उलटसुलट -३

Submitted by विजय देशमुख on 18 July, 2013 - 22:33

भाग १ http://www.maayboli.com/node/44121
भाग २ http://www.maayboli.com/node/44172

"डॉक्टर निलिमा तुमच्यासमोर बसली होती?"
"हो, म्हणजे काही वेळासाठी ती नर्स सोबत गेली होती पण २-३ मिनिटंच"
"मग मी बोललो ती कोण होती?"
"ते मला माहीती नाही, पण एक गोष्ट नक्की की हे सगळं इतकं साधं नाही."
"हम्म"

**************************
"मी काय म्हणते, एकदा गुरूजींना विचारुन बघुया..."
"अग जिथे डॉक्टरांनी हात टेकले, तिथे..."
"प्रयत्न करु नाही जमलं तर सोडुन देऊ"
"ठीक आहे. दुसरा काहीच उपाय दिसत नाहीय"

********************************
"हरी ॐ. बोला"
"गुरूजी, आमची निलिमा..."
"ये बेटा, बैस..."
"मला नेमकं काय होतय हे कळत नाही. म्हणजे मी एकाचवेळी २ ठिकाणी कशी असू शकेन? आणि मला स्पष्ट आठवतय की मी डॉक्टरकडेच गेली होती. पण निलेश म्हणाला आणि दिलिपही की मी ऑफिसमध्येच होती... आई ग..."
"काय झालं बेटा?"
"पोटात दुखतय...मी जरा वॉशरुमला ..."
"हो हो......."

*******************************
"आता कसं वाटतय बेटा?"
"मला काय धाड भरलीय?"
"अग तुला पोटात दुखत होतं ना.."
"केंव्हा?"
"गुरुजी, माझ्या मुलीला काय झालय हो? कुणी करणी-बिरणी तर केली नाही ना?"
"हे बघा ताई, तिला नेमकं काय झालं हे सांगण, कठीण आहे.... घ्या ज्युस घ्या...पण एक मात्र नक्की की ही साधी गोष्ट नाही. तुम्ही मानसोपचार तज्ञांकडेही घेउन गेलात, पण काही उपयोग झाला नाही म्हणता..."
"हो गुरूजी.... पण मग आता उपाय काय"
"काही शक्ती आपल्या आकलनापलिकडच्या असतात. त्यावर इलाज एकच"
"गुरुजी, म्हणजे तुम्हाला म्हणायचय की मला काय होतय ते तुम्हालासुद्धा ठाऊक नाही?"
"नाही बेटा, मला खरच नाही माहिती........... अरे पण बेटा, पण तुला पोटात दुखत होतं ना...."
"हो, जरा वेळ झाला की अस्वस्थ होते मला आणि कधी पोटात दुखत, तर कधी खुप पाणी प्यावसं वाटतं... "
"ज्युस हवाय अजुन?"
"नाही"
"बरं तू जरा बाहेर बसतेस का? मी जरा तुझ्या आई-वडिलांशी बोलतो"
"हो चालेल"
******************************
"गुरूजी..."
"नेमकं काय ते नाही सांगता येणार, पण तिची मानसिक स्थिती दोलायमान वाटते. कदाचित काही कारणाने तीचं वागणं बदलत आहे, पण नेमकं कारण कोणतं ते कळत नाही आहे."
"मग आता?"
"तुमचं कुलदैवत कोणतं"
"तसं आम्ही फारसं आस्तिक नाही, पण गणपतीपुळ्याला जातो कधीकधी"
"ते बरय.... एखाद्या शांत ठिकाणी घेउन जा तिला ४-८ दिवस. देवदर्शनाने कदाचित बरं वाटेल..."
"ठिक आहे. तेही करुन बघु... येऊ आम्ही?"
"या... शुभम भवतु"

*********************************
"तू कशाला उगीच सुट्टी घेतोय..."
"का मी नाही येऊ?"
"तसं नाही रे, आधीच मी नोकरी सोडलिय.. आता गणपतीपुळेला जायच म्हणतात आई-बाबा, तोही खर्च होणारच ना"
"पण मलाही ४ दिवस तुझ्यासोबत घालवता येतील ना, आणि माझा खर्च मी करेन, वाटल्यास..."
"दिलिप.... तू म्हणजे नं...."
"हा हा हा... "

************************************
"काय मस्त वाटतय ना...."
"दर्शन छान झालय..."
"हो... आई आम्ही जरा समुद्रावर फिरुन येऊ?"
" हो, जा पण लौकर या. रात्री जेवायला बाहेर जावं लागणार आहे."
"हो ग आई, आता कुठे ५ वाजताहेत... येतो ७ पर्यंत..."

**************************************

"आज पौर्णिमा आहे ना."
"हो का?"
"नाही, चंद्र दिसतोय म्हणुन ..."
"चंद्र अन ५ वाजता...."
"मला दिवसापण दिसतो."
"ए... नाटकं करु नकोस हा...."
"सांभाळुन भरती आहे....जास्त खोल जाऊ नको"
"तुला पोहता येतं ना, मला मला तू वाचवशील हे माहिती आहे..."
"पहा ती लाट...."
"आ sssss.. दिलिप......"
"मी म्हटलं होतं की जास्त खोल जाऊ नकोस..."
"तू इथे कसा?"
"कसा म्हणजे?"
"तू माझ्या मागे का आलास?"
"निले, काय चाललय..."
"मी तेच विचारतेय... तू माझा पिच्छा कधी सोडणार आहेस?"
"अग आपण दोघं इथे आलोय आणि ..........."
"खोटं बोलू नकोस. मी तुला चांगली ओळखते..."
"निलिमा..."
"चुप... तुझ्या तोंडुन माझं नावही घेऊ नकोस... फसवलस मला तू..."
"अग मी दिलिप...."
"माहिती आहे... लहानपणापासुन ओळखते मी तुला"
"मी कधी फसवल?"
"मग त्या सटवीशी लग्न कशाला करतो म्हणालस?"
"कोणासोबत? तू काय बोलत आहे? मला काहिच कळत नाही आहे."
"ती माधुरी..."
"अगं ती माझी..."
"हो ती तुझी आहे न मी कोणीच नाही..."
"अगं ती फक्त.....सांभाळ स्वत:ला वादळ सुरू झालेलं दिसतय...."
"आ ssssssssssssss"

*************************************************
"घे गरम गरम कॉफी..."
"दिलिप, आई-बाबा.... काय झालं. आणि हे कोण... आई गsssss"
"काय झालं"
"डोकं दुखतय खुप, पण या माणसाला कुठेतरी बघिलय मी"
"हे डॉ. सहस्त्रबुद्धे.... "
"आणि... ही... ही ..."
"हो हि निलिमा... पण तू नव्हे..."
"मी जिवंत आहे नं..... हे काय चाललय? मी .... दिलिप, ही माझ्यासारखी दिसणारी.... तू खरा आहेस ना.... मला भिती वाटत आहे... आई...बाबा..."
**************************************************
"निलिमा आणि दिलिप, तुम्हाला कसं समजावून सांगावं हेच कळत नाही आहे. हे सगळं या निलिमाला समजवायला थोडं कठिणच होतं."
"मला आधी सांगा, ही माझ्यासारखी दिसणारी आहे कोण?"
"सांगतो... मी डॉ. गिरिश सहस्त्रबुद्धे. आणि ही निलिमा शेलार."
"पण निलिमा शेलार मी आहे..."
"हो तू आणि तीही"
"दिलिप काय चाललय हे...."
"निले तू जरा शांत बस आणि ते काय सांगताहेत ते ऐक."
"तर मिस निलिमा शेलार... म्हणजे तू, जी स्वतःच्या आईवडीलांसोबत इथे आली ती.... आणि ही निलिमा शेलार या दोन वेगवेगळ्या विश्वातल्या निलिमा आहेत."
"दोन वेगळ्या विश्वातल्या?"
"हो...."
"मला कळलं नाही... ही माझी डुप्लिकेट आहे का?"
"नाही, तीसुद्धा तुच आहे पण समांतर विश्वातली."
"समांतर विश्व म्हणजे?"
"हम्म... जाऊ दे मग तुला श्रॉडींजर वगैरे सांगण्यात अर्थ नाही. बरं असं बघ, की प्रत्येक माणसाला प्रत्येक क्षणी अनंत निवडी असू शकतात, त्यात आपण एक काहीतरी निवडतो, आणि बाकी मार्ग सोडुन देतो. म्हणजे जसं तुला १२ नंतर कॉमर्स घ्यावसं वाटलं आणि सायन्स सुटलं, आलं लक्षात..."
"हं, पण मग...."
"पण याचा अर्थ असा माही की बाकीच्या निवडी संपल्या..."
"असं कसं?"
"असच आहे .... आपण जगतोय ते आपल्याला एक विश्व वाटतं...आणि ही निलिमा दुसर्‍या विश्वातली आहे..."
"म्हणजे एलिअन?"
"Not Exactly... तू निलिमा, ही निलिमा आणि अश्या असंख्य जगातल्या निलिमा या पृथ्वीवरच राहतात, पण त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध येत नाही"
"असं कसं होईल?"
"अविश्वसनिय असलं तरी असं आहे. असं बघ, की तू कधी भुत बघितलय का?"
"नाही"
"देव"
"नाही"
"तरी कधीतरी आपल्याला यांचा अनुभव येतो की नाही?"
"हो..."
"तर हे भुतं, किंवा देव इतर कोणी नसुन आपणच किंवा दुसरी व्यक्ती, पण वेगवेगळ्या जगातले असतो."
"म्हणजे मी निलिमा आणि ही निलिमा एकच आहे, पण वेगवेगळ्या विश्वातल्या?"
"हो"
"मग त्या जगात दिलिपही आहे का?"
"हो... अगदी सगळेच आहे..."
"मग फरक काय आहे?"
"तिथली निलिमाने १२ नंतर सायन्य घेतलं आणि आता ती एक संशोधक आहे"
"असं कसं होईल?"
"शक्यता.... अनंत शक्यतेतील एक तू निवडलिस, तशीच तिनेही निवडली...तू बी कॉम केलस, तिने सायन्स घेतलं... का शक्य नाही..."
"बरं मग दिलिप..."
"सुदैव म्हण किंवा दुर्दैव... मनुषाचा जन्म होतो, तो एकाच वेळी सगळ्या जगात, आणि तसाच तुझा आणि दिलिपचाही झाला. पण या जगात तुम्ही एकाच चाळित राहत होतात, तर तिथे त्या जगातला दिलिप आणि निलिमाही. पण पुढे दोघांनी अगदी पीएचडीपर्यंत सोबतच शिक्षण घेतलं."
"बर हे सगळं खर मानुन चाललो तरी याचा माझ्याशी काय संबंध"
"२६ जुलै २००५ आठवते?"
"हो, का... "
"तू चर्चगेटपासुन ठाण्याला कशी पोचली?"
"हॉरीबल.... मला दिड दिवस लागला आणि पुढे महिनाभर आजरी होती मी..."
"तो एक क्षण होता, ज्यावेळी तुमचं विश्व आणि आमचं विश्व एकमेकांना छेदल्या गेलं."
"का?"
"ते नाही सांगता येणार पण असं झालं खरं. त्या क्षणी तू आणि ही निलिमा एकमेकांच्या विश्वात घुसल्या, परत आल्या आणि हा खेळ तब्बल ३६ तास चालू राहीला.."
"म्हणजे जोपर्यंत मी घरी पोचले नाही तोपर्यंत..."
"बरोबर... आणि इथेच दुर्दैवाने पाण्याशी तो क्षण जोडल्या गेला. तू आजारी होतीस, तशीच निलिमाही तिकडे आजारी पडली...."
"मग?"
"पण पुढे तिच्यावर आणि तुझ्यावर तोपर्यंत फरक जाणवला नाही, जोपर्यंत तू मागच्या वर्षी पावसाळी सहलीसाठी झेनिथ वॉटरफॉलला गेली नाही."
"हे सगळं तुम्हाला....."
"ते सोड... पण त्या दिवशी हिचं वागणं विचित्र होत, हो ना दिलिप?"
"हो सर... पण ..."
"इथे पुन्हा एकदा तुम्हा दोघींची अदलाबदल होत होती... आणि पाणी तुम्हाला एकमेकांच्या विश्वात ढकलत होतं..."
"पण मग पुढे..."
"पुढे अडचण जास्त झाली, कारण प्रत्येकवेळी जेव्हा तुझा पाण्याशी संबंध आला, ही अदलाबदल घडत गेली. सुरुवातीला कमी प्रमाणात आणि मग प्रमाणाबाहेर...अगदी तू वॉशरुममध्ये हात धुवायला गेलीस किंवा साधा ज्युस पिलिस तरीही.."
"म्हणजे दिलिपशी भांडणारी ही निलिमा होती, मी नाही..."
"करेक्ट..."
"पण का?"
"कारण त्या विश्वात दिलिपवर फिदा झालेली अजुन एक तरूणी आहे..."
"माधुरी?"
"करेक्ट दिलिप...."
"त्यामुळे तिथली निलिमा संशयी झाली होती."
"हम्म... पण मग आता ?"
"हे सगळं निलिमानी मला सांगितलं. मी आमच्या प्रयोगशाळेत काही प्रयोग केले आणि सुदैवाने आज मी निलिमाला घेउन इथे पोहचु शकलो."
"पण मग आता ही पण इथेच राहील?"
"नाही... म्हणजे तुला आणि तिलाही ते आवडणार नाही... काय?"
"मला आवडेल... काय निले.. हा हा हा...."
"दिलप्या...."
"काळजी करु नकोस... आज हे पाण्याचं आणि तुमच्या दोघींच अदलाबदलीचं कनेक्षन मी तोडणार आहे. आता तुम्ही दोघीही एकाचवेळी शॉवरखाली उभ्या रहा आणि मी माझी उपकरणं चालू करतो."

**********************************************

"निले... ए निले..."
"ऊं..... आई काय झालं..."
"अगं ऊठ चहा घे.... "
"आपण कुठे आहो?"
"अजुनही गणपतीपुळ्यालाच आहे..."
"दिलिप, ती निलिमा गेली का रे?"
"माझ्या पडलेल्या चेहर्‍यावरुन काय वाटते... हा हा हा ......."
"बरं झालं ... चला आज पुन्हा समुद्रावर जायचं का? "
"हो, पण त्याआधी एक वचन दे...."
"दिलिप.... आता पुन्हा विचारू नको की मी तुझ्याशीच लग्न करणार आहे ना !"
"हा हा हा ..........."

(संपूर्ण)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कथा Happy काहीतरी वेगळी
पण गुंतागूंत खुप वाटली.काही समजायच्या अगोदर दुसर संवाद सुरु होतात त्यामूळे गोंधळ होतो.

नाही पटली.
विजय देशमुख >>समांतर विश्वाबद्दल माझ्या काही वेगळ्या कल्पना आहेत. तुम्ही माझ्याच फिल्ड मधले phd आहात. तर तुम्हाला शंका विचारता येतीलच. Happy