कताई शास्त्र १

Submitted by बापूमामा on 21 September, 2012 - 14:01

अन्न ,कपडा, व निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पैकी अन्ननिर्मिती ( कृषी तंत्रज्ञान), व गृह अभियांत्रिकी वर बरीच माहिती मराठीत उपलब्ध आहे . परंतु वस्त्रनिर्मिती शास्त्राबद्दल तितकीशी उपलब्ध नाही. कदाचित हे शास्त्र थोडेसे किचकट व फारच लांबलचक प्रक्रियांचे आहे, त्यामुळे असेल.

या लेखात संपूर्ण वस्त्रनिर्मितीचा थोडक्यात आढावा घेउन आपण त्यातील एका मुख्य प्रक्रियेची म्हणजेच सुत निर्मितिची माहिती घेवू.

वस्त्रे तीन प्रकारांनी बनविली जातात -

१)मागावर विणलेले (वोव्हन) उदाहरणार्थ शर्टिंग, सुटींग, चादरी, पातळे, धोतरे इत्यादी.
२) सुयांनी विणलेले ( निटेड) उदाहरणार्थ बनियन, अंडर गार्मेंटस, स्वेटर, मोजे, इत्यादी.
३) नॉन वोव्हन - हे तंत्र आधुनिक असून केमिकल बाँडींग, थर्मल बाँडींग द्वारे बनविलेले टिश्यू पेपर, रुमाल, इंडस्ट्रीयल फॅब्रिक इत्यादी उदाहरणे देता येतील.

वस्त्रे निर्माण करण्याच्या तंत्राप्रमाणेच त्या साठी वापरलेल्या कच्च्या माला वरून ( तंतू वरुन) परत तीन मुख्य प्रकार पडतात.

१) नैसर्गिक : ह्याचे दोन उपप्रकार आहेत
अ) वनस्पतीज - ह्यामध्ये कापूस, ताग( ज्युट), अंबाडी, वगैरे तंतू येतात
ब) प्राणिज - ह्यामध्ये रेशिम,लोकर, प्रामुख्याने येतात.

२) मानव निर्मित तंतू - नायलॉन, पॉलिएस्टर, ऍक्रॅलिक, ऍस्बेस्टॉस इत्यादी

३) पुनर्निमित तंतू - रेयॉन, विस्कोज इत्यादी.

वरील सर्व तंतूंच्या प्रकारात कापूस हा सर्वाधिक लोकप्रिय व वापराचा आहे. कारण कापसात वातानुकूलन व शोषकता हे गुणधर्म आहेत
ज्या मुळे सुती कापड हे हिवाळ्यात उब देते ( चादरी हे या संदर्भात उत्तम उदाहरण) , तर उन्हाळ्यात थंडावा ( उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण डोक्यांस रुमाल , टोपी, गमछे, फेटे बांधतो.

सुती कपडा घाम शोषून घेतो, त्यामुळे आपल्याला आर्द्र हवेत ( पावसाळ्यात) खुपच आरामदायी वाटतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users