हातचे सोडुन पळत्यापाठी (खयाली तरही)

Submitted by मिल्या on 12 February, 2013 - 00:28

खयाली तरही मधे माझाही सहभाग. धन्यवाद बेफी

हातचे सोडुन पळत्यापाठी पळते आहे
गज़ल कस्तुरी शोधत वणवण फिरते आहे

कुठे लोपले पूर्वीचे ते प्रवाह निर्मळ?
जिकडे तिकडे केवळ दलदल दिसते आहे

झाड जीर्ण होताच पाखरे सोडुन गेली
वेलींच्या आधारे आता जगते आहे*

तू असताना ज्यांस चांदणे समजत होतो
उन्हात त्या आयुष्य आजही जळते आहे

चहूकडे दगडांच्या राशी पडलेल्या... पण
दगडांत बेडकी मजेत वावरते आहे

रस्ता, मंझिल, वाटाड्या... सारे हाताशी
पाऊल तरी का माघारी वळते आहे?

पाच ठिकाणी ’मिलिंद’ करतो दंश स्वत:ला
काय नेमके मनामधे दर्वळते आहे

* - दिलेल्या विचारापासून फारकत घेतल्याबद्दल क्षमस्व

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू असताना ज्यांस चांदणे समजत होतो
उन्हात त्या आयुष्य आजही जळते आहे>>> व्वा.

परफेक्ट खयाल उतरला आहे तरीही थेट नाही हे ग्रेट!

काही ओळींत लयींची गडबड जाणवली मला तरी, पुन्हा वाचतो.

तू असताना ज्यांस चांदणे समजत होतो
उन्हात त्या आयुष्य आजही जळते आहे>>>>>
मस्त शेर

दगडांत बेडकी मजेत वावरते आहे>>>> वाचताना लयीत अडखळ्लो

तू असताना ज्यांस चांदणे समजत होतो
उन्हात त्या आयुष्य आजही जळते आहे<< व्वा

सुंदर शेर!

रस्ता, मंझिल, वाटाड्या... सारे हाताशी
पाऊल तरी का माघारी वळते आहे?<< हाही आवडला

हातचे सोडुन पळत्यापाठी पळते आहे = २५
गज़ल कस्तुरी शोधत वणवण फिरते आहे = २४

असे झाल्यासारखे वाटत आहे, पुन्हा मोजून पाहतो.

खयाली तरहीतील सहभागासाठी मनःपूर्वक धन्यवाद मिलिंद! Happy

झाड जीर्ण होताच पाखरे सोडुन गेली
वेलींच्या आधारे आता जगते आहे
.
तू असताना ज्यांस चांदणे समजत होतो
उन्हात त्या आयुष्य आजही जळते आहे

भारी शेर. Happy

पाच ठिकाणी ’मिलिंद’ करतो दंश स्वत:ला
काय नेमके मनामधे दर्वळते आहे

पाचाचा उलगडा न झाल्याने समजलाच नाही. Wink

'पाच' ठिकाणी म्हणजे पाच शेरांत असाही खयाल असू शकतो. असो.. मिल्याभाऊच उलगडा करतील..

तू असताना ज्यांस चांदणे समजत होतो
उन्हात त्या आयुष्य आजही जळते आहे
आवडला..!

पाच ठि़काणी म्हणजे पाच शेरात>>>>>

वा खुरसाले साहेब मस्तच सांगीतलेत की वा वा अजूनच मजा वाढली त्या शेराची