नभी मेघ हिंडायचे बंद झाले!

Submitted by सतीश देवपूरकर on 23 June, 2012 - 08:30

गझल
नभी मेघ हिंडायचे बंद झाले!
वनी मोर नाचायचे बंद झाले!!

अरे माणसा काय केलेस तू हे?
ऋतू यायचे जायचे बंद झाले!

कुणी घातला बांध गाण्यास त्यांच्या?
झरे वाहते गायचे बंद झाले!

तुझे बोल बोलायला लागलो मी;
तसे लोक बोलायचे बंद झाले!

मनोरंजनाला अहोरात्र टीव्ही!
पहा लोक वाचायचे बंद झाले!!

न श्रोत्यांस, ना बासरीला कळाले....
कधी श्वास चालायचे बंद झाले!

कशी माणसे शुष्क पाषाण झाली?
तुझे नाव गोंदायचे बंद झाले!

किती रोज निर्यात व्हावी फळांची?
तरूंना फळे यायचे बंद झाले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

खूप छान गझल आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अधाशासारखी वाचली... अगदी लयीत.

मनोरंजनाला अहोरात्र टीव्ही!
पहा लोक वाचायचे बंद झाले!!

हा शेर आशयघन आहे खरा पण या गझलेत जरासा खटकला.. मिठाचा खडा लागावा तसा. या गझला आधीच रचलेल्या असतील तर त्या वेळचा दिनांक घालावा असं सुचवतो.

अरे माणसा काय केलेस तू हे?
ऋतू यायचे जायचे बंद झाले!

खूप छान ! आख्खी गझल उत्तम .

नभी मेघ हिंडायचे बंद झाले!
वनी मोर नाचायचे बंद झाले!!

वाह ...........प्रासादिकता पाहून थक्क झालो मी

_/\_

एक गोष्ट खटकली
माझ्या मते या गझलचे वृत्त 'भुजंगप्रयात' आहे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा
यतिस्थान : ६ व्या अक्षरावर (व ओळ संपते म्हणून १२ व्या अक्षरावरही)...... हो अक्षरावरच हे 'अक्षर'- 'गण' वृत्त आहे मात्रावृत्त नव्हे !!

अनेक जागी यातिस्थानी(६ व्या ) शब्द तोडावा लागतो आहे यतिभंग होतो आहे रसभंग होतो आहे .
आता यामुळे आकृतीबंधाच्या गोटीबंदपणाला धक्का लागतो की कसे याबाबत माहिती नाही असो.

असेल तर असेल आम्ही खपवून घेवू............. आपण काळजी करू नये............... गझल करावी .............आम्हास आनंद द्यावा !!
धन्यवाद .

गझल विशेष आवडली नाही. खास करून मतला फारच सपाट वाटला. बाकीचे शेरही विशेष 'भिडले' नाहीत.

क्षमस्व.

वैभवजी! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आपण प्रासादिकतेच्या इतके प्रेमात पडल्याचे पाहून (दंडवत करेपर्यंत), मी पण चकीत झालो आहे!
भुजंगप्रयात या अक्षरगणवृत्तातली लगावली आहे.............
लगागा लगागा, लगागा लगागा!...........मान्य.
यात, यति ६व्या अक्षरावर आहे.....बरोबर!
पण वृत्त जेव्हा तुलनेने छोट्या लांबीचे असते, तेव्हा यति पाळला नाही तरीही कानास खटकत नाही, कारण ओळच लहान असते.
अक्षरगणवृत्तात कुठल्याही –हस्वदीर्घाच्या सवलती न घेता, गोटीबंद व प्रासादिक लिहिले तर, यति नाही पाळला तरी काही बिघडत नाही. हे मी फक्त छोट्या वृत्तांबाबत बोलत आहे.

शार्दूलविक्रीडितासारख्या लांबलचक अक्षरगणवृत्तात मात्र यति सांभाळावा!
अर्थात कुठल्याही वृत्तात यति सांभाळला तर छानच आहे. पण छोट्या वृत्तात यति नाही पाळला तरी त्याच्या लयीत, वा गोडीत फरक पडत नाही. पहा गुणगुणून!

उदाहरणार्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक पहा........

मना सज्जना भक्ति पंथेचि जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे

यात कुठे यति पाळला आहे? पण म्हणून कानाला कुठेही खटकत नाही, कारण वृत्तच छोटे आहे.

माझे वैयक्तीक मत सांगतो...........

हे सर्व कोणते अक्षरगणवृत्त आहे, यावर अवलंबून आहे. काहींमधे यति पाळला नाही तरी खटकत नाही, काहींमधे खटकते.

माझीच दोन उदाहरणे देतो.........(अक्षरगणवृत्ताचे नाव माहीत नाही)

माझा एक मतला आहे.....

किनारा चालला आहे, कुणाला शोधण्यासाठी?
कुठे ह्या चालल्या लाटा, कुणाला भेटण्यासाठी?

इथे यति पाळला आहे, जे या वृत्तात आवश्यक आहे.

आता याच वृत्तातील यतिभंगाचेही माझे उदाहरण देतो, जे मलाही पसंत नाही.

स्मशानी अस्थि माझ्या घ्यावया येवू नका कोणी;
इथे दिसतील माझी फक्त स्वप्ने.....राख झालेली!

इथे दोन्ही मिस-यात यतिभंग झाला आहे, जो मला स्वत:लाही पसंत नाही. म्हणूनच हा शेर मी गझलेत वापरला नाही. (पण सुटा शेर म्हणून मी तो मुशाय-यात पेश करतो.), कारण या वृत्तात यतिभंग कानाला निश्चितच खटकतो!
हे वृत्तावर अवलंबून आहे.

पण अजून एक महत्वाचा मुद्दा मांडतो...........

गझलेमधे तुम्ही तुमचे स्वत:चे वृत्त तयार करू शकता. फक्त अट ही की, सर्व मिसरे त्याच आणि त्याच वृत्तात आले पाहिजेत!

ही बाब लक्षात घेतली तर, एखाद्या छोट्या वृत्तात एकदा मी यतिभंग केला(विशेषत: मतल्यात) तर, सर्व मिस-यात शक्यतोवर, तसाच यतिभंग करावा. ते चालू शकते. पण वृत्त तुलनेने मोठे असेल तर, शक्यतोवर यति जरूर पाळावा.

वृत्त अक्षरगणवृत्त असो वा मात्रावृत्त, त्याची स्वत:ची एक लय असते. ती सांभाळावी! यति पाळला तर सोन्याहून पिवळे. पण छोट्या वृत्तात यति पाळला नाही तरी माझ्यामते चालू शकते. कुठलाही रसभंग वा गोटीबंदतेत कमतरता येत नाही. हे त्या त्या वृत्तावर अवलंबून असते.

छोट्या वृत्तात यति पाळूच नये असे माझे म्हणणे नाही. पाळला तर छानच आहे! आमचे गुरुजी श्री. सुरेश भट साहेब छोट्या वृत्तातीलही यति पाळायचे, कारण ते गझलसम्राटच होते. उदाहरणार्थ........

पहाटे पहाटे, मला जाग आली!
तुझी रेशमाची, मिठी सैल झाली!!
Hats off to him!

आता मतल्यात त्यांनी यति पाळल्यामुळे इतर सर्व शेरांतही त्यांनी यति पाळला आहे. स्वत:ची वृत्ते तयार करण्यात तर ते तरबेज होते!

गेल्या ३० वर्षांत भटांची सर्व वृत्ते अजूनही माझ्याकडून हाताळून झालेली नाहीत, हे मी कबूल करतो! शब्दांवर भटसाहेबांची कमालीची हुकुमत होती, म्हणून त्यांना हे लीलया जमायचे! असो.
मला वाटते मला काय म्हणायचे आहे ते आपणापर्यंत पोचले असावे.
आता थांबतो.....दमलो फार मी!

..........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................

मराठीतील अक्षरवृत्त गजलेत मात्रा वृत्तात चालवले तर चालते.
छान गझल आहे.. बरेचसे शेर निसर्ग विषयावर आहेत.

<<<गेल्या ३० वर्षांत भटांची सर्व वृत्ते अजूनही माझ्याकडून हाताळून झालेली नाहीत, हे मी कबूल करतो>>>

हाताळून झाली तरी काय?

वृत्त हे साधन असावे, साध्य नव्हे

बाकी प्रोफेसर साहेबांचे हे वाक्य जालिम आवडले.

<<<वैभवजी! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आपण प्रासादिकतेच्या इतके प्रेमात पडल्याचे पाहून (दंडवत करेपर्यंत), मी पण चकीत झालो आहे!>>>

Rofl

आयाय गं................

आता म्हणे लहान वृत्तात यतीची सूट घेतली की चालते मोठ्या वृतात शक्यतो घेवू नये म्हणे

हे मत तुमचे स्वतःचे आहे ; भटांचे आहे ; की असेच ऐकीव आहे माहीत नाही........... .की कुणी चाणाक्ष गझलकाराने खुबीने घेतलेली सूट आहे जी पुढे चालते चालते म्हणत खपवली आहे हे कळायला मार्ग नाही ............असो !!

माझ्या काही स्पष्ट सन्कल्पना सांगतो चुकीच्या असतील तर सोडून द्या पण आधी वाचा तरी ...............

१) यती ही संकल्पना थांबायला सांगते हे कबूल?...पण नक्की कुणाला लिहिणार्यास की वाचणार्यास
मला वाटते वाचणार्यास जास्त लागू पडायला हवी ती लिहिणार्याने ही बंधन पाळले तर उत्तमच
कसे ते पहा.......................

२) मनाचा एक श्लोक .........तिथे रामदास स्वामी सहाव्या अक्षरावर थांबले नाहीत ठीक आहे(म्हणजे त्यांनी तिथे शब्द पूर्ण केला नाही ) पण तुम्ही यतिभंग झाला तरी थांबताच ना ?...होय थांबता ..
३)आता मुळात तिथे अक्षरावर थांबा असे म्हटले आहे तुम्हाला (वाचकाला ) अर्थाची ओढ आहे म्हणून >>............४)मना सज्जना भ(क) इथे केवळ अर्थ लागत नाही म्हणून तुम्ही मना सज्जना भक्ती इथे थांबता बरोबर? ...बरोबर

५)नका थांबू ना !!

यती अक्षरसंख्येवर आधारीत आहे तर अर्थासाठी शब्दाच्या मागे धावू नका ना

(वाचकाला सगळ्या गोष्टी हातात बसल्याबसल्या पाहिजेत का ??....त्याच्या डोक्याला काहीतरी काम दिलेच पाहिजे ना??... म्हणून मला वाटते यती पाळणे हे काम वाचकाची जबाबदारी असायला हरकत काय लिहिणार्याच्या जीवाला जरातरी उसंत म्हणून >??:))

६)शब्दही तिथे पूर्ण झालाच पाहिजे हा हट्ट रामदास स्वामींनी धरला नसेल त्या ओळी लिहिताना काय माहीत (यावरून भुजंगप्रयातात चालते असा अर्थ कसा काढता येईल ..अहो ते वृत्त आहे माहाराज ..........माणूस नाही भेदभाव करायला )

७)कवीताप्रान्तातदेखील असा आग्रह(गोटीबंदपणा ) हल्ली फारसा कुणी धरत असेल असे वाटत नाही
इथे लोचा मराठी गझलकार करतात.......... नियम तेच करतात मग म्हणतात गझलेला अमुक अमुक चालतच नाही वगैरे आणि अमुक अमुकच चालते वगैरे .अरे कुणी सांगितलंय मेंदूचा भुगा करायला
काय चाललंय हे................बाप रे बाप !!
________________________________________________________
गोटीबंदपणा मिरवायचा असेल तर गोटीबंदापणा आधी standardise करायला हवा !!

अक्षरगणवृत्तात आकृतीबंधाचा गोटीबंदपणा असा हवा............ .माझे मत >>>>>

१) वृत्ताची लगावली जशीच्या तशी पाळावी ...
गा चे लल चालणार नाही
गा च्या जागी गाच हवा
ल च्या जागी ल च हवे

२) यती लिहिणार्याने पाळायचा असेल तर त्याच जागी शब्द पूर्ण करणे बंधन कारक करून टाका एकदाचे

३) मग सूट म्हणून कुणासही दिली जाणार नाही एकदाही नाही असे फर्मान काढा .

मग बघू गझल कुणाला किती उस्फूर्तपणे सुचते ते आणि किती अचूक जमते ते ती ही प्रत्येक वेळी Wink

वैवकु,

यतीबाबत साधारणपणे पाळला गेलेला संकेत (किंवा संकेत न पाळला जाण्याबाबतचा संकेत) असा की:

शार्दुलविक्रीडित

आनंदकंद

रंगराग

अशा काही वृत्तात यती अगदी कडकपणे पाळायलाच लागतो तर इतर वृत्तात तो नाही पाळला तरी 'जिभेला उच्चारताना' काही त्रास होत नाही Happy

मला जेवढे माहीत आहे तेवढे नमूद केले

असा भेदभाव का ......................
नक्की काय कारण आहे या मागे ............
हे इतके बारीक सारीक नियम कुणी केले कही खास हेतू बीतू नव्हता ना ..कसे कळायचे आपल्याला बेफीजी ?

कोणत्याही आकृतीबंधाच्या निर्मीतीआधी काव्याच्या आशयाच्या असलेल्या गरजेची निर्मीती झाली. म्हणजे:

'काहीतरी म्हणायचे आहे, म्हणावेसे वाटत आहे' ही आवश्यकता आधी निर्माण झाली

त्यानंतर विशिष्ट भावना निर्माण व्हाव्यात, नाद. लय असावी व विशिष्ट ढंगात तो आशय व्यक्त व्हावा या दृष्टीने विविध आकृतीबंध निर्माण झाले. हे मत सुलभपणे जाणण्यासाठी कत्तअ ( एकाच गझलेचे कोणतेही दोन शेर) आणि रुबाई हे दोन प्रकार का निर्माण झाले हे जाणून घ्यावे. कत्तअ च्या दोन्ही शेरांचा एकमेकांशी आशयाने काहीही संबंध नसतो, पण रुबाईच्या चारही ओळी एकाच विषयाबाबत असतात. अशा प्रकारे भिन्न भिन्न आकृतीबंध निर्माण झाले. ते डायल्यूट करणे हा मोठा अपराध नाही. उलट ते डायल्यूट करत करत आता लोकांनी मुक्तछंद हाच जणू तारणहार असणारा आकृतीबंध असल्याप्रमाणे स्वीकारलेला आहे.

आशय अधिक प्रामाणिकपणे व्यक्त करताना सुटींची गरज भासू लागली. मराठी भाषिकांना ती अधिक भासण्यामागे मराठी या भाषेचा पोत हे कारण होते. जसे, उर्दूत 'है' हा शब्द एक किंवा दोन मात्रा यापैकी कोणत्याही प्रकारे वापरला जातो तसा 'आहे' हा चार मात्रांचा मराठी शब्द आपण वापरत नाही. मराठीत असलेल्या शब्दांच्या एकंदरच मात्राही अधिकच आहेत हे या भाषेचे ग्रेन स्ट्रक्चर आहे. त्याला आपण काही करू शकत नाही. म्हणून मर्ढेकर, कुसुमाग्रज या मोठमोठ्या कवींनीही कित्येक सुटी घेऊन वृत्तातील कविता लिहिल्या.

आशय प्रामाणिकपणे नोंदवताना वृत्त आड येत असले तर कधीकाळी अशी हलकी सूट घ्यायला जाणे हा अपराध नाही. तसेच, आपण ज्या हिरीरीने त्यावर भाष्य करत आहात ते अनावश्यकच आहे.

या सगळ्याची कारणे आहेत आशयातः

सूट तेव्हाच घ्यावी, जेव्हा त्या सुटीने आशय खुलणार असेल आणि ती सूट घेतल्याशिवाय आशय व्यक्तच होणार नसेल आणि एवढे सगळे करून तो आशय जबरदस्त असायला हवा.

============

आता 'किती एक्स्टेंटपर्यंत सूट घेतली जावी आणि आम्ही घेतली जास्त, तर काय' असा प्रश्न असल्यास शेवटी तुमच्या साहित्याचा आशय (ते प्रकाशित केल्यानंतर) जनताजनार्दनाला भावतो की नाही यावरच सगळे ठरणार. म्हणूनच ' तसा माझा ठ्याचा तो धीपासोन ओता गं' या तुमच्या अशुद्ध ओळीलाही दाद मिळाली आणि तुमच्या अनेक शुद्ध ओळींना कदाचित नसेलही मिळालेली.

============

हा एवढा मोठा चर्चेचा विषय करू नये असे आपले एक वैयक्तीक मत मांडून थांबतो

-'बेफिकीर'!

ओके बेफीजी मी ही थाम्बतो..................

तत्पूर्वी......

बेफीजी धन्यवाद
वृत्तात एखादी ओळ मग ती कवितेची असो वा गझलेची ती गोटीबंद असेल तर उत्तमच आहे हा माझा प्रामाणिक दृष्टीकोन आहे .
मात्र गझलेला आकृतीबंधाचा गोटीबंदपणा मुळातच अपेक्षित असतो .शेर गोटीबंद नसेल तर गझल करायचीच कशाला वगैरे सरळथेट प्रश्न प्रा. साहेबांनी मला उद्देशून एकदा उपस्थित केले ......
त्यावरून मी उखडलो
मुद्द्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयात्न्मात्र केला मी
भांडण /वाद /चर्चा /हे त्याचे वरकरणी दिसणारे रूप आहे
मुळात हे जे जे नियम असतात ते का असतात हे जाणून घेतल्याशिवाय मी माझा पुढचा गझलप्रवास असाच चालू ठेवणे मला रुचले नाही म्हणून मला जमेल त्या पाध्ध्तीने मी वाद अक्षरशः उकरून वगैरे काढण्याचा पावित्रा घेतला
माझा पावित्रा चुकीचाच असतो नेहमी हे कबूल आहे त्याबद्दल क्षमस्व

आपला प्रतिसादातून कितीतरी गोष्टी क्लीअर झाल्या धन्यवाद !!

शतशः धन्यवाद

Happy
_वैवकु

अंगापेक्षा बोंगा जड तशी गझलेपेक्षा चर्चा जास्त झाली

आम्हाला नेहमी इंदिराबाईंच्या सरकारची आठवण येते. ओरिसात भूकबळी जायचे त्या साली पंजाबात अपेक्षेपेक्षा अती पिकलेला गहू व्हाया मुंबई अरबी समुद्रात फेकायची योजना अंमलात आणली.

बासरी आणि तुझे बोल या दोन द्विपदी 'शेर' म्हणाव्यात अशा आहेत

बाकी 'गझल रोज झळकायचे बंद झाले' अशी ओळ तरहीस घ्यावी की कसे यावर विचार करत आम्ही आता बडिशोप खात आहोत. पाऊसही थांबला आहे. फिरून यावे की काय

कळावे

गंभीर समीक्षक

मतला सामान्य वाटला. दोन चार गोष्टी बंद झाल्या यापलीकडे काही विशेष सांगितल्यासारखे वाटले नाही. 'पावसाळ्यात मोर नाचतात' हे शास्त्र मान्य असले तरी दोन्ही ओळी 'विरार फास्ट' लोकलच्या दोन रुळांवरून जाणार्‍या दोन चाकांसारख्या वाटल्या. ठीक आहे राव मोर आता नाही नाचत, पण म्हणून प्रॉब्लेम काय आह ते तर सांगा? असे म्हणावेसे वाटले. म्हणून हासून पाहिले.