अवचितगडावर दुर्गमित्रांची पराकाष्ठा

Submitted by prafullashimpi on 20 July, 2012 - 06:03

कालच ही अभिमानास्पद बातमी वाचायला मिळाली. वाचतांना असे वाटत होते की प्रत्यक्ष डोळ्यांसमोरच घडते आहे.

पनवेलच्या दुर्गमित्र संस्थेचे अजय गाडगीळ आणि त्यांच्या मावळयांचे करावे तितुके कौतुक थोडेच आहे. त्यांच्या ह्या शिवपराक्रमासाठी आम्हां सर्व मायबोलीकरांचा मानाचा त्रिवार मुजरा.

खरोखरच असा विचार मनात आणून प्रत्यक्षात आणणे ही फार अभिमानास्पद कामगिरी आहे.

सौजन्य
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15036542.cms

अवचितगडावर दुर्गमित्रांची पराकाष्ठा

सलग ७० फुटांची खडी कातळभिंत , पस्तीसेक फुटांचा तिरपा उतार आणि निसरडी वाट ... अशा खडतर मार्गावरून दीडशे फूट खोल दरीत अडकलेली तब्बल दोन टनांची शिवकालीन तोफ गडावर चढवायची , हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षाही अवघड काम होते ... तोफ चढविण्यासाठी जो धातूचा दोर वापरला होता , त्याचेच वजन ४५ किलो भरले होते .. तोफ चढविताना गडाची आणि तोफेची तसूभरही हानी झाली असती , तर आरोपांच्या फैरींचा भडिमारच या मावळ्यांवर झाला असता ... पण पनवेलच्या ` दुर्गमित्रांनी ' प्रयत्नांची पराकाष्ठा केली अन् अवचितगडाच्या माथ्यावर हे वैभव दिमाखात विराजमान झाले .

किल्ले रायगडाच्या भवतालच्या परिसरासाठी सुरक्षाभिंत म्हणून कामगिरी बजावणाऱ्या रोह्याजवळच्या अवचितगडावरची एक तोफ गेल्या शतकापासून खाली कोसळलेली होती . रोह्याच्या निसर्गगिरिभ्रमण संस्थेने १९९६ साली ती सध्याच्या जागी थोडी सुस्थितीत ठेवली होती . पण ही तोफ पुन्हा गडाच्या माथ्यावर न्यायला हवी , असे दुर्गमित्र संस्थेचे अजय गाडगीळ यांच्या मनात आले . सुमारे दहा वर्षांपूर्वी कर्जतजवळच्या कोथळीगडावर एका छोटेखानी तोफेला त्यांनी तिच्या पूर्वीच्या जागी नेण्यात यश मिळविले होते . त्यामुळे त्यांचे बळ वाढले . सिव्हिल इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात असल्याने वणीच्या घाटातील दरडींची मजबुतीकरण आणि वन खात्यासाठी जलस्रोत संवर्धनाची कामे यांचे अनुभव त्यांच्या गाठीशी होते . त्याच बळावर अवचितगडावरील तोफचढाईसाठी दुर्गमित्रच्या मावळ्यांना त्यांनी प्रेरित केले .

३० मावळ्यांची मोहीम
* या मोहिमेत किल्ल्याची तटबंदी , तोफेचे अवशेष किंवा आपल्या मावळ्यांचे जीव यापैकी कशालाही धक्का लागता कामा नये , यावरही त्यांचा पुरेपूर कटाक्ष होता . त्यामुळेच केशव पाटील आणि राहुल खोत यांनी गिर्यारोहणातील तंत्रांचा वापर करत झुमारिंगद्वारे सतत तोफेबरोबर आरोहणाच्या रोपने चढाई केली . तोफ कुठे अडकलीच तर ती सोडवायला त्यांच्या हाती पहारय दिलेली होती . बाकीचे ३० - ३२ मावळे तब्बल अडीचशे फुटांचा गॅल्वनाइझचा रोप खेचण्याचे काम करत होते .

पावसातही अखंड कार्य
* या रोपची ब्रेकिंग स्ट्रेंग्थ ७ टनांपर्यंत होती , पण तो उचलण्यासाठी किमान पाचजण लागायचे . चेनपुलीच्या साह्याने तोफ वर खेचली जात होती . स्वतः गाडगीळ , विवेक पाटील , शिवराम म्हात्रे , अभिषेक कुलकर्णी सतत समन्वयाची आघाडी सांभाळत होते . चेनपुली आणि रोप गडावरच्या झाडाला बांधण्यात आला होता . पण निर्जीव वस्तूसाठी सजीव झाडाचे नुकसान होऊ नये , यासाठी पुरेपूर पॅकिंगही टाकण्यात आले होते . तब्बल आठ तास चाललेल्या या मोहिमेत पावसानेही हजेरी लावली आणि इंद्रधनुष्यानेही दर्शन दिले ... जय शिवाजी , जय सह्याद्रीच्या उदघोषात अवचितगडावर ही तोफ पुन्हा विराजमान झाली .

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रचंड अभिमानास्पद बातमी.
त्यांच्या ह्या शिवपराक्रमासाठी आम्हां सर्व मायबोलीकरांचा मानाचा त्रिवार मुजरा. >>> +१०००

बापरे झूमरिंग करीत १५० फूट चढणे हेच मुळी एक दिव्य आहे. त्यात हाती पहार आणि तोफेला सोडवायची जबाबदारी!! काही विचारू नका!!!

आणिक वरचा चमूही तितकाच कार्यकुशल. तसेच झाडांना इजा होऊ नये म्हणून घेतलेली काळजी 'दुर्गामित्रां'च्या मनाची संवेदनाशीलता दाखवते. शिवाय पाउस वेळीअवेळी हजेरी लावतोच आहे. अडचणी तरी किती याव्यात!!

धन्य झालो आम्ही ही वार्ता ऐकून! अजय गाडगीळांसह सर्व 'दुर्गमित्र' वीरांना शतवार मुजरा!! तसेच रोह्याच्या 'गिरीभ्रमण' संस्थेच्या सदस्यांचंही अभिनंदन! Happy

-गा.पै.

अजय गाडगीळांसह सर्व 'दुर्गमित्र' वीरांना शतवार मुजरा!! तसेच रोह्याच्या 'गिरीभ्रमण' संस्थेच्या सदस्यांचंही अभिनंदन! >>>>>+१००००

अजय गाडगीळांसह सर्व 'दुर्गमित्र' वीरांना शतवार मुजरा!! तसेच रोह्याच्या 'गिरीभ्रमण' संस्थेच्या सदस्यांचंही अभिनंदन!
अगदी अगदी

ह्या उपक्रमात सह भागी झालेल्या दुर्गमित्रांना सलाम !!

हल्लीच (म्हणजे काल परवा ) मटा पेपरला आलेल्या बातमी नुसार

दुर्ग/गड,किल्ले,यांच्या संवर्धनाचा सरकारी मास्टर प्लान १० वर्षांपासून धूळ खात पडलेला आहे.

ह्या बातमी च्या पार्श्वभूमीवर अवचीतगडा ची ही बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे.

ह्या उपक्रमाची उत्कृष्ट चित्रफित यंदाच्या गिरीमित्र संमेलनामध्ये दाखवली गेली. या फिल्मला दुसरे पारितोषिक मिळाले. ती तोफ वर खेचतांनाचे रोमांचक नाट्य पडद्यावर सुरु असतांना हजारावर गिरीमित्र श्वास रोखून खिळून होते. तोफ वर आल्याक्षणी प्रेक्षागृहाने टाळ्या- शिट्ट्यांनी दणाणा केला...