चंद्र दे आणून माझा

Submitted by -शाम on 31 January, 2013 - 08:13

हात जोडूनी नभाला घालतो मी साकडे
चंद्र दे आणून माझा खिन्न माझे झोपडे ||

अंगणी येऊन माझ्या मेघ कोणी थांबतो
ओळखीचा ना तरीही जीव हा भांबावतो
पापण्यांच्या उंबर्‍याशी आठवांची सर झडे ||

धीर देतो रोज वारा भोवती रेंगाळुनी
शब्द काही सांत्वनाचे बोलुनी जाते कुणी
कोण बघतो झाकलेल्या काळजावरचे तडे ||

का उगा लावू दिव्याची झुंज अंधारासवे
तेज माझ्या संचिताचे तेवढे मजला हवे
हे अभासी चांदण्याचे काय कामाचे सडे ||

..................................................शाम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आह....
सिंपली ऑसम.. हिअर यू आर शाम...!!

अतिप्रचंड आवडली... पहिल्या दोन ओळींतच वातावरणनिर्मिती केलीस.. ती कविताभर व्यापून राहिली.. जियो दोस्त!!

छान लिहिलंय शाम...... मस्तच.
---------------------------------------------------------------------------------
कवितेतला चंद्र सुख/जीवनावश्यक गोष्टी/पाऊस इ.इ. चं प्रतीक वाटला.
मी भाकरीचा चंद्र अशी कल्पना करूनही वाचून पाहिली १-२ वेळा.
मस्त वाटली.
"देवूस उसणे" इथे "देऊस उसने" असं असायला हवं का ? वैम. कृगैन.

वाह ! अप्रतिम काव्य !

प्रिय व्यक्तिच्या वियोगातून अवतरलेलं हे विरह(शोक)गीत हृदयस्पर्शीच !

शब्दाशब्दांतून व्यक्त होणारी आर्तता व्याकूळ बनवते वाचकालाही .

चांदण्याचे खडे
हे
चांदण्यांचे म्हणजे इतर खगोलांचे (चंद्रप्रभेचे नव्हे) खडे या शब्दशः अर्थाने वापरले असावे . माझा चंद्र (प्रेयसी) सोडून तू देऊ केलेली इतर कोणतीही प्रलोभनं मला नकोत, असा व्यंगार्थ आहे असं मला वाटतं .

वाह!
जियो
बागेश्री +१
माझ्याकडे तर तुझ्या कवितांचं कौतुक करायला पण शब्द नाहीयेत Happy

का उगा लावू दिव्याची झुंज अंधारासवे
तेज माझ्या संचिताचे तेवढे मजला हवे
हे अभासी चांदण्याचे काय कामाचे सडे ||<<<

उत्कृष्ट

चांदण्याचे खडे अधिक सुंदर होते शाम, अर्थात संपूर्णपणे वैम... आकाश, चंद्र, चांदण्या- आणि चांदण्याचे खडे थेट जात होतं!

हा बदलही छानच आहे. इथे थाडकन वास्तव येतयं... आधीच्या समारोपामुळे काव्य तरल स्वप्नवत वाटत राहिलं होतं!

फक्त एक ओळ- पण किती कमाल करू शकते ना Happy

अंगणी येऊन माझ्या मेघ कोणी थांबतो
ओळखीचा ना तरीही जीव हा भांबावतो
पापण्यांच्या उंबर्‍याशी आठवांची सर झडे ||

व्वा..!

Pages