द्वैत

Submitted by UlhasBhide on 22 January, 2012 - 02:30

द्वैत

पानांच्या गर्दीतून वाट काढत
दाट सावलीखालच्या मउशार मातीवर उतरून
माझ्या अवतीभोवती विसावलेले उबदार कवडसे,
शेजारीच खळाळणार्‍या निरागस झर्‍यावर
सांडलेला सोनेरी वर्ख,
मधुनच एखाद्या रानफुलाला
‘भोज्जा’ करत बागडणारी गोड फुलपाखरं,
कुठल्याशा पक्ष्याने
प्रियेला घातलेली सु्रेल साद,
टेकड्यांच्या पिलावळीसहित
दूरवर ठाण मांडून बसलेले डोंगर,
मंद झुळुकेला लयीत दाद देणारं
माळावरचं हिरवंगार गवत,
स्वच्छ निळ्या आकाशात रेंगाळाणारा
एखाद-दुसराच चुकार ढग…...
…….. मोहक, सुंदर, विलोभनीय इ. शब्द
फिके पडावेत असं ते दृष्य,
विधात्याने रेखाटलेलं अप्रतीम चित्र.....

मंत्रमुग्ध होता होता वाटलं......
इथेच संपून जावं, माझ्यातलं 'मी'पण,
विलीन होऊन जावं या सगळ्यात,
साधलं जावं अद्वैत……….
पण…..पण, मी ’मी’च राहिलो नाही
तर वाटेल का या सार्‍याचं अप्रूप ?
उपभोगता येईल का हा अमूल्य आनंद ?.....
साखरेला चाखता येते का, स्वत:चीच गोडी !!
सुरेल गळ्याला लाभते का, रसिक कानांची तृप्ती !!!
……………
…… ह्म्म्म्म .....
अद्वैताच्या अंबरातून
द्वैताच्या जमिनीवर अलगद उतरत
एक छानसा आळस देत उठलो तिथून
नि घराच्या वाटेकडे परतताना
चार पावलांनंतर मागे वळून पाहिलं….
...... विधात्याचं ते निसर्गचित्रं
शतपटीने सुंदर भासलं.

.... उल्हास भिडे(२०-१-२०१२)

गुलमोहर: 

आवडली आणि पटली देखील..

पण…..पण, मी ’मी’च राहिलो नाही
तर वाटेल का या सार्‍याचं अप्रूप ?
उपभोगता येईल का हा अमूल्य आनंद ?.....
साखरेला चाखता येते का, स्वत:चीच गोडी !!
सुरेल गळ्याला लाभते का, रसिक कानांची तृप्ती !!!>> हे खुप आवडलं..
Happy

खास सुंदर!
पटलं फार काका, साखरेला स्वतःची गोडी चाखता येते का? वा ...!
ऊबदार कवडसा, सोनेरी वर्ख- काय छान, दिसलं डोळ्याला सगळं Happy

<<पण…..पण, मी ’मी’च राहिलो नाही
तर वाटेल का या सार्‍याचं अप्रूप ? >>
शतशः खरे आहे......... यात सारे सार आहे आपल्या आयुष्याचे.......... अद्वैतात जरी कितीही समाधान आहे तरी द्वैत आणि अद्वैत या दोघांनाही एकमेकांची गरज आहे......... कलाकाराला रसिकाशिवाय उपाय नाही आणि रसिकाला कलाकारशिवाय तरणोपाय नाही तसेच काहीसे........
फार सुंदर आहे भिडेकाका.....

निशदे .... माझ्या कवितेवरील तुमच्या प्रतिसादा संदर्भात :
प्रथम धन्यवाद.
"कलाकाराला रसिकाशिवाय उपाय नाही आणि रसिकाला कलाकारशिवाय तरणोपाय नाही तसेच काहीसे........"

अगदी माझ्या मनातलं बोललात. खरं तर रसिकाशिवाय कलेचा आविष्कार होऊ शकत नाही.

उकाका, निशदे,
कलाकाराला रसिकाशिवाय उपाय नाही आणि रसिकाला कलाकारशिवाय तरणोपाय नाही तसेच काहीसे>>>>>>>>> ;
मला वाटतं ; एक खरा कलाकार मुळात स्वतः एक रसिक असावाच लागतो किंबहुना असतोच! तसाच एक खरा रसिक मूळचा एक कलाकार ! त्याशिवाय का कला त्यांच्या दोघांच्या काळजाचा ठाव घेते ?
अद्वैत मला हे सांगतं..........

अप्रतिम ! इतकं सुंदर, सुसंगत, हळुवार आणि मोहक निसर्गकाव्य कित्येक दिवसांनंतर आज वाचायला मिळालं. तुमचे आभार, उल्हासराव.

कविता आवडली....मात्र तो हम्म्म्म....खटकला.
मराठीत आपण असा हुंकार भरत नाही...हं...असं म्हणतो.....हम्म्म....हे इंग्रजीचे मराठीकरण होतंय...ते टाळलं असतं तर जास्त बरं झालं असतं.

कलाकाराला रसिकाशिवाय उपाय नाही आणि रसिकाला कलाकारशिवाय तरणोपाय नाही तसेच काहीसे>>>>>>>>> ;
मला वाटतं ; एक खरा कलाकार मुळात स्वतः एक रसिक असावाच लागतो किंबहुना असतोच! तसाच एक खरा रसिक मूळचा एक कलाकार ! त्याशिवाय का कला त्यांच्या दोघांच्या काळजाचा ठाव घेते ?
अद्वैत मला हे सांगतं..........>>>> वा वा वा खरी रसिकता...
काका - मस्त कविता - मांडणीही वेगळीच - पण छान - मनमोकळी.....

गोड गिट्ट (मला तरी) मुळीच नाही वाटली. क्षमस्व दक्षिणा! फार खोल विचार आहे त्यात एक असे मला वाटते.

<<<<<<पण…..पण, मी ’मी’च राहिलो नाही
तर वाटेल का या सार्‍याचं अप्रूप ?
उपभोगता येईल का हा अमूल्य आनंद ?.....
साखरेला चाखता येते का, स्वत:चीच गोडी !!>>>>>>>

डोळ्यासमोर उभं राहिलं चित्र..

साखरेला चाखता येते का, स्वत:चीच गोडी !!
सुरेल गळ्याला लाभते का, रसिक कानांची तृप्ती !!!
आवडल्या या ओळी.

<<एक खरा कलाकार मुळात स्वतः एक रसिक असावाच लागतो किंबहुना असतोच! तसाच एक खरा रसिक मूळचा एक कलाकार >>

वैभव जी,
या विचाराच्या पहिल्या भागाशी मी सहमत आहे पण दुसऱ्या भागाशी नाही.
कलाकार हा रसिक असावाच लागतो कारण स्वत:ची कला रसिकाच्या नजरेतून बघणे हे कलाकृतीच्या निर्मितीमधील एक पाऊल आहे.
पण रसिक हा कलाकार असावाच असे नाही किंबहुना ते जरा अवघडच असते. कलाकृतीचा आस्वाद घेता येणे यात रसिकाचे रसिकपण ठरते. तशी कलाकृती त्याला निर्माण करता येते कि नाही हा मुद्दा दुय्यम ठरतो. भीमसेनांचे गाणे, पुलंचे लेखन याचा आपापल्या परीने आस्वाद घ्यावा. तशी कला स्वहस्ते निर्माण झाली नाही तरी हरकत नाहे असे मला वाटते

निशदे: कलाकाराची रसिकता आपणास कळाली कारण आपण खरे कलाकार आहात ........
रसिकाची कलात्मकता समजली नसावी
------------------------------------------------
ती कलाकाराच्या कलेच्या रसग्रहणात आहे,
कलेला दिलेल्या दादेत आहे,
हो ! तीही एक कलाच आहे,
.......तीही एक कलाच आहे!!

Pages