'कोकणमय' (७) — जयगणेश मंदिर, श्री रामेश्वर (कांदळगाव), श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी), जलमंदिर (बिळवस)

Submitted by जिप्सी on 8 March, 2012 - 23:52

'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"
'कोकणमय' (६) — "तारकर्ली-देवबाग"

=======================================================================
=======================================================================
जय गणेश मंदिर (मालवण)
मालवण शहरापासुन अर्धा किमी अंतरावर असलेलं "जयगणेश मंदिर" हे अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. या मंदिराची स्थापना कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी केली आहे. श्रीगणेशभक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय मिळवून द्यावा, जागतिक व्यापार-उद्योगापासुन ते खेळापर्यंत सर्वच आघाड्यावर भारतीयांना जय मिळावा, या संकल्पनेतूनच या मंदिराचे नाव "जय गणेश" असे ठेवण्यात आले आहे. सभामंडपाच्या गाभार्‍यातील घुमटावर आतल्या बाजूने गणपतीच्या आठ मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपामध्ये उभे राहिल्यानंतर आठ दिशांना असलेल्या आठही मूर्ती आपल्याभोवती आपले रक्षण करण्यासाठी उभ्या आहेत अशी दृढ भावना मनामध्ये उत्पन्न होते आणि तेथे उभे राहिल्यानंतर समोर दिसणारा हा सुवर्णगणेश सिद्धी-बुद्धीसहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने आणि दयादृष्टीने पाहतो आहे असेच भासते. जय गणेश मंदिरात सिद्धीच्या हातात ढाल,तलवार आणि बुद्धीच्या हातात कागद, लेखणी असून गणेशाचे पारंपारीक ध्यान मन प्रसन्न करणारे आहे.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

रामेश्वर आश्रम (मालवण)
प्रचि ०७
श्री रामेश्वर मंदिर (कांदळगाव)
मालवणपासून अवघ्या सात-आठ कि. मी. अंतरावर असलेले कांदळगावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. कांदळगावचे रामेश्‍वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा रामेश्‍वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो. सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना समुद्रातील भरतीच्या पाण्याने तटबंदीचे दगड ढासळत होते. किल्ला आकार घेत असताना लावलेले दगड कोसळत होते. बांधकामात सतत व्यत्यय येत होता. महाराज व्यथित झाले. त्याचवेळी त्यांना दृष्टांत झाला. मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्‍वर त्यांच्या स्वप्नात आले. ‘‘मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंडी आहे. ती उघड्यावर असून तिच्यावर प्रथम छत्र उभे कर आणि नंतरच किल्ल्याचे बांधकाम सुरू कर.’’ रामेश्‍वराने दिलेल्या दृष्टांतानुसार छत्रपतींची स्वारी उत्तरेकडे शिवपींडी शोधावयास निघाली. जंगलमय, सखल भाग, कांदळवन, पाणी व चिखलाची दलदल असा परिसर असलेल्या एका राईमध्ये महाराजांना पिंडी आढळून आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रामेश्‍वराच्या सांगण्यानुसार शिवपिंडीवर एका रात्रीत घुमटी बांधली. स्वयंभू पाषाणाला पुराचे पाणी लागू नये यासाठी घुमटीच्या चारही बाजूने कठडा उभारला. त्या घुमटीसमोर आठवण म्हणून वटवृक्षाचे रोपटे लावले. ते वडाचे झाड सध्या ‘शिवाजीचा वड’ म्हणून ओळखले जाते. घुमटी बांधून झाल्यानंतर किल्ल्याच्या बांधकामात कोणतेही विघ्न आले नाही आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदळगाव यांचे नाव अधिक दृढ करणारा आणि या नात्याची आजच्या पिढीला साक्ष देणारा असा हा उत्सव. रामेश्‍वर पंचायतन सकाळी वाजत गाजत बाहेर पडते. पालखी, तरंगे व वारीसुत्रांसह सिंधुदुर्ग किल्ल्यावर निघालेली ही स्वारी मार्गातील कामरादेवी, सीमा म्हारतळ, मारुती घाटी यांना सांगणे करून पुढच्या प्रवासाला निघते. गांगोचा अवसर कोळंब खाप्रेश्‍वराला भेटायला जातो. कोळंब पुलावर रामेश्‍वराच्या स्वारीचे शाही स्वागत होते. त्यानंतर मेढा जोशी महापुरुष मांडावर देव स्थिर होतात. या मांडावर इतर वारीसुत्रे विसर्जित होतात. मात्र रामेश्‍वराचा अवसर विसर्जित होत नाही. दुपारी श्री देव रामेश्‍वर आपल्या लवाजम्यासह जोशींच्याच होडीने सिंधुदुर्ग किल्लयावर जातो. किल्ल्यात प्रवेश करताना २१ नारळ फोडले जातात. हा सोहळाच अपूर्व असा असतो.
(साभार रामेश्‍वराची सिंधुदुर्ग किल्ला भेट! )

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
श्री रामेश्वर
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

श्रीरामेश्वर मंदिराच्या समोरच असलेले रवळनाथ मंदिर
प्रचि १४

श्री छ्त्रपती शिवाजीमहाराजांनी स्वहस्ते लावलेला वटवृक्ष आणि त्या वटवृक्षाखाली असलेला महाराजांचा पुतळा
प्रचि १५

प्रचि १६
श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी)
मालवणपासून साधारण १४-१५किमी अंतरावर असलेल्या मसुरे गावातील बारा वाड्यांपैकी एक असलेली आंगणेवाडी आज जगाच्या कानाकोपर्‍यात प्रसिद्ध पावली आहे ती श्रीभराडीदेवीमुळे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजीअप्पा यांना एका मोहिमेमध्ये श्री भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभाला त्यामुळे आनंदित होऊन त्यांनी दोन हजर एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. आंगणेवाडीतील भरडावर ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणुन तिला "श्रीभराडीदेवी" असे म्हणतात. नवसाला पावणार्‍या या श्री भराडीदेवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रौत्सवाला भाविकांचा महापूर लोटतो. हा जत्रोत्सव साधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात असतो.
आम्ही गेलो तेंव्हा जत्रेची तयारी जोरदार चालू होती. मंदिराला रंगरंगोटी चालु होती.

प्रचि १७

प्रचि १८

मंदिराच्या आतील कलाकुसर
प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
जलमंदिर (बिळवस)
मालवणहुन आंगणेवाडीला जाताना उजवया हाताच्या रस्त्याने आतमध्ये हे वैशिष्ट्यपूर्ण सातेरी देवीचे जलमंदिर आहे. मंदिर प्राकाराच्या सभोवताली खंदकात पाणी खेळवलेले आहे. नैसर्गिक झर्‍यांमुळे पाण्याची पातळी पाऊसकाळात जास्त असते. येथील नीरव शांताता अनुभवताना मन प्रसन्न होते.

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

(तटि: सदर भागात "फोटोग्राफिक विशेष" असं काहि नाही, पण या कोकण दौर्‍याचा एक भाग म्हणुन इथे प्रदर्शित करत आहे. Happy मंदिराची माहिती "कोकण पर्यटन" मधुन साभार.)

(क्रमशः)

गुलमोहर: 

सुंदर प्रचि.
त्या साळगावकरांच्या देवळापासून हाकेच्या अंतरावर आमचे घर होते.
त्यावेळी देऊळ नव्हते आता घर "आमचे" नाहि.

आंगणेवाडीच्या जत्रेला लोटणार्‍या अलोट गर्दीला घाबरून तिथं इच्छा असूनही जाणं झालं नाही. तुमच्या सुंदर प्र.चि.मुळें कांहीशी रुखरुख कमी झाली. धन्यवाद.

जिप्सी मस्तच!
मी पूर्वी मालवणला भरतगड हायस्कूलमध्य शिकायला होते, तेव्हा आंगणेवाडीला गेले होते. पण नुसती जत्रा पाहूनच आले होते. Uhoh आता मंदीर नीट पाहिले. सुंदर कलाकुसर आहे. परत जावेसे वाटते.