येथ रिकाम्या हाती येसी, जाशी रिक्त या हाती तू
दोन रिक्तांमधली जागा, व्यापूनी टाक पुरुषार्थे तू
जगरहाटीने स्मित खुलो परि, दुःख गिळावे मनोमनी
हसवूनी जगां सवे हसुनी, गंध पसरो दश दिशांतुनी ॥
मिथ्या, नश्वर जग भवसागर, भार तयाचा पित्यांवरी
मनी वासना, चित्ती तृष्णा, नाम लटके मुखावरी
लोभ सुटेना, ज्ञान पटेना, होई स्थिती त्रिशंकु परी
भोगास मिती अन जीवन निष्ठा, बोध तुज हा खरोखरी ॥
घरात साऱ्या सुगंध पसरवी, पारिजात तू होऊनीया
कष्टांची जर होता वृष्टी, सोस पाषाण होऊनीया
भाग्य तुझे जर होसी तू, त्या तृण आणि फळापरी
सर्वांसाठी होऊन जा तू, कशापरी अन कशापरी ॥
आचरिसी तू साऱ्या कर्मां, काम प्रेरित होऊनीया
मद, लोभ, अन मोह ही येती, होता सफल त्यातुनीया
मी केले ह्या श्रेय ही माझे, मद तयातुनी जन्मतसे
लोभापायी पुन्हा फलाच्या, मोह तयाचा उपजतसे ॥
कर्म तुवां जे आचरिले ते विफल होतसे कधी जरी
क्रोध कारणावरी होई जर, अवलंबुन ते तुझ्यावरी
नसेल तुझी जर का सत्ता, विफलतेच्या मुळावरी
मत्सर करुनी त्याचा तुही, खंगत जासी खरोखरी ॥
अंतरंगी ते सत्य वसे की, जे मज बाह्य जगी दिसे
कां हे असे अन ते का तसे, कि मलाच सारे हे भासे ?
शोध तयाचा पुरता घेता, सत्यनिष्ठ ते सत्व दिसे
आत्मनिष्ठ तू होऊन बघता, चित्र सारे स्पष्ट असे ।|
कां असे हे जग असे ? कां असे कांही त्यां प्रयोजन ?
अस्तव्यस्त हे दिसे असे की, असे काहीसे नियोजन ?
भार तुझा ना अर्थ शोधण्या, कारण आणि विश्लेषण
तू येता जग होते त्याहूनी, सुंदर करणे तुज भूषण ॥