वाट

Submitted by दाद on 24 January, 2012 - 20:48

नचिकेतनं(आनंदयात्री) परिच्छेदांचा क्रम बदल सुचवला जेणेकरून लेखाला अधिक चांगला प्रवाह येतो आहे. तेव्हढाच बदल केला आहे..
आनंदयात्रीचे मनापासून आभार....
************************************************************************************************
वाट म्हटलं नं की माझ्या डोळ्यांसमोर लाल मातीची, नागमोडी चालत जाणारी, दो बाजूंना हिरव्यागार गवताची महिरप रेखून घेतलेली, रांगोळीतल्या सुक्षम रेघेसारखी पायवाट येते. डोक्यात काहीतरी मस्तं गाणं चालू आहे. हातात एखादी लांब शिपटी आहे, आपल्याच पायांवर नाहीतर आजूबाजूच्या गवत तुर्‍यांवर हलके ताल देत चालत जावं अशी. मधेच कधीतरी डोक्यातून पुढल्या कडव्याचे शब्दं आत्ता होते, आत्ता नाही... असे गुल होतात आणि त्याचं कारण नजरेच्या टप्प्यातून पायाशी येतं. एकांडं पिवळं धम्मक फूल नुस्तंच इकडे-तिकडे बघत एका फांदीच्या डोक्यावर बसलेलं दिसतं. नीट त्याच्या बाजूला बसावं, जरा जवळ जाऊन बघावं तेव्हा दिसतात, जांभळ्या रेषा, ठिपके-ठुपके, पाकळ्यांची दुमड-बिमड. आपण इतकं निरखुन बघतोय... त्याला त्याचं नाहीच काही. मधेच ते सुद्धा आपल्या डोळ्यांत थेट रोखून बघतं! वाटलं तर तस्सं गुंतुन पडावं त्या नजरबंदीत किंवा... त्याचा नाद सोडून उठून पुढे चालू पडावं... वाट चालू लागावं.

ह्या चालण्याला काही निमित्तं नाही, काही ठराविक दिशा नाही, का अंतर नाही. इतकच काय पण पाय दुखेपर्यंत इतकाही अदमास नाही... आकाशातल्या ढगाने किती, कुठे चालावं आणि कुठे थबकावं हे तो किती ठरवतो? तितकच. एखाद्या रागाच्या ठाय लयीतल्या ख्यालासारखी वाट उलगडत जाते... आपण ऐकत जातो....

नुस्तं, ’वाट’ म्हटल्यावर माझ्या डोक्यात हे इतकं आणि असलं स्वप्नंरंजन होतं हे ऐकल्यावर माझी एक मैत्रिण आधी पोट धरून हसली. खूप हसली... अगदी मी चिडून आठ्या घालेपर्यंत आणि तिच्या डोळ्यात पाणी येईपर्यंत. आणि एकदम तटकन थांबून म्हणाली.. ’भाग्यवान आहेस... वाट म्हटलं की, चालणारीच वाट दिसते तुला. संपणारी, वळणावर दिसेनाशी होणारी, तटकन कड्याशी तुटणारी.... असल्या वाटा...’ पुढे बोललीच नाही, नुस्तीच हसली. ते हसणंही कसं... तर त्यापेक्षा रडलेली परवडली, म्हणण्यासारखं.... मलाही असहाय्यं करणारी.
लग्नाला आता काही वर्षं झालीत. हिला मूल होऊ शकणार नाही असं कळल्यावर नवर्‍यानं घटस्फोट मागितला. मधल्या काळात काहीतरी घडण्याची जीवघेणी वाट बघणं चालू होतं. मधेच कधीतरी कुणीतरी कुठेतरी ऐकलेला उपाय करून बघा असं सुचवतं. कितीही दृढ निश्चय असला तरी, मन कच खातं. मग तो उपाय करायचा, त्याचा निकाल येण्यासाठी वाट बघायची. हिची हिनं वाट बघायची... त्याची त्यानं. पुढे काहीच नाही. दोघांचीही मनं चालायची थांबलीयेत, कधीचीच. दोघांच्याही पायात अडकून बसलेली ही एकच वाट... सध्या एकमेकांपासून दूर जातोय अशा समजुतीत विरुद्ध दिशेला चालतायत दोघे. मात्रं दोघांना अजून बांधून आहे... तीच ती एकच एक वाट... दोन दिशांना अनंत फुटलेली!

अजून एक मित्रं... काय कसं काय? ह्या प्रश्नाला कायम "बsssस... चल रही है जिंदगी... धक्का मारकेss" असली उत्तरं देतो. मला तरी कायम तो त्याची लठ्ठं बायको, दोन पोरं गाडीत घालून मागून धक्का मारीत गाडी नेत असल्याचं दृश्यं नजरेसमोर येतं. मी वैतागते, "काय रे सारखं वाकडं तोंड करून...अरे, धक्का मारून का होईना चालवायला जिंदगी आहे... गाडी आहे. जिनका कुछ नही वो...."
माझं हिंदी ह्याच्याइतकं उच्चं नाही, त्यामुळे मला मधे तोडणं त्याला सहज शक्यं... "बात जिंदगी की नही..... रास्ते की है, दीदी... रास्तेकी" घ्या! म्हणजे हा, ह्याची जिंदगी, आणि ह्याचा धक्का मारके प्रवास ह्याला वाट कारणीभूत... म्हणजे ह्याला म्हणायचय काय? रस्ता थांबला किंवा संपला की हा सुखी का काय?

माझा नेहमीचा शाळेपासून घरचा रस्ता! कधी एकदा हा संपतो अन घरी किंवा शाळेत... कुठे ते पोचते असं झालेलं असायचं... हे नेहमीचं. एकदाच... एकदाच एका किर्रं उशीरा, शाळेच्या सभागृहातल्या एका गाण्याच्या कार्यक्रमानंतर परत येताना.... बरोबर कोण कोण होतच.... पण माझ्यासाठी मात्रं, डोक्यात अजून चाललेलं ते गाणं अन मी, असे दोघेच होतो. मी चालायची थांबले तर ते ही थांबेल ह्या भीतीने मला तो दहा मिनिटांचा रस्ता संपूच नये असं खरच वाटलं होतं... घराच्या कुंपणाशी येता येता अगदी व्याकूळ झाले होते.

लग्नं ठरल्यानंतर आणि झाल्यानंतरही नव्या नव्या दिवसांत चाललेल्या अनेक वाटा अजून त्यातल्या वळणांसकट मनात ताज्या आहेत. मधेच एका वळणानंतर समोर ठाकलेलं हिरवंकंच, गवतपातींचं, हुळहुळं शिवार.... डुलणारं, थबकणारं.... अन... वार्‍यानं हात धरताच... शहारणारं... सारं सारं अगदी आत्ता आत्ता घडल्यासारखं उभारतं मनात. तो नव्या नवलाईच्या दिसांत एकमेकांचा घेतलेला शोध... किंबहुना त्या शोधापाईच चालेल्या सगळ्याच वाटा.... शोध वाटांच्या साक्षीनं अन त्या सार्‍या वाटचालींना त्या शोधाची साक्षं.

माझ्या ओळखीच्यातल्या एक काकू... जुन्या काळातलं सासर... थोडका छळ-बीळ झालेला. नवर्‍यानं खूप समजून, संभाळून वगैरे घेण्याचा प्रघात नसलेलं, हौस-मौजविना आयुष्यं गेलेलं. आता तशा एकट्या असतात. कधीमधी येऊन जाऊन मुलांच्यात, नाहीतर तशा एकट्याच रहातात. बोलता बोलता मोकळ्या झाल्या माझ्याशी अन काहीतरी सुरेख सांगून गेल्या. म्हणाल्या, ’....ह्या खेपेला गावच्या घरात गेले... ह्यांच्यानंतर पहिल्यांदाच. मागचं वाईट-साईट काय काय परत एकदा ढवळून निघालं.... पण मागे विहिरीपाशी ह्यांनी एकदाच शेंदून दिलेल्या घागरीची आठवण आली.... आणि.... .....मी नं आता एक करायचं ठरवलय... जिथं जिथं म्हणून वाईट आठवण आहे, तिथे तिथे जाऊन चांगलं आठवायचा प्रयत्नं करायचा... नाहीतर कल्पून काही छानसं, ताजं रुजवायचं मनात... बर्‍याच ठिकाणी जायचय मला...’ हे अगदी भावलं मला. आपल्याच मनाच्या पायात रुतलेला काटा काढण्यासाठी करायची थोडी अधिक पण वेगळी वणवण... किंचित हळवी, उगाच उत्सुक पण अधिक समजुतदारही.

वाटा खरच थांबतात का? मला आठवतं एकदा एका दूर्ग भ्रमणात वाटेनं चालत चालत एकदम कड्यापाशी पोचलो. केशरमाखली संध्याकाळ उलगडली होती, समोर. छान आसनमांडी घालून तिथेच बसलो.... नि:शब्दं होऊन. पण आमच्यातल्या प्रत्येकाच्या मनाने कड्यापुढली उघड्या डोळ्यांना न दिसणारी वाट चालायला सुरूवात केली होती. सरssळ रेषेत गेल्यास... ह्या समोरच्याच दोन डोंगररांगाच्या पल्याड दिसणार्‍या त्या चंदेरी सागर रेषेवरच नाही का... ते मधाचं लोटकं सांडतय?
इथून इतक्या दूssर तिथे... अगदी सावकाssश, रेंगाळत, चालत जाऊन आलेली आमची मनं, आमच्याकडे परत आली ना.... तेव्हा अशी झंकारत होती की.... जणू एकाच सतारीच्या तरफेच्या तारा. परतीच्या वाटेवर एकाच विषयावर किलकिललो.... तो सूर्यास्तं आणि तिथवर सगळेच जाऊन आलो ती.... ती अदृश्य वाट!

वाटा थांबत नाहीत... वाटा संपत नाहीत... आपण मनानं चालायचे थांबतो. नाहीतर निर्जन, निबिड अरण्यातून, नसलेल्या वाटांमधून कुणी कधी बाहेर आलाच नसता. मनाच्या वाटा अधिक गहिर्‍या, गहन, नागमोडी आणि अनंत. मनानं चाललेल्या वाटा ठरवून पुसता येत नाहीत हा मानवी मनाचा कदाचित सगळ्यात मोठ्ठा तोटा असेल. कधी कधी ना, चाललेल्या वाटेपेक्षा सोबत कोण, ह्यासाठीच एखादी वाटचाल आयुष्यातली एकमेव असल्यासारखी लक्षात रहाते.

सोबतीनं वाटचाल म्हणावी तर... कधी कधी बरोबर अगदी अमिताभ किंवा साक्षात नारदमुनी असते तरी आपण आपल्याच नादात असतो... कधी अन कशी वाट सरते ते कळतच नाही... असा खुळावलेपणानं प्रवास.
मला नं हे ही आवडतं..... किंबहुना मला हेच अधिक आवडतं. हे... आपण आपल्याच नादात असणं किती छान नै? ’अज्ञानात सुख’ म्हणतात तसं जगाच्या भानाविरहित वाटचाल होऊन जाते. कुणी बरोबर आहेत, कुणी बघतायत, कोण काय म्हणेल, कुठे जायचय, कधी पोचायचय, कसं जायचं, काय काय भोगायचय वाटेत ह्या सगळ्या सगळ्यातून निसटलेली वाटचाल... ही सगळ्यात सुखाची.... त्यात फक्तं स्वत्वाचं भान असतं. आपण कुणाचेतरी कुणीतरी नाही, कुणाला काही दाखवायचा सोस नाही, काही बघण्याचा हट्टं नाही, काही घडवण्याचा अट्टाहास नाही... जे आहे तेच आहे आणि तेच सुखाचं आहे.
अशाच वाटचालीत एका सुक्षणी... जे काही आहे ते... आत, बाहेर सगळं सगळं... एक असल्याचा निर्वाळा मिळतो... अन...अन शोध थांबतो....मग चाललो काय आणि न चाललो काय.....
-- समाप्त

गुलमोहर: 

.

मस्त!
कधी कधी प्रवास / वाट संपुच नये असं वाट्तं मग सोबत कोणी व्यक्ती असो वा विचारांचे प्रवाह Happy

लेख वाचला आणि 'जब वी मेट' आठवला.
"हम जो चलने लगे है, चलने लगे है ये रासते,
मंजील से बेहतर लगने लगे है ये रासते"
सोबतीने वाट चालणारे कुणी असेल तर अंतरेही जाणवत नाहीत...
लेख आवडला.

त्यात फक्तं स्वत्वाचं भान असतं. आपण कुणाचेतरी कुणीतरी नाही, कुणाला काही दाखवायचा सोस नाही, काही बघण्याचा हट्टं नाही, काही घडवण्याचा अट्टाहास नाही... जे आहे तेच आहे आणि तेच सुखाचं आहे.
अशाच वाटचालीत एका सुक्षणी... जे काही आहे ते... आत, बाहेर सगळं सगळं... एक असल्याचा निर्वाळा मिळतो... अन...
अन शोध थांबतो....
मग चाललो काय आणि न चाललो काय.....>>>>>>> धिस इज "दाद".......
बाकी नि:शब्द.

अतिशय छान लिहिलय...
>>कधी कधी ना, चाललेल्या वाटेपेक्षा सोबत कोण, ह्यासाठीच एखादी वाटचाल आयुष्यातली एकमेव असल्यासारखी लक्षात रहाते>><< खरंय अगदी!!

आपण कुणाचेतरी कुणीतरी नाही, कुणाला काही दाखवायचा सोस नाही, काही बघण्याचा हट्टं नाही, काही घडवण्याचा अट्टाहास नाही... जे आहे तेच आहे आणि तेच सुखाचं आहे.>>>

दाद..यासाठी तुला काय हवं ते घे माझ्याकडुन Happy
अगदी भान विसरायला लावणारं अप्रतिम लेखन नेहमीसारखंच!

आपल्या लेखन लौकीकाला साजेसे >>>> अनुमोदन

लेखक "दाद" बघायच आणि खुळ्यागत वाचत सुटायच Happy Happy Happy

फक्त खुप "वाट "बघायला लावत जाऊ नका

आवडली ही न संपणारी वाट Happy

वाट म्हटल की मला आपली "स्वप्नांच्या गावाला जाणारी" आठवते Happy
नेहेमीसारखेच एक वेगळा सुंदर अनुभव देणारे लेखन दाद Happy

अप्रतिम आणि नेहमीप्रमाणेच संयत!
साथी हो अगर तुमसा, मंजिल की तमन्ना क्या
हमको तो सफर प्यारा, मंजिल का खुदा हाफिज!

क्या बात है दाद.

एकाच वाटेवर चाललं तरी दोन व्यक्तिंना भासते मात्र ती वेगळी.
...सुख है अलग और चैन अलग है...
... चैन तो है अपना सुख है पराये...

हं............येस्स! ही खरी दाद!! अक्षरा अक्षरातून जाणवणारी!! बस्स इतकंच.........

<<<.....मी नं आता एक करायचं ठरवलय... जिथं जिथं म्हणून वाईट आठवण आहे, तिथे तिथे जाऊन चांगलं आठवायचा प्रयत्नं करायचा... नाहीतर कल्पून काही छानसं, ताजं रुजवायचं मनात... बर्‍याच ठिकाणी जायचय मला...’>>>> वा ! वाईटातून चांगले शोधणे... छान अ‍ॅटिट्युड!!!
सुंदर लेखन!

अन शोध थांबतो....
मग चाललो काय आणि न चाललो काय.....

हळुच समोरच्या पारावर टेकायच
त्याच्याकडे शुन्य नजर लावत.
कसलाही पुढचा विचार नाही
कसलीही मागची आठवण नाही
देह विरेपर्यंत..

Pages