नवजात

येताच फोडती हे टाहो
का ?.. ते जरा सांगा हो
अजूनी मिटलेले डोळे
शाश्वता न पाहीलेले
आवळल्या मुठीत
काही न धरलेले
इवलेसे पाय ही
भुमी न लागलेले
क्षण मोजकेच अवघे
काही न अनुभवलेले
तरीही केवढ्याने हो...येताच फोडती टाहो..
रागावली न आई
कुणी बोलले न काही
झापले ना बाबांनी
मित्रांनी ढापले नाही
मैत्रिणीने टांगण्याची
वेळ आली ना जराही
तरीही केवढ्याने हो...येताच फोडती टाहो..
नसे आनंददायक येथे
उपजत आहे का ज्ञान ?
जगण्या धरा ना लायक
न पाहता असे ते भान ?
कि ईश्वराने दिला ना
आर्त विनंतीस मान ?
म्हणूनी एवढ्याने हो...येताच फोडती टाहो..