विषय क्र. १ - आम्ही तिघी आणि 'देवदास'

Submitted by बागेश्री on 14 August, 2012 - 02:24

"पिंके, आज ह्या साईड ने जाऊयात ट्युशन ला...."

"इकडनं??... का?"

"मला ते ऐश्वर्याचं तळहातावर दिवा धरलेला आणि त्याकडे एकटक ती बघत असलेली पोस्टर हवंच्चं आहे... तो ह्यासाईडला एक माणूस बसतो ना पोस्टर्स घेऊन त्याच्याकडे मिळेल नक्की"

"अगं पण लावणार कुठे, पल्लू? घरमालकिण बदडेल ना!!"

"कोण म्हणतंय लावायचंय"

"मग खर्च कशाला?"

"पिंके, तुला प्रश्नच फार पडतात, ठेवू फोल्ड करून... किंवा करू काहीतरी, पुट्ठ्यावर चिकटवून पुस्तकांच्या चळतीवर ठेवू... "

"नही पारो... तुम्हे तील तील जलते मै नही देख सकता... मुझे याद आती हो तूम मै जब जब सांस...

"पिंके, बास... एकदाच पाहिला तो चित्रपट अन संवाद पाठ झालेत... पुन्हा एकदा पाहिलाच पाहिजे..."

"पहिली गोष्ट- पॉकेट्मनी संपत आलीये मॅडम... आणि दुसरी- तोंडावर परिक्षा आलीये, तिसरी- स्वाती इथे नाही, तिला कळलं तिला सोडून पाहिला पिक्चर, तर गहजब... "

(पण माझं ऐकतंय कोण, मॅडम पोस्टर निवडण्यात मश्गूल)

"पिंके, कोणतं छान आहे?"

"ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट"

"डन!! भय्या ये वाला देना ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट, कितनेको? आणि पिंके, स्वाती टपकणार आहे सकाळीच उद्या "

----------------------------------------------------------------------------------------

मी: तुला वेड बिड लागलंय का???

स्वाती: "ए, ही अंगावर साप- बिप पडल्यासारखं काय ओरडतेय?"

पल्लू: नाही स्वाते, मलाही पिंकीचंच बरोबर वाटतंय

मी: मग काय... बये, ह्या उदगीर मधे सात नंतर मुली फिरताना फारश्या दिसत नाहीत, ज्या काही तुरळक दिसतात, त्या मेस वर जाणार्‍या येणार्‍या आपल्याच इन्जिनीअरिंग कॉलेजच्या...आणि पिक्चर कुठे पहायचा तर तो नव्या थियटर मधे.. पार उदगीरबाहेर! तो ही आणि लास्ट शो बघायचा??
बरं चल, केली हिम्मत, गेलोही.. परतून आल्यावर इकडे वर कसे येणार... आपल मेन गेट १० वाजता बंद होते... मरवायेगी तू!

पल्लू: पिंके सगळं बरोबर... आणि आपली ही ओपन टेरेस खोली, इथे पोहोचण्याचे पायर्‍यातले ग्रीलचे दारही बंद असणार! सर्व अडचणी असतीलच यार.... पण विचार कर हे असलं कॉलेज लाईफ पुन्हा मिळणार का, रात्रीचं मूव्ही पहाणं, वॉव कसलं थ्रिलींग असेल ते?

मी: आय नो.. मजा येईल.. म्हातारपणी नातू, पणतूंना सांगायला किस्सा ही मिळेल.. पण हा पोरकट्पणा नको करायला यार...
जाऊ-पाहू, पण दुपारचा शो पाहूयात ना येत्या रविवारी.. कारण शनिवारी 'सी प्लस' ची ट्यूशन पण संपेल, मग रविवार दुपार मोकळीच

स्वाती: अच्छा? तेव्हा येणार तू? सोमवार पासून पेपर्स आहेत! तू कसली येत्येस? आणि उद्यापासून आपण तर ब्वॉ फुल्ल ऑन अभ्यास, मी नाही येणार कुठे... आख्खी पी एल ह्या ट्यूशनमुळे इथेच लटकून काढली, घरी पण नाही गेलो... चला ना मूव्ही ला!

पल्लू: स्वाते, तू पण काय... येईल ती, कशी नाही येत.. पकडून घेऊन जाऊ! आज रात्री ११ चा शो डन.....

-------------------------------------------------------------------------------------

वय वेडं होतं... मनावर देवदास व्यापून होता...एकदा हा चित्रपट पाहून समाधान नव्हतं! आपल्यासाठी असं झुरणारं कुणी असावं, हे वाटणारं ते वेड होतं! संजय लीला भंसाळीच्या सादरीकरणाने, पारो, चंद्रमुखीने... श्रेया घोशालच्या आलापांनी धुंद केलें होतं...

असं होण अपार साहाजिक होतं... कारण तेव्हा निसर्ग आमच्यावर उदार होता नि ते वय......... वेडं होतं!

-------------------------------------------------------------------------------------

मी: काकूंना काय सांगितलंय आपण? घरी परत कसं येणार आहोत?

पल्लू: सांगितलंय, इकडे माझ्या नातेवाईकांच्या कडे जातोय, परतायला उशीर होईल... तर त्या म्हणाल्या संतोषला फोन करा, रात्री तो अभ्यास करत जागा असेल, तर तो दरवाजा उघडेल, बेल वाजवू नका... सोप्पंय!

मी: हुश्श, खरंच सोप्पंय.. संतोषला आपण पिक्चरला गेलो होतो, असं खरं सांगितलं तरी धोका नाही म्हणा.. काकूपर्यंत जायची नाहीच गोष्ट... तो आपल्याच कॉलेजात आहे आहे ना..!!

ह्या वाक्यावर थियेटर कडे भरधाव सुटलेल्या त्या रि़क्षात हशा पिकला...

संतोष!- घरमालकिणींचा मुलगा- आम्हाला कॉलेजमध्ये ज्युनिअर, त्याचं कॉलेजातलं 'ताजं, सुंदर, नाजूक गुपित' आम्हा तिघींनाही ठाऊक होतं! गुपितं असली की ती जपण्यासाठी पडती बाजू घ्यावी लागते, कित्येकदा.. आज त्याची पडती बाजू, आमची जमेची बाजू ठरली!

जेट विमान न चालवू शकल्याने जीवनावर असलेला सारा राग काढण्याच्या अविर्भावात ती रिक्षा थियेटरच्या आवारात शिरली...
अगदी तयारीने आलेल्या स्वातीने, त्याचे मोजके पैसे चुकते केले...

मी नि पल्लू तिकीट खिडकीकडे वळालो! आधीच महिना अखेर..! संपत आलेल्या पॉकेट्मनी मधली ही चैन जितकी चिंतादायी तितकीच रोमांचकारी वाटली.. पण काही क्षणच...
एक एक नजरा आमच्यावर स्थिरावत होत्या... मघासपासून फुललेले हास्य हळूच दबकत होते... कुजबूज होणारच होती... जिथे संध्याकाळी सात- आठ नंतर मुली घरात शिरलेल्या असतात, तिथे नव्याने उघडलेल्या ह्या चित्रपटगृहात लास्ट शो पहायला तीन पोरी'च' जमल्यात म्हणजे काय?

एकमेकींचा हात दाबून हिम्मत एकवटली गेली...

एक बांगडी असलेला हात तिकीट्घराच्या खिडकीतून पलिकडे डोकावताच, बाहेरच्या व्यक्तीचा चेहरा बघण्यास तिकीटविक्रेताही उठून उभा राहून, विचित्रसे हसून खाली बसला... मघासपासून त्याचा जाडा-भरडा "कितने टिकीट?" हा प्रश्न अचानक प्रेमभरा "कितsssने टिकीssssट?"असा आला... आणि

माझ्या कानाजवळ "पिंके, तुझं बरोबर होतं, नको काढूस तिकीट, चल रूमवर परत..."
"आता गप्प बस... आता आज मूव्ही पहायचाच, तू डर मत चंद्रमुखी..."

चित्रपट सुरू होईपर्यंत एका ठिकाणी घोळका केल्यासारखं उभे राहून गप्पा मारल्या... शो सुरू झाल्यावर पाच मिनीटांनी आत शिरलो आणि..

तीन तिकीटे घेऊन आम्ही मागून तिसर्‍या अशा रांगेत स्थानापन्न झालो.. अंधारात भिती वरमली.. कारण आता त्या नजरा फारशा दिसणार नव्हत्या... रूतणार नव्हत्या!

आणि शिरकाव झाला त्या मोहमयी दुनियेत!!! संजय लीला भंसाळींनी बखुबीने सजवलेली दुनिया!

भव्य दिव्य सेट... मोहक रंगसंगती.. रंगीत तावदानं..... बेंगॉली वातावरण... आणि खूप काही!!!

तब्बल दहा वर्षांनी सोनपूरच्या घरी, घर कसले भव्य राजवाडा जणू.... परतणारा श्री नारायण मुखर्जी- जमीनदारांचा सुपूत्र 'देवदास'!!

वयाच्या दहाव्या वर्षी आपल्याला सोडून गेलेल्या बालमित्राची वाट पहाणारी चक्रबोर्तींची कन्या- पार्वती चक्रबोर्ती!
मित्र लवकर परतावा म्हणून तिने 'अखंड' तेवत ठेवलेला दिवा... सारं विलक्षण... सुंदर! आता तिचे सुंदर युवतीत झालेले रुपांतर...
आणि तिची आर्त साद..

"मोरे पिया, अब आ जा रे मोरे पिया!!"
श्रेया घोशाल च्या मधाळ आवाजाने ही साद कातर होऊन चित्रपटगृहात झिरपत राहते... ऐश्वर्येचं रूप तितकच सुखद वाटत रहातं!!

इंग्लडला उच्च- शिक्षणासाठी गेलेल्या देवदासच्या परतण्याचा सोहळा तुम्हाला मुखर्जी- चक्रबोर्ती कुटुंबियातलाच एक सदस्य करून टाकतो...

इतक्या वर्षांनी परतूनही आई- वडील कुटुंबीय ह्यांपे़क्षा आधी 'लाडक्या पारो'ला भेटायला गेलेला देवदास, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याची मूक कबूली देऊन जातो!!

मग एक एक संवाद..
एक एक पात्र आपलं काम चपखलपणे करत जातं.... करतच जातं!

उच्च- नीच समाज वर्गाच्या, अहंकाराच्या, पोक्त स्वाभिमानाच्या रेषा ह्या प्रेमी युगूलांत आडव्या न आल्या तर नवल...

ह्याची परिणती म्हणून पारोचे भलत्याच उमरावाशी होणारे लग्न आणि देवदासचा गृहत्याग!!

देवदासचे पारोला तिरमिरीत पत्र "आपल्यात कधीच प्रेम नव्हते" पण त्याच प्रेमात अखंड झुरणारा देव..
मिष्कील चुन्नीबाबूचा प्रवेश... आणि ज्या नीच समाजस्तरामुळे पारोला धुडकावण्यात येते.. त्याच वेश्यागृहात देवचा प्रवेश्...आणि दुसर्‍या रुपमवतीचा भव्य स्क्रीनवर प्रवेश....चंद्रमुखी!

एक तवायफचा रोल इतका रुबाब, आब राखत कुणी सादर करणे खरेच आव्हानात्मक असावे, सौदर्याला रूबाबाची झळाळी पाहून मन तृप्त न झाले तर आश्यर्यच!

आता,
"हम पे ये किसने हरा रंग डाला..."
सादर होताना माधुरीच्या अदाकारीने, कविताच्या चढत्या आवाजाने तो मुजरा अफाट सुंदर भासू लागतो....

चंद्रमुखीने देवच्या प्रेमात पडणे...
देवचं पारोवरचं प्रेम विसरण्यासाठी मद्याला आपले करणे...
आणि देव च्या आठवणीत पारोने तो दिवा तेवता ठेवणं...

सारे अगम्य... गुंतागूंतीचे पण चटका लावणारे!

------------------------------------------------------------------------

जगात ल़क्ष ल़क्ष माणसे आहेत... समाज आहे... त्याचे नियम आहेत.. आपण समाजाचा भाग असल्या कारणाने ते नियम आपल्यावर गारूड करून आहेत! अशावेळेस हृदयातील भावनांना समाज लीलया कूस्करून बेमालूम पुढे निघतो... तो चालतच असतो अशी असंख कलेवरं घेऊन, हे नव्याने जाणवले!

जगात ताठ मानेने रहायचे असेल, चांगलं जीवनमान हवे असेल तर इतके भावनिक असून चालत नाही- हा धडा नकळत गिरवल्या गेला....

दूपारपर्यंत, आपलाही कुणी देवदास असावा ह्या भावनेचं हसू आलं! कुणासाठी कुणी आयुष्यभर झुरून सोन्याचं जीणं मातीमोल का करून घ्यावे?

'जगणं" हे देणं आहे विधात्याचं.. ते पुरेपूर जगून, जगताना इतरांना जगवून त्याला फुलवावं... सुंदर करावं.. भावनातिरेकाने कुणी कुठल्याच पदाला पोहोचत नाही...

जगण्याचा राजमार्ग असताना, भावननेंच्या धूळभरल्या पाऊलवाटा धुंडाळत आयुष्याची माती का करावी? आयुष्यात समतोल महत्त्वाचा भावनेचा, वास्तवाचा.. हे नकळत बिंबलं.. मनावर... व्यक्तिमत्त्वावर!

---------------------------------------------------------------------------------------------
आम्ही तिघींनी चित्रपट अर्ध्यातच सोडायचं ठरवलं!
कारण नंतर रिक्षा मिळणार नाही.. आणि उशीरा लोकांच्या नजरा आणखी झेलाव्या लागतील म्हणून....

झटकन निघून, पटकन रि़क्षा करून.. घरी पोहोचून संतोषच्या कृपेने रात्री १२.४५ च्या आधीच, घरात प्रवेश करते झालो!!!

---------------------------------------------------------------------------------------------

ह्या धाडसात,
आम्हांला खरेतर कुठल्याच व्यक्तीकडून काहीच त्रास झाला नाही! पण मनच सतत खात होतं, म्हणून सुखरूप घरी पोहोचण्याकडेच कल होता! (तरी सोबत पर्समधे कटर घेऊन गेलो होतो, सेल्फ डिफेन्सच्या तयारीने)

घराबाहेर राहून इंजिनीयरींग करताना केलेले एकूलते एक धाडस, ते दडपले धपापते उर, आज 'देवदास' च्या निमित्ताने आठवले...

आम्ही तिघी लग्नानंतर तीन वेगळ्या ठिकाणी आहोत... पण भेटलो आणि हा विषय नाही निघाला असे होत नाही... आणि मग एकमेकांना उत्स्फुर्त टाळी देऊन डोळ्यात उतरलेली चमक साठवत, 'असं परत एकदा केले पाहिजे यार' म्हणत... आम्ही पुन्हा परततो......

-बागेश्री.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅक्चूली अश्विनी!!
आमचा हा प्रताप निर्विघ्नपणे पार पडला तरी नंतर घरी सांगितलेच (अर्थात डिग्री हातात पडल्यावर Wink ) पण तेव्हा आईबाबांचा 'आणखी काय काय केले होते?' असा अपेक्षित प्रश्न आलाच होता... मग कळकळीने हेच करताना कसले तंतोरलो होतो सांगितल्यावर 'स्वतःच्या सेफ्टीशी असे खेळू नका पुन्हा कधीही' अशी समज मिळून सुटका झाली Happy

मस्त लिहीलेय आणि वेगळ्या पद्धतीने....!!
आवडेश.
>> +१
संवाद लिहून योग्य परिणाम साधला आहे
बर्‍याच लोकांनी लिहीले आहे स्पर्धेत. स्पर्धेसाठी शुभेच्छा Happy

>> एक तवायफचा रोल इतका रुबाब, आब राखत कुणी सादर करणे खरेच आव्हानात्मक असावे, सौदर्याला रूबाबाची झळाळी पाहून मन तृप्त न झाले तर आश्यर्यच!

आता,
"हम पे ये किसने हरा रंग डाला..."
सादर होताना माधुरीच्या अदाकारीने, कविताच्या चढत्या आवाजाने तो मुजरा अफाट सुंदर भासू लागतो....>>

सहमत.. माधुरी ती माधुरीच!
लेख आवडला. काही आठवणीच अशा असतात की त्या कायम ताज्याच राहतात!

आवडलं अनुभवकथन ! मस्तच झालय...

<<एक तवायफचा रोल इतका रुबाब, आब राखत कुणी सादर करणे खरेच आव्हानात्मक असावे, सौदर्याला रूबाबाची झळाळी पाहून मन तृप्त न झाले तर आश्यर्यच!>>>

अगदी अगदी ! मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जानच्या रेखानंतर तवायफच्या भुमिकेला न्याय मिळाला असेल तर तो याच चित्रपटात आणि माधुरीच ते करु जाणे.

अवांतर : मी देवदास (नवा) अजुन एकदाही सलगपणे बघीतलेला नाहीये, पण त्यातले माधुरीचे प्रसंग मात्र पुन्हा पुन्हा पाहीलेले आहेत. विशेषतः दुर्गापुजेच्या वेळच्या त्या अप्रतिम नृत्याच्या जुगलबंदीनंतर मिलींद गुणाजीवर संतापलेली माधुरी वेड लावुन जाते Happy

देवदास फसला होता. मुळ कथानकात झालेली ढवळाढवळ. शिवाय भव्य सेटस, रंगसंगती आणि स्टारडमच्या नादात पात्रे जिवंत झालीच नाही. शाहरुख त्यात शाहरुख म्हणूनच वावरला. शिवाय माधुरी आणि ऐश्वर्याने पण आपलं स्टारडम जपत ते रोल केले. त्यामुळे मूळ कथेतील व्याकुळता, आर्तता त्या सिनेमात तेवढ्या प्रकर्षाने जाणवलीच नाही. दिलीपकुमारचा देवदास जेवढा जिवंत वाटला तेवढाच शाहरुखचा देवदास कल्पित कथेतील 'पात्र' वाटला. त्यामानाने देवडी मधला अभय देओल नेहमीच्या ओळखीतला असावा इतका अस्सल होता.
बाकी 'पिंकी' असं काही करणार्‍यातली असेल असं वाटल नव्हतं. Proud

वर्षु तई +१

देवदास अजिब्बात नाही आवडला ... पण तुमची मज्जा लै भारी......

नवा देवदास मला लार्जर दॅन लाइफ वाटला. दुखः एकदम ग्लोरीफाय केल्या सारखे वाटले..... प्रत्येक फ्रेम सुंदर दिसलीच पाहिजे...मग ते अश्रु, दुखः का असेना..... ऐश्वर्या खुपच क्रुत्रीम पणे वावरली..... शहारुख खुपच ओव्हर अ‍ॅक्टींग करतोय असे वाटले. माधुरी मात्र अप्रतिम......

म्हणजे शेवटचा शो... तोही अनोळखी शहरात... लैच बाबा डेरींग... (त्यात देवदास पाहीला म्हणजे डेरींग + १) Proud
बागेश्री, तू नियम मोडून वागणार्‍यातली वाटत नाहीस. Happy

बेक्कार सिनेमा, मस्त लेख ! Happy बाग्ज, छानच लिहिलं आहेस. सपसप वाचत सुटले आणि संपल्यावरच थांबले. मग पहिला विचार डोक्यात आला - धाडसी बागु Happy

देवदास फसला होता. मुळ कथानकात झालेली ढवळाढवळ. शिवाय भव्य सेटस, रंगसंगती आणि स्टारडमच्या नादात पात्रे जिवंत झालीच नाही. शाहरुख त्यात शाहरुख म्हणूनच वावरला. शिवाय माधुरी आणि ऐश्वर्याने पण आपलं स्टारडम जपत ते रोल केले. त्यामुळे मूळ कथेतील व्याकुळता, आर्तता त्या सिनेमात तेवढ्या प्रकर्षाने जाणवलीच नाही. दिलीपकुमारचा देवदास जेवढा जिवंत वाटला तेवढाच शाहरुखचा देवदास कल्पित कथेतील 'पात्र' वाटला. <<<

दिलीपकुमारचा देवदास 'पूर्ण' न पाहूनही सहमत!

===========

म्हणजे शेवटचा शो... तोही अनोळखी शहरात... लैच बाबा डेरींग... (त्यात देवदास पाहीला म्हणजे डेरींग + १)
बागेश्री, तू नियम मोडून वागणार्‍यातली वाटत नाहीस.<<<

मला असे वाटते की नियम बागेश्रीला मोडत नाहीत

===========

बेक्कार सिनेमा, मस्त लेख !<<<

सहमत!

बाग्ज, छानच लिहिलं आहेस. सपसप वाचत सुटले आणि संपल्यावरच थांबले.<<<

बाकीचे वाचताना मधे सपसप थांबून संपल्यावरच सुटतात का? Proud Light 1 सर्व संबंधितांना

मग पहिला विचार डोक्यात आला - धाडसी बागु <<<

काही म्हणा, पण हे पटले, पहिलाच काय, कोणताही विचार डोक्यातच येतो Light 1

बागेश्री, तू नियम मोडून वागणार्‍यातली वाटत नाहीस>> नियम प्रकार पटत नाहीच मला कौ! Wink
मला काय पटतं आणि काय नाही एवढीच व्याख्या आहे. मला काही न पटताना काही करायला गेले की ते माझ्यापूरते धाडस (इतरांसाठी ते कदाचित नियमातलेच असू शकेल, पण माझ्यासाठी धाडस) म्हणूनच धाकधूक असते- चुकतेय की बरोबर आहे ह्याची- पुन्हा स्वतःकडे पहाताना लाज वाटू नये इतकीच काळजी Happy

Pages