ही मुले............ ती मुले

Submitted by मंजिरी सोमण on 28 March, 2012 - 00:54

ही मुले :
ही मुले म्हणजे आमच्या ऋतुरंग च्या 'ए' 'बी' आणि 'सी' बिल्डींग मध्ये राहणारी छोटी छोटी निरागस मुले. ठराविक दिनक्रम, चाकोरीबद्ध सुरक्षित आयुष्य, एका ठराविक पातळीवरच सर्व गोष्टी घडतात असा बालसुलभ निरागसपणा ठामपणे आपल्या सोबत घेऊन वावरणारी अशी 'ही मुले'. तीनही बिल्डींगची मिळून मोठ्या संख्येने आढळणारी, प्रत्येक वयोगटातली अगदी सहा महिन्यांपासून ते दहा वर्षांपर्यंतची आमची 'ही मुले'. यांना आम्ही रोज बघतो.
प्रत्येक घरात एक किंवा दोन अशी 'ही मुले' लाडाची, कौतुकाची. प्रसंगी हट्टी, क्वचित बेजबाबदार, आपल्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द आई बाबांनी झेललाच पाहिजे अशी सवयीने आग्रही स्वभावाची बनलेली अशी 'ही मुले'.

ती मुले :
आमच्याच ऋतुरंग च्या 'इ' बिल्डींगच्या बांधकामाने अचानक जोर पकडला. येत्या दीड ते दोन वर्षांमध्ये ही 'इ' विंग पूर्ण झालीच पाहिजे म्हणून अनेक मजूर कामावर रुजू झाले. त्यांच्या बरोबरीने कामाला आल्या त्यांच्या बायका. रोजंदारीची मजुरी त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत थोडे दिवसांसाठी थाटलेल्या तुटपुंज्या झोपडीवजा खोपटात वाढणारी अशी 'ती मुले'. असतील एक दहा-बारा मुले..... वेगवेगळ्या वयोगटातली. सहा महिन्यांपासून ते दहा वर्षांपर्यंतची. त्यांना आम्ही रोज बघतो.
प्रत्येक खोपटात दोन-दोन, तीन-तीन मुले, नैसर्गिक कर्तव्यातून जन्माला आलेली. ना कसली दिनचर्या, ना साचेबद्ध आयुष्य, ना कसलं उद्दीष्ट डोळ्यासमोर... खरं सांगू, खर्‍या अर्थाने मूलपण अनुभवू शकणारी, कदाचित स्वच्छंदी म्हणता येतील अशी 'ती मुले'.

ही मुले :
सकाळी उठून आवरून शाळेत जायचं, आल्यावर वाकडी तोंड करत आईने केलेले सुग्रास अन्न टीव्हीच्या आधाराने कसबसं घश्याखाली ढकलणारी 'ही मुले'. संध्याकाळी कसलातरी क्लास किंवा ग्राउंड, त्याआधी थोडा मारून मुटकून केलेला अभ्यास, नंतर बिल्डींग मधल्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळ, सायकलिंग, स्केटिंग, झोपाळे... आई ओरडून घरी नेइपर्यन्त लॉन वर मनसोक्त खेळणारी, आपापल्या भावंडांशी यथेच्छ भांडण करणारी 'ही मुले'. मापात मारामारी, किंचीतशी, पण आई-वडिलांच्या जीवाचं पाणी पाणी करणारी पडझड. जरा कुठे शिंक आली की काळजीने लगेच डॉक्टरांकडे पाळणाऱ्या आई-बाबांबरोबरची 'ही मुले'. फास्ट फूड, मॉल्स, मल्टीप्लेक्स यांची सवय आणि आवड असणारी अशी 'ही मुले'.

ती मुले :
सकाळी लवकर उठून आवरून आईबाप कामाला जुंपायच्या आत तयार होणारी आणि आपल्या धाकट्या भावंडांसाठी दिवसभर पालकच बनणारी 'ती मुले'. 'ह्या मुलांकडे' विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणारी, शाळेच्या व्हॅन साठी वेगवेगळे रंगीत गणवेष घालून थांबलेल्या 'ह्या मुलांना' न्याहाळणारी, सगळीकडे शुकशुकाट असेल त्यावेळी आपल्या बालसुलभ कुतूहलाने पण कोणीतरी पटकन ओरडेल म्हणून घाबरत घाबरत हळूच बागेतले एक दोन झोके घेऊन बघणारी 'ती मुले'. 'ह्या मुलांच्या' विविध गोष्टींकडे, बांधकामासाठी टाकलेल्या वाळूच्या ढिगावर गुपचूप आपल्या लहान भावंडांना मुकाट्याने खेळवत उत्सुकतेने बघणारी पण हट्ट न करणारी, परिस्थितीने समजूतदार व प्रौढ बनलेली अशी 'ती मुले'. पाचवीलाच पुजलेली पडझड, मारामारी, दुर्लक्षित आजारपणं, भुकेला कोंडा निजेला धोंडा अशी वृत्ती अंगात झिरपलेली, थंडी-वारा-ऊन-पाऊस या गोष्टींची खोपटेवजा घरापेक्षा जास्त जवळीक असणारी 'ती मुले'.

मुले सारखीच पण विरोधाभास प्रचंड.... निरागसता, अनभिज्ञता दोन्हीकडे सारखीच पण जगण्याच्या व्याख्या वेगळ्या. 'ह्या मुलांचे' हट्ट वेगळे, 'त्या मुलांच्या' जबाबदार्‍या वेगळ्या. 'ह्या मुलांची' कोडकौतुक वेगळी,' त्या मुलांच्या' फक्त जीवनावश्यक गरजा वेगळ्या, 'ह्या मुलांना' क्षणभर ही एकटे न सोडणारे जागरूक पालक, 'त्या मुलांच्या' डोळ्यात क्षणभर तरी आईबापाजवळ जाता येईल का असे भाव..... शाळेत कंटाळत, रडत जाणारी 'ही मुले' आणि शाळेबद्दल अनामिक कुतूहल घेऊन भावंडांना बिनबोभाट सांभाळणारी 'ती मुले'..... ना 'ह्या मुलांना' या विरोधाभासाची जाणीव ना 'त्या मुलांना' त्यांच्या अपरिहार्यतेची ....

परिस्थिती, नशीब, दैव, शिक्षण, पैसा, जागरुकता... काहीही म्हणा, हा विरोधाभास नजरेत येतो, खुपतो, टोचत राहतो. पुढे कदाचित मोठे झाल्यानंतर 'ही मुले' अशाच कुठल्याश्या हौसिंग कॉम्प्लेक्स मध्ये घरं आरक्षित करतील आणि मोठी झालेली 'ती मुले' त्या स्वप्न बांधणीच्या कामावर रुजू होतील. ही दरी अशीच राहणार कायम....

आपण काय करू शकतो? परिस्थिती बदलू शकतो?.... नाही, दरी कमी करू शकतो?........ खूप अवघड आहे...... पण एक करू शकतो... किमान आपल्या मुलांना एवढी जाणीव तरी नक्की करून देऊ शकतो की आपल्याला मनात येईल ती प्रत्येक न प्रत्येक गोष्ट सहज-साध्य आहे, जी 'त्या मुलांना' माहिती पण नाहीये... आपण रोज खातो ते अन्न 'त्या मुलांना' फक्त सणासुदीलाच दिसू शकतं याची जाणीव करून देऊ शकतो. ते वाया न घालवण्याची शिकवण देऊ शकतो. 'त्या मुलांच्या' आयुष्यातील खडतरपणाची/हार्डशिपची कल्पना देऊ शकतो. आपल्या अंगवळणी पडलेल्या जीवनशैलीत 'डाऊन टू अर्थ' राहायला शिकवू शकतो. जे आहे, जे मिळालंय त्याबद्दल देवाचे आभार मानायला शिकवू शकतो, ऋणी राहायला शिकवू शकतो.

एवढे तरी आपण नक्की करू शकतो, नाही का?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

हा लेख आमच्या सोसायटीच्या वार्षिक नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. या अंकाचे प्रकाशन परांजपे बिल्डर्स चे श्री. शशांक परांजपे आणि निर्माता दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते झाले.
IMG_6851.JPG

मनोज ने केलेले अंकाचे मुखपृष्ठ.
rasicrang mukhaprushtha.jpeg

गुलमोहर: 

अशा मूलांना किमान अक्षरओळख करुन द्यायचे काम, या मूलांच्या आईबाबांपैकी, ज्यांना वेळ असेल त्यांना करता आले असते.

छान! हे विचार फार येतात मनात

एकदा एक लहान मुलगी आपल्या आईबरोबर रस्त्यातून चाललेली होती. समोरून एका मजुराची तितकीच लहान मुलगी खेळता खेळता या मुलीकडे पाहू लागली. या मुलीच्या अंगावर उंची फ्रॉक होता, चांगल्या चपला होत्या, हातात छानसे खेळणे होते

ती मजुराची बिचारी मुलगी नुसतीच तिच्याकडे पाहात राहिली

फार वाईट वाटले

काय आले असेल तिच्या मनात

लहान मुलांना विषमतेचे अनुभव आले आणि त्यांना गप्प बसून ते मान्य करायला लागले तर माझा संताप होतो

असे वाटते त्याला उचलून त्याला जे जे हवे ते देऊन खुष करावे

मंजिरी सोमण,

आपला लेख सुंदर, मासिकात आल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन

नेहमीप्रमाणे स्वतःचेच तुणतुणे वाजवत बसलो मी, तुमच्या लेखामुळे ते आठवले इतकेच Happy

धन्यवाद

मंजे, खरच बरेच अंतर्मुख करायला लावणारा लेख. माझ्या मुलीच्या लहानपणी ती जर एखाद्या ठरावीक ड्रेससाठी / फ्रॉकसाठी हट्ट करु लागायची तेव्हा आमच्या सोसायटीच्या बांधकामावरच्या मजुरांची ती मुले दाखवायचो (त्यातल्याच एका मुलीने माझ्या मुलीचा जुना वापरलेला फ्रॉक त्यावेळी घातलेला असायचा). ती मुले जुने ड्रेस घालूनसुध्धा किती समाधानी असायची. कदाचीत आपल्या मुलांमधे आलेली ही असमाधानी वृत्ती आपल्यामुळेच त्यांच्या मनात बिंबली आहे का? हा विचार करायला हवा. कदाचीत आपल्या लहानपणी काही गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या आपली परिस्थीती बरी असल्याने किंवा काळाची गरज म्हणून म्हणा आपण आपल्या मुलांना सहज देऊ करतो का?

सॉरी मंजिरी, नाही भावला लेख.

दिनेशदा + १.
किमान अक्षरओळख आणि मूलभूत आरोग्याचे धडे तरी आपण स्वत:, आपल्या मुलांकरवी 'त्या मुलांना' देऊ शकतो.

शहरी विभागात ही विषमता दिसतेच आजकाल. Sad आपल्या मुलांना त्याची जाणीव करून द्यायलाच हवी.
दोन्ही परिस्थितींतली तफावत लक्षात घेणे ही पहिली पायरी झाली.
सेवाभावी वृत्तीची माणसं त्यापुढे जाऊन काहीतरी करू पाहतात.

चांगला लेख मंजे. आवडला.
ट्रेन मध्ये सुद्धा जेव्हा काहीबाही विकणार्‍या बायांच्या कडेवर बांधलेलं एखादं तान्हं मूल दिसतं तेव्हा एकदा तरी विचार येतोच की हे मोठं झाल्यावर काय करेल Sad

मंजे,
विरोधाभास शब्दांत अचूक पकडला आहेस.

आपण काय करू शकतो? परिस्थिती बदलू शकतो?.... नाही, दरी कमी करू शकतो?........ खूप अवघड आहे...... पण एक करू .................................
..................देवाचे आभार मानायला शिकवू शकतो, ऋणी राहायला शिकवू शकतो.
>>>>> +१००

खुप अंतर्मुख करणारा लेख!!! तुमच्यातल्या संवेदनशील मनाने दोघांमधला विरोधाभास जाणुन घेतला म्हणुन. नाहीतर इतर लोक दुर्लक्षच करतात. एखादी चांगल्या घरची चिमुरडी जेव्हा हातातलं चोकोबार तिच्याच वयाच्या दुसर्या कळकट फ्रॉक घातलेल्या मुलीला दाखवत खात असते... तेव्हा खरच वाईट वाटते. Sad तेव्हा वाटतं की गुन्हेगारीचं बीज अशा असमानतेतुनच आणि या वयातच पेरलं जात असावं!

रच्याकने, एकदा नाशिकहुन येतांना जुन्नरजवळच्या एका मस्त ढाब्यावर, एक जोडपं अशाच मजुरांच्या १२-१५ मुलांना घेउन जेवणास आलं होतं तेव्हा फार कौतुक वाटलं होतं त्यांचं. Happy

..

मंजिरी...
लेख आवडला... विशेषतः तू स्वतः केलेलं निरीक्षण, आणी त्या अनुषंगाने शब्द-बद्ध केलेले तुझे स्वतःचे विचार... दोघांचीही दखल घेतोय... जमल्यास आज रात्री 'विपु' तपासुन घे...
Keep-it-up...

ललिता +१
लहानपणी १-२रीत असताना एकदा बाबा भेळ खायला घेऊन गेले होते (जरा दुर्मिळच घटना होती आमच्यासाठी) तेव्हा ऑर्डर दिल्यावर माझ्या एवढीच एक लहान मुलगी खाली पडलेले भेळेचे कागद चाटत होती ती दिसली. तिथली लोकं निवांतपणे दुर्लक्ष करून खात होती. दुकानदार तिला हाकलू पहात होता. तेव्हा कधीही बाहेर वावरताना न संतापणारे बाबा चिडलेले आम्ही पाहिले. त्यांनी दुकानदाराला 'थोडक्या' शब्दातच 'समजावले' आणि त्या मुली साठी आणि तिच्या छोट्या भावासाठी दोन भेळी आधी त्याला तयार करून द्यायला लावल्या. त्या मुलीने भीतभीत पण बाबांना एक गोड हसू देऊन ती भेळ घेतली, आणि रस्त्यावरच्या समस्त ८-१० पोरांना एकत्र करून सगळ्यांनी वाटून खाल्ली. त्या दिवशीची भेळ खाताना मला रडूच येत होतं.. आयुष्यात कधीही मी त्यानंतर भावाशी कुठल्याही गोष्टीच्या वाटणीवरून बालसुलभ सुद्धा भांडले नाहीये.. माझ्या आयुष्यातला खूप मोठा धडा होता तो. बाबांनी याविषयी एकही शब्द न बोलता आम्हाला शिकवलेला...

लेख आवडला.
वरदा , छान!

आपल्याला काही शक्य अहे का हे सुचणे करणं आणि जमणंही महत्त्वाचं आहे.
आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांना ते जमो!

आपण काय करू शकतो? परिस्थिती बदलू शकतो?.... नाही, दरी कमी करू शकतो?........ खूप अवघड आहे......>>>

आपण बरंच काही करु शकतो. मी स्वतः अशा मुलांसाठी काम करणार्‍या संस्थांशी संबंधित आहे. मायबोलीवरचेच हे धागे पहाः
http://www.maayboli.com/node/33850
http://www.maayboli.com/node/30254

कविता महाजन ह्यांच्या 'ग्राफिटी वॉल' मधे एक कवितेचा अनुवाद आहे.
"कुछ बच्चे .. और बहुत सारे बच्चे" असं काहीसं शीर्षक आहे त्याचं. (मला आत्ता exactly आठवत नाहीये). त्याची आठवण झाली हे वाचून.
आपल्या जाणीवा/नेणीवा जागृत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अगदी साधीशी किंवा चैनीची गोष्ट घेण्यापूर्वी विचार करायला प्रवृत्त करणारी कविता आहे ती.
तुमचा हा लेखही असाच.

मंजिरी दिनेशदा आणि मंजुडी ने म्हटल्याप्रमाणे त्या मुलांना अक्षर ओळख, बेसिक स्वच्छतेचे धडे, अधून मधून पौष्टीक जेवण वगेरे तुम्ही सोसायटितले सगळे मिळून देऊ शकता ना? आपल्या मुलांना समजावणे वगेरे ठीक आहे. पण ते निव्वळ ही मुलं आता तुमच्या सोसायटीत रहात आहेत म्हणून नाही तर या बेसीक गोष्टी आपण आपल्या मुलांना अशाही सांगायलाच हव्या ना. अन्न, पाणी, वीज याचा अपव्यय न करणे हे काही जगात गरीब मुले आहेत म्हणून करायची गोष्ट नाहिये ना? ती प्रत्येकाची जबाबदारी आहेच ना.

दरी मिटवता येणार नाही पण कमी करायचा प्रयत्न जरूर करता येईल.

वरदा +१

दिनेशदा, मंजूडी, आणि फुलपाखरू,

लेखाचा मूळ उद्देश हा आहे की 'ह्या मुलांना' जाणीव नाहीये समाजातल्या विषमतेची जी त्यांना करून दिली पाहिजे. सगळंच सहज, सोपं नाहीये हेच त्यांना समजावून द्यायचं आहे. ललिताने लिहिल्याप्रमाणे आधी पहिली पायरी तर चढायला हवी मग पुढे जाता येईल.
अन्न, पाणी, वीज याचा अपव्यय न करणे हे काही जगात गरीब मुले आहेत म्हणून करायची गोष्ट नाहिये ना? ती प्रत्येकाची जबाबदारी आहेच ना. >>>>>>>>> त्या जबाबदारीची जाणीव 'ह्या मुलांना' करून देण्याच्या मार्गांपैकी एक मार्ग मी लेखात नमूद केलेला आहे जो आपल्या मुलांना समजावून देताना आपण अंगिकारू शकतो. इतरही अनेक मार्ग असतील. मी फक्त 'ह्या मुलांच्या' जाणीवेभोवती हा लेख गुंफायचा प्रयत्न केला आहे.... 'त्या मुलांना' सद्य परिस्थितीतून कसे बाहेर काढू शकतो हा पुढचा प्रश्न आहे. अनेक सेवाभावी संस्था या बाबतीत कार्यरत आहेत पण दरी आहे तेवढीच आहे अजूनही.

फक्त अक्षरओळख करून देऊन असा काय फरक पडणार आहे आमच्या बिल्डिंगमधल्या 'त्या मुलांच्या' परिस्थितीत?

माझ्या लेखाचा रोख हा 'ह्या मुलांना' सगळ्या गोष्टी सहजसाध्य आणि सोप्या वाटणं याकडे आहे आणि तो आधी प्रत्येक आईवडिलांनी जबाबदारीने दूर केला पाहिजे मग 'त्या मुलांसाठी' काय करू शकतो हा विचार येतो.

आपण असेच आपल्या मुलांना सांगू शकतोच की अन्न, वीज, पाणी याचा अपव्यय करू नये पण त्याने त्यांच्यापर्यंत ही विषमता कितपत पोचेल? Happy

प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

आपल्या जाणीवा/नेणीवा जागृत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अगदी साधीशी किंवा चैनीची गोष्ट घेण्यापूर्वी विचार करायला प्रवृत्त करणारी>>>>>>>>>>>>

रार, धन्यवाद, मला माझ्या लेखात एक्झॅक्टली हाच मुद्दा मांडायचा आहे Happy

मंजिरी सोमण,

तुमची संवेदनाशीलता आवडली. प्रतिसादांत अनेकांनी सांगितल्याप्रमाणे आपण बर्‍याच गोष्टी करू शकतो. मात्र एक गोष्ट आपल्या नजरेतून सुटली आहे.

ती म्हणजे सरकारचे दायित्व. बहुतांश मजूर गावांतून विस्थापित झालेले असतात. शासन जर (पंचवर्षिक योजनांतून) ग्रामीण विकासावर एव्हढा पैसा खर्च करीत असेल, तर गावाकडून शहरांकडे लोंढे का येताहेत? कल्पना करा या रस्त्यावरच्या पोरांना त्यांच्याच गावी शिक्षण आणि पालनपोषण मिळालं असतं तर...!

या दुरवस्थेला कारण सरकारी भ्रष्टाचार आहे हे उघड आहे. म्हणूनच आपण सरकारला जाब विचारला पाहिजे. हे कसे करायचे त्याची रूपरेषा स्पष्ट नसल्याने विचारमंथन स्वागतार्ह ठरेल. Happy

आ.न.,
-गा.पै.

हम्म्म! लेख उत्तम जमला आहे.
समाजात असलेल्या भयानक विषमतेची जाणिव असणे फार महत्वाचे आहे. त्याने पाय जमिनीवर राहायला मदत होते आणि एखाद्या समाजघटकाबद्दल बेफाम अन्यायकारक आणि मूर्ख सामान्यीकरण करणारी मते पटत नाहीत हा माझा अनुभव.
मुलं सभोवतालची विषमता टिपत असतातच, तिच्याशी कसे डील करायचे हे मात्र ती आपल्याकडून शिकतात. त्यामुळे पालक म्हणून आपले वागणे फार काळजीपूर्वक असायला हवे. याची सुरुवात घरकाम करणार्‍या व्यक्तिंशी आपण कसे वागतो, बोलतो येथूनच होते.

अतिशय सुंदर लेख! खूप आवडला. शेवटचा परिच्छेद - आपण काय करू शकतो हे प्रत्येकाने ठरवायचे आहे पण बाकी लेखातील वर्णन एकदम आवडले.

Pages