांचा शहरातला एकमेव आधार असलेल्या धनंजय मानेकडे येतात. आता चार लोक…. तेही एकाच खोलीत… कसं जमायचं ?? त्यात घरमालक मानगुटीवरच्या समंधासारखा. शेवटी एक धमाल खो - खो चा खेळ सुरु होतो. अखेरीस बिंग फुटतं आणि चौघेही घराबाहेर हाकलले जातात.
नवीन घर शोधायला आकाश पाताळ एक केल्यावर एक बंगला मिळतो. बंगल्याची वयस्कर मालकीण एकटीच राहत असल्याने घराच्या खोल्या फक्त विवाहित जोडप्यालाच भाडयाने देणार ही तिची मूळ अट. शेवटी एक भन्नाट कल्पना आकार घेते आणि इथेच चित्रपट आपल्याला जिंकतो.
या चित्रपटाचा मूळ आत्मा… बादशहा…. आधारस्तंभ…. विनोदाचा मूर्तिमंत आविष्कार आणि चित्रपटाच्या यशाचा एकमेव सूत्रधार… म्हणजे One and Only आदरणीय अशोक सराफ !!! अशोक सराफ नसता तर बनवाबनवीचं काय झालं असतं ही कल्पना करणंच अशक्य. त्याचा प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल. एन्ट्रीच्या दूधडेअरीच्या प्रसंगापासून अशोक सराफने चित्रपट अक्षरश: खाउन टाकलाय. (त्याचे यापुढचे सगळे डायलॉग त्याच्या स्टाइलने आणि त्याच्या टोनमध्ये वाचा. बनवाबनवी नुसता "वाचण्यात" पण काय धमाल आहे हे तुम्हाला अनुभवायला मिळेल). त्याचा "कुठे पोचवताय…मसणात ???" हा डायलॉग म्हणजे कहर आहे. "केवढी मोठी लाईन आहे. तेवढयात काही माझं बरं वाईट झालं तर ???" ह्याच्यासारख्या भन्नाट इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या वाक्यानी प्रेक्षक त्याच्यावर तिकडेच निहायत फिदा होतो. घरी आल्यावर "ओहोहोहो मालक…यायाया अलभ्य लाभ…" वगैरे वाक्य म्हणताना त्याच्या चेहे-यावरचे हावभाव आणि त्याच प्रसंगात पुढे "आज माझं पाकीट अशक्तय" हे तर कातीलच !!!

नंतर स्वत: नोकरी करत असलेल्या दुकानात साहेब पोचतात. तिकडे त्यांना उशीर झाल्याने आणि काऊंटरपाशी खोळंबायाला लागल्याने तिथल्या ग्राहक बायका कमालीच्या भडकलेल्या असतात. त्यातल्या एकीने सेंट मागितल्यावर मवाली बॉडी लँग्वेजने तिला म्हटलेलं "आय लव्ह यू." आणि त्यावरच्या तीच्या जालीम प्रतिक्रियेनंतर भानावर येत "सेंटचं नाव आहे…. सेंटचं नाव आहे. " ह्यात त्याच्या आवाजाची बदललेली पट्टी केवळ लाजवाब !! पुढे भडकलेल्या बॉसच्या (अश्विनी भावे ) केबिनमध्ये घुसल्यावर तिच्या "बायकांचा वेढा उठला ?? सरळ बोलता येत नाही ??" ह्या प्रश्नावर "कुणाला ?? हा मला !!!" हा डायलॉग किंवा सायकल कशी पंक्चर झाली याचं नॉनस्टॉप पुराण ऐकवताना त्याच्याबरोबर प्रेक्षकही त्याच्या पुराणात गुंगत जातो. अचानक बॉसच्या "मि. माने तुमचं हे सायकलपुराण बंद करा" या स्पीडब्रेकरवर त्याची "…… करतो" ही Spontaneous प्रतिक्रिया म्हणजे त्याच्या विनोदातल्या निरागसपणाचं ज्वलंत उदाहरण !! हा प्रसंग तर प्रत्यक्षातच बघावा.
पुढे बनवाबनवीचा सर्वात "हाईट" आणि चित्रपटाची जान असलेला प्रसंग म्हणजे चौघंही एकत्र खोलीत असताना मालक (सुधीर जोशी) ने खोलीत येणं आणि त्यानंतर चौघांचीही उडालेली धांदल म्हणजे केवळ अविस्मरणीय हास्यस्फोट !!! "हा सकाळीच इथे अभ्यासाला आलाय…. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास !!!" "रोज सकाळी मला दोन कप चहा लागतो… तुमच्या मंडळींचही असंच आहे काय" हे डायलॉग आणि ते म्हणताना अशोक सराफच्या चेहे-यावरचे सरसर बदलणारे एक्स्प्रेशन्स म्हणजे अफलातून !!! जातिवंत प्रेक्षक इथेच हसून हसून निम्मा गारद होतो.याच सीनमधलं लक्ष्याचं "धनंजय माने इथेच राहतात का" हा प्रसंग म्हणजे कळस आहे. जब्बरदस्त अफलातून टायमिंगने लक्ष्याने हा सीन कुठच्या कुठे उचलून नेलाय !!!
Hats Off !!!

नंतरचा बाप सीन म्हणजे अशोक सराफ,लक्ष्या आणि सचिन हे तिघंही सचिनला नोकरी लागल्याबद्दलची "ओली पार्टी" करून घरी येतात आणि चुकून स्वत:च्या ऐवजी सुधीर जोशीच्या घरात घुसतात. या प्रसंगात "कडी सापडली पण फाटक सापडत नाहीये" वगैरे डायलॉग चालू असताना अशोक सराफ रिमोट हरवलेल्या रोबोटसारखा छातीने घराच्या फाटकावर धडका मारत असतो !!! पण लक्ष्या आणि सचिनच्या बडबडीमुळे अशोक सराफच्या प्रसंगाला अनुसरून असलेल्या या भन्नाट बॉडी लँग्वेजकडे आपलं दुर्लक्ष होतं. लक्ष्याने या प्रसंगात बेवड्याचा आवाज मस्तच काढलाय. सुधीर जोशी या तिघांवर भयानक संतापल्यावर त्यांना भस्स्सकन आपल्याबरोबर जमिनीवर बसवणे आणि त्याच वेळी त्याच्या मागे वाजणारं "ट्यांव्व्व्व्व्व्व्व्व्व्व" हे पार्श्वसंगीत टायमिंग साधून गेलं आहे. सुधीर जोशींची बायको बाहेर आल्यावर "शंतनू…. ही कोण आणली ?????????" हा लक्ष्याचा डायलॉग आणि त्याचवेळी अशोक सराफने पुढ्यात बसलेल्या सुधीर जोशींना "कसले छुपा रुस्तम / लब्बाड निघालात !!!" च्या आशयात उजव्या खांद्याने धक्के मारणे हा प्रसंग तर आपल्याला गडबडा लोळून हसल्याने आणि त्यामुळे डोळ्यात आलेल्या पाण्याने चित्रपटाचे पुढचे पाच मिनिट बघूनच देत नाही !!!
मग नंतर घरातून सन्मानाने हकालपट्टी झाल्यावर घराच्याच दरवाजात आपल्याच माजी घरमालकाला "तो माझा इस्त्राईल वाला मित्र होता ना… तो अपघातात वारला हो… त्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले" हे म्हणताना त्याचा बापुडवाणा कम "हरामी" चेहेरा क्लासच !!! त्यावर सुधीर जोशींनी "हा हलकटपणा आहे माने" या केलेल्या भाष्यावर "आता तो वारला यात हलकटपणा कसला" हे वाक्य म्हणजे प्रासंगिक विनोदाचं जब्बरदस्त उदाहरण !!!

पुढे मग नवीन घरात शिफ्ट झाल्यावरचे लक्ष्याला बिडीचे "डोहाळे" लागणे,निरंजनबाबांचा आंबा,लक्ष्याचे डोहाळजेवण आणि त्यात त्याने आपण प्रेग्नंट असल्याचं नाटक करायचंय हे विसरून केलेला नाच किंवा त्याचे एकूणच "कुणीतरी येणार येणार गं" गाण्यातले त्याचे हावभाव यांना तोड नाही. हे गाणं त्यावेळीही प्रचंड गाजलं आणि लक्ष्याच्या कायिक आणि मुद्रिक अभिनयाने प्रेक्षणीय देखील झालं.
पुढे चित्रपट जरा सेमी - गंभीर वळण घेत असल्याने विनोदी प्रसंग थोडे कमी आहेत पण ती कथेची गरज आहे. नंतर मग मालकिणीच्या "बळी" (विजू खोटे) या स्वत:च्या मावशीचं घर बळकावू पाहणा-या गुंडाचं उपकथानक आहे. तो बिडी पीत रस्त्याने जाणा-या स्त्रीवेशातल्या लक्ष्याला छेडतो आणि तेव्हाचं "मेल्या…. एकटया बाईच्या अंगाला हात लावायला लाज नाही वाटत ??" वगैरे लक्ष्याच्या तोंडच्या वाक्यांनी तो थोडा गंभीर प्रसंग मस्त विनोदी अंगाला नेलाय.लक्ष्याचा आपण बाईच्या वेशात आहोत हे विसरून जेन्ट्स टॉयलेटमध्ये जायला पाहणे आणि त्याचवेळी शेजारच्या लेडीज टॉयलेटमधून बाहेर आलेल्या मुलीने विचित्र नजरेने पाहिल्यावर त्याच्या चेहे-यावरचे टिप्पिकल बायकी हावभाव यांनी तो सीन कमालीचा उचलला आहे !! चित्रपटात चारही नायिका,सुशांत रे आणि सचिन नसते तरी चाललं असतं. कारण कॉमेडी हा बेस असल्याने अशोक सराफ आणि लक्ष्यावारच संपूर्ण चित्रपटाची धुरा आहे आणि त्यांनी त्याचं सोनं केलंय हे वेगळं सांगायलाच नको. विनोदी प्रसंगातलं पार्श्वसंगीतसुद्धा कथेला पूर्णत्व देऊन गेलंय. "ही दुनिया मायाजाल" "कुणीतरी येणार येणार गं" "अशी ही बनवाबनवी" आणि "हृदयी (उच्चार ह्रिदयी) वसंत फुलताना" ही गाणी श्रवणीय. सचिनने अभिनयात फार झेंडे लावलेले नसले तरी दिग्दर्शनात त्याने कमाल केली आहे. लक्ष्या बाईच्या वेशात बघवत नसला तरी अभिनयाने तरून जातो (अशोक सराफचा चित्रपटातलाच डायलॉग "तुझं तरी ठीके रे…. निदान तुझी बायको सुंदर तरी आहे. मला या रानरेडयाबरोबर संसार करावा लागणारे !!!"). सचिन स्त्रीभूमिकेत खरंच छान दिसलाय आणि "कुणीतरी येणार येणार गं" मधलं साडी घातलेली असूनही केलेलं त्याचं नृत्य सफाईदार. अशोक सराफने चांगलं दिसण्याचा आणि अभिनय जमण्याचा काहीही संबंध नाही हे सर्वार्थाने सिद्ध केलं आहे (हा नियम फक्त अशोक सराफलाच लागू होतो. बाकीच्यांनी इकडे दुर्लक्ष करावं). मुख्य म्हणजे ताकदीचे कलाकार असल्याने चित्रपट कुठेही "लाऊड" किंवा "पानचट" झालेला नाही आणि हेच त्याच्या यशाचं गमक आहे. अजून या चित्रपटातले आपल्याला आवडलेले कोणते प्रसंग असतील तर कृपया यात भर घालावी. आजच्या भरत जाधव,मक्या,पंढरीनाथ कांबळे,संजय नार्वेकर (!!!!) वगैरे सुमार आणि दर्जाहीन अभिनेत्यांनी आणि "सो कॉल्ड" बकवास विनोदवीरांनी किमान एकदा मन लावून हा चित्रपट "समजून घ्यावा". अर्थात कितीही वेळा पाहिला तरी त्यांना अभिनय जमणार नाही हे तितकंच खरं आणि अशोक सराफच्या अतिउच्च लेव्हलला जाण्याची त्यांनी स्वप्न न बघितलेलीच बरी.
सो माझं हे पहिलवहिलं परीक्षण अशोक सराफच्या अफलातून टायमिंगला आणि "बनवाबनवी" च्या एकूणच जमलेल्या बेमालूम भट्टीला सादर समर्पित. कारण आजकाल मराठी विनोदी सिनेमा टीव्हीवर दिसताच चॅनेलबदल होणा-या काळात "बनवाबनवी" सारखा एव्हरग्रीन चित्रपट पुन्हा होणे नाही.
आत्ताच लागला होता झी
आत्ताच लागला होता झी मराठीवर..
झी टॉकीजवर लागलेला काल. एकेके
झी टॉकीजवर लागलेला काल.
एकेके एक्सप्रेशन्स लक्ष्याचे, अशोक सराफचे जबरदस्तच आहे..
मला तर सुधीर जोशी पण प्रचंड
मला तर सुधीर जोशी पण प्रचंड आवडतो
.... 'माने हा हलकटपणा आहे', म्हणताना तर जामच गोड दिसतो 
परवा झी मराठीवर लागला होता.
परवा झी मराठीवर लागला होता. पण जवळपास अर्ध्या तासाचा सिनेमा कापला होता.
२ सुलटे, एक उल्टा.... धनंजय
२ सुलटे, एक उल्टा.... धनंजय माने हे काय करुन ठेवलं आमचं. !!! -- सौ पार्वती माने. :डोळा मारा:
अर्ध्या तासाचा सिनेमा कापला
अर्ध्या तासाचा सिनेमा कापला होता.>>> गाणे कट केलेल बहुतेक.
त्याना एका दिवसात सहा शो करायचे आहेत म्हणून ही अॅडजस्टमेन्ट असावी...
मी पण बघितला परत एकदा
मी पण बघितला परत एकदा
जेंव्हा ती सुधा मरत असते आणि पार्वती तिला पाणी पाजत असते तेंव्हा अशोक सराफच्या चेहर्यावरचे हावभाव अगदी बघण्यासारखे आहेत
"तुम्ही मधे मधे बोलू नका हो"
"तुम्ही मधे मधे बोलू नका हो" अस डॉक्टरींण बाई मोठ्याने लक्ष्याच्या कानाच्या अगदी जवळ म्हणते तेव्हा लक्ष्याच्या चेहर्यावरचे भाव आठवा
लक्ष्या स्त्रीरूपात कमळीला
लक्ष्या स्त्रीरूपात कमळीला भेटायला लॉजवर जातो तेव्हा खाली छबूराव त्या लॉजच्या मालकाला म्हणतो 'तो वर बसलाय न्हवं, त्यो बघून घेईल की" तो प्रसंगही भन्नाट आहे
अशोक सराफ अजारी असल्याची चिठ्ठी देताना सचिन, "उद्या पर्यंत आम्ही सगळं ठिक करू" तेव्हा अश्विनी भावे त्याच्याकडे असं डो़ळे विस्फारून बघते..
गाण्यांविषयी कुणीच कसं बोलत
गाण्यांविषयी कुणीच कसं बोलत नाहीये...
‘हृदयी वसंत फुलताना’ काय एव्हरग्रीन गाणं आहे? कुणीतरी येणार येणार गं... अगदी भन्नाट
:हहगलो: :हहगलो:
टायटल साँग आणि कुणितरी येणार
टायटल साँग आणि कुणितरी येणार गं या दोन्ही गाण्यात माझी नजर सचिन वरून हटत नाही.
अतिशय ग्रेसफुली नाचलाय तो साडी नेसून सुद्धा.. सोप्पं नाही ते.
दक्षिणा, १००% अनुमोदन. गाणी
दक्षिणा, १००% अनुमोदन. गाणी तर सगळीच भन्नाट आहेत. 'हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यात फक्त सचिन आणि सुप्रियाच मस्त नाचतात. बाकीचे यथातथाच आहेत.
अश्विनी भावे + अशोक सराफ - अश्विनी भावे नाचणं विसरल्यासारखी वाटली. अशोक सराफ अभिनयात बाप माणुस पण नाचकाम उसके बस की बात नही.
लक्ष्मीकांत बेर्डे + प्रिया अरुण - लक्ष्मीकांत बेर्डे सेम केस लाईक अशोक सराफ. प्रिया अरुण मात्र मस्त नेहमीप्रमाणे.
सुशांत रे + निवेदिता जोशी - यात निवेदिता जोशी चिडलेली असल्याने तीने नाचायचा संबंधच येत नाही. सुशांत रेला फार काही नाचवल नाहिये आणि तेच बर आहे.
दक्षिणा, १००% अनुमोदन. गाणी
दक्षिणा, १००% अनुमोदन. गाणी तर सगळीच भन्नाट आहेत. 'हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यात फक्त सचिन आणि सुप्रियाच मस्त नाचतात. बाकीचे यथातथाच आहेत.
>>>
अर्र्र्र्र मला कोणीच नाही आवडलं
दक्षिणा, मुग्धा, पूर्वी मराठी
दक्षिणा, मुग्धा,
पूर्वी मराठी सिनेमांतल्या गाण्यांमध्ये नाचकाम म्हणजे सगळी कवायतच असायची. आठवा ते सचिन पिळगावकर, लक्ष्या, महेश कोठारे यांचे प्रसिध्द डान्स. अगदी माशा उडवतात असे वाटतात. पण तरीही त्यांच्या अभिनयाचा विचार करता आपण त्यांचा कवायत डान्सही एन्जॉय करतो.
विनोदाची जबरदस्त जाण असलेल्या
विनोदाची जबरदस्त जाण असलेल्या सुधीर जोशींच्या अभिनयाविषयी फारसे कुणी बोलताना दिसत नाही...
टोच्या, अॅबसोल्युटली खरय.
टोच्या, अॅबसोल्युटली खरय. अशोक सराफ आणि सुधीर जोशी ह्या दोघांशिवाय हा सिनेमा पुर्ण होऊच शकला नसता. एका छोट्याश्या रोल मधे सुधीर जोशींनी कमाल केलीये. "ही पाटी काही आम्ही फाटकाची शोभा वाढवायला नाही लावलीये", "हा हलकटपणा आहे माने", "तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखं आहे", "आता थेट औषधच घेतो" वगैरे वाक्य अजरामर आहेत.
फेरफटका, राजा गोसावी, शरद
फेरफटका, राजा गोसावी, शरद तळवलकर यांच्यासारख्या दिग्गज विनोदविरांच्या पठडीतील सुधीर जोशी हे अभिनेते होते. त्यांचं विनोदाचं टायमिंग जबरदस्त. मराठीतील कित्येक भूमिका त्यांनी अजरामर करून ठेवल्यात. विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकाही त्यांनी तितक्याच ताकदीने केल्या. आपण फक्त मुख्य कलाकारांचं कौतुक करतो. पण त्यांची भूमिका मुख्य बनविण्यासाठी साथ देणाऱ्या चरित्र अभिनेत्यांना विसरून जातो.
टोच्या, पण त्यातल्या त्यात
टोच्या, पण त्यातल्या त्यात मला सचिनचा नाच आवडतो. बाकी सगळे म्हणजे खरच कवायत मास्टर आहेत. त्यातही अशोक सराफ आघाडीवर
सुधीर जोशींबद्दल टोच्या
सुधीर जोशींबद्दल टोच्या ह्यांच्याशी सहमत
अर्रे...हे मिसलं होतं मी...
अर्रे...हे मिसलं होतं मी... भन्नाट मजा आली वाचून!
अरे इथे हा धागा आहे !! कसा
अरे इथे हा धागा आहे !! कसा काय राहून गेला
सिगरेट चे डोहाळे.....
सिगरेट चे डोहाळे.....
हा एकमेव मराठी चित्रपट आहे जो
हा एकमेव मराठी चित्रपट आहे जो tv वर लागला की आमच्या कडे channel बदललं जात नाही..
माझा स्कोअर १८२ आहे हा पिक्चर
माझा स्कोअर १८२ आहे हा पिक्चर बघायचा.
मामाच्या गावाला घरामागे ओपन एअर टाॅकीज होते. साईडला पत्रे अन वरून मोकळे. घराच्या वरच्या मजल्यावरून खिडकीतून रोज रात्री असा १० दिवस सलग पाहीला आहे.
"हा हलकटपणा आहे माने", >>
"हा हलकटपणा आहे माने", >> नुसता नव्हे शुद्ध हलकटपणा..
फर्स्ट हाफ जबरदस्त आहे, शेवटी
फर्स्ट हाफ जबरदस्त आहे, शेवटी बोर केलाय पिच्चर.. सेकंड हाफ चा उत्तरार्ध!
शेवटी बोर केलाय पिच्चर.. >>
शेवटी बोर केलाय पिच्चर.. >>> काहीही
शेवटी बोर केलाय पिच्चर.. >>>
शेवटी बोर केलाय पिच्चर.. >>> काहीही
>> +१२३
येच्यापेक्षा आयत्या घरात
येच्यापेक्षा आयत्या घरात घरोबा फार भारी आहे... बनवाबनवी उगाच हायीप झालीय.
Pages