पाकीजा

Submitted by सत्यजित on 6 November, 2008 - 02:45

उमराव शोधाताय की शोधताय नरगिस
इथे पाकीजा शब्दच मुळी खोटा आहे,
वेड्यांन्नो हा फक्त कोठा आहे

उदरात काय पेक्षा पदरात काय
इथे फायद्याच्या सौद्यातही तोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

चेहरा नाही ना मोहरा नाही
सारा बंद निनावि लखोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

कायद्याचा देव, वायद्याचा देव
पुजलेला देव देखिल थोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

न दिव्यात वात, ना मदतीचा हात
इथे पैसा फक्त मोठा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

अंगाला रंग रंगाला अंग
अंगाचा संग वांझोटा आहे
काय शोधतोस खुळ्या हा कोठा आहे

-सत्यजित.

गुलमोहर: 

जळजळीत.
बर्‍याच दिवसांनी मित्रा. आलास तोच वेगळाच विषय घेऊन. म्हणून कुठे होतास हे मी विचारतच नाही. (मिश्किल बाहूली)

कविता आवडली, सत्यजित

कॉलेजमध्ये असताना अभाविप मधुन आम्ही पुण्यात बुधवार पेठेत एक साक्षरता वर्ग चालविला होता वर्षभर. तेव्हा हे डोळ्यानी पाहीले होते, अनुभवले होते. त्या जळजळीत वास्तवाची पुन्हा एकदा आठवण करुन दिलीस.
खुप छान.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

बालकविता लिहिणार हाच सत्यजित आहे? ग्रेट.............
गोदेय

खरच जळजळीत वा़स्तव आहे.

गोदेय सारखंच मलाही वाटलं. तुच का रे तो?
>>अंगाला रंग रंगाला अंग
अंगाचा संग वांझोटा आहे
काय शोधतोस खुळ्या हा कोठा आहे>>
अख्ख्या समाजातल्या सद्य स्थितीला टेरीफिक उपमा.
दे धडक बेधडक! Happy

उदरात काय पेक्षा पदरात काय
इथे फायद्याच्या सौद्यातही तोटा आहे

न दिव्यात वात, ना मदतीचा हात
इथे पैसा फक्त मोठा आहे

अंगाला रंग रंगाला अंग
अंगाचा संग वांझोटा आहे
काय शोधतोस खुळ्या हा कोठा आहे

तुझ्या आजपर्यंतच्या वाटचालीतली अगदी वेगळी पहाट. मस्तच !! Happy