सायकलविषयी सर्व काही ४ (सायकल चालवताना आणि देखभाल)

Submitted by आशुचँप on 12 May, 2013 - 12:47

गेल्या काही भागात दिलेल्या माहीतीचा काही जणांना तरी सायकल घ्यायला मदत झाली असेल. आता सायकल खरेदी झालीये, बरोबर एक्सेसरीज पण घेतली आहे. आता काही सायकलींगच्या आणि मेंटेनन्सच्या टीप्स....
एक सूचना - मी काही यातला तज्ञ वगैरे नाही. आंतरजालावर माहीती घेऊन आणि माझे काही अनुभव असे मिळून माबोकरांसाठी मी ही माहीती देत आहे.

सायकलमध्ये सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे चेन आणि गियर्स. आणि या दोन्ही भागांची अतिशय काळजीपूर्वक देखभाल करावी लागते. कितीही भारीतली सायकल घेतली आणि त्याची योग्य ती निगा राखली नाही तर थोडक्या काळातच त्याची वाट लागते. कशाही ताबडवल्या तरी पिढ्यान पिढ्या चालणार्या सायकलींचा जमाना आता गेला. त्याचबरोबर नविन सायकलींचा मेटेंनन्सही फार सोपा झाला आहे. बर्याच सायकलींना चेन कव्हर नसते त्यामुळे ते आधी खोला, त्याचे स्क्रू गंजलेले, मग चेन साफ करा आदी उपसव्य करावे लागत नाहीत.

मुळात आधी सायकल नीट पद्धतीने चालवली तर बरेच प्रश्न सुटतात. चेनला विनाकारण ताण न देता सायकल चालवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी

१. सायकल चालवण्यापूर्वी ती डावीकडच्या (पुढच्या) पहिल्याच गियरमध्ये असल्याची खात्री करून घ्या. मागच्या भागात दिल्याप्रमाणे पहिला गियर हा फक्त सायकलला चालना देण्यासाठी असल्याने चेनवर एकदम ताण पडत नाही आणि पायाच्या स्नायूंवरही. पाय आणि चेन दोन्ही मोशनमध्ये आल्यानंतरच दुसरा गियर टाकावा. यासाठी सिग्नलला किंवा इतरत्र थांबावे लागणार असेल तर आधीच पहिला गियर टाकून मगच सायकल थांबवावी. (अपवाद इमर्जन्सी थांबावे लागल्यास). दुसर्या आणि तिसर्या गियरमध्ये पण सायकल रेटता येते पण त्याने चेनलींक्सवर खूपच ताण येतो आणि त्याचे आयुष्यही कमी होते.

२. सायकल थांबलेली असताना कधीही गियर बदलू नका. याने डिल्युलर्स तर खराब होतातच पण चेन निसटण्याचीही दाट शक्यता असते. कायम पेडल मारत असतानाच गियर बदलावा. मित्रमंडळी किंवा इतरही आगावू लोक सायकल बघत असताना गियरशी खाटखूट करून खेळतात. त्यांना शक्य तितक्या सभ्यपणे असे करण्यापासून थांबवावे. तरीही ऐकत नसल्यास त्यावेळी योग्य ती कृती करावी.

३. अत्यंतिक चढावर अचानक गियर बदलू नका. जरी पेडल मारत असताना गियर बदलायचे असले तरी खूप चढावर पेडल अगदी दाबून मारत असताना गियर बदलू नका. चढ येण्यापूर्वी किंवा अगदी सुरुवातीलाच खालचा गियर टाकून ठेवला तर ही वेळ येत नाही.

४. कधीही पेडल उलटे फिरवू नका (रिव्हर्स पेडलींग)

५. काहींना हॉपींग करत मग सायकलवर बसायची सवय असते. त्यापेक्षा जागच्या जागी आधी पाय पलिकडे टाकून अलगद पॅडल दाबून मग लगेच सीटवर बसण्याची सवय ठेवावी.

६. एकच ब्रेक कधीही दाबू नका. विशेषत पुढचा..दोन्ही ब्रेक हळूहळू दाबावेत. यामुळे ब्रेकपॅडचे आयुष्य वाढते.

आता चालवण्याविषयी

१. सायकलच्या सीटची उंची आपल्यानुसार अँडजस्ट करून घ्यावी. याचे साधारण प्रमाण असे आहे की सीटवर बसल्यानंतर पूर्ण पॅडल मारण्यासाठी पाय गुढग्यातून ताठ झाला पाहीजे. (ताणावा न लागता). जर पूर्ण पॅडल मारल्यावर पाय एकदाही संपूर्ण ताठ होत नसेल तर सीटची उंची वाढवण्याची गरज आहे. आणि अगदी चवडा टेकत असेल तर कमी करण्याची.

थोडा वेळ दोन्ही पाय गुढग्यात वाकवून चालून पहा म्हणजे आपण सायकल किती चुकीच्या पद्धतीने चालवून पायावर ताण देतो याची जाणीव होईल. पण आपण वर्षानुवर्षे अशीच चालवल्यामुळे त्यात काही चुकीचे आहे हेच जाणवत नाही.

२. सीट उंच केल्यावर हँडलबारची उंचीही तपासून पहावी. जर सगळे वजन खांद्यावर आणि मनगटावर येत असेल तर लवकरच दोन्ही दुखायला सुरुवात होईल. बर्याच सायकलमध्ये हँडलबारही उंच करण्याची सोय असते. तसेच सीट ही जमिनीला अगदी समांतर अशीच पाहीजे. ती किंचितदेखील पुढे अगर मागे झुकलेली असेल तर चालवताना पाठीवर ताण येणार.

३. पेडल मारताना पिस्टनप्रमाणे नुसते खालीवर असे पॅडल मारताना ते शक्यतो वर्तुळाकार मारता येईल असे पहा. म्हणजे आपण कसे करतो, डावीकडचे पॅडल खाली दाबतो आणि मग लगेच उजवीकडचे. आणि त्यासाठीचा जोर मांडीच्या वरच्या स्नायूतून लावतो. त्याऐवजी डावीकडचे पॅडल दाबल्यानंतरही त्यावरचा दाब न सोडता ते जोर लाऊन वर ओढण्याची एक्शन करायची. त्याचवेळी उजवीकडचे पॅडल खाली जातच असते त्यावर थोडा दाब देऊन ते वर ओढायचे. एकंदरीत पॅडलवरचा दाब सोडायचा नाही.

याचे फायदे असे की मांड्याच्या आणि पिंढर्यांच्या वरच्या आणि खालच्या स्नायूंवर सारखाच ताण येतो. जास्त वेगाने जाण्यात मदत होते. सुरुवातीला याचे गणित जमायला जरा वेळ जातो पण एकदा जमल्यानंतर अतिशय बेस्ट प्रकार आहे. आधी आधी लक्ष देऊन हे करावे लागते मग नंतर एकदा अंगवळणी पडले की पायाचा सर्वांगसुंदर व्यायाम होतो. प्रोफेशनल सायकलपटूंना हे करणे खूप सोपे असते कारण त्यांचे शूज पॅडलला अडकवलेले असतात (क्लीट) त्यामुळे ते चटकन पॅडल मागे ओढू शकतात. आपल्याला फ्लॅट पॅडलवर थोडी कसरत करावी लागते.

४. केडन्स सांभाळणे आवश्यक आहे. केडन्स म्हणजे एक पेडल मारायला आपल्याला जितका वेळ लागतो तो. (बहुदा) बाईकचा जसा आरपीएम (रोटेशन पर मिनिट) असतो तसा. तो जितका जास्त (म्हणजे एका मिनिटात आपण कितीवेळेला पॅडल पूर्ण फिरवतो तो आकडा) तितका चांगला. विनाकारण वरचा गियर ठेऊन स्नायूंवर ताण देण्यापेक्षा वेग तितकाच ठेऊन खालच्या गियरवर पॅडलीग जोरात करणे आवश्यक आहे. पट्टीचे सायकलपटू ८०-९० केडन्स ठेवतात. आपण किमान ५०-६० चा पल्ला ठरवला तरी चालण्यासारखे आहे. यामुळे स्टॅमिना वाढतो व जास्त अंतर सायकलिंग केले तरीही फार दमछाक होत नाही. आता कितव्या गियरवर ठेवले तर स्नायूंवर पुरेसा ताण येईल आणि वेगही कमी येणार नाही हे अनुभवातूनच कळेल. आणि या केडन्ससाठीच सायकलला इतके गियर बसवलेले असतात आणि चांगल्या सायकलसाठी खर्चलेला पैसा इथे वसूल होतो.
(क्रं ३ मध्ये दिलेली पद्धत अंमलात आणली तर देखील केडन्स वाढायला मदत होते)

आता सायकलची देखभाल

१. वेळच्या वेळी हवेचे प्रेशर चेक करा. सर्वसाधारणपणे हायब्रीड सायकलला ५० ते ७५ पीएसआय इतके प्रेशर पुरेसे होते. यापेक्षा जास्त हवा भरली तर टायर अगदीच टणक होते आणि लहानसहान खडड्यांवरही जोरात हादरे बसतात. यापेक्षा कमी ठेवला तर सायकल चक्क ओढून नेल्यासारखी ताकद लावावी लागते आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे पंक्चर होण्याची शक्यता असते. (पीएसआय तपासण्यासाठी पंप आवश्यक आहे). माझ्या आत्ताच्या सायकलला दोन-तीन महिन्यातून एकदाच हवा भरून देखील चालते. (बहुदा प्रेस्टा व्हॉल्वची किमया असावी)

२. सायकलचे ब्रेकपॅड सगळ्यात आधी खराब होतात. त्यामुळे वेळच्या वेळी ते ठिकठाक असल्याची खात्री करून घ्यावी. (डिस्कब्रेक बाबत मी अनभिज्ञ आहे..)

३. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे चेन. सायकलचे प्राण चेनमध्ये असतात असे म्हणल्यास वावगे ठरू नये. चेन वापरताना काय काळजी घ्यावी हे वर दिलेच आहे. पण किमान आठवडा-दोन आठवड्यातून एकदा चेन स्वच्छ करणे आवश्यक आहे.
आजकाल बर्याच सायकलना चेन कव्हर नसते त्यामुळे त्यावर धूळ, माती लवकर साठते. अर्थात पण ती साफ करायलाही तितकीच सोयीची जाते.
आधी एका स्वच्छ कोरड्या फडक्याने चेन अलगद पुसुन घ्यावी.

मग खाली रद्दी वर्तमानपत्रे पसरून ठेवावीत आणि फडक्याचा बोळा रॉकेलमध्ये बुडवून त्याने काळजीपूर्वक चेन साफ करावी. जुना टूथब्रश वापरला तर उत्तम.

(दुकांनामध्ये खास डिग्रीजरपण मिळतात पण ते खूपच महागडे असतात). रॉकेलने चेनवरचे ऑईल आणि इतर घाण साफ करून घ्यावी. चेनच्या मधला कचरा साफ करण्यासाठी इयरबड वापरावेत.
(सूचना - माहीती असल्याशिवाय गियर्स, डिल्युरल्सशी छेडछाड करू नये, त्याचे सेटिंग बिघडवू नये..)
नाहीतर Happy

संपूर्ण चेन चकाचक झाल्यानंतर ती किमान एक ६-७ तास तशीच ठेऊन द्यावी. लगेचच वापरात काढू नये.
६-७ तासानंतर छान ऑइलींग करावे. ऑईलींग करण्यासाठी दुकानात ल्युब्रिकंट्स मिळातात. (ड्राय आणि वेट अशा दोन प्रकारात) पण आपले इंजिन ऑईल स्वस्त आणि मस्त. अर्थात त्याचा तोटा असा की इंजिन ऑईल थीक असते आणि चिकट असते त्यामुळे त्यावर धूळ, कचरा जास्त लवकर साठतो.

आईल भसाभसा ओतू नये. चेनलींकवर जिथे घर्षण होते तिथेच जास्त गरज असते. हळूहळू चेन फिरवत त्यावर एक एक थेंब सोडत जावा.

ऑईलींग केल्यावर सायकल स्टँडवर घेऊन पॅडल दाबत सगळ्या गियर्सवर फिरवून पहावी. पुन्हा एकदा स्वच्छ फडक्याने चेन अलगद पुसुन जास्तीचे ऑईल काढून टाकावे.
(हे सगळे करताना सायकल चक्क उलटी ठेऊन खूप सोयीचे जाते.)

आतंरजालावरचे फोटो वापरण्याऐवजी मी स्वतच चेन साफ करतानाचे फोटो टाकण्याची इच्छा होती पण दुसर्या कोणी मला हवे तसे फोटो काढणे आणि ऑईलने लिडबिडलेले हात कॅमेराला लावणे दोन्हीही शक्य नव्हते.

४. किमान सहा महिन्यातून एकदा चांगल्या सर्विस सेंटरमध्ये नेऊन थोडे पैसे खर्च करावेत. चेनचा ताण, डिल्युलर्स, ब्रेक्स हे सगळे तज्ञ हातांनीच सेट केलेले कधीही उत्तम.
========================================================================
पुढच्या भागात शहरात, ऑफीसला जाताना काय काय खबरदारी घ्यायची, अडचणी, माझे काही अनुभव, लांब पल्ल्याचे सायकलींग, चढ चढण्यासाठीच्या टीप्स आणि अन्य माहीती. (हा बहुदा शेवटचाच भाग असेल..जर तोपर्यंत नविन काही डोक्यात आले नाही तर)

भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919
भाग ३
http://www.maayboli.com/node/42971
======================================================================

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायकलचं सीट खूप उंच केलं तर टांग मारता येत नाही. लवचिकता कमी झाली आहे. पाय टेकले पाहीजेत एव्हढ्या बेताने सीट ठेवतो. बरेच जण ब्रेक मारताना चटकन मधे उतरतात आणि चालवताना मागे सीटवर अचूक बसतात. मला ते जमत नाही. त्यामुळे पायडल मारताना थोडा त्रास होतो हे मान्य आहे.
ठिकाण ओळखले तर बक्षीस मिळेल.
Screenshot_20230113-141807_Gallery.jpg

त्यामुळे पायडल मारताना थोडा त्रास होतो हे मान्य आहे. >>>> हळूहळू एक इंच असे वाढवत न्या
सतत गुढग्यात वाकून सायकल चालवली तर त्रासासोबत इंज्युरी चीही रिस्क आहे

मागे सिहगड नर्सरी चा बोर्ड >>> अर्रर्र ! फोटोशॉप करायला पाहीजे होतं. अचूक नसली तरी दोन्ही उत्तरं बरोबर.
डोणजेचा नवीन सीएनजी पंप आहे.

नाही, त्यावर बराच स्टडी रिसर्च झाला आहे
अरुंद सीटची रचना अशी असते की बरोबर योग्य जागीच दाब पडावा
आणि शॉफिंग म्हणजे मांड्यानं घासून राशेस येणे वगैरे होत नाही

पूर्वीचया सायकली या लॉंग डिस्टन्स साठी बनवल्या जात नव्हत्या

आजही ज्या सिटी बाईक्स म्हणून असतात त्यांची सीट रुंद आणि कम्फर्टेबल असते

पण लॉंग राईड च्या सगळ्या सायकली अरुंद असतात सीट

Pages