ट्रेक करायचा.. ट्रेकींगला जायचेच.. पहिल्या ट्रेकींगची मजा चाखायचीय.. डोंगरकडांशी दोन हात करायचेच.. धबधब्याच्या पाण्यात हात घालायचाच.. किल्ल्यांना भेट देउन शिवरायांना स्मरावे.... बस्स ! काहीही झाले तरी हा पावसाळा हा असाच कोरडा जाउ द्यायचा नाही.. अशा कितीतरी प्रतिज्ञा मनोमनी करुन झाल्या पण जल्ला श्रावणसरी येउन थडकल्या तरीसुद्धा त्यांची घडी तसुभरही विस्कटली नव्हती.. फक्त मनातल्या मनातच चालले होते.. आता तर श्रावणसरी पण तुरळक होउ लागल्या.. कडक उन्हाची झालर सभोवार पसरली.. मग जल्ला कसली प्रतिज्ञा नि कसलं काय.. नि त्यात आजकालचा पाउस हा आज हाय उद्या नाय...
पण असेही नव्हते की ट्रेकींगच्या संधी आल्याच नाहित.. खरे तर ह्या ना त्या कारणाने साधताच आल्या नाहित.. पण काय करणार.. माझा थोडी ना ट्रेकिंग ग्रुप होता.. नेटवरील अनोळखी ग्रुपसोबत जायचे म्हटले तर जरा जपुनच.. त्या ग्रुपची सविस्तर माहिती मिळवेपर्यंत.. हो नाहि करेस्तोवर त्या ग्रुपचे ट्रेंकिग होउन त्यांनी फोटोची लिंक एव्हाना दिली असते.. नि मग आम्हि जल्ला कसले शॉलिड फोटुज आहेत.. मिस केले यार.. म्हणत पालीसारखे चुकारत बसायचे.. श्या वैतागलो होतो.. शेवटी असेच एकदा कॉम्प्युटरवर ऑर्कुटच्या जाळ्यात फिरता फिरता "संजय गांधी नॅशनल(राष्ट्रीय) पार्क(उद्यान)" ही कम्युनिटी दिसली.. नि घुसलो तिकडे.. कोण्या एका राजेश सचदेव या वाईल्ड लाइफ ऍक्टीविस्टची पोस्ट होती "Natural Trail to Tulsi Lake".. नि मी लगेच होकार दिला.. नुसता होकार नाही.. फोन नं , ईमेल आयडी देउन मोकळा..
तुळसी तलाव.. गर्द झाडींच्या जंगलात वसलेला नि मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या तलावांपैकी एक भव्य दिव्य तलाव.. कान्हेरी, पवई च्या डोंगराळ भागात याचे वास्तव्य.. जिथे सामान्यांना जाण्यास बंदी आहे.. मुळात त्याची वाट ही जंगलातुन आहे आणि अशा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी वनखात्याची परवानगी काढावी लागते.. ही परवानगी सहजासहजी मिळत नाही हे समजुन घ्यावे.. त्यामुळे ही आयती संधी कशाला सोडा.. ट्रेक नही तो ट्रेल सही.. जाउन तरी पाहुया.. शेवटी जंगलवाटातुन भटकणे नि ते पण चक्क "core" एरिआमधुन.. हीच खरी मजा.. नि तलावाचे दर्शन होत असेल तर उत्तमच.. जे त्या राजेशमुळे संधी मिळत होती.. मग ठरले..
म्हटले आपण बोरिवलीचेच.. नॅशनल पार्कचे प्रवेश द्वार बोरिवलीतच.. जाण्याची वाट नॅशनल पार्काच्या जंगलातुनच.. इतक्या जवळ.. वॉव, मस्त.. पण जेव्हा त्याला संपर्क केला तेव्हा कळले गोरेगाव फिल्म सिटीच्या शेवटच्या बस थांब्यावर भेटायचे.. तिकडुन जंगलात शिरायचे..!! नि भेटायची वेळ रविवारी सकाळी ठीक ७ वाजता..! खाणेपिणे घेउन येणे !! किती जिकरीचे काम हे.. लगेच माझ्याबरोबर कुर्ल्याहुन येणार्या मायबोलीकर सहकारी योगायोगाला फोनुन सांगितले "सकाळची पहिली ट्रेन पकडुन ये.. पण ये.. गोरेगाव स्टेशनला ६.३० पर्यंत ये.. मग बघु.." वाटले हा योगा वैतागेल.. पण त्याने "Done" म्हटले.. "मी असेन तु मात्र ये वेळेवर" हा अनाहुत सल्ला नाहि दिला म्हणुन बरे वाटले..
खरे आम्हा दोघांना असल्या ट्रेल, ट्रेकिंगचा काहि अनुभव नव्हता.. झाले ठरल्याप्रमाणे आम्ही वेळेत भेटलो.. नि गोरेगाव पुर्वेवरुन रीक्षा पकडली.. तोच एक कॉउबॉय टोपीस्वाराने विचारले "फिल्मसिटी" विचारले नि तो आम्हाला जॉइंड झाला.. आधी वाटले आमच्यातलाच.. पण विचारपुस केल्यावर कळले तो विल्सन कॉलेजचा ग्रुप "bird watching" (पक्षीनिरीक्षण हो) साठी जाणार होता.. शेवटी आम्हि पोहोचलो त्या स्टॉपवर.. तोपर्यंत टिपीकल शहर नि गर्दी मागे सरली होती.. रीक्षाचे भाडे आमचे पाकीट बाहेर पडेपर्यंत त्या कॉउबॉय ने देउन टाकले नि भाडे शेअर करण्यास पण नकार दिला.. का तर म्हणे.. "अरे यार तुम्ही पण ''bird watching" ni Trail साठी जात आहात.. मग कसले काय.." तुम्ही आम्हि निसर्गप्रेमी असेच सुचवुन गेला.. नि त्याची वाट पाहणार्या घोळक्यात सामिल झाला..
तितक्यात समोरुन दोन व्यक्ती आल्या.. त्यात एक गोरापान, सडपातळ, चष्मिश.. हाच असावा राजेश.. झाली आमची तोंडओळख झाली.. त्याच्याबरोबर हितेशभाय हा शेअर बाजारातला गुज्जु होता.. "हम खाली चारजण क्या.." मी टिपीकल हिंदीत विचारले असता "नहि, और एक बंदा है.. वहा खडा है.. वैसे फिलहाल हम पांच है.. और दो आनेवले है.." नि आम्ही पुढे निघालो.. माझा सोबती योगा तर आपण कोण्या एका जंगलातील गावात आल्याच्या आवेषात खुष झाला होता.. जंगलाच्या गंजलेल्या प्रवेशद्वारापाशी गेलो, तिथे तो "माने" नावाचा बंदा त्यांच्या कारपाशी उभा होता.. राजेशने गाडीतुन आपले सामान काढले.. कॅप, सॅक, दुर्बीण, पुस्तकांच्या चार हँडबॅग्ज.. आम्हि बघतच होतो.. यानेच "आपके पास बायनाक्युलर, डिजीकॅम रहेगा तो लेके आना.. मजा आयेगा" असे सांगितले होते.. आम्हा दोघा बापड्यांकडे असे काहि नव्हते.. पण मी माझ्या चुलत भावाकडुन कामचलाउ कॅमेरा नावाला म्हणुन घेतला होता..
जल्ला कसला कॅमेरा तो.. फोटु येईल की नाही याची गारंटी नव्हती पण क्लिक्-ऑन्-ऑफ चा आवाज कसला भन्नाट.. उगीच नाहि काय चायना आयटम आकर्षक असतो ! 
त्या दोघांची सामानाबरोबर सजावट चालु असताना मायबाप नि त्यांच्या लेकरांचे काही घोळके अधुन मधुन गेटमधुन जाताना दिसत होते.. BHNS या सेंटरने फुलपाखरु निरीक्षणाचा छोट्यांसाठी कार्यक्रम आयोजीत केला होता.. खुप कौतुक वाटले त्या मायबापांचे..
तसे अजुन सुर्यदेवांनी डोके पुर्णपणे बाहेर काढले नव्हते.. हवेलाही जाग आली नव्हती.. म्हणुनच की काय झाडेही स्तब्ध होती.. तोच एक चित्रविचित्र आवाज (शब्दांकीत करणे कठीण!!) कानी पडला.. लगेच झाडांवर पाहिले.. बाजुंच्या झुडपांत पाहिले.. पण छे.. काहिच दिसले नाही.. तोच रस्त्याच्या कडेला पहाटेकर्सांपैकी एक आसामी बसुन कसले तरी योगासन(कदाचित प्राणायम !!) करीत होता.. जल्ला नाकाने की तोंडाने आवाज येता तोच जाणे 
"Lets Go" असे त्या राजेशने म्हणताच अजुन दोघे येउन सामील झाले.. विवेक (फोटोग्राफित शिकाउ) नि दुसरा सचिन(आमच्यासारखाच या क्षेत्रातील अनाडी..
.. अगदी थोडेस अंतर पुढे गेलो तोच अजुन तिघे फोनाफोनी करत आमच्यापर्यंत पोहोचले.. हेमंत्(गळ्यात मस्तच्या मस्त कॅमेरा), शीतलकुमार्(गळ्यात दुर्बिण नि हातात वही !!) नि समिर (हातात डि़जीकॅम).. चला पाचाचे दुप्पट झाले.. नि आमचे मार्गाक्रमण सुरु झाले.. चढणाच्या दिशेने एक सिमेंटखडी टाकुन कच्ची वाट गेली होती.. पुढे ती "आ" करुन असलेल्या जंगलाच्या तोंडात लुप्त झाली होती.. आम्ही तिच वाट पकडली. !!
त्या "आ" मध्ये शिरताच रंगाची उधळण सुरु झाली.. त्याचे काय की विविध रंगी फुलपाखरे त्यांच्या निसर्गमहलात आमचे स्वागत करत होते..
त्या स्वागतानेच आम्ही भारावुन गेलो.. नि पुढे काय वाढुन ठेवलेय याची जाणीव झाली..
पुढे जाताच "Hey look at that Psyche" राजेश आम्हाला थांबवुन म्हणाला.. इवलेसे फुलपाखरु आपले इवले इवले पंख फडफडवित उडत होते.. "Psyche का ? " विचारताच माने म्हणाला " तो वेड्यासारखा कन्ट्युनिअस उडत असतो.. विश्रांतीशिवाय.. म्हणुन Psyche " वा.. ग्रेट..
क्षणातच हिरव्या रानात एक भलेमोठे तेजस्वि फुल दिसले.. "Its Spiral Ginger " कानावर पड्ले.. सगळ्यांचे कॅमेरा त्या फुलाच्या दिशेने सरसावले.. अरेच्च्या हे तर आमच्या गावी बरेच ठिकाणी आढळते.. 
म्हटले चला नाव तरी कळले.. रानटी फुल म्हणण्यापेक्षा हे नाव बरे.. काहीसे पुढे जाताच एक गोल टोपी घातलेला भलामोठा वयस्कर गृहस्थ एका छोटुश्या वनस्पतीकडे एकटक बघत बसला होता.. आम्ही जवळ जाताच "शुsss.. आवाज मत करो.. its Mantis" आमच्या नजरा त्या वनस्पतीवर खिळल्या.. मी, योगायोग डोळे बारीक करुन पाहु लागलो पण जल्ला काहिच दिसत नव्हते.. बरं तो गृहस्थ आम्हाला जास्ती जवळही जाउ देत नव्हता.. नि तो प्राणी पण मेला काय हलत नव्हता.. मग कळणार कसे.. शेवटी आम्ही जे एक सुकलेले पान समजत होतो तोच Mantis होता..!! नाकतोड्यासारखाच.. पण वेगळा.. देवापुढे प्रार्थना करताना जशी आपल्या हातांची रचना असते त्याप्रमाणे त्याच्या पुढच्या पायांची रचना असते.. म्हणुन त्याला Preying Mantis देखिल म्हणतात..

त्याचे फोटोसेशन पार पाडल्यावर आम्ही पुढे निघालो.. नि
रस्त्याच्या कडेला निळयाजांभळ्या फुलांचे पट्टे दिसले..!! हम्म्म.. राजेशने सर्वांना थांबवुन सांगितले.. thats Karvi.. वॉव ! यंदा नॅशनल पार्कात ती आठ वर्षांनी फुलली होती.. खरच खुप मोहक नि सुंदर ! 
डोंगराळ भागात दिसणारी कारवी चक्क मुंबईत पाहायला मिळते यातच खुप आनंद होत होता..
कारवीप्रमाणेच इतर फुलांचे रंग आम्हाला आकर्षुन घेत होते.. त्यात "रानहळद" छानच वाटली.. 
आतापर्यंत सगळे त्या जंगलात चांगलेच रमले होते.. कोणी फुलपाखरु न्याहाळत होते, कोणी पक्षी दिसतोय का बघत होते, कोणी कारवीचे फोटो काढण्यात गुंतला होता तर कोणी आजुबाजुच्या गवतामध्ये नाकतोड्यांव्यतिरीक्त अजुन काहि अतरंग(!) किटक दिसतोय का बघत होते..
असेच एकाच्या नजरेत एक वनस्पती दिसली.. तीच्या देठावर एक पांढरा बोळा दिसला.. प्रथमदर्शनी कोणालाही कापुसच वाटेल जसे ! तोच राजेशकडुन कळले की तो कापुस नसुन त्यात एक किटक आहे ज्याला "spitting bug" म्हणतात..
जो तोंडातुन द्रव सोडुन आपल्या भोवती हे पांढरे कवच तयार करतो !! खरच थक्क झालो ऐकुन कारण तो किटक जरासुद्धा नजरेस पडत नव्हता..
अशाप्रकारे आमची वाटचाल गोगलगायच्या गतीने चालु होती.. काय करणार, आजुबाजूस पाहत रहावे अशी गर्द झाडी होती.. पण आमच्यातल्या हितेशभाय ला लै घाई होती.. और कितना किलोमीटर डिस्टन्स है ?? असे सारखे चालु होते.. याउलट दोघे तर गोगलगाय तरी बरी इतके हळुवार चालत होते.. एक फोटो काढतोय नि एक वहीत नोंद करतोय.. !! दोघेही पदोपदी थांबुन आजुबाजुच्या जंगलात डोकावत होते.. एकेक फुलपाखरु, नाकतोडा यांच्यासाठी वेळ देत होते..
फुलपाखरांचे म्हणाल.. माझ्या ज्ञानात बरीच भर पडली.. "ओक लिफ" बटरफ्लाय जे आपले पंख बंद करुन बसल्यास ओक वृक्षाच्या पानाप्रमाणे भासते, "Blue Pansy" "Choclate Pansy" "Glassy Tiger" "Swift" इत्यादी बरिच नावे कानावर पडली.. मला तर "Great Orange Tip Butterfly" खुप आवडले.. 
बहुतांशी फुलपाखरे जोड्याने उडत होती.. त्यात ही नारिंगी फुलपाखरे आघाडीवर होती.. काही "mating" अवस्थेत होती.. तर काही आपाआपसात प्रेमाची देवाणघेवाण करीत होते..
फुलपाखरु नि पतंग यांतील फरकसुद्धा कळला.. पतंगाची ऍन्टीना सरळ असते तर फुलपाखरांच्या ऍन्टीनांची टोके थोडीशी वाकलेली असतात.. तसेच बसतान पतंग आपले पंख पसरुन बसतो.. बहुतांशी फुलपाखरांचे तसे नसते इत्यादी..
सभोवतालचे नयनरम्य दृश्य न्याहाळण्यात दंग झालो होतो तोच अगदि समोरुन वेगाने डोक्यावरुन काही तर उडत गेले.. आधी वाटले वटवाघुळचे पिल्लु असावे.. तोच राजेश ओरडला " See that Blue Mormon " सर्वात मोठ्या फुलापाखरांपैकी एक जात.. पंख्याच्या कडांना आकर्षक अशा निळ्या रंगाचा लेप असतो त्यांना.. पहिल्यांदाच इतके मोठे फुलपाखरु पाहवयास मिळाले.. अशा अनेक जीवांची तोंडओळ्ख करत आम्ही पुढे चालत होतो..
एव्हाना जंगलाच्या मध्यभागी आलो होतो.. जंगली कावळ्यांचा आवाज कमी होउन आता विविध पक्षुपक्ष्यांची गुंज कानी पडत होती..
पण सर्वात मोठे आकर्षण नि ज्याचे हे राज्य तो बिबट्या काही नजरेस पडला नव्हता.. !!
खरच प्रत्यक्षात पहायची खुप इच्छा होती.. भले मग आपली घाबरगुंडी उडाली तरी चालेल.. तशी इच्छा पण मी सर्वांना बोलुन दाखवली. पण आमचा बोलण्याचा आवाज, वाटेत असणार्या सुकलेल्या पानांचा पायाखाली आल्याने होणारा "क्रॅssप क्रॅssप"आवाज या गोष्टींमुळे काही शक्य नव्हते.. तसे वाटेत मध्ये मध्ये जनावरांसाठी पिण्यासाठी डबके तयार केलेली नजरेस पडत होती.. काही वेळाने आमच्या रस्त्याला लागुन एक पाण्याची पाइपलाइन्(मुंबईस पुरवठा करणार्या जलवाहिनींपैकी एक) लागली.. त्यादिशेने जंगलात राजेश गेला नि आम्हाला बोलावुन घेतले.. निमित्त होते ती बिबट्या कंपनीच्या पावलांचे ठसे होते... नर, मादी नि पिल्लु यांचे.. दोन तीन तासापुर्वीचे असतील असा त्याने अंदाज लावला.. अरेरे ! मिस केले असे उद्गार निघालेच.. आकृती नाही निदान पावलांचे ठसे तरी.. यातच समाधान..
"चलो अभी यहासे निकलना जरुरी है.. हम खतरे के इलाके मे है.." राजेश म्हणाला.. त्या पाइपलाइनपासुन आणखी एक पाउलवाट नी एक छोटा पाइप त्या गर्द झाडीत जात होता.. तिथे उंगलीदर्शन करत त्याने सांगितले "यहा दो चीज का खतरा.. एक तो ये जनावर और दुसरे वो लोग जिनकी अंदर दारुभट्टी है.. लुटमार का डर ज्यादा रहेता है इस इलाके मे"
काही उपाय नाही का हे धंदे थांबवायला तर म्हणे " दोनदा पाडुन झाली ती भट्टी.. तक्रार नोंदवुन झाल्या.. पण अजुन त्यांचे धंदे चालुच आहेत" हम्मम नक्कीच काहितरी झोल आहे समजुन आम्ही लागलीच त्या क्षेत्रातुन बाहेर पडलो नि पुढे वाटचाल केली..
काहि अंतरावरच एक छोटुसा बगिचा लागला..

विविध छोट्या वनस्पतींची रेलचेल होती तिथे.. देखभाल करायला फक्त एकच म्हातारी बाई असते !!! बापरे !
तिकडेच एका झोपडीखाली आम्ही ठाण मांडले नि खाण्याचे डबे उघडले.. एव्हाना किती तंगडतोड झाली याची कल्पना नव्हती.. अन्नग्रहण होताच काहिजण आडवे झाले.. चक्क घोरु लागले !!!
अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर lets go back असे राजेश म्हणाला.. कायद्याने म्हणाल तर आम्हाला इथपर्यंतच (विहार रोड) परवानगी असल्याचे राजेशने सांगितले.. पण इथपर्यंत आलोय तर तुलसी विहार का सोडा म्हणुन आम्ही सर्वांनी आग्रह धरला.. नि त्या परवानगीला खिशात गुंडाळुन अजुन पुढे चालु लागलो..
गर्द झाडी थोडीफार मागे पडत चालली होती.. हवेची झुळुक अधुन मधुन येत होती.. वाटेत विविध जीव आपापले तोंडओळख करुन देत होते.. सरडे, बेडुक, नाकतोडे, कोळी.. त्यात "Signature Spidy" ने लक्ष वेधुन घेतले.. नुसते जाळे विणुन हा कोळी थांबत नाही; तर स्वता:ची Sign मारतो !!


व्वा.. काय कला आहे त्या कोळीची..
हळुहळु डोक्यावरील झाडांचे छप्पर बाजुला सरले.. हवेचा जोर वाढला.. नि काहि क्षणातच एक टाळे लावलेला गेट नजरेस पडला.. बाजुला दोन तीन सुचनाफलक उभे होते.. पण तिकडे बघतयं कोण.. कारण त्यांच्यामागे समुद्रासारखा भासणारा भव्य तलाव आमच्या नजरेस पडला होता.. लगेच गेटवरुन उड्या मारुन आम्हि पलिकडे गेलो.. पण काठावर जाणार तोच राजेशने मनाई केली.. सुचना दिली की मगर कधी बाहेर येउन गेम करेल कळणार नाही.. फोटोसुद्धा काढु नका.. बंदी आहे.. ही BMC ची हद्द आहे.. फक्त वियापी लोकच इथे येउ शकतात.. कुणी आले तर कदाचित भुर्दंड भोगावा लागेल.. जणु काही हा ते सुचनाफलक वाचून दाखवत होता.. 
लगेच दुर्बिण घेउन त्याने पलिकडील जंगलात लपलेला भुतबंगला बघण्यास सांगितले.. ज्या ब्रिटीशाने हा तलाव बांधला तो या बंगल्यात तलावाचे काम सुरु असताना राहत होता.. भूताचा संदर्भ कुठुन आला ते काहि कळले नाही.. डोंगरात लपुन असलेला हा तलाव नजरेसमोर पाहुन खुप छान वाटले..
नाही नाही म्हणता आम्ही फोटो घेतलेच..
थोडी ना पाणी दुषित होणार होते..

पण तिकडुन लौकर पळ काढला.. उगीच कोण आले तर लफडा नको म्हणुन... काही क्षण का होईना पण त्या तलावाचे रुप पाहुन थकवा मात्र दुर झाला.. नि आम्ही परतीची वाट धरली.. पुन्हा जंगल तुडवण्यास सुरवात केली..
पुनश्च क्षणभर विश्रांतीसाठी एका ओहोळ पाशी थांबलो.. त्या शांततेत वाहत्या पाण्याचे मंजुळ संगीत फारच मधुर वाटले.. डोळा लागण्यासाठी हमखास ठिकाण होते.. नि डोळा लागलाच तर स्वत:च शिकार होण्यासाठी पण योग्य ठिकाण होते..
कारण आजुबाजुस नजरेस पडणारे जनावरांचे ठसेच ते सुचवित होते..
परतीच्या वाटेवर असताना एकाने फुलपाखरु दाखवले.. glassy tiger होते.. एकाने कॅमेरा पुढे आणला.. नि फोटोसेशन सुरु झाले..पण ते फुलपाखरु चक्क समाधी लावुन बसले होते.. जवळ गेलो तरी उडेना. नंतर नीट पाहिले तेव्हा कळले त्या पाखराचे तोंड त्याच्या पंखापेक्षा आकाराने लहान असलेल्या कोळ्याच्या तावडीत होते..!!
म्हटले या कोळ्याला महिनाभर पुरेल हे खाणे..
चालता चालता अंदाजे १६ किमी चे अंतर कापत कापत आम्ही पुन्हा प्रवेशद्वाराजवळ आलो.. तोच एकाचे लक्ष स़काळी पाहिलेल्या Mantis वर गेले.. च्यामारी.. जरापण चलबिचल झाला नव्हता. तिच पोझ घेउन बसला होता.. फरक एवढाच की त्याने तोंडात फुलपाखरु कोंबले होते !! आमच्या ट्रेलचा समारोप या दृश्याने झाला याला काय म्हणावे..
नि त्या जंगलास मागे सोडुन आम्ही शहरी भागात प्रवेश केला.. पुन्हा जमल्यास भेटु म्हणुन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला..
एकीकडे या क्षेत्रात प्रवेश मिळवणे कठीण म्हणुन वनखात्याला शिव्या द्याव्याशा वाटत होत्या पण त्याचवेळी सामान्यांना जंगलापासुन दुर ठेवुन जंगल जंगलासारखेच ठेवलेय म्हणुन आभार मानावेसे वाटत होते.. पुन्हा कधी संधी मिळेल माहीत नाही पण या ट्रेलचा पुरेपुर आनंद घेता आल्याचे समाधान वाटले..
-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-
मस्त रे योग्या..
वा! छान माहितीपूर्ण लेख. फोटो पाहतांना मज्जा आली.
छान, आम्हालाही चांगली सहल झाली.
छान. तुमचा सगळ्यांचा नॅचरल ट्रेक आवडला.
ही सगळी फुलांची, फुलपाखरांची नावे कशी काय लक्षात राहिली, की फिरतांना वहीत नोंद करुन ठेवली होती?
कुठला फोटो कोणाचा हे नंतर आठवायला हवे ना.
तुमचा नेचर ट्रेल मस्तच..
मुंबईमधे वर्षानुवर्ष राहुन, ठरवुन कधीही असे नेचर ट्रेल केले नाहि. आतातरी करायला हव.
लेखात जल्ला जल्ला वाचुन ओळखीची खुण पटली.

लेख चांगला लिहिला आहेस.
फोटु जरा मोठे हवे होते रे. अजुन मजा आली असती.
लिन्क असेल तर दे.
योग्या, सुपर्ब रे एकदम!! वाचूनच एवढं छान वाटलं तर तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला काय सुरेख वाटलं असेल रे......
योग्या लय झ्याक...
जल्ला तुला तोंडी परिक्षे पेक्षा लेखी परिक्षेत जास्त गुण मिळतात का रे?
प्रवासवर्णनाच्या माझ्या पहिल्या प्रयत्नाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार..




इंद्रा..
रुनी.. नोंदणीवही माज्याकडे नव्हती.. ज्या नावांचा इथे उल्लेख झाला आहे हे त्या जीवांच्या वैशिष्ट्यच तसे होते म्हणून राहीले लक्षात.. बाकी बरीच नावे आहेत त्यांचे उच्चारही जमत नाहीत.. अशा ट्रेल मध्ये जवळ वही असल्यास उत्तम !
झकासराव.. तुमच्या विनंतीस मान देउन..
कारवी..
सिग्नेचर स्पायडी..
:- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-
योग्या
यो, मस्त लिहील आहेस...