भिंतीच्या पल्याड...

Submitted by वैभव देशमुख on 9 February, 2012 - 01:21

भिंतीच्या पल्याड तुझे मुग्ध श्वास
पाझरे सुवास भिंतीतून

भिंतीवरी तुझे टेकतात ओठ
जाणवती थेट इथे मला

भिंतीवरी तुझे फिरतात हात
मला पोचतात स्पर्श सारे

भिंतीवरी तुझे सांडतात डोळे
माझेही हुंदके भिंतीवरी

मुरत चाललो दोघेही भिंतीत
खचणार भिंत खचणार

- वैभव देशमुख

गुलमोहर: 

ही गूढ भिंत कसली आहे? दोघांच्या घरांमधली की दोघांच्या अस्तित्वामधली.
कविता फारच सुंदर वाटली. तिच्या सर्व भावना त्याच्यापर्यंत सर्व रूपांत कशा पोचतात हे वर्णन अतिशय भावगर्भ, पर्याप्त व सुमधूर.

कर्णिक काकांच्या आदेशाचे पालन केले आहे ...सदर प्रतिसाद संपादित करीत आहे .......... वडम्बन पाहायचे असल्यास लिंक देत आहे
http://www.maayboli.com/node/32597

वैभव वसंतराव, तुमची कविता थोडी अस्थानी होतेय. विडंबन करायचं असेल तर जरूर करा पण ते स्वतंत्रपणे 'विडंबन' या विभागात द्या. इथे देण्याने वैभव देशमुखांच्या नितांतसुंदर कवितेची चेष्टा केल्यासारखे वाटते (जरी 'क्षमस्व' असे लिहिले असले तरीही). असे प्रकार टाळता आले तर बरे. प्रतिसादात फक्त त्या कवितेवर, तिच्यातल्या काव्यगुणांवर, सौंदर्यावर, किंवा तिच्यातल्या कमतरतांवर टिप्पणी असावी इतकेच अपेक्षित असते. राग मानू नका.