रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स

Submitted by रचना. on 16 June, 2012 - 04:03

­­आमच्या घरात पेपर वाचून झाल्यावर जागेवर ठेवण्यावरून नेहमी वादावादी होते. एके दिवशी नेटवर हा बॉक्स पाहिला. लगेच पसरलेले पेपर गोळा करून ५-६ बॉक्सेस बनवले. आता ह्यांचा उपयोग रद्दी, लेकाने गोळा केलेला त्याचा खजिना, खेळणी, लॉन्डी बॅग अश्या वाटेल त्या गोष्टी ठेवण्यासाठी होतो आहे.

साहित्य :-
वर्तमानपत्र
गोंद
बोन फोल्डर किंवा स्टिलची पट्टी

प्रथम वर्तमानपत्राची सगळी पानं वेगवेगळी करा. एक पान घेऊन त्याच्या ३ दा अशाप्रकारे घड्या घाला की साधारण १ १/२ - २ " ची पट्टी तयार होईल. प्रत्येक घडी घालतांना त्या घडीवरून बोन फोल्डर किंवा स्टिलची पट्टी जोर लावून फिरवा. ह्याने घडी नीट बसेल. ही पायरी पुढच्या कृतीसाठी आवश्यक आहे. मी अश्या १८ पट्ट्या वापरल्या आहेत. आकार लहान किंवा मोठा हवा असेल त्याप्रमाणे कमी किंवा जास्त पट्ट्या लागतील.

चार पट्ट्या घेऊन त्या एकमिकांत खाली दाखवल्याप्रमाणे विणा.

दोन पट्ट्या जिथे एकावर एक येतील तिथे-तिथे गोंद लावा.

नंतर दोन्ही बाजूंना आणखी २-२ पट्ट्या विणून घ्या.

परत दोन्ही बाजूंना आणखी २-२ पट्ट्या विणून घ्या. खाली अशी चटई तयार होईल.

आता चारही बाजूंच्या मोकळ्या पट्ट्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आत दुमडून बोन फोल्डरने घड्या घाला.

खाली जशी चटई विणली तशीच आता चार उभ्या बाजूंना विणायची आहे. थोडं कठिण आहे. पण करून पहिल्यावर जमेल.

आता तयार बॉक्सला वरून रंगीत कागद, रिबीन, लेस, कपडाची पट्टी लावून सजवा. यामुळे त्याला आणखी मजबुती येईल.

रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मॅगझीन मधिल पाने वापरुन) http://www.maayboli.com/node/35779

नियतकाल

गुलमोहर: 

मस्त!!

मस्तच झालाय बॉक्स! (फक्त एक स्टेप मला जरा विस्ताराने सांगाल का? चारही बाजू अशाच पद्धतीने विणून घ्यायच्या तर त्या चारही कोपर्‍यात एकमेकांना कशा चिकटवायच्या? ५ व्या फोटोनंतर आणि ६ व्या फोटोपूर्वी कुठली स्टेप करायची?)

शांकली,
उभ्या बाजू विणतांना मी कोपर्‍यापासून सुरवात न करता एका बाजूच्या मध्यापासून दुसर्‍या बाजूच्या मध्यापर्यंत असा c आकारात विणलं आहे. ह्याने जास्त मजबुती येते. नाहीतर बॉक्स कोपर्‍यातून सुटु शकतो. बॉक्सच्या एका पुर्ण फेरी साठी दोन c लागतात. c ची पट्टी आडवी पट्टी मोकळ्या उभ्या पट्टीला गोंदाने चिकटवायची आहे. नंतरची पट्टी विणतांना c चा जोड दुसर्‍या बाजूला येईल हे पहावे. म्हणजे एका बाजूला एकाखाली एक c चे जोड येणार नाहित.

सॉलीड.... या रविवारी करणार..... आणि झब्बु देणार...... खुपच उपयुक्त.....

शांकली ला विपूत दिलेले उत्तर इथे पण चिकटवते.
मी दिलेल्या मापात दोन सी पट्टया बरोबर पुरतात. बॉक्स लहान-मोठा किंवा चौकोनी एवजी आयाताकृती करायचा असल्यास जास्तीची पट्टी कापावी किंवा कमी पडत असेल तर आधीची पट्टी चिकटवून पुढे दुसरी पट्टी चिकटवा. दोन आडव्या पट्ट्यांचा जोड कोपर्‍यात किंवा एकावर एक यायला नको हे महत्वाचे. भिंत बांधतांना विटांचे जोड एकावर एक नसतात. तसेच काहीसे.

अशा खोक्यात अंदाजे किती किलो वजनाच सामान मावू शकेल? मला वाटत एक दीड किलो वजन सहज घेइल नाही का? त्या पट्ट्या जर जास्ती घड्या घालून आणखी अरुंद केल्या ( म्हणजे जास्त जाडीच्या) केल्या तर पट्ट्या जास्ती लागतील पण तो आणखी मजबूत होईल.व जास्ती वजन हीघेउ शकेल. बाकी बॉक्स मस्त जमलाय.

श्रीकांत,
ह्या मापाच्या खोका (मला खोका हा साधा शब्द आठवत नव्हता. दरवेळी डब्बा च आठवत होता.) दोन-अडिच किलो सामान नक्की घेतो. पट्ट्या अजुन अरुंद केल्या तर त्या फार जाड होतील आणि विणतांना, चिकटवतांना त्रासाचं होईल.
मॅगझीनच्या अश्याच बारिक पट्ट्यापासून केलेल्या वस्तु ५ व्या भागात दाखवणार आहे. ४ थ्या भागात त्यापासून ज्वेलरी केली आहे.

मस्त कल्पना आहे. आजच करुन बघतो. नाहीतरी रोज टीपॉयच्या खाली पडलेली रद्दी बघून बायको शिव्या घालत असतेच. Wink

Pages