असा 'मी', तसा 'मी'
न जाणे कसा 'मी'
मला व्यापले अन
म्हणे एकटा 'मी'
जणू राज्य माझे
फिरे मोकळा मी
खरे 'मी'च जाणे
करी मी गुलामी
दिलासा मनाला
असे 'मी' मुठी हा
उसासा मनाचा
मिठी घालतो हा
कसाही कुठेही
कधी 'मी'च काया
नसे शब्द ओठी
बने मीच छाया
कितीदा मुखी 'मी'
सहज शर सुटे ते
जवळ आज नुरले
सखे कालचे ते
दिले दान 'मी'ने
मला एकटेपण
सयींच्या सुयांचे
किती भळभळे वण
अरे जाणतो मी
न माझा सगा 'मी'
तरी बाळ जैसा
तसा या जपे मी