उर्मिला

हाय ! लिहीलेस काय लेखा
भाळी धुसरशी रक्तरेखा

अजूनी हाती, पान मेंदीचे
अजूनी ओले, अंग हळदीचे
रात्र उंबर्‍यात शोधिते स्वप्ने
अजूनी कोरे, भाव धुंदीचे

विसकटला ना, जुडा ही पुरता
शेजेवरचा, सडा ही पुरता
प्रणयगीत ही थबकले अधरी
हिरमुसलेला, विडा ही पुरता

बिंब दर्पणात एकटे उरले
लाजले ना ते, हासले, रूसले
साजश्रुंगारा, रंग ही परके
धवलसे अवघे, सोहळे सजले

प्राक्तनाची होऊनिया बळी
फुलण्याआधी, चुरगळली कळी
दुर्लक्षिले मज, तूच वाल्मिका
मर्यादेची पायी साखळी


कौतुक छान.



शब्दच नाहीत रे, ग्रेट!

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.



उर्मिलेच्या भावविश्वातील उलथापालथ कशी असेल याची खूप छान कलपना मांडली आहे. मलाही रामायण संबंधीची पुस्तके वाचताना जेव्हा लक्ष्मणही वनवासाला निघतात तो प्रसंग आला की तिचे काय झाले असेल हा विचार मनात येतो. कधी कधी वाटते की ती पण आपल्या पती सोबत का नाही गेली?



वा! सुंदर शब्दरुप दिलय उर्मिलेच्या व्यथेला.



अतिशय सुरेख! कौतुक तुझ्या कवितात छानशी लय असते. ती खूप भावते.
उर्मिलेवरची मला आवडलेली ही दुसरी कविता. मैथिलीशरण गुप्तांच्या नितांतसुंदर उर्मिलेनंतर..

>>दुर्लक्षिले मज, तूच वाल्मिका
वाल्मिकींना का हो दोष? स्मित



छान कविता....

>>दुर्लक्षिले मज, तूच वाल्मिका
वाल्मिकींना का हो दोष? >>

तुमच्या प्रश्नातच तुमचे उत्तर आहे.... कारण वाल्मिकींनी उर्मिलेला रामायणात योग्य स्थान नाही दिले म्हणून....



कित्येक कलाकृतीत एखादी दुर्दैवी व्यक्तिरेखा असते. उर्मिलाहि तशीच. पण लेखकाने तीच्या कपाळी दुर्दैवाचे दशावतार लिहीले म्हणून केवळ लेखकाला दूषण देता येणार नाही. मात्र त्याने त्या व्यक्तिरेखेला पुरेसे महत्व दिले नाही, ती धडपणे रंगवली नाही तर त्या व्यक्तिरेखेला 'उपेक्षित' केलं असं आपण म्हणू शकतो. ह्या अर्थाने उर्मिला ह्या व्यक्तिरेखेला वाल्मिकिंनी 'न्याय' दिला नाही, असं जर अभिप्रेत असेल तर मी सहमत आहे.
बापू करन्दिकर



हा दोष मला वाटते उर्मिलेचा नाही तर मनुचा आहे. त्याने स्त्रीला त्यागाची देवी वगैरे ठरवताना तिच्या मनाचा विचार करायचे सोयिस्कररित्या टाळले. त्याचीच री ओढत वाल्मिकीने उर्मिलेला लक्ष्मणाबरोबर पाठवण्याऐवजी त्यागाची मुर्ती बनवुन राम - लक्ष्मणांच्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी मागे ठेवले.उपेक्षेचा त्रास नेहेमी त्याग आणि चांगुलपणाच्याच वाट्याला का येतो?

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.



बापू , सहमत. विशाल, तुझ्याशीही. चिनू तुझ्या प्रश्नाचे उत्तर प्रतिसादामध्ये मिळालयं. उर्मिलेचा त्याग महान होता यात शंकाच नाही. नवरा असून १४ वर्षे विधवेसारखं जगणं... असं असूनही पंचकन्येत तिला स्थान नाही मिळालं. तिची व्यथा मांडण्याचा हा एक प्रयत्न. तुमच्या प्रतिसादांमुळे तो जमलाय असं वाटतय.



राम अवतार व कृष्ण अवतार यांच्यातल्या काही घटना पाहिल्या तर कुठेतरी लिंक लागतेच.

---
रामाने पाना आडून बाण मारुन वध केलेला वाली (शाखामृग / वानर, म्हणून शिकार केल्याप्रमाणे वध्य) परत व्याध बनून आला व कृष्ण योगमुद्रेत असताना पायाचा तळवा मृगाप्रमाणे वाटल्याने व्याधाने बाण मारला व कृष्णावतार संपला
---
राम वनवासात असताना रानातले मोर स्वतःची पिसे पाणवठ्याच्या मार्गावर झडवून रामाला पाण्याचा साठा दाखवायचे. कृष्णावतारात हीच मोरपिसे कृतज्ञता म्हणून शिरावर लेणं म्हणून धारण केली.
---
एवढास्सा जीव असलेली खारुताई तिला जमेल तसे सेतु बांधताना काम करत गेली व तिला परमात्म्याच्या (सगुण साकार) मातेकडून म्हणजे अनसुया मातेकडून अंशतः मातृत्वाचे दान मिळाले व हिच खारुताई कृष्णावतारात यशोदामाई म्हणून परमात्म्याची पालनकर्ती झाली.
---
रावणास मरताना महारुद्र हनुमंताने आपल्या शिवस्वरुपाची (रावणाच्या आराध्य दैवताची) जाण दिली तरीही तो अंधाराचा उपासक रावण अजून या पुढेही परमात्म्याचा व प्रकाशाच्या उपासकांचा सदैव विरोधच करेन असे म्हणाला. कृष्णावतारात तोच परत कंस म्हणून आला व आपले परमात्म्याच्या विरोधाचे काम करता करताच वधला गेला
---
रामावतारात कुणास न कळलेली उर्मिला कृष्णावतारात बलरामाची रोहिणी म्हणून परत शेषाची सहधर्मचारिणी (इथे विरह नाही) झाली.
---



वाल्मिकींना दोष देणारी पहिलीच कविता असेलही.
उर्मिलेने सहन केले. तिचा रोष मात्र लक्ष्मणावर होता असेच माहीत होते (वाचून). तुझ्या कवितेमुळे हाही एक दृष्टीकोण मिळाला. छान वाटलं वाचून.



मनापासून आवडली.



मस्त... रे कौतुक.

वपुंच एक छान वाक्य आहे उर्मीलेवर... ते आठवल मला फार आवडतते...
वाल्मीकी हा देखिल पुरुष शेवटी. त्याग म्हणुन राम महान आणि उर्मीला वंचित.. पुर्वापार कहाणी आहे अगदी.