पाऊस.. तुझा माझा
---------------------------
मुसळधार पाऊस..
गुलजारच्या सिनेमामधला
आपण उभे वळचणीला एका पडवीत
भिजायचं का ?
या प्रश्नावर तुझा नकार असणार..
माहीत असतं,.. मलाही नि तुलाही
पावसाने झालेली नजरबंदी, दमून जमिनीवर टेकलेलं आकाश..दिसू देत नाही..
त्या क्षितिजरेषेपाशी धरेला कुजबुजत दिलेलं वचन हिरवंगार होऊन फुलतं
नजर तुझ्या टिकलीपाशी स्थिरावते..नकळतच
या विश्वासाला मी ही जपलंय
खरंचच...!
कुठुनतरी गाण्याची लकेर हवेवर तरंगत येते
छोटीसी कहानी से.. बारीशों के पानी से... सारी वादी भर गयी
आणि मनात नाजूक घंटा किणकिणतात
तेव्हाही पाऊस असाच असतो.. मुसळधार
भिजायचं का विचारत
ती खिदळत मला ओढते.. भर पावसात
मग नखशिखांत ओलेचिंब.. आम्ही दोघे
आणि डाकबंगल्यावर शिंकत काढलेली एक रात्र
धुंद रात्र, हवासा एकांत
ओलेती शरीरं, ओढाळे श्वास
एक शेकोटी, एक कंदील
व्हरांड्यात कुडकुडणारं कुत्रं आणि
बाहेर खोकणारा वॉचमन
त्याचा खोकला बंद व्हावा म्हणून
त्याला एक हिरवी पत्ती मात्र मी देत नाही
तुझ्या टिकलीला जपलंय मी
माहीत आहे ते.. मलाही नि तुलाही !
अरबीअश्वासारखा पाऊस झुपकेदार होत जातो नि
तुझ्याशी नजरानजर होते..
तू मंद हसत असतेस
कुंडीत फुललेल्या गुलाबासारखी
मनातली चित्रं उमटत असतील का कुठेशी
या पावसाच्या धवलगिरी पडद्यावर
कि या चहाटळ डोळ्यांत
न सांगताच शब्दांची देवाणघेवाण होते
तू मंगळसूत्राशी चाळा करत असतेस
नकळतच !!
माहीत असतं ते.. मलाही नि तुलाही
पौर्णिमेचा चंद्र तुझ्या ओटीत टाकताना
अमावस्येच्या काही रात्री
तिने ओढणीत बांधून नेलेल्या...
तुझ्या माझ्या पायवाटेतून वजा होतात
ऋतू येतात ..जातात
पण कूस बदलत असताना
थोडासा विसावा.. घेतच असतील कुठेतरी
वसंताच्या आगमनाने तुझ्या अंगणात कोकिळा साद घालते
आणि
पानगळ संपतानाच्या एका संध्याकाळची
तिच्या आवाजातली एक...सांजभैरवी तान
ती न्हालेली, केस मोकळे सोडलेली
शूभ्रवस्त्रांकिता...!
जणू कृष्णभक्तीत हरवलेली मीरा
तिचा तो गंध.. धुंद करत असतो
ती मात्र..
डोळे मिटून वीणा छेडत
बेधुंद गात असलेली
मंदिरातली संगरवरी मूर्तीच जशी
बस्स तेव्हाची आसमंतातली सप्तसुरांची दरवळ
तुझ्या काळ्या मण्यांना तडा जाऊ देत नाही
माहीत आहे हे ही.. तुलाही नि मलाही
तुझ्या डोळ्यांत पाहत राहतो...
न भिजता गेलेल्या काही मुसळधार सरी, डोळ्यात साठवलेल्या !
न आळवलेल्या काही ताना.. गळ्यात रूतलेल्या !
गोठ्यात एक मेणबत्ती उगाच जळणारी
वितळत वितळत अस्तित्व हरवत जाणारी
आताही तळहातांचा आडोसा करून
तू तिला जपत असतेस.. मी समजून !!!
छतावरून टपटपणारे टप्पोरे तुषार..
तू पदराने अडवत असताना
केसातल्या थेंबात इंद्रधनु अवतरतं..
दूरवरून ऐकू येणारं गाणं
आता बदललेलं असतं
तेरे मेरे सपने अब एक रंग है..
मी हसतो.. म्हणून तू ही
उगाचच... नाहीच !
माहीत असतं कारण.. मलाही नि तुलाही
पाऊस कमी झालेला असतो
थोडीशी रिपरिप..
तुझ्या चेह-यावरचे टपोरे थेंब मी पुसून घेतो
झाडावरून किलबिलाट सुरू होतो
मृदगंध दरवळतो नि
एक कालवड सुसाट सुटते
राधाकृष्णाचं देऊळ आता दिसू लागतं
पुजा-याची लगबग सुरू होते
आडोशाला थांबलेली बैलगाडी रस्त्याला लागते
गुरांच्या गळ्यातला घंटा ऐ़कू येऊ लागतात
हमरस्त्याला गाड्यांचे कर्कश्श हॉर्न सुरू होतात
निघायची वेळ झालेली असते...
ते विसाव्याचं ठिकाण आपण जोडीने सोडत असतो
पाऊस आता पूर्ण थांबलेला असतो...
- Kiran
व्वा!! समा बांधलास मित्रा!!
व्वा!!
समा बांधलास मित्रा!!
आवडलं. शुभेच्छा !
आवडलं. शुभेच्छा !
आवडलं..
आवडलं..
मस्त..
मस्त..
विदिपा, के. अंजलीजी... नेहमीच
विदिपा, के. अंजलीजी... नेहमीच देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार आपले.
पण विदिपा तुम्हीच म्हटल्याप्रमाणे समेवर आलो आता !
खरं तर यावर अजूनही लिहावंसं वाटतंय ..
शेवटी पाऊस म्हणजे
शेवटी पाऊस म्हणजे काय...
तुझी-माझी हौस अन काय
छान लिहीलय किरण... शुभेच्छा !!!
गिरीश मित्रा..
गिरीश
मित्रा.. तुझ्यासारख्याने कौतुक केलं कि अंमळ मूठभर मास चढतं बघ.. पण मित्रा, चुका पण सांगत चल रे !
मित्रा, खरं सांगायच तर यात
मित्रा, खरं सांगायच तर यात तुला काय सांगायचय किवा म्हणायचय या फंदात मी अडकलोच नाही. किंबहुना तशी वेळच आली नाही. मी त्या पडवीतून माझ्या पायवाटांवर निघून गेलो. पावसाच्या चिंब सोबतीने.
सुंदर!!! मी हरवले !!
सुंदर!!! मी हरवले !!
'छोटीसी कहानी थी..'?? हे
'छोटीसी कहानी थी..'?? हे कुठलं गाणं?
छोटीसी कहानी से .. बारेशोंके पानी से.. हे म्हणायचं आहे का?
इंद्रधनु थँक्स. तेच तेच. तेच
इंद्रधनु
थँक्स. तेच तेच. तेच गाणं होतं ..इजाजत मधलं !
केला बदल !!
कौतुक
एक्झॅक्टली ! फील घ्यायचा आणि स्वतःची पायवाट धरायची. मस्त प्रतिक्रिया
मस्त्...........तरळल्या
मस्त्...........तरळल्या आठवणी............
त्या क्षितिजरेषेपाशी धरेला
त्या क्षितिजरेषेपाशी धरेला कुजबुजत दिलेलं वचन हिरवंगार होऊन फुलतं
नजर तुझ्या टिकलीपाशी स्थिरावते..नकळतच
या विश्वासाला मी ही जपलंय
खरंचच...!
कुठुनतरी गाण्याची लकेर हवेवर तरंगत येते <<< एकदम खास
आवडलं
आवडलं
ऑसम्म.... रात्रभर कोसळणारा
ऑसम्म....
रात्रभर कोसळणारा मुसळधार पाऊस
अन त्याला एका कवितेत बंद करणारा तू.....
माहित आहे हे तुलाही नि मलाही....!
किरण भिजवून टाकलस अगदी...:)
किरण.. मsssस्तं उतरलंय!
किरण..
मsssस्तं उतरलंय!
सुंदर आवडली. कौतुकच्या
सुंदर आवडली. कौतुकच्या प्रतिसादात सगळं आलंय
नेमकं काय आहे हे? कविता कि
नेमकं काय आहे हे?
कविता कि ललित ? स्फुट हा साहित्यप्रकार आहे का ? स्पष्ट झालं म्हणजे प्रतिक्रिया देता येईल.
आभार सर्वांचे टोके विडंबन
आभार सर्वांचे
टोके
विडंबन टाकतेस काय ? टाक टाक...:) खूप आभार !
मस्तच..एक नंबर..
मस्तच..एक नंबर..
किके.. फारच सुंदर!! पाउस माझा
किके.. फारच सुंदर!! पाउस माझा फेवरीट.. आणि गुलझार ही!!
हे 'छोटीसी कहानी से.. बारीशों के पानी से.' ऐकत वाचलं.. एक दम गुलझार च्या कथानकातले सीन दिसु लागले..
थ्रिल्लिन्ग आहे हे स्फुट!!
कितीदा वाचुन ही ..
ना जाने क्युं.. आंख भार गयी...ना जाने क्युं...
'दिल भर गया' असं वाटत नाही!!!
आहाहा.. केके तू हमारा अपना
आहाहा.. केके तू हमारा अपना 'गुलजार'...
खूप आवडलं स्फुट...
लंपन...थँक्स ! इंद्रधनु...
लंपन...थँक्स !
तुझे स्पेशल आभार !!
थँक्स अ लॉट !!
इंद्रधनु... गुलजार भेटले तर पायाला हात लावावा अशी खूप इच्छा आहे
वर्षुतै - फिर तू हमारी अपनी कॅमेरावूमन
गारवा ची आठवण झाली...मस्त आहे
गारवा ची आठवण झाली...मस्त आहे एकदम
आवडली...मस्त....निवडक १० त
आवडली...मस्त....निवडक १० त आली राव.....
लिखाणाची धाटणी चांगली
लिखाणाची धाटणी चांगली वाटली.
अनेक विचार विस्कळीत होत होत .... कुठेतरी परत एकत्र येताहेत असा काहीसा फील आला वाचताना.
उकाका,
उकाका, मयुरी...धन्यवाद
विनायकजी ..स्पेशल थँक्स तुमचे निवडक दहाबद्दल
कौ शी सहमत. मी ही कविता फक्त
कौ शी सहमत.
मी ही कविता फक्त वाचतच गेले, अर्थ लावायच्या भानगडीत पडलेच नाही.
अनंत सामंतांचं पण असंच एक पुस्तक वाचत गेले होते... त्यात निसर्गाचं सुरेख वर्णन होतं. कथा अजुनही आठवत नाही आणि पुस्तकाचं नावही. पण त्यातल्या नायिकेचं, खास करून तिच्या डोळ्यांचं वर्णन अजूनही आठवतंय, तिचं आणि तिच्या नायकाचं नौका नयन असंच डोक्यात फिट्ट बसलंय. तुझ्या कवितेतला पाऊस आणि वातावरण सुद्धा सेम तसंच.
दक्षिणा काय मस्त प्रतिसाद
दक्षिणा
काय मस्त प्रतिसाद दिलायस तू...
तुमच्यास सर्वांच्या सदिच्छेने आज या स्फुटाचे ( स्पंदनकाव्याचे ) ध्वनीमुद्रण पार पडले. धन्यवाद !
आवडलं... खरच.. एक सुरेख लय
आवडलं... खरच.. एक सुरेख लय आहे.
Pages