नदी

Submitted by छाया देसाई on 7 October, 2008 - 07:03

मी नितांत सुंदर मंगल पात्र नदीचे
का मला लागले वेड सागराचे ,सागराचे

मी हीमनग कन्या ,जरी अनन्या
शिव शिरी शोभे ,अशी सुकन्या
शिवा सोडुनी भवा भजत का
अर्ध्य अमृताचे ,अमृताचे

मी चैतन्याचा ओघ सुपात्री
सुपीक धरेच्या कोमल गात्री
का शांत निरामय मधुर जीवनी
स्वप्न अर्णवाचे ,अर्णवाचे

आल्हाद तरंगाचा अनुभवता
खळाळणारा सुवेग जपता
जपत तिरांच्या मर्यादा का
वेध अमर्यादाचे
छाया देसाई

गुलमोहर: 

सुंदर शब्द.... छानय छायाताई.
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

छानच. फक्त भावेबाई म्हणतात तसं शुद्धलेखन जपायला हवं.

छाया
धन्यवाद दाद
धन्यवाद कौतुक सूचना मान्य

सुंदर कविता...आवडली..:)

छान आहे कविता
मन्गल,-- तरन्गाचा, लिहिल्याने रसभंग झाल्यासारखा वाटतो,
mMgala मंगल असं लिहायचं,

शिवा सोडुनी भवा भजत का - हे आवडले.
कवितेत नदी हा शब्द आला नाही तर आणखी छान वाटेल.
'सुकन्या, सुपात्री, सुवेग' नदीने स्वत:चेच इतके कौतुक करू नये.
सागराचे, अमृताचे , अर्णवाचे यांच्या द्विरुक्तीचे प्रयोजन कळले नाही.

भरत ,देव प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
भरत ,या कवितेत नदी असा विचार करते आहे की मी अशी अशी आहे तर मला अस अस का वाटत ?
मग ती कशी कशी आहे ,तर ,सुंदर ,मंगल ,सुकन्या वगैरे वगैरे येण स्वाभावीक आहे .कविता ,नदीच आत्मकथन असल्याने पहिल्याच ओळीत ती ,मी ''नदी ''अशी ओऴख देण गरजेच आहे .ही कविता गात गात सुचली त्यामुळे केवळ गीताची गरज म्हणून काही शब्दांची द्विरुक्ती आहे ,त्यामुळे कवितेला छान नाद जाणवला म्हणून ती तशीच ठेवली .माझी फार जुनी कविता रस घेवून वाचल्याबद्दल विशेष धन्यवाद .

छान आहे कविता !
मी नितांत सुंदर मंगल पात्र नदीचे
वरील वाक्य आता अतिश्योक्तीपुर्ण वाटते, कारण जवळपास सर्व नद्या या प्रदुषित झाल्या आहेत,कितीतरी नद्यांच पाणी पिण्यास योग्य राहीलेल नाही, बेसुमार वाळु उपसा तर चालुच आहे ...२०-२५ वर्षापुर्वी देखील नद्या खूप स्वच्छ होत्या !

सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद .अनिल तुमच म्हणण बरोबर आहे पण ही कविता लिहिली तेव्हा माझ्या
डोळ्यासमोर मी १९८३ मध्ये पाहिलेली गंगा नदी होती .