माझी-तुझी कहाणी..

Submitted by -शाम on 27 January, 2012 - 08:33

डोळ्यामधे कुणाच्या आणू नकोस पाणी
सांगू नको जगाला माझी-तुझी कहाणी..

जर न्यायचेच होते सारेच न्यायचे ना
तू वादळा कशाला ठेवायची निशाणी..

एकांत पाहुनी ती घेते रडून आता
अन् माणसांत हसते माझी व्यथा शहाणी..

समजू नकोस साधे आहेत शब्द माझे
रक्तास जाळुनी मी लिहिलीत आज गाणी..

रे 'शाम' या जगाची बदलून रीत गेली
राधा न प्रेमवेडी मीरा नसे दिवाणी..

(माझा निरोप घेण्या येऊ नका मुक्याने
कोणीतरी गझल गा कोणीतरी विराणी)

,.................................................शाम

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शामभाऊ, आवडलीच अगदीच Happy

>>राधा न प्रेम वेडी मीरा नसे दिवाणी..
नव्या जगातलं विदारक सत्य Sad

तोडलस् मित्रा

छान गजल.... श्यामराव... मतला ज...रा ठासून पाहिजे होता. शहाणी, विराणी लाजवाब. Happy

छान गजल---

कविवर्य मंगेश पाडगावकरांची गझल आठवली---
*
डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

--
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी

--
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

---
व्यवहार सांगती हा ही माणसे शहाणी

---
मी पापण्यात माझ्या ही झाकली विराणी

----किती साम्य ! व्वा राव....

जर न्यायचेच होते सारेच न्यायचे ना
तू वादळा कशाला ठेवायची निशाणी..

(माझा निरोप घेण्या येऊ नका मुक्याने
कोणीतरी गझल गा कोणीतरी विराणी)

व्वा!! मस्तच शेर

एकंदरीत सगळी गझलच छान. मतला अजून उंचावायला हवा होता.

मंदार, मयूरी, बेफि, डॉक, अरविंद, उमेश, सुप्रिया आणि पाटील... खूप खूप आभार दोस्तांनो!!!
....................................................................................................

----किती साम्य ! व्वा राव....>>>> अरविंदराव कवाफी सोडता आशय पुर्ण वेगळा आहे असे मला वाटते..
....................................................................................................

पाटील, डॉक- मतल्या बाबत विचार करूया ... तुम्हीही कळवा.

धन्यवाद!!!

Happy शाम.

धमकीसाठी हे - उच्च, अलौकिक, अप्रतिम, वाह वाह ! Wink

आणि खरं हे - सुरेख. गझलमधलं शुन्य कळतं, पण आशय सुरेख. इतके साधे शब्द कि माझ्यासारख्या पामरांनाही शब्द न शब्द कळला आणि अजुनच भावली गझल. सोपं आणि तरीही इतकं सुंदर आणि अर्थपुर्ण लिहिणं जास्तच अवघड असेल ना. थँक्स !

समजू नकोस साधे आहेत शब्द माझे
रक्तास जाळुनी मी लिहिलीत आज गाणी..

माझा निरोप घेण्या येऊ नका मुक्याने
कोणीतरी गझल गा कोणीतरी विराणी

<< ये बात..!

आणि खरं हे - सुरेख. गझलमधलं शुन्य कळतं, पण आशय सुरेख. इतके साधे शब्द कि माझ्यासारख्या पामरांनाही शब्द न शब्द कळला आणि अजुनच भावली गझल. सोपं आणि तरीही इतकं सुंदर आणि अर्थपुर्ण लिहिणं जास्तच अवघड असेल ना. थँक्स !>>>>>> येस्स हीच भावना उमटली.
बाकी - शाम, नामही काफी है.......

अजयजी , आर, मनी, योगुली, बागुली, अमित, शशांक, जो, शोभा, विभा, प्रद्युम्न, विरु आणि नन्ना.....

आभारी आहे दोस्तांनो...!!!
.................................................शाम

२ ० १ २ ची गझल आणि माझ्या वाचनातून तेव्हा कशी सुटली !
अप्रतिम आहे.

डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

मंगेश पाडगावकरांची गझल आज सकाळी रेडिओवर ऐकली आणि सहज शब्द सुचले "सांगू नको जगाला माझी-तुझी कहाणी" उत्कंठा म्हणून सर्च केले तर या गझलेवर पोचलो. Happy