जरा वेगळे वाटते..

Submitted by प्राजु on 9 February, 2012 - 23:40

मनाचे असे वागणे का अताशा उगाचच जरा वेगळे वाटते
घडे सर्वकाही इथे नेहमीचे तरी का जरा वेगळे वाटते???

कधी पावसाच्या सरी मागते तर कधी मागते गंध ओलावला
कधी स्वप्न पाहूनिया हासते तर कधी आसवांची ढळे श्रूंखला
कधी फ़ूल रंगीतही वाटते तर कधी मेघही सावळे वाटते
मनाचे असे वागणे का अताशा उगाचच जरा वेगळे वाटते..

नभातून फ़िरते सरीतून झरते, नि तेजाळते सूर्य किरणांपरी
कधी बावरुनी उगा माळरानी, खुळे धावते, द्वाड हरणांपरी!
कधी शुभ्र मोती-हिरे वाटते अन कधी माणके-पोवळे वाटते..
मनाचे असे वागणे का अताशा उगाचच जरा वेगळे वाटते

क्षणी गीत होते दिशातून घुमते, सुरांच्या झुल्यावर झुले लाघवी
निराशा कधी घेरता सांजवेळी, उणी रात्र चंद्रासवे जागवी
कधी बांधलेली गझल वाटते तर कधी काव्यही मोकळे वाटते
मनाचे असे वागणे का अताशा उगाचच जरा वेगळे वाटते

-प्राजु

गुलमोहर: 

कधी पावसाच्या सरी मागते तर कधी मागते गंध ओलावला
कधी स्वप्न पाहूनिया हासते तर कधी आसवांची ढळे श्रूंखला
फारच सुंदर.