सखा

Submitted by चिमुरी on 9 February, 2012 - 06:06

पहिल्यांदा ४थी त असताना अलिबागला भेटला.. बघुनच जाम घाबरले होते.. पायाखालची जमीन सरकत नसली तरी वाळु सरकलेली जाणवत होती आणि ती जाणीव आजही तितकीच ताजी आहे.. बाईंनी हात घट्ट धरुनही माझी बाहेर पडायची धडपड आठवली की अजुनही हसु येतं की.. लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट वगैरे काही नसतं हो.. ओहोटी लागल्यावर रेतीतुन चालत जावुन केलेला किल्ल्यात प्रवेश.. किल्ला मात्र जाम आवडला आपल्याला.. पण नंतर भरती यायला लागली म्हणुन जीव खावुन पळत गाठलेला किनारा.. अजिबात न आवडलेला तो खारट चिकटपणा..

मधे अधे केव्हातरी झालेली कोकण ट्रिप पण तेव्हाचा अजिबात न आठवणारा तो..

नंतर ७ वर्षांनी परत झालेली भेट.. तेव्हा मनावर बिंबला तो त्याचा अफाटपणा.. यावेळी मात्र त्याच्याकडे बघण्यात गुंगल्याने पायाखालची रेती सरकलेली जाणवत नव्हती, नंतर कधीच जाणवली नाही म्हणा.. पहिला स्पर्श मात्र कायमच ध्यानात राहिल.. लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट खरच असतं का? की नावड ही देखील आवडीची पहिली पायरी असते?

त्याच्या पुढच्याच वर्षी परत झालेली तिसरी भेट आणि का कोण जाणे अचानक उचंबळुन आलेली ती अनामीक ओढ.......

पहिल्या तिन्ही भेटी अश्या एकाच ठिकाणी झाल्याचं नवल अजुनही मनात आहेच..

पुढच्याच सहा महिन्यात मात्र त्याच्या प्रेमात पडण्यावाचुन पर्यायच उरला नाही... इथे मात्र पहिल्यांदा ठिकाण बदललं, कन्याकुमारी.. तिथला सुर्योदय, सुर्यास्त... खडकावरुन दिसणारा फक्त तोच.. रामेश्वर चा तो.. आणि त्याच्या आठवणी, ज्या पुरल्या मला पुढच्या ४ वर्षांकरता..

मग परत एकदा कोकण.. आणि का कोण जाने कोकणाची ट्रिप म्हणजे महाबोर हे समीकरण याच वेळी लक्षात आलं.. म्हणजे त्याला भेटायला जायचं तर असतं, पण तेव्हा हे बरोबरचे लोक नको वाटतात, बसमधला तो गोंधळ नको वाटतो.. किनार्‍यावरचे लोक नको वाटतात.. टाळता तर येत नाही पण त्यांच्याबरोबर राहताही येत नाही असं काहीतरी होवुन जातं.. वाटतं फक्त आपण असावं तिथे, मी, वाळु, किनारा, तो, सुर्य किंवा चंद्र, वारा आणि... यावेळी त्याचा आवाजही मनात खोलवर घुमला, कदाचीत रात्रीच्या नीरव शांततेत वाळुतुन फिरल्याचा परिणाम असावा.. पहिल्यांदाच मनसोक्त, कडककडुन भेट पण झाली ... अगदी नाका-तोंडात पाणी जाईपर्यंत... तशी भेट आजवर तरी परत झालेली नाही..

परत ३ वर्षांनी भेटलाच तो माझ्या तोपर्यंतच्या फेव्हरेट ठिकाणी.. कन्याकुमारी... यावेळी त्याला मनात भरपुर साठवुन ठेवलं, अशक्यातलीच गोष्ट, पण केला एक कोता प्रयत्न.... रामेश्वरची पाय भिजवण्यापुरतीच घडलेली भेट.. पण प्रवासात अधुन मधुन सारखाच दिसणारा, बोलावणारा तो.. यावेळी मात्र त्याला भेटायला जाण्याचा प्रवास मस्त होता.. अजिबात महाबोर, बोर वगैरे झालं नाही.. इथे मात्र मी खरोखरीच प्रेमात पडले... आणि माझं मरण कसं यावं या स्वप्नावरदेखील शिक्कामोर्तब झालं.. आयुष्यात सगळ्यात आनंदी असताना किंवा समाधानी असताना म्हणा, पण आता जगुन झालय असं जेव्हा वाटेल तेव्हा समुद्राच्या मध्यभागी, सगळीकडे फक्त पाणी पाणी दिसत असताना अलगद मरणाच्या कवेत शिरणं यासारखं दुसरं सुख नाही..

यानंतर मात्र त्याला भेटायचे वेधच लागले.. पण योग खुपच उशीरा आला त्यामानाने.. जवळपास २ वर्षांनी भेट झाली.. त्याकरता तो महाबोर प्रवास, महाबोर लोकांबरोबर करण्याचं धाडसदेखील केलं मी.. संध्याकाळी जेमतेम तासभरच भेट झाली... पण वर्थ वेटिंग असलं काहीतरी वाटलं, पण तेव्हडी बाकीची लोकं नसती तर जास्त मजा आली असती असंही वाटलं... यावेळी भेटुन निघताना खूपच हुरहुर वाटत होती.. अगदी एकटं एकटं.. पण तेव्हा माहितच नव्हतं अवघ्या महिनाभरातच परत भेटणार आहोत ते..

यावेळी मात्र ठरवलं होतं प्रवासदेखील एन्जॉय करायचा, आणि बरोबर असलेली महाबोर माणसं देखील.. त्यामुळेच की काय पण कोकण ट्रिप जराजरा मजेशीर वाटायला लागली.. पण तरिही या महाबोर लोकांमुळे आधी जेवण मग भिजणं प्रकार घडलाच आणि त्यामुळे कोकण ट्रिप नेहमीसारखीच महाबोर हे समीकरण परत एकदा सिद्ध झालं.. परत एकदा फक्त तासभरच झालेली भेट खूप काही शिकवुन गेली.. निग्रहाने लोकांपासुन दुर जावुन मनभरुन पाहिलेला सुर्यास्त.. निळाई, केशराई... अथांग पसरलेला तो.. शेवटी शेवटी माणसांचा आवाज विरुन फक्त त्याचीच भरुन राहिलेली गाज.. सरकणार्‍या वाळुचा तो पहिल्या भेटीत जाणवलेला स्पर्श शोधण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न.. शेवटी स्वीकारलेलं हार, पण त्याबरोबरच मनातल्या बर्‍याच प्रश्नांची सापडलेली उत्तरं.. जाताना बरोबर असलेली हुरहुर, निराशा, आशा, रुखरुख यांचं त्याला मनापासुन दिलेलं अर्घ्य.. आणि परत निघताना उरलेलं एकच सत्य, समर्पण... फळाची अपेक्षा न धरता कर्म करत रहा....

पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही... सगळं काही जाणवुनही निघताना मनात भरुन राहिलेली शांतता शेवटी गणपतीसमोर दानपेटीत पडली आणि देवासमोर कधीच काही मागायचं नाही हे कळत्या वयापासुन पाळलेलं तत्त्व त्या बेसावध शांत क्षणी खळ्ळ्ळ आवाज करत फुटुन गेलं.. जे आपल्याला कधीच मिळणार नाही हे पक्कं माहित असुनही नवस करण्याचा केलेला मुर्खपणा आणि ते ऐकुन गालातल्या गालत हसलेली बाप्पाची ती गोड पांढरीशुभ्र संगमरवरी मुर्ती... आणि त्यावर माझं मलाच आलेलं हसु अन कोसळलेलं रडु..

शेवटी काय तर त्याने इतकं शिकवुनही माझं मन अजुनही माझ्याच ताब्यात आलेलं नाही... भटकतय अजुनही इकडे तिकडे.. हातपाय मारत अथांग सागरात त्याच्या खोलीबरोबरच बरोबरी करायला बघतयं.. आणि हे बघुन तो ही खळाळुन हसुन म्हणतोय, वेड्या, मनाची गहिराईच्या तोडीला माझी खोली तोडकीच पडणार रे.. पण त्याच्याच आवाजाच्या निरंतर ओढीमुळे माझं मनही त्यातला अर्थ समजावुन न घेताच नुसताच नाद ऐकत बसलय .. थोडीशी हुरहुर, अनामीक ओढ, आणि अथांग प्रेम सगळं काही जसच्या तसच आहे, मनाच्या एका कोपर्‍यात....

गुलमोहर: 

मला तर कोकणातला प्रवास सुद्धा आनंद देतो.
अगदिच महामंडळ नको मात्र.
बाइक पहिली पसंती. Happy

समुद्र मात्र आवडतोच. इतका अफाट असतो की आपल्या कल्पनेपेक्षाही अफाट.
त्याच्या पहिल्या दर्शनाची फोटो फ्रेम अजुनही डोक्यात पक्की आहे.
अचानकच एका वळणावर समोर दिसणारा निळाशार तो.

मस्त लिहिलय. Happy

नितांत सुंदर लेख.

समुद्रासारखा जिव्हाळ्याचा विषय नाही दुसरा.
त्याची गंभीरता, त्याची गाज, त्याची निळाई, त्याच्या लाटा, त्याची भरती-ओहोटी, त्याचा खारा-वारा... सगळंच विलक्षण...

एnice

धन्यवाद शुकु, झकासराव, फुलपाखरु, प्राजु, सुन्या, अजंली Happy

बाइक पहिली पसंती.>>>>>> +१००

तेव्हढं ते महाबोर सोडून...>>>>>> Lol

छान लिहिलं आहे...
कोकणातील आठवणी जागवल्यातं...

मी तारकर्ली बीचवर प्रथम त्याला भेटलो... त्यावेळी तिथे आम्ही ३-४ जण सोडून इतर कुनीही नव्हतं.
आजही तो नजारा नजरेसमोर आहे..

आवडलं. समुद्राशी इतकं सख्य नाही पण समुद्रावर गेल्यावर सूर्यास्त चुकला की कसेसेच वाटते. सूर्यास्त होतानाची केशरी रंगाची रोषणाई बघण्यासाठी समुद्राची साथ आवडते. Happy

मस्तच लिहिलंय चिमुरी.

रेती, किनारा, बंदर, होड्या आणि फेसाळणारा समुद्र विसरूच शकत नाही. एकटी असते तिथे समुद्र असतो ध्यानी ... !