स्मशान वैराग्य

Submitted by श्रीमत् on 8 March, 2012 - 02:15

बोरिवलीची ट्रेन पकडल्यामुळे आज सात नं. फलाटाऐवजी पाच नं.फलाटावर उतरावे लागले. उशीर तर झालाच होता. धावत पळत खांदे वाकडे, तिरपे करत कसाबसा (नेहमीच्याच) गर्दीतुन पार्ले पश्चिमेच्या आकाशमार्गावर आलो (Sky walk). थोडे अंतर चालतो न चालतोय तोच खिशातला मोबाईल चुळबुळ करु लागला. सुरवातीला वाटले नको उचलुया. ऑफिसमधुन असेल. नाहीतरी मी लेट झालो होतोच. पण नंतर सवयीप्रमाणे न रहावुन फोन बाहेर काढला. स्क्रीन वर अण्णांचा नंबर. तिथेच मनात शंकेची पाल चुक-चुकली. जराही उसंत न लावता मी फोन काणाला लावला.समोरुन अण्णांचा अपरिचित असा गहिवरलेला आवाज्."अरे...... दादा आई....गेली........!...तुझी आज्जी गेली.....! एव्हाना मी अर्धा स्काय वॉक चालुन आलो होतो. एक "अर्ध्या" मिनिटासाठी मी ब्लॅंक झालो. पण लगेचच ह्या पांढरपेशा जगात कोडगं झालेलं स्वार्थी मनं जाग झालं. मी अण्णांना म्हणालो,''आता तुम्ही लगेचच आईला घ्या आणि मानखुर्दला जा. मी आता इथवर आलोच आहे तर ऑफिसमध्ये जाऊन लगेचच निघतो हो पण तिकडे गेलात कि नानांना सांगा प्रेत गावी वैगरे नेन्याच्या भानगडीत पडु नका. उगीचच वेळ पण जाईल आणि खर्चही होईल्.......मी पुढे काही बोलणार इतक्यात समोरुन अण्णा काहिसे रागावलेल्या स्वरातच बोलले, " चल ठेव आता..! त्यांनी मी पुढे काही बोलण्याच्या आतच फोन ठेवुन दिला.

आता माझं एक मन सांगत होतं की असाच मागे फिर तर माझा स्वार्थ मला सांगत होता की अरे आत्ताच जाऊन काय करणार आहेस. सर्व नातलग येईपर्यंत अजुन बराच वेळ जाईल उगाच उन्हा-तानात तिथे जाऊन सर्वांचे सुतकी चेहरे बघण्यापेक्षा ऑफिसला जा. खाडाही होणार नाही त्यात सेंकड हाफ मध्ये लोकांची सहाणभुती मिळवुन निघता ही येईल. अर्थात मी स्वार्थाचचं ऐकले. खाली उतरुन रिक्षा पकडली आणि थेट ऑफिस गाठलं. ठरल्या प्रमानेच गेल्या गेल्या काही महत्वाची कामे आटपली. मधुन मधुन बायकोला फोन करुन अपडेटस घेणं चालुच होते. अस करता करता बरोबर दुपारी बारा वाजता मी चेहरा सुतकी करुन बॉसच्या कॅबीनमध्ये गेलो आणि विचारल."Sir i have to leave, as my grandmother is no more. i gott a call from home. मी गेल्या दहा एक दिवसांपासुनच माझी आज्जी सिरियस आहे व तिला कधीही काहिहि होऊ शकतं. मला तिला बघायला जावं लागत वैगरे कारणं देऊन मस्तपैकी लेट जात होतो वरुन लोकही विचारपुस करत. त्यामुळे एक वातावरण निर्मिती आधीच झाली होती. बॉसने जराही आढेवेढे न घेता मला परवाणगी दिली. मी तडक माझ्या जागेवर गेलो बॅग आवरली आणि ऑफिसच्या बाहेर रस्यावर आलो.

रिक्षा पकडण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना मनात विचार आले. मी असा का वागतोय? दुसर तिसर कोणी नसुन माझी सख्खी आज्जी वारली आहे. तरीही मी असा भावशुन्य का वागत आहे?
मान्य आहे कि आत्तापर्यंत तिचा सहवास असा कधी मला मिळालाच नाही. त्यात आमचे अण्णा आणि सर्व काकां मध्ये आप-आपसात बेबनाव. घरची एकुन सद्यपरिस्थीती आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल-गोल साडी. अशी झाली आहे. आमचे कुटंब एकत्र तर आहे. पण ते गावापुरतं (कारण गावात घरफळा एकाच घराचा द्यावा लागतो म्हनुन) मनं केव्हाच विभक्त झाली आहेत. आम्ही भावंड मात्र एक-मेकांशी छान बोलतो वागतो. पण तेही फक्त फेसबुकवरच. आजची पिढी तंत्रज्ञानामुळे एकमेकांच्या फार जवळ आली आहे. पण सुट्टीत भावंडाबरोबर अंगा खाद्यावर खेळण्या पेक्षा सोशल साईटसवर गेम खेळण्यातच त्यांना धन्यता वाटते. इतक्यात बायकोचा फोन आला आणि मी भानावर आलो. ते नुकतेच मानखुर्द ला पोहचले होते आणि मी पार्ल्याला. स्टेशनला पोहचताच मी माझ्या चुलत भाऊ दिपकला फोन केला तर त्याने काहीसे "त्रासिक" होउनच उत्तर दिले. निघालोयना....पोहचेन दोन-सवा दोन वाजे पर्यंत. ठिक आहे मीही पोहचेन तोपर्यंत म्हणुन फोन ठेवला.
मानखुर्दचे टिकिट काढले आणि प्लॅट-फॉर्म वर न जाता. टिकिट घराच्या बाहेर आलो.

भरपुर भुक लागली होती. विचार केला सर्व सोपस्कार पार पाडे पर्यंत काहीच खायला मिळनार नाही. पण एक आवाज सांगत होता. अरे चांगला धष्टपुष्ट आहेस. एक दिवस स्वताच्या आज्जीसाठी उपाशी राहीलास तर काही बिघडत नाही. अरे त्या माऊलीने गेले दहा दिवस अन्नाचा नीट कणही गिळला नसेल आणि तु आता अशा वेळी स्वताच खळंग भरण्याचा विचार करतोयस अरे आयुष्य पडलय अख्खं जेवायला. अर्थात आत्ताही स्वार्थी मनाचाच विजय झाला होता. मी वेटर ला मसाला डोसाची ऑर्डर दिली होती.

क्रमशः

गुलमोहर: