कसली तृष्णा, ओढ कशाची मला लागली आहे?(खयाली तरही)

Submitted by सतीश देवपूरकर on 3 February, 2013 - 00:44

गझल (खयाली तरही)
कसली तृष्णा, ओढ कशाची मला लागली आहे?
आयुष्याची नदी कोरडी कुठे चालली आहे?

त्या पूर्वीच्या कुठे निरागस चेह-यांस मी शोधू?
जो तो धारण करी मुखवटे! प्रथाच पडली आहे!

चार मुले खंदस्त त्यास पण, अमेरिकी झालेली.....
अखेर त्याची शेजा-यांनी तिरडी धरली आहे!

हात तुझा मिळताच जाहली निम्मी सरशी माझी!
हा हा म्हणता, झुंज जिण्याची पूर्ण जिंकली आहे!!

दु:खांचे तम काय एकट्याने मी तुडवत होतो?
मी खांद्यावर तुझ्या, म्हणोनी वाट काटली आहे!

पळत्याच्या पाठीशी दृष्टी सतत धावली आहे!
जे होते हातात त्याकडे नजर न वळली आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह सर वाह वाह सर मस्तच
वाह् वा खूप आवडली

काही खयाल बरेच बदलून आलेत एक दोन नाहीयेत तरीही मजा येते आहेच Happy

त्या पूर्वीच्या कुठे निरागस चेह-यांस मी शोधू?
जो तो धारण करी मुखवटे! प्रथाच पडली आहे!

चार मुले खंदस्त त्यास पण, अमेरिकी झालेली.....
अखेर त्याची शेजा-यांनी तिरडी धरली आहे!

हात तुझा मिळताच जाहली निम्मी सरशी माझी!
हा हा म्हणता, झुंज जिण्याची पूर्ण जिंकली आहे!!<<< आशय जवळपास अचूकच आलेला आहे या शेरांमध्ये!

मला 'अमेरिकी झालेली' ऐवजी 'अमेरिकन झालेली' किंवा 'परदेशी / परगावी गेलेली' असे काहीसे सुचले.

खंदस्त असा शब्द प्रथमच वाचला.

मतला अचूक नसला तरी नेमका मतलाच या गझलेतील सर्वात चांगला शेर झालेला आहे.

खयाली तरहीतील सहभागाबद्दल धन्यवाद व अभिनंदन प्रोफेसर साहेब.

भूषणराव! धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
तरही गझल माहीत होते, पण खयाली गझल ही संकल्पना प्रथमच ऐकली व भावली, प्रचंड आवडली!
तेव्हा आपले प्रथम अभिनंदन करतो व आभार मानतो की एका नवीन प्रकाराशी आमची ओळख आपण करून दिली.

खयाली गझलेबाबत आमचे काही विचार/वै. मते इथे देत आहोत, कृपया मार्गदर्शन करावे......

१) गझलेचे अतरंग शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त प्रथा!

२) शेराचा दिलेला अर्थ वा आशय शब्दश: न घेता तो म्हणजे शेराचा मथितार्थ समजावा! म्हणजे अभिव्यक्तीत शब्दांना/प्रतिकांना मोकळीक मिळावी म्हणजेच समग्र शेराचा मथितार्थ सांभाळला जावा, प्रतिके कोणतीही असोत!

३) वृत्ताचे, रदीफ, काफियांचे पूर्ण स्वातंत्र्य असूनही इप्सित मथितार्थ शेवटी समग्र शेरात कलात्मकरित्या निभावणे ही काही सोपी गोष्ट नव्हे.

४) खयाली गझलेत शायराच्या प्रज्ञेचा, प्रतिभेचा, कल्पनाविलासाचा, अभिव्यक्तीसामर्थ्याचा कस लागतो.

५) शायराची मानसिकता यातून कळून येते!

६) विविध शायरांची एकाच पातळीवर सयोग्य तुलना खयाली गझलेने होते!

७) आपल्या अंतरंगात सुचलेले काव्य शायर शेरात कसे मूर्तिमंत उतरवतो, नेमकी काय करामत करतो, कोणत्या प्रतिमांचा व कसा वापर करतो हे यातून पहायला व शिकायला मिळते.

८) यालाच गझलेचे अंतरंग शिकणे, गझलेचा आत्मा, मंत्र शिकणे असे आम्ही म्हणू!

९) दिलेले गद्य खयाल म्हणजे कवीस सुचलेले काव्य असते सुचल्या सुचल्याच यात काव्य आहे का याची कवीमनाला जाणीव होते, व मग सुरू होते त्याचे चिंतन, ज्यातून खयालांना शब्द मिळून तयार होतात मिसरे व शेर!

१०) हे काव्य सुचणे महत्वाचे, त्याने आतून हालून जाणे हे महत्वाचे व त्याला अनुरूप गुणगुणण्यातून सुचलेले वृत्त, रदीफ व काफिया हे त्याहून महत्वाचे!

११) मतला मनाजोगता होणे, त्याची जमीन ठरणे हे कर्मकठीण काम असते, ज्याला शायराजवळ सबूरी असणे अत्यंत गरजेचे असते.

१२) कित्येकवेळा अचानक एखादा अख्खा मिसराच ओठांवर आपोआप येतो, कसा ते खुद्द शायरालाही सांगता येणार नाही.

१३) खयाली गझलेच्या यशस्वितेला कमीत कमी एक ग्रेड देण्यात यावी! म्हणजे शायराला आपण गझललेखनप्रक्रियेत नेमके कुठे उभे आहोत हे समजावे!

१४) खयाली गझलेचे परिक्षण करण्यासाठी काही ठोस निकष ठरवता यावेत जसे ......आशय/मथितार्थ निभावणे, वापरलेल्या प्रतिमातील काव्यसौंदर्य, प्रतिमांची गुंफण व शेरातील नेमका कलात्मक वापर, शब्दकळा, प्रभावी/चमकदार अभिव्यक्ती, शेरातील नाट्य, कडेलोट, सस्पेन्स, शब्दकळा, प्रासादिकता व शेराचा बोलकेपणा, शेराच्या अर्थाचे बहुपदरीपण/व्यामिश्रता इत्यादी! हवे असल्यास प्रत्येक शेरास २०पैकी गुण द्यावेत! २० गुणीले ५शेर्=१००मार्क्स! व तद्अनुसार एकंदर ग्रेड!

१५) निवडलेले वृत्त, समर्पक काफिये, रदीफ व त्यांचे निभावणे यांस स्पेशल गुण ठेवावेत!

पुनश्च भूषणराव खयाली गझलेची प्रथा सुरू केल्या बद्दल आपले अभिनंदन करतो व थांबतो!

............प्रा.सतीश देवपूरकर

टीप: वरील आमच्या खयाली गझलेतील मतला हा आम्ही आधीच लिहिलेला होता, जी गझल मायबोलीवर आधीच प्रकाशित झाली आहे! कारण या मतल्याचा मथितार्थ आपण दिलेल्या आशयाला जुळत होता म्हणून!

भूषणराव आपली मते जरूर कळावा, वाचायला आवडतील!
..................................................................................................................................................

तुमचे स्वतःला "आम्ही" म्हणणे बुडालेल्या संस्थानांच्या उरलेल्या वारसांगत वाटते आहे... बोलताना पण असेच बोलता का? .... असो

गझल छान!

हात तुझा मिळताच जाहली निम्मी सरशी माझी!
हा हा म्हणता, झुंज जिण्याची पूर्ण जिंकली आहे!! <<< सुंदर >>>

पळत्याच्या पाठीशी दृष्टी सतत धावली आहे!
जे होते हातात त्याकडे नजर न वळली आहे!! << छान शेर >>

आवडली...

प्रोफेसर साहेब, आपल्या सर्व मुद्यांशी पूर्ण सहमत आहे.

धन्यवाद!

===============

एक अधिक मतः

गझल लेखनाची प्रक्रिया 'प्रथम विचार नंतर शब्दयोजना' अशी असावी हा विचार ठाम व्हावा यासाठी खयाली तरही सहाय्यभूत ठरते. आधी ओळ, वृत्त, जमीन किंवा काफिया / रदीफ आणि नंतर खयाल ही उलटी प्रक्रिया हानीकारक आहे हे अश्या खयाली तरहीमुळे हळूहळू प्रस्थापित व्हावे अशी आशा!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

शाम,
तुमचे स्वतःला "आम्ही" म्हणणे बुडालेल्या संस्थानांच्या उरलेल्या वारसांगत वाटते आहे... बोलताना पण असेच बोलता का? ....
आम्ही म्हणण्याचे प्रयोजन मागे खुलासेवार सांगितले आहे! कुठे ते धुंडाळ, सापडेल ते!
टीप: कोण बुडाले हे पहाण्यापेक्षा आपण बुडत आहोत की तरत आहोत हे पहावे माणसाने आधी! स्वत:त दम नसलेल्यांनाच वारश्यांच्या कुबड्या लागतात!
बाकी गझल छान वाटल्याबद्दल धन्यवाद!
पक्वान्न कसे झाले म्हटल्यावर चटणी छान होती अशा धाटणीतील प्रतिसाद वाटला तुझा!
खयाली गझलेवर काही मते नोंदवली होती, त्यावर काही वदला नाहीस ते? ते वाचायला जास्त आवडले असते!
होय! बोलतानाही असेच बोलतो आम्ही!

धन्यवाद भूषणराव! आपण मांडलेले मत १६ आणे खरे आहे!
रोजच्या जीवनात आलेले कडूगोड प्रत्यय पाहता कवीचे/शायराचे मन अंतर्मुख होते व आलेल्या प्रत्ययांना न्याहाळते.
त्यातून त्याला काही तरी सुचते. सुचलेल्यात काव्य आहे का याची तो चाचपणी करतो. चिंतन करतो. सबूरी व थांबायची तयारी ठेवून उठणा-या खयालांच्या तरंगांना तो येवूजावू देतो व योग्य वेळी त्याच्या ओठांवर आपोआप एखादा अख्खा मिसराच येतो, कसे ते कवीला स्वत:ला देखिल सांगता येणार नाही. यासाठी किती कालावधी लागेल हे कवीच्या प्रज्ञेवर, प्रतिभेवर, मूडवर, साहित्यिक पोषणावर अवलंबून असते!

मिसरा सुचल्यावर तो वृत्ताची चाचपणी करतो, मग रदीफ, संभाव्य काफियांचा विचार करतो!
त्याला त्याची संपूर्ण गझल जणू समोर दिसते केवळ एका मिस-यावरून!
नंतर नंतर तर काफिये आपोआप फेर धरून नाचू लागतात!
इतकेच नाही तर सुचतानाच काफिये खयाल/मिसरे घेवूनच येतात!
प्रगल्भ शायर शब्दांवर हुकुमत गाजवतो, शब्दांना शरण जात नाही! कोणता शब्द ठेवायचा, काढायचा यासाठी तो कधी कधी जिवाचे रान करतो! ब-याच वेळा गुणगुणल्यावर एका क्षणी त्याचा शेर हातावेगळा होतो!

एकदा मिसरा निश्चित झाला की, फुरसतीने तो पुढील गझल पूर्ण होवू देतो!
जोम मंद झाला की, तो थांबतो, पण गझल मात्र त्याच्या मनात थैमान घालतच असते!
काही शेर लिहिल्यावर त्याला थांबावेसे वाटते मग काफियांची रांग जरी ताटकाळत उभी असली तरी तो थांबतो!
काफिये व रदीफ हे अगदी अलगद व अपसूक त्याच्या शेरात येतात जर त्याच्या खयालात प्रत्ययाचा प्रामाणिकपणा असेल तर! कुठेही काफियांची वा रदीफची फरपट त्याच्या गझलेत होत नाही!

खयाल देवून गझलच काय कोणताही काव्यप्रकार लिहिता यावा!
पण एक मात्र निश्चत की, आधी खयाल/काव्यात्मक खयाल व मग शेर/गझल/मिसरे/काफिये/रदीफ!
वृत्त , काफिये व रदीफ ठरवून मग तद्अनुसार खयाल करणे वृत्तात ते कोंबणे असे गझलेत नसते!
हृदयात सुचलेले काव्यात्मक खयाल, त्यांना समजून घेणे, त्यांच्या मुळाशी जाणे, चिंतन करणे, गुणगुणणे यातूनच कामयाब शेरांची /गझलेची निर्मिती होत असते!

हे सर्व शिकायला, महसूस करायला , कमवायला, गझल वश व्हायला, भूषणराव, आपली खयाली गझलेची प्रथा खूपच उपयुक्त आहे! तेव्हा आपले पुनश्च अभिनंदन!

टीप: खयाली गझलेच्या मूल्यांकनाबद्दलची मते पटली का? अंमलात आणू या का ती! थोडिशी शालेय वाटतील पण खूपच उपयोग होईल त्याचा! फक्त आम्ही आमचा अहंकार बाजूस ठेवायला हवा व जिंदादिलीने खयाली गझला लिहून आत्मपरिक्षण करायला शिकले पाहिजे! अशाने गझल समृद्ध व्हायला निश्चितच मदत व्हावी!
थांबतो!
पुनश्च आपले अभिनंदन!
...........प्रा.सतीश देवपूरकर

मतला मस्त आहे...

खयाली तरहीत 'शेर टकराना' होणे अधिक स्वाभाविक आहे जे बरेच गझलेत जाणवते आहे... ते टाळण्यासाठी काय करता येईल?

धन्यवाद मिल्या!
खयाली तरहीत 'शेर टकराना' होणे अधिक स्वाभाविक आहे जे बरेच गझलेत जाणवते आहे... ते टाळण्यासाठी काय करता येईल?<<<<<<<<<<<<<

शेर टकराना झाले तरी त्यात अपराध्यासारखे वाटण्यासारखे काही नाही!
खयाली गझलेत म्हणाल तर आशय गद्यात दिलेला असतो, जो आपल्या शेराचा मथितार्थ व्हायला हवा!
ब-याचदा आपण खयाली गझलेत आशयाचे इतके भान ठेवायला लागतो की, आपल्या प्रतिमा संकुचित होतात व आशयाच्या शब्दश: अर्थाकडेच नको तितके लक्ष दिले जाते. शेवटी समग्र शेराचा अर्थ तो असला पाहिजे! हे एकदा घट्ट लक्षात ठेवले की, आपण खयाली गझल लिहित आहोत हे दडपण निघून जाते. याच गझलेच्या आमच्या मतल्याचे उदाहरण याला लागू होते! एकदा का हे दडपण गेले की, आपली प्रतिभा फुलायला लागते! आपोआपच आपलक्या पिंडानुसार प्रतिमा येवू लागतात व विविध शायरांच्या एकाच आशयावरील शेरांत विविधता येते व आपणास प्रत्येकाची शैली व मानसिकता कळू लागते! अशा शेरांची सरळ सरळ तुलना होवू शकते कारण त्यांचा मथितार्थ एकच असतो, वेगळी असते ती फक्त अभिव्यक्ती, जिचे शिक्षण खयाली गझलेच्या माध्यमातून मिळू शकते!
...........प्रा.सतीश देवपूरकर
टीप: अशा वेळी आपण आपला अहंकार बाजूस ठेवून सगळ्यांच्या शेरांचा अभ्यास करायला हवे व रसास्वाद घ्यावा!