'अग्नी-५'च्या निमित्ताने

Submitted by श्रीकांत काशीकर on 23 April, 2012 - 09:38

आपले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी "भारत २०२०" हे स्वप्न पाहिलं. आपला देश महासत्ता होईल असा विश्वास आपल्या देशबांधवांना दिला. साऱ्या जगाच्या नजरा भारताकडे लागल्या. हे सारे खरे आहे. पण खरंच हे घडेल का?

अशी शंका का यावी? आणि तीही 'अग्नी-५' चे यश हाती असताना! आश्चर्य वाटतंय नं? वाटो. मला मात्र वेदना जाणवतात. का? काय महत्त्व 'अग्नी-५'ला दिलं आम्ही? 'अग्नी-५'चं यश पाहून किती लोकांनी आनंदोत्सव साजरा केला? किती फटाके वाजले? ज्या घटनेनं आमच्या शेजारच्याच काय पण जगातल्या अन्य मोठ्या राष्ट्रांचे एका अर्थानं धाबे दणाणले त्या घटनेचं स्वागत आम्ही कसं केलं? या साऱ्या प्रश्नांचं मोहोळ मनात उठतं.

आज देशातील तरुणच काय तर त्यांचे आजोबाही क्रिकेटज्वरानं ग्रासले आहेत. भारताचा सामना सुरु असेल तर साऱ्यांचे लक्ष त्याकडेच. पाकिस्तानशी सामना असेल तर रस्ते संचारबंदीची आठवण करून देतात. सामना जिंकला तर फटाक्यांचे आवाज तोफांची आठवण करून देतात. अगदी रात्री - अपरात्रीही. आणि हे सारं अगदी स्वेच्छेने. ना आदेश ना फतवा. मतभेद, पंथभेद, पक्षभेद, आर्थिक - सामाजिक - शैक्षणिक अंतर कशाकशाचा भेद नसतो. गल्ली ते दिल्ली फक्त हा आणि हाच विषय. त्याखालोखाल चर्चा असते चित्रपटक्षेत्राची. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील 'उताऱ्याला योग्य शीर्षक' द्यायला ज्यांना जमलं नाही अशी मंडळीही अभिनेत्यांच्या घरातील बारशाची, नाव काय ठेवायचं याची चर्चा करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर ' अग्नी-५' ची दखल आम्ही कशी घेतली? त्या संशोधकांचं अभिनंदन करण्यासाठी, हा आनंद share करण्यासाठी किती एसएम्एस पाठवले गेले?
ज्या घटनेचा आपल्या देशाच्या म्हणजेच पर्यायानं आमच्या व्यक्तिगत सुरक्षेशी संबंध आहे त्या घटनेबद्दल आमची प्रतिक्रिया काय ?

माझं ना क्रिकेटशी वैर ना चित्रपटाशी. पण शालेय जीवनातल्या १९६५ व १९७१ च्या युद्धांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. चर्चा, सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सभा, प्रभात फेऱ्या, प्रार्थना कितीतरी उपक्रम. अगदी शालेय विद्यार्थ्यांचा सहभागही महत्त्वपूर्ण असायचा. त्यानंतर विजयाचा जल्लोष, गणेशोत्सवातील त्यासंबंधीचे देखावे. काय काय सांगावं ? या पार्श्वभूमीवर 'अग्नी-५' च्या स्वागताचा उत्साह जाणवला का? नसेल तर का नाही? आमच्या शास्त्रज्ञान्चा उत्साह मग वाढेल कसा? नवे संशोधक निर्माण व्हावेत कसे? क्रिकेटपटू आणि अभिनेते यांच्यासाठी पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी, उद्योजकांपासून शासनापर्यंत साऱ्यांकडून बक्षिसांची उधळण; पण मग आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रासाठी करणाऱ्या संशोधकांना समाज काय देतो? खेळाडूंना महत्त्व नाही असं नाही पण काही गोष्टींचा तारतम्याने विचार करायची वेळ आली आहे हे नक्की. राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर सर्व क्षेत्रांकडे लक्ष हवं हे जितकं खरं तितकंच त्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम योग्य रीतीने लावणे आवश्यक आहे हेही महत्त्वाचं. अर्थात हे झाले माझे विचार, साऱ्यांचे तसेच असले पाहिजेत असं नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जाहिरात झाली नाही ना !! हे कारण होते.
आजकाल लोकांनी काय आवडून घ्यायचे, कशाचा गौरव करायचा, कशाचे कौतुक करायचे, हे प्रसार माध्यमे ठरवतात.
मला ही बातमी महत्वाची वाटली, पण ती विस्ताराने कुठल्याही वर्तमानपत्रात वाचायला मिळाली नाही.

'अग्नी-५'चं यश पाहून किती लोकांनी आनंदोत्सव साजरा केला?
>>> मी नक्की साजरा केला.. Happy कॉलेजमध्ये असताना शेवटच्या वर्षी अग्नी-२ चे मॉडेल बनवले होते. मस्त आठ्वणी आणि अनुभव आहेत ते.. Happy

या अस्त्राचा उपयोग(वापर) भारतासारखा देश कधी करेल का? देशावर एकादा हल्ला झाल्यावर, हल्लाकर्त्या देशावर हल्ला करायला ताकीद, निषेध, निंदा यासारखी अस्त्रे या देशाच्या मंत्र्यां-संत्र्याकडे असताना या ५०००+(आंतरखंडीय) क्षेपणास्त्राची गरजच काय भारताला. शिवाय स्वातंत्र्यप्राप्ती नंतर स्वतंत्र भारताला सैन्याची गरजच काय असे विचारणार्‍या एक महान महात्माजीच्या अंहीसावादी देशाने इतके संहारक अस्त्र बाळगणे हा त्या अहींसावादाचा अपमानच नाही का? आणी यांची अंतर्गत सुरक्षाव्यवस्थाच इतकी ढिसाळ आहे की बाहेरून कुणाला लढाई करण्याची गरजच नाहिये. इथं खुद्दं आपल्याच संरक्षण खात्याचे दारूगोळा भरलेली ट्रक नाहिशी होतायेत, बंदुकी, बॉम्बही होत असतीलच. (परवाच खुद्द कृपाशंकरच्या घरात बेकादेशीर जिवंत ११० काडतुसं सापडली म्हणे!). एखादा कट्टर नक्षलवादी सोडाच, या व्यवस्थेला कंटाळून असंतोषानी खदखदलेला तरूण आज केंद्रिय मंत्र्याला झापड मारतोय उद्या संसदेवरच बाँबही फेकेल!

हा पैसा पायाभुत सुविधा उभारण्यासाठी वापरता आला नसता का?

साध्या कॉमनवेल्थ गेम्सचा घोटाळा शेकडो कोटी झाला. इथं तर मग गोपनियतेच्या पडद्याआडून हजारो कोटींचा घोटाळा होत असेल, आणि कधी उजेडातही येणार नाही.

अग्नी-५ ची चाचाणी यशस्वी झाली... चांगली घटना आहे त्याचा आनंद साजरा करतांना लष्करा बाबत येणार्‍या बातम्यांबद्दल चिंता व्यक्त करायची ?

याच काळात सैन्य/ पायदळा कडे दारुगोळा नाही, सामग्री अत्यंत जुनकट आहे, अशा अनेक बातम्या बाहेर आलेल्या आहेत. अनेक हजारो कोटींचे कंत्राटांचेह भिजत घोंगडे पडलेले आहे. मिळालेल्या पैशांचे % तर नौदलापेक्षा कमी आहे. नक्की आकडे महत्वाचे नाहीत. सर्वांत चिंतेची बाब म्हणजे जानेवारी मधे सैन्याची एक तुकडी दिल्ली कडे पुर्व सुचना न देता निघाली आहे अशी बातमी पसरवणे. नंतर सरकारनेच म्हणायचे असे काही नव्हते, त्यांचा नित्याचाच सराव चाललेला होता. येथे मला जाणते नोकरशाही लष्कराची थट्टा करते आहे असे जाणवते.... तुमचे वैर एका व्यक्तीशी (सैन्य प्रमुखाशी) आहे पण तुम्ही एका संस्थेला जेरिस नाही धरु शकत...

संरक्षण मंत्री अँटोनी, संसदेत देशाची दिशाभुल करणारी धादांत खोटी उत्तरे देतो. १५ महिन्यांपुर्वी, लष्करप्रमुखांनी १४ कोटीच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली होती.... पण हे मंत्री झोपले होते काय? त्यांचे संसदेत उत्तर होते, मी प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले होते, त्यांनी चौकशी करण्यास नकार दिला. अरे मग ते संरक्षण मंत्री आहेस, तु त्याच वेळी त्यांच्यावर कारवाई का नाही केली ? आज एप्रिल २०१२ मधे पाळे मुळे खणुन काढायचे आश्वासन देत आहेस ?

हजारो कोटींच्या व्यावहारांत काही % मिळाले, नाही मिळाले तर कुर बुर सुरु आहे का ? हे व अशे अनेक प्रश्न मला अनुत्तरित करतात.

श्रीकांतकाका

विषय पोहोचला इतकंच म्हणतो.
मात्र वाचत असतानाच सत्ते पे सत्ता सिनेमात अमिताभचे भाऊ बार मधे जाऊन दूध मागतात त्याची आठवण झाली....