कताई शास्त्र २

Submitted by बापूमामा on 21 September, 2012 - 14:08

सुताचे परत ढोबळमानाने दोन प्रकार आहेत.
१) तंतूंना पीळ देऊन केलेले सूत ( स्पन यार्न) , २) सलग तंतू ( फिलॅमेंट यार्न)
यातील स्पन यार्न जास्त प्रचलित आहे, कारण छोट्या छोट्या तंतूंना दिलेल्या पिळात हवेच्या पोकळ्या असतात त्यामुळे परिधान करणाऱ्यास
सुखद वाटते.
कापसापासून निर्मित वस्त्रे देशात तसेच विदेशात जास्त लोकप्रिय आहेत कारण कापसाप्रमाणे गुणधर्म असलेला कोणताही तंतू किंवा कापसाला अद्याप पर्याय मिळालेला नाही. त्यामुळेच कापसाला वस्त्रांचा राजा (King of Textiles) असे संबोधले जाते.
आपण मुख्यत्वे कापसाच्या कताईची माहिती घेऊ.
सूत निर्मितीत कापसाच्या प्रतीचा सिंहाचा म्हणजे जवळजवळ ८०% वाटा असतो. म्हणून उत्तम किंवा गरजेप्रमाणे कापसाची निवड करणे
अत्यंत महत्त्वाचे असते. येथे मी गरजेप्रमाणे असे मुद्दाम नमूद करतो, कारण सुताची तलमता (जाडी) ही प्रत्येक उपयोगासाठी वेगळी असते.
जसे चादरीसाठीचे सुत हे पातळासाठी अथवा धोतरांसाठी वापरले जात नाही. तेथे तलम किंवा बारीकच सुत लागेल.
दोन्ही सुतांच्या निर्मिती साठी लागणारा कापूस वेगळा वेगळा लागेल. जाड सुताच्या निर्मितीसाठी आखूड लांबीचा कापूस तर बारीक /पातळ/तलम सुताच्या निर्मितीस लांब धाग्याचा कापूस लागेल. आखूड कापसापासून केलेले तलम सुत प्रतीत डावे असेल. तर लांब धाग्याचा कापूस महाग असल्याने तो जाड सुतासाठी वापरणे व्यवहार्य ठरणार नाही.
कापूस हे एक नगदी पीक आहे. उत्तम कापसासाठी काळी , पाण्याचा निचरा होणारी जमीन, चांगले सिंचन/पाऊस, स्वच्छ सूर्यप्रकाश, चांगले
बियाणे, खते, कीटकनाशके, इत्यादी आवश्यक गोष्टी आहेत. वरील पैकी जर एखाद्या बाबीत कमतरता असल्यास कापसाचे तंतू अपरिपक्व
राहतील (immature).
कापसाचे चयन करताना त्याची लांबी (length), बल (strength), परिपक्वता (maturity),तलमता (fineness),कचऱ्याचे प्रमाण(trash%), रंगाची प्रत(colour grade) ह्यांचा आपल्या गरजेशी मेळ घालावा लागतो.
सुताचे यंत्रांच्या पद्धतीनुसार व अर्थात गरजेनुसार परत प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.
१) कार्डेड २) कोंब्ड ३) ओपन एंड.
१) कार्डेड यार्न : यामध्ये कोंब्ड सिस्टिम पेक्षा कमी यंत्रसामग्री लागते व ह्यात वाया जाणारा कापूसही कमी असतो. परंतु ह्याची प्रत कोंब्ड सुताच्या
पेक्षा कमी दर्जाची असते.
२) कोंब्ड यार्न : ह्या पद्धतीमध्ये यंत्रसामग्री कार्डेड पेक्षा जास्त व वाया जाणारा कापूसही जास्त असतो. पर्यायाने लागणारे मनुष्यबळ व ऊर्जा ही
जास्त लागते. परंतू सुताची प्रत अत्यंत उच्च दर्जाची असते. विशेषतः निटेड कापडासाठी ( बनियन, होजियरी ) वापरले जाते. कारण ह्यामध्ये
अनावश्यक व उपद्रवी आखूड तंतू काढून कताई केल्याने , ह्या धाग्याला पीळ कमी दिला तरी चालतो व त्यामुळे हवेच्या पोकळ्या जास्त राहतात
तसेच सर्व लांब तंतू व ते ही एकमेकांना जास्त समांतर राहिल्याने कपड्याचा मुलायमपणा व लकाकी वाढते.
३) ओपन एंड यार्न : ह्यामध्ये प्रामुख्याने जाड सुताची निर्मिती होते, परंतू ते ताकतीला व प्रतीत थोडेसे कमी असते.
तसेच ह्यामध्ये कमी यंत्रसामग्री , व पर्यायाने कमी मनुष्यबळ व ऊर्जा लागते.
वरील तिन्ही कापूस कताई पद्धतींमधील होणाऱ्या प्रक्रियांचा फ्लो चार्ट खाली देत आहे.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users