केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि... [२]

Submitted by मी-भास्कर on 16 September, 2012 - 06:43

केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि..[२]
छोटा सुमो आता अण्णा-सुमो नसून केजरीवाल-सुमो आहे.

अण्णा आणि केजरीवाल , तुमच्या प्रत्येकासमोर आता असे १०० अगडबंब सुमो कुस्तीसाठी उभे आहेत. आणि ते तुमच्याकडे या चित्रातील सूमोप्रमाणेच 'बच्चा है' अशा आविर्भावात पाहाताहेत हे नक्की.
केजरीवाल, तुम्ही राजकारणात उतरण्याचे ठरविल्यापासून तुमच्याकडे तर ते अधिक निर्विकारपणे पाहाताहेत, कारण तुम्ही त्यांना हव्या असलेल्या जागी कुस्तीसाठी आपणहून गेलेले आहात.
Anna and corruption.jpgवरील चित्रातील बच्चा-सुमो म्हणजे केजरीवाल

आता
आदरणीय केजरीवालजी [अण्णाजीं ऐवजी ],
सप्रेम नमस्कार.
आपण आपल्या नव्या टीमसह आंदोलनाची तयारी केल्याचे वाचले [१६-९-१२]. त्यात नव्या टीममधील ज्येष्ठांवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी टाकली जाणार आहे हा एक नवा उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचे दिसते. ज्येष्ठांची जी कांही नावे बातमीत आहेत तीही आशादायक आहेत. फक्त ती कायम टिकोत म्हणजे झाले.
माझ्या तसेच लाखो लोकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच.
माझा फक्त इतकाच आग्रह आहे की आंदोलनाचे लक्ष्य केवळ 'भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई' एवढेच असावे.
त्या लढाईत लिंग, पक्ष, व्यक्ती, धर्म, जात, मागास, गरीब, श्रीमंत, सेक्युलर, जातीयवादी, संघ, सेवादल असले मुद्दे घुसडू पाहाणार्‍यांना ठणकावून सांगावे की भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत जो कोणी मनापासून साथ देईल त्या सर्वांचा पाठींबा आम्ही घेऊ.
याचे कारण भ्रष्टाचार कोठलाही भेदभाव न करता सर्वांनाच पिडतो.
-- मी-भास्कर
[पुढील प्रगति]
दि.म.बा.('दिव्य मराठी'-बातमी :१९-९-१२): अण्णा समाजकारणात राहाणार. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था हे ध्येय समोर ठेऊन केजरीवालांना योग्य वाटेल त्या मार्गाने जाण्याचा सल्ला. पुन्यातल्या बैठकीला माधव गाडगीळ, नरेंद्र दाभोळकर, धर्माधिकारी, विश्वंभर चौधरी उपस्थित होते. जनजागरणासाठी अण्णा देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार.

२८ सप्टेंबर २०१२
अण्णा, जनजागरणासाठी आपण देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार असे कळते.
महाराष्ट्राचे एक चीफ इंजिनियर श्री पांढरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे लवासाप्रमाणे उडून जाण्याची शक्यता दिसत असतांना या वयात तुम्ही देशभर प्रवासाला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच ठाण मांडून बसणे आवश्यक दिसते. इथेच १०० पेक्षा जास्त सुमो तुमच्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यांचा समाचार घेण्यासाठीच तुमची शक्ति तुम्ही राखून ठेवायला हवी.
४ ऑक्टोबर २०१२:
२ ऑक्टोबर २०१२ या गांधीजयंतिच्या मुहूर्तावर केजरीवालांनि नवा पक्ष काढून निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्याचे 'आम आदमी'ची टोपी घालून ठरविले. इरादे तर प्रामाणिक दिसतात पण या आखाड्यात त्यांना धोबीपछाड बसण्याची शक्यताच अधिक. त्यांना शुभेच्छा तर देऊयात.
मिडिया भासविते तशि मनोमन फूट अण्णा आणि केजरीवाल यांच्यामध्ये पडलि नसल्याचे अण्णांच्या वक्तव्यांमुळे जाणवले. लढाईच्या दृष्टीने हे एक सुदैवच म्हणायचे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्तापक्षाचे जणु प्रवक्तेच अशा कुमार केतकरांचा पेपर आहे तो. आवडेल तुला.
तुझ्या दृष्टीने स्टँदर्ड पेपर कुठले? बातम्या दडपणारे?

आमच्याकडे येत नाही. आजच नेटावर पाहिला... राण्यानी पेपर काढला तिथं केतकरांचं पेपर निघालं तर आश्चर्य कसलं??

काल चॅनेलवर होते . कालच राळेगणला बैठक झाली. निर्णय नेहमीप्रमाणे विनोदी आहेत. महाराष्ट्रातल्या नरेन्द्र दाभोळकर सारख्या मिशनरी वृतीने अं नि स व बालसाहित्य, साधना मध्ये काम करणार्या व्यक्तीस टीम मध्ये येण्याचे आवाहन केले आहे (बाकीचेही मान्यवर आहेत). म्हनजे त्यांनी यांच्या मचमचीत सामील होऊन स्वतःच्या कामाचा कार्यनाश तर करावयाचाच वर आणखी बदनामीही करून घ्यायची. गंमत म्हणजे ही पुढची बैठक दिल्लीला ठेवलीय म्हणजे दाभोळकरानी(व इतरानीही) स्वखरचाने विमानाने दिल्लीला जायचे अन यायचे . दाभोळकरांकडे यांच्यासारखे लठ्ठ ट्रस्ट आहेत काय खर्च करायला?

अं नि स मध्ये कार्य करतात. म्हणून त्यानी भ्रष्टाचाराविरुद्धही लढायचे, तेही स्वखर्चाने ... गंमतच .... आणि यांच्या टीममधले इतर रिकामटेकडे लोक काय करणार?? बडबड आणि कार्टून काढत फिरणार. छान

अण्णा किरीट सोमय्यांना का बरं घेत नसावेत टीममध्ये? (किंवा किरीट (जी)का जात नाहीत या पवित्र कार्यात?)... किरीट(जीं) चे मिशन आणि टीमचे मिशन एकच आहे ना?

अं नि स मध्ये कार्य करतात. म्हणून त्यानी भ्रष्टाचाराविरुद्धही लढायचे, तेही स्वखर्चाने>>>>>> ते काय राजकिय नेते आहेत का मग, तुमच्या आणी माझ्या टैक्सच्या पैशाचा उपयोग करुन स्वतःचा संडास पंचतारांकित करुन घ्यायला!.

दि.म.बा.('दिव्य मराठी'-बातमी): अण्णा समाजकारणात राहाणार. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था हे ध्येय समोर ठेऊन केजरीवालांना योग्य वाटेल त्या मार्गाने जाण्याचा सल्ला. पुन्यातल्या बैठकीला दाभोळकर, धर्माधिकारी, चौधरी उपस्थित होते. जनजागरणासाठी अण्णा देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार.

शेवटी राजकारणात न जाता कांहीतरी दिशा ठरली हे बरे झाले.

शेळीताई, दिव्य मराठी हे दैनिक भास्कर गोटातले मराठी वर्तमानपत्र आहे. त्यांच्या संकेतस्थळावरील दाव्यानुसार तो भारतातला सर्वाधिक वाचकसंख्येचा वृत्तपत्रसमूह आहे. इंग्रजीतील डीएनए हेही त्यांचेच.

दैनिक भास्कर गोट ...... म्हणूनच भास्कररावांचे आवडते आहे.. ( पण 'गोट' असूनही शेळेला मात्र माहीत नाही. Proud )

आजचा दिव्य मराठी मधला अग्रलेख >>>>>>

फळीतील दुफळी (अग्रलेख)

अण्णांच्या फळीत दुफळी माजली आहे. ते अपेक्षितच होते. त्यांच्या आंदोलनात काही आदर्शवादी, तर काही अराजकवादी; काही भाबडे, तर काही डँबिस, काही स्वयंभू शहाणे, तर काही मूर्ख, काही भणंग -भटके, तर काही उडाणटप्पू, काही महत्त्वाकांक्षी, तर काही दिशाहीन आणि काही संघवाले, तर काही समाजवादी सामील झाले होते. बाजारबुणगे तर आपल्या देशात सर्वच आंदोलनांमध्ये असतात. ‘टीम अण्णा’ या नावाने ओळखली जाणारी फळी ही अशा विविध प्रवृत्तींनी आणि स्वभाववैशिष्ट्यांनी काहीशी आकस्मिकपणे उभी राहिली होती. अण्णांचे कार्य राळेगणसिद्धीपासून प्रकाशझोतात आले होते आणि त्या ठिकाणच्या शेतीविषयक व पर्यावरण क्षेत्रात जे काम झाले त्यामुळे त्या कामाभोवती एक वलय निर्माण झाले होते. अण्णांचे नेतृत्व व सूत्रसंचालन असले तरी राळेगणसिद्धीचा प्रयोग सरकारी नोकरशाहीच्या सहभागाशिवाय आणि आर्थिक मदतीशिवाय यशस्वी झाला नसता. अण्णांची कार्यशैली काहीशी फकिरी आणि बरीचशी आत्मनिष्ठ. त्यांच्या नि:स्पृहपणाविषयी गाजावाजा झाला तो त्यांच्या बिन-संसारी आणि साध्या जीवनशैलीमुळे. परंतु या फकिरी, स्वयंभू कार्यकर्ता-नेत्याचा एकदम राष्ट्रीय (आणि आंतरराष्ट्रीय) संत झाला तो गेल्या वर्षी. अण्णांनी जेव्हा भ्रष्टाचारविरोधी आंदोलन देशव्यापी करायचे ठरवले तेव्हा त्यांनाही कल्पना नव्हती की सर्व मीडिया; विशेषत: टीव्ही चॅनल्स ते अगदी ‘टाइम’ आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ त्या आंदोलनाची ओतप्रोत दखल घेतील. देशातील वातावरण भ्रष्टाचारविरोधाचे होते आणि सर्वच राजकारणी भ्रष्टाचारी असतात ही समजूतही समाजात रुजलेली होती. बहुतेक राजकारणी ज्या वेगाने संपत्ती जमा करत होते आणि त्या संपत्तीच्या जोरावर पुन्हा सत्ता, त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा संताप वाढत होता. सरकारी कचेरीतील कारकुनापासून ते आयएएस अधिका-यांपर्यंतही एक भ्रष्टाचाराची साखळी असल्याचे लोकांना दिसत होते. तो सर्व क्षोभ सुरुवातीला अण्णांच्या आंदोलनातून व्यक्त झाला. अण्णांच्या ‘नि:पक्षपाती’ आंदोलनाची नेपथ्यरचना करणा-यांमध्ये तसे संघ परिवाराचे कार्यकर्ते घुसले होते आणि काही समाजवादीही; पण ते त्यांच्या पक्षाचा अधिकृत झेंडा घेऊन नव्हे. त्यामुळे वरून बिन-राजकीय दिसणारी चळवळ आतून राजकीय दृष्टीने पोखरली जात होतीच. अण्णांची गेल्या वर्षीची चळवळ सुरू होण्यापूर्वीच म्हणजे 2010च्या मध्यालाच (यूपीए-2 चे सरकार आल्यानंतर वर्षभरातच) भ्रष्टाचाराच्या भानगडी प्रकाशात येऊ लागल्या होत्या. ‘कॉमनवेल्थ गेम्स’, ‘आदर्श घोटाळा’ इत्यादी भानगडी वृत्तपत्रांत व टीव्हीवर झळकू लागल्यानंतर 5 एप्रिल 2011 रोजी अण्णांचे ‘दिल्लीस्थित’ आंदोलन सुरू झाले. त्या उपोषणाची तयारी करण्यात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ची तमाम ‘टीम’ होती. किंबहुना तोपर्यंत अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणा-या सहका-यांना वा कार्यकर्त्यांना ‘टीम’ म्हणून संबोधले जात नसे. किरण बेदी, अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण यांची (खरे म्हणजे टोळी!) आंदोलनात ‘एंट्री’ झाल्यानंतर अण्णा आंदोलनाचे रूपच पालटले. उत्तर भारतीय सेलिब्रिटीज्चा सहभाग हा मीडियाला (विशेषत: इंग्रजी-हिंदी टीव्ही चॅनल्सना) खास भावणारा होता. जोपर्यंत अण्णा महाराष्ट्रात, मुंबईत आझाद मैदानावर वा राळेगणला उपोषण करायचे तोपर्यंत फक्त महाराष्ट्रातील वृत्तपत्रेच त्याची दखल घ्यायची. इलेक्ट्रॉनिक चॅनल्स (मुख्यत: मराठी) 2003मध्ये नव्हतेच. त्यामुळे अण्णांचे त्या वर्षीचे उपोषण गाजले ते महाराष्ट्रात. तेव्हा आझाद मैदानात अण्णांच्या समर्थनार्थ चार-पाचशे मंडळीही जमत नसत. तेव्हा त्यांचे प्रसिद्धी क्षेत्र मर्यादित होते; परंतु 2011च्या उपोषणाने अण्णांना एकदम ‘राष्ट्रीय पुरुष’ करून टाकले. ते करण्यासाठी लागणारी प्रसिद्धी योजना, नेपथ्यरचना, संघटना ही मुख्यत: केजरीवाल आणि कंपनीने आयोजित केलेली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या (वा अशा प्रकारच्या) आंदोलनासाठी रामदेवबाबा, एपीजे अब्दुल कलाम याही मंडळींची नावे चाचपून पाहिली होती; पण अण्णांचे समांतर प्रयत्न आणि ‘टीम’ अण्णा हे आपल्याला जास्त उपयोगी पडतील, हे दिसू लागल्यानंतर ते अण्णांच्या उपोषण-महोत्सवात सामील झाले. इलेक्ट्रॉनिक मीडियाला तर इतकी झिंग आली की, त्यांनी 24 तास ‘अण्णा एके अण्णा’ हाच मुख्य (करमणुकीचा) कार्यक्रम केला. कॉलेजमध्ये जाणारे हजारो तरुण अण्णांच्या त्या आंदोलनात बेभान होऊन सामील झाले - त्यात भ्रष्टाचारविरोधाचा भाबडा आदर्श होता आणि सेलिब्रिटी संस्कृतीमधला भंपकपणाही होता. मीडियाच्या त्या प्रचाराला सत्ताधारी तर घाबरलेच; पण लोकसभाच थिजल्यासारखी झाली आणि अण्णा म्हणजे ‘दुसरा महात्मा’ अशी भाषा सुरू झाली. एकापाठोपाठ एक ‘राष्ट्रपुरुष सन्मान’ त्यांना प्रदान केले जाऊ लागले. खुद्द पंतप्रधानांनी लोकसभेत उभे राहून अण्णांना मानाचा सलाम ठोकला. लोकसभेनेही एकमुखाने या नव्या (तोतया!) महात्म्याला अभिवादन केले. हे सर्व अण्णांच्या इतके डोक्यात गेले की त्यांनाही आपण ‘प्रेषित’ असल्याचा भास होऊ लागला. हा ‘प्रेषित’ मग बहकल्यासारखा सरकारला धमक्या देऊ लागला; लोकसभेला आदेश देऊ लागला; रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याच्या गर्जना करू लागला; ‘मैं अण्णा हूं’च्या टोप्या घातलेले तरुण कार्यकर्ते रामलीला मैदान व जंतरमंतर येथे धिंगाणा घालू लागले. अण्णांची ही महती सुरू झाली ती त्यांना अटक करण्याच्या फार्सनंतर. ती अटक केली गेली नसती तर त्या आंदोलनाची झिंग कदाचित पसरलीही नसती. परंतु मीडियाच्या जोरावर आणि केजरीवाल प्रभृतींच्या चलाख संघटन कौशल्याच्या आधारे ‘अण्णा’ नावाचे मिथक तयार झाले. आता ते मिथक भंगले आहे. त्यातील आदर्शवाद थोडाफार शिल्लक आहे; पण सर्वसामान्य माणसाला त्यातील पोकळपणा आणि (काँग्रेस व सोनियाविरोधी) राजकारण लक्षात आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी दिल्लीतील उपोषण मागे घेतले ते सक्रिय राजकारण करण्याची घोषणा करून. (जरी अण्णा स्वत: निवडणुकीत उभे राहणार नव्हते वा पक्ष काढणार नव्हते तरीही!) आता हीच घोषणा त्यांना भेडसावते आहे. केजरीवाल थेट राजकारणात येणार आहेत आणि अण्णा राजकारणाबाहेर राहून आंदोलन करणार आहेत. अण्णांच्या फळीतील दुफळी अखेर राजकारणामुळे पडली आहे. 1977 मध्ये जनता पक्ष स्थापण्यात जयप्रकाश नारायण यांचा पुढाकार होता. तसे काही तरी करून काँग्रेस आघाडीला खाली खेचायच्या प्रयत्नात विरोधी पक्ष होते. अण्णा हे त्यांनी तयार केलेले ‘आयकॉन’ होते. आता अण्णांच्या नावाने उभे राहिलेले आव्हान (आणि भुतावळही) संपत आले आहे. दुफळीने त्यातील राजकारणही स्पष्ट झाले आहे!

@आदिविझ | 21 September, 2012 - 11:33
आजचा दिव्य मराठी मधला अग्रलेख कुमार केतकरांच्या दिव्य चष्म्यातून लिहिला गेलेला असणार.
भ्रष्टाचारात आकंठ बुडलेल्या सरकारचे ते समर्थक प्रवक्ते आहेत.
पण तुमचे मत काय?

दिव्य मराठी उवाच
>>अण्णांच्या आंदोलनात काही आदर्शवादी, तर काही अराजकवादी; काही भाबडे, तर काही डँबिस, काही स्वयंभू शहाणे, तर काही मूर्ख, काही भणंग -भटके, तर काही उडाणटप्पू, काही महत्त्वाकांक्षी, तर काही दिशाहीन आणि काही संघवाले, तर काही समाजवादी सामील झाले होते.<<
अशा या लोकांना
>> सत्ताधारी तर घाबरलेच; पण लोकसभाच थिजल्यासारखी झाली आणि अण्णा म्हणजे ‘दुसरा महात्मा’ अशी भाषा सुरू झाली. एकापाठोपाठ एक ‘राष्ट्रपुरुष सन्मान’ त्यांना प्रदान केले जाऊ लागले. खुद्द पंतप्रधानांनी लोकसभेत उभे राहून अण्णांना मानाचा सलाम ठोकला. लोकसभेनेही एकमुखाने या नव्या (तोतया!) महात्म्याला अभिवादन केले.<<

यात अधिक भंपक कॉणाला म्हणाल? आंदोलनातील लोकांना कि लोकसभ्एतील?

भ्रमाचा भोपळा अखेर फुटला.......खरी लायकी दिसुन आली....... यांच्या विरोधात बोलले की ते लगेच देशविरोधीच बोलण्यासारखे झालेले.....आता हेच एकमेकांविरोधी बोलु लागले आहेत...आता यांचे आंधळी मोमबत्ती जलाव अगरबत्ती वाले कुणाकडे जाणार....? अण्णांकडे की.......केजरीवाल कडे ?

दिव्य मराठी चे विचार खरोखर "दिव्य" आहेत!

भुवनेश्वर येथे या दिव्य पक्षाच्या दिव्य लोकांनी ज्या प्रकारचे आंदोलन केले आणी महिला पोलिसाचा जो दिव्य सन्मान केला आणी जगदिश टायटलर या दिव्य बाबांनी जी मुक्ताफळे उधळली त्यावरही या दिव्य केतकरांनी आम्हाला दिव्यत्वाची प्रचीती देउन उपक्रुत करावे! म्हणजे केतकरांच्या म्हणण्याप्रमाणे ‘मैं अण्णा हूं’च्या टोप्या घातलेले जे तरुण कार्यकर्ते रामलीला मैदान व जंतरमंतर येथे धिंगाणा घालू लागले त्यांना समजेल कि दिव्य आंदोलने कशी करावीत

राळेगणसिद्धीचा प्रयोग सरकारी नोकरशाहीच्या सहभागाशिवाय आणि आर्थिक मदतीशिवाय यशस्वी झाला नसता>>> छान. सरकारी नोकरशाहीचा सहभाग आणि आर्थिक मदत असताना मग भारतातल्या उरलेल्या 6,40,867 गावात हा प्रयोग का झाला नाहि याबद्दलही दिव्य केतकरांनी त्यांचे दिव्य विचार आम्हाल जरुर सांगावेत

>>आंधळी मोमबत्ती जलाव अगरबत्ती वाले कुणाकडे जाणार....? <<
हे आणखी कोण बुवा?

दिव्य मराठी उवाच
>>अण्णांच्या आंदोलनात काही आदर्शवादी, तर काही अराजकवादी; काही भाबडे, तर काही डँबिस,...<<
नशिब कि 'सगळे डँबिस' असे म्हनाले नाहीत.

आता यांचे आंधळी मोमबत्ती जलाव अगरबत्ती वाले कुणाकडे जाणार....? अण्णांकडे की.......केजरीवाल कडे ? >>> ते कोणाकडेहि जावोत, पैसा जातोय ना नेत्यांकडे, मग झाले!

लहरि राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार
उद्धवा अजब तुझे सरकार!

अण्णांचे हनुमान आणि स्वीय सहायक सुरेश पठारे यांनी राजीनामा दिला आहे व अण्णांशी संबंध तोडले आहेत. आता त्यांनी राजीनामा दिला की अण्णांनी घेतला यावर राळेग्ण परिवारात चर्चा रंगली आहे. असे झाले तर पठारे यांचा वाळूच्या व्यवसायाचे काय होणार?

अण्णा आणि केजरीवाल आपापल्या मार्गाने गेले तरी त्यांचे काम एकाच ध्येयासाठी असल्याने एकमेकांच्या कार्याला पूरक असेच राहील असे मानायला हरकत नाही.
केजरीवालचे तरूण रक्त आहे तेव्हां घेऊ द्यात त्यांना राजकारणात उडी. डिपॉझिट जप्त झाले म्हणजे कळेल त्यांना कि सुरुवातीला दिलेल्या चित्रांतील अण्णा-सुमोच्या जागी ते स्वतःच आहेत हे, आणि अशा १०० अगडबंब सूमोंशी त्यांचि झटापट व्हायची आहे ते. यदाकदाचित निवडून आलेच तर एक चांगला लढवय्या संसेदेत आहे हीही जमेचीच बाजू म्हणावी लागेल. नाहीतरी सरतेशेवटी हवे असलेल्या सुधारणा सम्सदेकडूनच करवून घ्याव्या लागणार. तेव्हां चळवळीची फार कांही हानी होईल असे वाटत नाही.
दोघांनाही शुभेच्छा देण्यात आपल्या सर्वांचेच भले आहे. कारण दोघानीही भ्रष्टाचाराविरूद्धच्या महाभयंकर लढाईत स्वतःला झोकून दिले आहे यात मुळीच शंका नाही.

आ. अण्णा,
जनजागरणासाठी आपण देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार असे कळते.
महाराष्ट्राचे एक चीफ इंजिनियर श्री पांढरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे लवासाप्रमाणे उडून जाण्याची शक्यता दिसत असतांना या वयात तुम्ही देशभर प्रवासाला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच ठाण मांडून बसणे आवश्यक दिसते. इथेच १०० पेक्षा जास्त सुमो तुमच्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यांचा समाचार घेण्यासाठीच तुमची शक्ति तुम्ही राखून ठेवायला हवी.

Pages