कलंगुट बीच

गोव्यातील कलंगुट बीच मुंबईच्या जुहू चौपाटीची आठवण करुन देतो. जुहू चौपाटी जशी माणसांनी गजबजलेली असते, तसाच कलंगुट बीच माणसांनी गजबजलेला बीच होय.
जुहू चौपाटीवर भारतीय माणसांची गर्दी तर कलंगुट बीचवर विदेशी पर्यटकांची गर्दी असते. कलंगुट बीचवर भारतीय पर्यटक, कलंगुट बीचचा आस्वाद घ्यायला येतात की विदेशी पर्यटकांना पाहण्यासाठी येतात हा एक संशोधनाचाच विषय ठरू शकेल. मला मात्र कलंगुट बीचवर प्रत्येक वेळेस भारतीय पर्यटक व विदेशी पर्यटक यांचा मेळ घालणे काही शक्य झाले नाही. कलंगुट बीचवरील संपूर्ण वातावरण हे विदेशी वाटल्यावाचून राहत नाही. कलंगुट बीचवर एक एक महिना ठाण मांडून बसणारे विदेशी पर्यटक. या विदेशी पर्यटकांचा दिवस बीचवर सुरू होतो व बीचवरच मावळतो. विदेशी पर्यटक मालिश करुन घेणे,रेतीवर अंग तापविणे आणि समुद्रात डुबकी मारणे असा तिहेरी कार्यक्रम करीत भारतीय पर्यटकांच्या नजरा झेलत 'तुम्ही काहीही म्हणा,आम्ही आहोतच असे.' असे मिस्किल नजरेने सांगत असतात,असे वाटल्यावाचून राहत नाही. दरवर्षी गोव्याला येणार्‍या विदेशी पर्यटकांना भारतीय नजरांची चांगलीच ओळख झालेली दिसते. कलंगुट बीचवर भारतीय नजरा व विदेशी नजरा यांचं अद्श्य युध्द मला प्रत्येक वेळेस पाहायला मिळाले आहे.

कलंगुट बीच हा दूरपर्यंत पसरलेला आहे. या बीचवर मनमुराद रेतीचा गुदगुल्या
करणारा मुलायम स्पर्श अनुभवता येतो.रेतीसोबत पायांना हळूवारपणे लपेटणारी पाण्याची लाट अथांग पसरणार्‍या समुद्राकडे खेचत असते.क्षणभरापूर्वी रेतीवर आपला ह्क्क आहे, असे सांगून गेलेली लाट,मी पुन्हा येईन असेच तर सांगून जात नाही ना? रेतीवर आपला ठसा उमटवून निघून गेलेली लाट मागे शंख,शिपले असे बरेच काही रेतीवरच सोपवून जात असते. रेती आणि पाणी यांचे मिलन पाहत दिवस केव्हा मावळतो ते कळतच नाही. कलंगुट बीच प्रत्येक वेळेस वेगवेगळी वैशिष्टय घेऊन आपल्यापुढे उभा ठाकतो. हजार रुपये खर्च करण्याची तयारी असेल तर पॅराशूटच्या साह्याने आकाशातून कलंगुट बीचचे सौंदर्य न्याहाळण्याची मौज अनुभवता येते. नाहीतर मोटर बोटवर स्वार
होऊन समुद्राच्या लाटांवर स्वार होण्याचे साहस करता येते. आकाश, पाणी, जमीन अशा तीन्ही माध्यमातून कलंगुट बीचचे सौंदर्य पर्यटकांना उपभोगता येते.
जुहू चौपाटीवर भेळ्पुरी,पाणीपुरी खाणार्‍यांची गर्दी तर कलंगुट बीचवर बिअरच्या व कोल्ड्रींक्सच्या बाटल्या हातात घेतलेल्यांची गर्दी. कलंगुट बीचच्या विदेशी वातावरणातून
बाहेर पडायचे असेल तर मीरामार बीच गाठणे आवश्यक असते.


अतीशय सुंदर असा हा कलंगूट बीच लोकांनी नी मुन्सीपालटीने सुद्धा घाण केलाय. लोकांनी त्याच्या घाण इथे तिथे टाकून, परदेशीयानी नंगे नाच करून नी सरकरनी विशेष कारवाई न करता दुर्लक्षीत करून.........