तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..

Submitted by रसप on 20 September, 2013 - 05:55

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा
तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा
हरेक फांदीस पापणी, किती आसवांस माळते
उदासवाणी किती फुले, गळून पडली बघून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

अनेक थेंबांस थोपवुन, पन्हाळ खिडकीत रांगते
तुला पाहण्या पुन्हा पुन्हा, मुजोर वाऱ्यास सांगते
झुळूक येते घरात अन्, सुन्या मनाने परत फिरे
समोर त्यांच्याच एकदा, झुळूक होउन निघून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

बराच अवधी सरूनही, अजून संध्या न मावळे
किती बरसले मेघ तरी, अजून आकाश ओघळे
भिजून पाऊलवाट ही, सुकेल ऐसे न वाटते
कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

नकोच येऊस तू पुन्हा, नकोच दावूस आसही
उधाणलेला समुद्र मी, नको किनारा भकासही
अथांग डोळ्यांतुनी तुझ्या, खळाळुनी हासलो कधी
जुनी तरलता तुझीच तू, पुन्हा जरा आठवून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

....रसप….
२० सप्टेंबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/09/blog-post_20.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

>.नकोच येऊस तू पुन्हा, नकोच दावूस आसही
उधाणलेला समुद्र मी, नको किनारा भकासही
अथांग डोळ्यांतुनी तुझ्या, खळाळुनी हासलो कधी
जुनी तरलता तुझीच तू, पुन्हा जरा आठवून जा ..>>
व्वा रसप ! खूप दिवसांनी ही तरलता शब्दात उतरून भेटली.

व्वा ! भाव छान मांडलेत.

"अनेक थेंबांस थोपवुन, पन्हाळ खिडकीत रांगते
तुला पाहण्या पुन्हा पुन्हा, मुजोर वाऱ्यास सांगते
झुळूक येते घरात अन्, सुन्या मनाने परत फिरे" >>> सर्वात या ओळी ('चेतनागुणोक्ती'मुळे) विशेष वाटल्या.

कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा

नकोच येऊस तू पुन्हा, नकोच दावूस आसही
उधाणलेला समुद्र मी, नको किनारा भकासही
अथांग डोळ्यांतुनी तुझ्या, खळाळुनी हासलो कधी
जुनी तरलता तुझीच तू, पुन्हा जरा आठवून जा

तुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा<<<

उत्कृष्ट!!!

मस्त मस्त!

कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा<<< ही ओळ तरहीला द्या की?

>> ओह्ह !! बहुमान असेल हा.. बेफीजी..!!
मनापासून धन्यवाद ! Happy

कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा... व्व व्वा व्वा

झुळूक येते घरात अन्, सुन्या मनाने परत फिरे... मस्तच रे

रणजीत ही कविता मास्टर पीस आहे यार...

रसप | 8 October, 2013 - 10:20

कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा<<< ही ओळ तरहीला द्या की?

>> ओह्ह !! बहुमान असेल हा.. बेफीजी..!!
मनापासून धन्यवाद <<<

मी ही ओळ त्या धाग्यावर सजेस्ट करत आहे. Happy

धन्यवाद!

काय तरल झालीय ही कविता

ओळ मस्तच ! उत्सुकता ताणली जातेय विविध खयाल वाचण्याची

ग्रेट !!!

चाल लावायचा किरकोळ प्रयत्न केलाय.
ऑफिसमध्ये, मोबाईलवर केलेले रेकॉर्डिंग आहे. जरा आवाज कमी व डिस्टर्बन्स असण्याचीही शक्यता आहे. तसेच स्वरसाथही नाहीये त्यामुळे फिकं वाटेल.... तरी देतोय.....

https://soundcloud.com/rasap/tula-jayche-asel-tar

अप्रतीम....

ओळ मस्तच ! उत्सुकता ताणली जातेय विविध खयाल वाचण्याची >> १