शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तात्पुरते का होईना, मुस्लिमांनी गोमांस भक्षण करू नये अशी मागणी जनता दल (सेक्युलर) चे दक्षिण कन्नडचे जिल्हाध्यक्ष गुलाम महंमद यांनी केली आहे. हिंदूंशी उगीचच तेढ वाढवू नये याकरिता प्रयत्न करणारे गुलाम महमंद यांचे अभिनंदन. संबंधित वृत्त : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2013/08/blog-post_183.html

-गा.पै.

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे(DRDO)तील संशोधकांनी तयार केलेल्या विस्फोटक शोधक उपकरण संचाचे अमेरिकेत उत्पादन आणि वितरण होणार. संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बाबत भारताकडून अमेरिकेकडे हस्तांतरित होणारे हे पहिलेच उत्पादन आहे.

स्वातंत्र्यदिन जवळच असताना खर्‍या अर्थाने (स्वावलंबनामुळे) स्वातंत्र्याकडे वाटचालीतील महत्वाचा टप्पा गाठणार्‍या वरच्या दोन बातम्या पुर्णार्थाने 'शुभ वर्तमान' आहेत. नंदीनी आणि भरत मयेकर खरोखर मस्त वाटले. Happy

हर्पेन,

>> स्वातंत्र्यदिन जवळच असताना खर्‍या अर्थाने (स्वावलंबनामुळे) स्वातंत्र्याकडे वाटचालीतील महत्वाचा टप्पा
>> गाठणार्‍या वरच्या दोन बातम्या पुर्णार्थाने 'शुभ वर्तमान' आहेत. नंदीनी आणि भरत मयेकर खरोखर मस्त वाटले.

१००% अनुमोदन!

आ.न.,
-गा.पै.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/--/ar...?

सौजन्य महाराष्ट्र टाईम्स

अविनाश महालक्ष्मे , नागपूर

डोक्यावर टोपी असलेले आणि संपूर्ण ' गणवेशा ' त असलेले सारे कैदी रांगा करून उभे असतात. काही क्षणात ध्वजारोहण होणार असतं. कारागृहाचे अधिकारीही तयार असतात. आता कारागृह अधीक्षक झेंडावंदन करतील आणि त्यानंतर उपस्थित बंदी राष्ट्रध्वजाला सलाम करून राष्ट्रगीत म्हणतील असे वाटत असते. पण त्याचवेळी रांगेत उभ्या असलेल्या एकाला पुकारले जाते. तो चपापतो. पण त्याच्या नावाचा पुकारा , त्याला ध्वजारोहण करायला बोलावण्यासाठी असतो. क्षणभर त्याचा स्वतःच्या कानांवरच विश्वास बसत नाही , पण गजाआडच्या ' स्वातंत्र्या ' चा अनोखा अनुभव घेण्याची संधी त्याच्यापुढे उभी असते. या पुकाऱ्याने भारावून गेलेला तो झेंडावंदनासाठी पुढे सरकतो. त्याची छाती आत्मसन्मानाने फुलून येते. आदेश होताच त्याच्या हस्ते ध्वजारोहण होते. तो तिरंग्याला कडक सॅल्युट ठोकतो आणि मग एका सूरात सुरू होते , ' जन गन मन अधिनायक जय है , भारत भाग्य विधाता '. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवशी सकाळी ध्वजारोहणाच्यावेळी दिसणारे हे दृश्य उपस्थित कैद्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.

कायद्याचे आणि समाजाचे गुन्हेगार म्हणून ज्यांच्यावर शिक्का बसला आणि झालेल्या शिक्षेमुळे ज्यांचं स्वातंत्र्यच हिरावलं गेलं , त्यांना ध्वजारोहणाचा सर्वात मोठा सन्मान प्राप्त करून देण्याचा प्रयोग नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. कारागृहाचे अधीक्षक विनोद शेकदार यांनी हा प्रयोग येथे सुरू केला आहे.

स्वातंत्र्य दिनी कारागृह परिसरात एक नव्हे तब्बल पाच ठिकाणी ध्वजारोहण होतं आणि त्यातील तीन ठिकाणचं ध्वजारोहण हे कैद्यांच्या हस्ते होत असतं. नागपूर कारागृह परिसरातच कारागृह उपमहापिरीक्षकांचे कार्यालय आहे. त्यामुळे तेथे , तसेच मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झेंडावंदन केले जाते. त्यानंतर कारागृहातील भिंतींच्या आत कच्चे कैदी , महिला कैदी आणि सिद्ध अपराध बंदी अशा तीन विभागांमध्ये वेगवेगळे झेंडावंदन केले जाते. आतील झेंडावंदनाचा मान त्या-त्या विभागातील कैद्याला दिला जातो. झेंडावंदन कुणाच्या हस्ते होणार हे वेळेपर्यंत कैद्यांना माहीत नसतं. ते मुद्दाम गुप्त ठेवण्यात येतं. पण कैद्याची एकंदर वागणूक पाहून एकाला बोलावलं जातं. अनपेक्षित मिळालेल्या या सन्मानानं त्याच्या डोळ्यातील अश्रूही स्वतंत्र होऊन गालावर ओघळू लागतात.

अशीच स्थिती महिला बंद्यांच्या विभागातही असते. चूल आणि मूल सांभाळताना हातून घडलेली चूक त्यांना येथवर घेऊन आली असते. झालेल्या शिक्षेमुळे आपलं स्वातंत्र्य हिरावलं गेल्याचं दुःख असतं. पण त्याच हातांना जेंव्हा झेंडावंदनाची संधी मिळते , त्यावेळी राष्ट्रप्रेमाने त्यांचही मन उचंबळून येतं. येथून सुटल्यावर समाजात परत जाताना समाजाविषयी आणि राष्ट्राविषयी प्रेम घेऊन जायचं , हा संदेश या कैद्यांना कारागृहातील स्वातंत्र्य दिन देत असतो.
स्वातंत्र्य दिनी कैद्यांसाठी विविध खेळ , स्पर्धा होतात , काही कैदी दैशभक्तीपर गाणी सादर करतात. कारागृह प्रशासनातर्फे सर्वांना गोडधोड दिलं जातं. भविष्यात आपलं आणि इतरांचही आयुष्य ' गोड ' करा , असा संदेश देऊन सारेच ' जय हिंद ' करतात.

सायमन फाउंडेशनतर्फे आलूर यांना पुरस्कार
सकाळ मधली बातमी खालीलप्रमाणे
पुणे - जागतिक पातळीवर पदार्थविज्ञान, गणित व संगणक क्षेत्रातील मूलभूत संशोधनामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सन्मान केला जातो. "सायमन इन्व्हेस्टिगेटर्स ऍवॉर्ड' पटकाविणाऱ्या 13 शास्त्रज्ञांमध्ये यंदा चार भारतीयांचा समावेश आहे. न्यूयॉर्कमधील सायमन फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. मूळचे पुण्याचे असलेले डॉ. राजीव आलूर यांनाही हा सन्मान मिळाला आहे.

संगणक प्रोग्रॅमर्सना नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा भरवशाच्या प्रणाली विकसित करण्याच्या क्षेत्रात आलूर यांनी मोलाची भर टाकली आहे. त्यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. दर वर्षी एक लाख डॉलर्स, असे या पुरस्काराचे स्वरूप असून, तो पाच वर्षांसाठी दिला जातो.

राजीव आलूर यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. दहावी व बारावीमध्ये बोर्डात सर्वप्रथम आल्यावर त्यांनी आय.आय.टी. कानपूरमधून संगणक क्षेत्रात पदवी घेऊन सर्वोत्तम विद्यार्थ्यासाठीचे "राष्ट्रपतींचे सुवर्णपदक' मिळविले. त्यांनी शोधलेल्या अनेक "ऑटोमाटा' व "लॉजिक्‍स' सॉफ्टवेअर व्हेरिफिकेशनसाठीची "स्टॅंडर्ड मॉडेल्स' म्हणून जगभर वापरली जातात.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व स्नायडर इलेक्ट्रिकल्स यांनी संयुक्तपणे ' स्प्रेडिंग हॅप्पिनेस ' या प्रकल्पांतर्गत हेदआंबासह परिसरातील पाडे सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांनी उजळून टाकले आहेत .

अधिक बातमी http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharash...

आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के एम जाधव यांनी फेरोइलेक्ट्रिक संयुगांवर केलेल्या संशोधनास स्वामित्वाधिकार बहाल :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada...

-गा.पै.

गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचे जन्मदिवसानिमित्त अभिष्टचिंतन ! या पदावर पुढची पन्नास वर्षे त्यांनी मनसोक्त राज्य करावे या शुभेच्छा !

(गुरुजी हिटलर यांचा वाढदिवसही आजच असतो का ? )

खटासी खट,

>> (गुरुजी हिटलर यांचा वाढदिवसही आजच असतो का ? )

हिटलरचा वाढदिवस तोच असला तरी काही बिघडत नाही. शूर आणि भित्र्याचं शुद्ध भारतीय उदाहरण आपल्याला आठवत असेलंच!

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : मोदी व गुरुजी शूर आहेत.

अबब..

सर्च इंजिनसाठी प्रसिद्ध असलेल्या गुगलने भारतीय विद्यार्थ्याला तब्बल 93 लाखाची ऑफर दिली आहे. दिल्ली येथील टेक्‍नॉलॉजिकल विद्यापीठामध्ये (डीटीयू) तो शिक्षण घेत असून, हिमांशू जिंदाल असे त्याचे नाव आहे.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5652145154149008544&Se...

हिमांशु जिंदालचे अभिनंदन !

सौजन्यः मटा

केवळ फालतू जोक्स, विचित्र फोटो, व्हिडिओ असल्याच गोष्टी शेअर करण्यासाठी 'व्हॉट्स अ‍ॅप' या अँड्रॉइड फोन अ‍ॅप्लिकेशनचा जन्म झालेला आहे, असा समज असलेल्यांचा तो (गैर)समज दूर करणारी एक चांगली बातमी आहे. ठाणे जिल्ह्यातल्या एका डॉक्टरने प्रसंगावधान दाखवून 'व्हॉट्स अ‍ॅप'च्या केलेल्या समायोचित वापरामुळे हातावर पोट असलेल्या एका मजुराचा कापला गेलेला हात पुन्हा जोडणे शक्य झाले आहे.

बोईसर येथील डॉ. जितेंद्र पाटील यांच्या कल्पकतेची ही कथा. तिलक राम नावाचा वीस वर्षांचा बांधकाम मजूर बुधवारी सायंकाळी जखमी अवस्थेत त्यांच्याकडे आला. इलेक्ट्रिक करवतीच्या साह्याने लाकूड कापताना चुकून ती हातावर चालवली गेल्यामुळे मनगटापासून त्याचा हात कापला गेला होता. तो हात केवळ मांसाच्या एका तुकड्याला लोंबत असलेल्या आणि प्रचंड रक्तस्रावाच्या अवस्थेत त्याला इतर मजुरांनी घाबरलेल्या स्थितीत पाटील डॉक्टरांच्या साईलीला हॉस्पिटलमध्ये आणले.

'त्याच्या हाताची अवस्था भयंकर होती. मी पायाच्या फ्रॅक्चरची किंवा इतरही नेहमीची अनेक ऑपरेशन केली आहेत; पण अशी केस कधीच हाताळली नव्हती. अशी ऑपरेशन शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये केली जातात आणि त्यासाठी वेगळी उपकरणे लागतात; पण शहराचा प्रवास तीन तासांचा असल्याने त्याला शहरात नेणे किंवा मुंबईतील कोणी डॉक्टरही येणे शक्य नव्हते...' डॉ. पाटील आपला अनुभव सांगत होते...'तात्पुरते उपचार सुरू करून मी घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत पाटणकर यांना फोन लावला. माझ्या सुरुवातीच्या काळात मी त्यांच्या हाताखाली काम केले होते. डॉ. पाटणकरांनी मला पेशंटची माहिती विचारली आणि त्याचे फोटो पाठवायला सांगितले. मी 'व्हॉट्स अ‍ॅप'वरून ते पाठवले. त्यानंतर डॉ. पाटणकरांच्या सूचनेनुसार दहा तासांची 'हँड साल्व्हेजिंग सर्जरी' सुरू केली. प्लॅस्टिक सर्जन असल्याशिवाय ही सर्जरी करता येत नाही. मात्र, तरीही त्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि फोनवरून मार्गदर्शन केले. त्यामुळे त्याच्या हाताचे तुटलेले १८ टेन्डॉन्स, कापली गेलेली एक मुख्य रक्तवाहिनी पुन्हा जोडता आली.'
'व्हॉट्स अ‍ॅप'चा उपयोग अनेक चांगल्या कारणांसाठी केला जातो; पण केवळ मजा म्हणून फोटो, जोक, व्हिडिओ शेअर करण्याकरिता त्याचा होणारा वापर खूप जास्त आहे. ठाण्यातल्या डॉक्टरचे हे उदाहरण 'व्हॉट्स अ‍ॅप'सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या कल्पक वापराला प्रोत्साहन देणारे ठरेल.

डॉक्टरांकडून कौतुक
प्रसंगावधान राखून व्हॉट्स अ‍ॅप आणि फोनचा अत्यंत नेमका वापर करून पेशंटचा जीव वाचवल्याबद्दल डॉ. पाटणकरांनी आपल्या विद्यार्थ्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. आपला हात आणि जीव वाचला यावर तिलक रामचा विश्वासच बसत नाहीये. आठवडाभर हॉस्पिटमध्ये राहायला लागेल, पण पुन्हा उदरनिर्वाह करता येईल, या आशेने तो आश्वस्त झालाय.

मित यानी दिलेली बातमी विशेष स्वरुपाचीच आहे....डॉ.पाटणकर यानी आपल्या विद्यार्थ्याचे जे कौतुक केले आहे तेही उचित असेच आहे.

आज लोकसत्तामध्ये एक बातमी वाचली....ती "शुभ वर्तमान" सदरात येईल का नाही याची कल्पना नाही, पण त्यामध्ये काहीतरी चांगले आहे म्हणून इथे देत आहे.

http://epaper.loksatta.com/163834/indian-express/24-09-2013#page/3/2

मंदिर शिल्पाचे काम करणारे माळकोळी, ता.लोहा जि.नांदेड येथील जालिंदर कागणे यानी १९९९ मध्ये लग्नात घेतलेला १ लाख रुपयाचा हुंडा सासुरवाडीस परत करण्याचा निर्णय घेतला..... कारण काही दिलेले नाही. पण विशेष म्हणजे ही रक्कम ना सासूने ना मेव्हण्याने स्वीकारली....शेवटी येत्या २ आक्टोबरला हे एक लाख रुपये सिंधुताई सपकाळ यांच्या सेवासंस्थेला देण्याचा निर्णय झाला आहे.

अशोक पाटील

शेवटी येत्या २ आक्टोबरला हे एक लाख रुपये सिंधुताई सपकाळ यांच्या सेवासंस्थेला देण्याचा निर्णय झाला आहे. हे नक्कीच शुभ वर्तमान आहे Happy

धन्यवाद हर्पेन आणि सुहास्य..... मी काहीसे घाबरत घाबरतच ही वार्ता 'शुभ....' मध्ये द्यायचा निर्णय घेतला. कारण मुळात आपल्या कायद्याच्या दृष्टीने 'हुंडा' घेणे हाच प्रथम गुन्हा आहे....तरीही कारण काही का असेना त्या जालिंदर कागणे यानी ती रक्कम चौदा वर्षांनी परत करण्याचा निर्णय घेतला ही बाब मला त्यातल्यात्यात समाधानाची वाटली.

महाराष्ट्रटाईम्स :-

गर्दीच्या ठिकाणी होणारे विनयभंग , छेडछाड , अश्लिल चाळे , फेसबुक , ट्विटरवरून होणारी बदनामी , तरुणांच्या टोळक्यांकडून मारले जाणारे शेरे , अश्लिल एसएमएस... महिलांच्या मानसिक व शारीरिक छळाच्या अशा असंख्य तक्रारी लोकलज्जेस्तव नोंदविल्याच जात नाहीत. परंतु , शहरातील महिला छळाचे वास्तव समोर आणण्यासाठी पीडितांना ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

अक्षरा या स्वयंसेवी संस्थेने ' मुंबई हरॅस मॅप ' हाती घेतला आहे. या मोहिमेचा प्रारंभ सामाजिक कार्यकर्त्या नंदिता गांधी , अभिनेता राहुल बोस , आयटीतज्ज्ञ विजय मुखी यांच्या हस्ते गुरुवारी झाला. आपले नाव जाहीर न करता वेबसाइट किंवा एमएमएसद्वारे महिला आणि तरुणींनी तक्रारी नोंदवाव्यात , असे आवाहन त्यांनी केले. येथील प्रत्येक तक्रारींवर पोलिस कारवाई व्हावी अशी अपेक्षा नाही. परंतु , महिलांसाठी असुरक्षित असलेली ठिकाणे प्रकाशझोतात यावी आणि तिथल्या अपप्रवृत्तींवर कारवाई करून तो भाग कायमस्वरूपी सुरक्षित करता यावा , हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे राहुल बोस यांनी सांगितले.

अशी नोंदवा तक्रार

akshara.crowdmap.com या वेबसाइटवर तक्रार नोंदविण्याची सोय आहे. छळ किंवा छेडछाडीचे प्रकार कुठे , कधी आणि कसे घडले , आरोपीचे वय आणि वर्णन याबाबतची माहिती त्यावर नोंदवायची आहे. तक्रारदार महिलेने स्वतःचे नाव जाहीर करण्याचे बंधन नसले तरी वयोगट द्यायचा आहे. इथे स्थानिक पोलिस स्टेशनचे फोन नंबरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑनलाइन तक्रार शक्य नसेल तर ९९२०१०३१०३ या क्रमांकावर एसएमएस करूनही तक्रार दाखल करता येईल. या बेवसाइटवर पीडित महिलांसाठी सपोर्ट सिस्टीम , कायदेशीर मदत आणि कौन्सिलिंगचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन पीटिशन

सुरक्षित मुंबईसाठी अक्षरातर्फे ऑनलाइन पीटिशनही दाखल केली जाणार असून www.chang.org/mumbaisafe येथे लोकांनी आपली मते नोंदविल्यानंतर तो अहवाल सरकारला सादर केला जाणार असून सरकारवर त्यातून दबाव निर्माण करण्याचे प्रयोजन आहे.

बाजारात जाताना खिशातील पन्नास रुपये हरविले म्हणून काहीच न खरेदी करता घरी परतून रडतरडत उपाशी झोपी गेलेल्या जोडीने जवळपास त्या पद्धतीने दहा वर्षे संसार चालविला....मग जिद्दीने पत्नीने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले....आणि आज ती इन्स्पेक्टर झाली आहे.....नवरा पेव्हर ब्लॉकचे काम करणारा मजूर...पण पत्नीचे स्वप्न पूर्ण करणारा....अगदी शुभ वर्तमान. आजच्या 'सकाळ' मधील ही अभिनंदनीय बातमी....

apadma.jpg

नाशिक - घरात अठरा विश्‍व दारिद्य्र... पती पेव्हर ब्लॉकचे काम करणारा मजूर... गोदावरीच्या काठावरील एका पालामध्ये दोन लहानग्यांसह पुढे चाललेला संसार... अशा अनेक आव्हानांशी लढत "ती' पदवीपर्यंतचे शिक्षण घेते... तिथेच न थांबता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क फौजदारही होते..! ही कहाणी आहे पद्मशीला तिरपुडे या सामान्यांतील असामान्य नारीची!

महाराष्ट्र पोलिस अकादमीत आज झालेला फौजदारांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा या वीरांगनेसाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा नि अभिमानाचा ठेवा ठरला. हा क्षण अनुभवण्यासाठी तिने केलेल्या प्रचंड संघर्षाची ही सुखद परिणती होती. मूळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे हिचा त्याच जिल्ह्यातील वाळकेश्‍वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे याच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे. पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खूप सोसलंय. हमाली केली. सामोसे विकले. मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आज कामाला आले.
- पद्मशीला तिरपुडे, (पोलिस उपनिरीक्षक)

एक दिवस असा आला, की घरात दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. दोघंही खूप रडलो नि तसेच उपाशी झोपलो. मनाशी एकच निश्‍चय केला, पद्मशीलाला शिकवायचं अन्‌ मोठी अधिकारी करायचं. त्यासाठी खूप कष्ट केले. पण, आज तिला फौजदार झाल्याचं बघून सगळा शीण गेला आहे.
- पवन खोब्रागडे (पद्मशीलाचा पती)

अरे वा! मस्त बातमी पवन खोब्रागडे यांचे कौतुक आणि पद्मशीला तिरपुडे यांचे अभिनंदन !

Pages