एक संध्याकाळ ...

Submitted by परागकण on 6 October, 2008 - 11:07

संध्याकाळी दारापुढे
सैलावलेला मेपल,
त्याच्या फांद्यांमधून रेंगाळणारं आळसावलेलं ऊन,
आणि सवयीनुसार पारावर विसावलेला मी.

नव्यानेच तिघांची ओळख झाली
'तुमचं कसं - आमचं कसं?'
नेहमीचेच नमस्कार-चमत्कार
घडीव शब्दाळ सोपस्कार

शब्द सरले तेव्हा मैत्र जडलं,
क्षणांत आभाळाचा झाला कॅन्व्हस
अन तिघांनी मिळून रेखाटलं
एक केशरी चित्र .... उद्याचं !

ते चित्र डोळ्यात साठवून
मेपल डोलू लागला वार्‍याच्या शीळ-मारव्यावर,
ऊन अलगद उतरलं क्षितिजापल्याड
अन मी वितळत गेलो रात्रीच्या आश्वासक अंधारात ...

'येतो' म्हणण्याचं भान कुणालाच उरलं नाही,
तशी गरजही उरली नाही.

गुलमोहर: 

क्या बात है.. ,मजा आला रे.. Happy
- अनिलभाई

ते तिघं आणि तू चौथा... interesting.

    ***
    Cole's Law : Thinly sliced cabbage salad rules.

    "घडीव शब्दाळ सोपस्कार" ..
    आणि " मी वितळत गेलो रात्रीच्या अ`न्धारात"
    मस्त रे....
    यतीन

    मस्त . जमलीये मैफल आणि चित्रही.. Happy
    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    अजिबात नाही आवडली. फक्त शब्दांची फेक काय कामाची. आशय बिशय काहीच नाही.. Sad घनघोर निराशा केली रे.. Sad आणि कवितेचा आकृतीबंध एकदम वेडावाकडा झाला आहे.

    धन्यवाद मंडळी!

    Bee: अरे असाच एखाद्या संध्याकाळी एकटा एखाद्या पारावर बसून बघ. मजा असते त्यातही. हे एक शब्दचित्र आहे. काही गहनघोर आशय सांगायचा प्रयत्नच केलेला नाही. असो. तुझं प्रामाणिक मत सांगितलंस त्याबद्दल आभार.

    परागकण

    पराग फक्त काही कण.......... आशावादी चित्र .... व यात आशय आहे बर्का.
    'येतो' म्हणण्याचं भान कुणालाच उरलं नाही,
    तशी गरजही उरली नाही.

    शोधणार्‍याला सापडेल तो..... असं मला वाटत.

    पीक्या आता तू म्हान जाला रे!!
    विदर्भातून यवडी टिका झाली ना भावा! Happy

    परत एकदा.. पीक्या तुझी कविता म्हणजे एक अस्सल अनुभव आहे.

    बाकी चिरफाडूंसाठी आपल्या जयाच्या(पेशवा) कवितेतल्या काही ओळी..

    "हिंदाळणारा एक थेंबही जर
    नसेल तुमच्या शरीरपेल्यात
    तर दारावर पावसाला बोलावू नका
    तुम्हाला भिजणे जमणार नाही
    त्याहूनही गडद ते उमगणार नाही...."
    --पेशवा

    -नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home

    मेपल डोलू लागला वार्‍याच्या शीळ-मारव्यावर,>>>किती छान!
    मस्तच...

    नी,
    तु टाकलेल्या ओळी जबरदस्त.
    अगदी मनसे ने केलेल्या आंदोलनासारख्या बेधडक. Happy

    शब्दातीत सुंदर अनुभूती..

    मस्त रे मस्त... आहा काय संध्याकाळ उभी केली आहे. वाह... मेपल च्या खाली मी कधी बसलो नाही... पण कोणतही झाड, त्याचा पार.. उतरणारी रंगीत संध्याकाळ आणि एकांत.
    बस्स हे असच घडत... केशर उतरवल आहेस, आणि तु परत आला आहेस.

    तू काढलेल्या फोटोत हा सुप्रिम आहे... Happy

    तू काढलेल्या फोटोत हा सुप्रिम आहे...>>>>> Happy आवडली दाद!

    धन्यवाद मंडळी!

    परागकण

    पिक्या जबरदस्त उच्च..केवळ आणि बरच काही...
    अक्षरशः जगले मी ती संध्याकाळ!
    मेपल डोलू लागला वार्‍याच्या शीळ-मारव्यावर,
    अन मी वितळत गेलो रात्रीच्या आश्वासक अंधारात ...

    किती सहज सुंदर अलवार!

    अन मी वितळत गेलो रात्रीच्या आश्वासक अंधारात>>>> ओहो !क्या बात है ! Happy