भाग्ययोग - टिटवी व तिची पिले

Submitted by पुरंदरे शशांक on 20 January, 2012 - 09:06

भाग्ययोग - टिटवी व तिची पिले

मागच्या वर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात सासवडजवळ रहाणारा माझा मित्र दिनेश पवार याने बातमी दिली की त्याच्या शेताजवळ एका टिटवी दांपत्याने दरवर्षीप्रमाणे ४ अंडी घातली आहेत.

मी चक्रावलोच. कारण माझ्या घरासमोरील पाचगाव टेकडीवर मी कितीतरी वेळा या टिटवीच्या अंड्याचा शोध घेतला होता - पण एकदाही मला त्या जमिनीवर अंडी घालणार्‍या पक्ष्याची अंडी निरखता आली नाहीत.

ही टिटवी अगदी उघड्यावर अंडी घालते व सतत सतर्क राहून त्याचे रक्षण करत असते आपल्या साथीदारासोबत. त्या अंड्याच्या शोधातला प्राणी जरा त्या दिशेला जायचा अवकाश की ती दोघे असा काही कल्ला करतात की तो त्या अंड्यांच्या बरोबर विरुद्ध दिशेलाच भरकटतो. आणि चुकून त्या अंड्याच्या दिशेला गेलाच एखादा तर त्या जोडीपैकी एक़जण जमिनीवर पडून पंख अथवा पाय मोडल्याचा असा काही अभिनय करतो की ती अंडी सोडून सहाजिकच तो प्राणी त्या पक्ष्याकडे लक्ष देत तिकडेच जातो. हळुहळू तो अभिनय करणारा / करणारी त्या प्राण्याला बरोबर गंडवत त्या अंड्यापासून व्यवस्थित लांब नेऊन अखेर पळ काढतात.

मी न राहवून दिनेशला विचारले - तू स्वतः ही अंडी पाहिलीस का ? का उगाच हा म्हणतो, तो म्हणतो म्हणून मला सांगतो आहेस....
दिनेश - उद्या फोटो काढूनच आणतो की...... मग तरी विश्वास बसेल ना ?

हा फोटो दिनेशने काढलेला - ही ठिपकेदार अंडी कशी बेमालूम मिसळली आहेत त्या आसपासच्या खड्यात.... हे खडे कसे बरोबर वेचून आणले असतील या टिटवीच्या जोडीने ??
आणि दुसरी गंमत ही की हे खडे एवढेच काय ते घरटे..... दिनेशने पुढे सांगितले की सतत त्या जोडीपैकी एकजण ती अंडी उबवत असतो - तोवर दुसरा आपले खाणे उरकून व सतर्क राहून अंड्यांचे रक्षण करत असतो - निसर्गात काय काय आश्चर्ये भरली असतील हे त्याचा तोच जाणे.......

t 017.jpg

ते फोटो पाहून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही........ मनात म्हटले - चला याचि देही याची डोळा ही 'टिटवीची' अंडी तरी पाहता येतील...... पण मधेच अशी काही कामे निघत गेली की ती अंडी फोटोतच राहिली.......

पुढे काही दिवसांनी दिनेशने बातमी आणली - त्याच्या घरच्यांनी संध्याकाळच्या सुमारास त्या अंड्यांच्या आसपास एक मुंगुस व एक नाग फिरताना पाहिले - मी विचार केला..... झालं!!!! - आता काय ती अंडी शिल्लक रहातात या दोन तरबेज शिकार्‍यांसमोर ?? ..... पण माझा अंदाज खोटा ठरला.... त्या टिटवी जोडप्याने त्या दोघाही अंडीचोरांपासून त्या अंड्यांचे यशस्वीपणे रक्षण केले होते..... मला हाही एक धक्काच होता व मनात त्या टिटवी जोडीचे अपार कौतुकही वाटत होते.

आता दररोज न चुकता मी दिनेशला त्या अंड्यांबद्दल (त्यांच्या ख्याली खुशालीबद्दल) विचारत होतो. मला सगळ्यात आश्चर्य वाटत होते की दिनेश अथवा त्याच्या घरातल्या सर्व मंडळींबाबत ती टिटवी जोडी एवढी निर्धास्त होती...... म्हणजेच मला एक चान्स अजून होता..... त्या टिटवीची पिल्ले पहाण्याचा.....
कारण ते टिटवी दांपत्य जर एवढे या मंडळींवर विश्वासले होते तर ती पिल्लेही काही काळ तिथे आसपासच भटकणार - उडण्याइतकी मोठी होईपर्यंत....... मला अजून एक चान्स होता - प्रत्यक्ष टिटवीची पिल्ले पहाण्याचा....... ती देखील भर रानातल्या टिटवीची....

अखेर एक दिवस दिनेशने सांगितले की पिले बाहेर आली आहेत - पुढे दमही दिला की लगेच २-३ दिवसातच या नाहीतर ती पिले फार भराभर वाढतात - एकदा का पळायला लागली की फोटो काय, नजरही ठरत नाही - उडण्यासाठी त्यांचे पंख तेवढे तयार होत नाहीत लवकर, पण पळण्यात फार लगेच पटाईत होतात.

दुसर्‍या का तिसर्‍या दिवशीच तिकडे जाण्यास निघालो. जाण्याच्या दिवशी सकाळपासून ४-५ वेळा माझा फोन झाला की पिले आहेत आसपास की नाही.......कारण टिटवीला जरा काही संशय आला की ती पिले घेऊन लगेच जागा बदलते..... दिनेशने मला बिनधास्त या सांगितले - मे महिन्यातले रणरणते ऊन - ती पिले दुपारी त्याच्या सिताफळाच्या बागेतच फिरत असतात -सावलीमधे..... कुठेही लांब जात नाहीत.....

आता माझ्या जीवात जीव आला....... चला, आता नक्की पिले पहायला मिळणार - या अतिशय सावध व चतुर पक्ष्याची....
दिनेशच्या शेतात जाईपर्यंत गाडी एकदा पंक्चर वगैरे झाल्याने अगदी हायसेच वाटले की... आतापर्यंत सगळे कसं काय बरोब्बर चाललय......

पण मला तिर्‍हाईताला पहायचा अवकाश ...... त्या टिटवी जोडीने असा काही कल्ला सुरु केला की बास रे बास....- मी दिनेशला म्हटले हा कॅमेरा घे व तूच फोटो काढ..... मी आपला त्या फोटोवरच समाधान मानेन... आता काही ती पिले इथे थांबत नाहीत.....

पण दिनेशचा अंदाज बरोबर होता - दुपारच्या रणरणत्या उन्हात ती असहाय पिले त्या बागेबाहेर जाऊ शकत नव्हती -त्याच्या घरच्या मंडळींनी ती साधारण कुठे असतील ते आम्हाला हातानेच दाखवलं -

मी व दिनेश त्या सिताफळाच्या बागेत भर दुपारी(?) अगदी डोळे फाड-फाडून(?) ती पिले शोधू लागलो - कारण ती पिलेही त्या टिटवीचीच ना.... - त्यांच्या आईबाबांनी - ओरडण्यातून त्यांना "जोरदार खतरा" असा इशारा केल्यावर ती लगेच आहे त्या ठिकाणी जमिनीशी अशी एकरुप व्हायची की बास - शोधूनही सापडणार नाहीत ...... वर ते दोन्ही पक्षी आमच्यावर आकाशातून केव्हाही हल्ला करायला तयारच......

Picture 001_0.jpg

अथक प्रयत्नाअंती ती चार पिले असल्याचे लक्षात आले....... निसर्गाने त्यांच्या अंगावरील ठिपके असे बनवले आहेत की जमिनीवर ती पिले नेमकी कुठे बसली आहेत हे अजिबात लक्षात येत नव्हते.....शिवाय अशी मुडपुन बसत की आता इथे पाहिले तर लगेच कुठे गेले - असे वाटून भिरभिरायला होत होते..... आपले डोळेच काय कॅमेर्‍यालाही चकवत होती किती वेळ - एक फोकस करायचे तर त्या कॅमेर्‍याच्या स्क्रीनवर वेगळेच यायचे - अखेर कसेबसे ते उन्-सावली व जोडीला ते कल्ला करणारे, आकाशातून आमच्यावर झेपावणारे पालक पक्षी सांभाळत काही फोटो जमवले....

अजून एक भिती अशी होती की एक पिलू दिसले व त्याचा फोटो काढायला जवळ जाताना सारखे वाटायचे की दुसरे एखादे चुकून आपल्या पायाखाली तर येणार नाही !!!! कारण ही पिले एकदा का जमिनीलगत निपचीत पडून राहिली की किती तरी वेळ तशीच गुपचूप बसलेली - अगदी आपण त्यांच्या जवळ गेलो तरी एवढीही हालचाल न करणारी... त्यांच्या आई-बाबांचे ऑल क्लिअर हा इशारा येत नाही तोवर किती ही वेळ..... एवढी डिसिप्लीन्ड पोरं पाहून माझाच जीव कळवळत होता - न जाणो आपल्यामुळे एखादे पिलू उन्हातच बसून राहिले तर या कडक उन्हात हे किती वेळ तग धरणार.....

एकीकडे या गोष्टीमुळे चिडचिडही होत होती तर कधी निसर्गाची ही विलक्षण किमया पाहून धन्य धन्यही वाटत होतं.......एकंदर, हा सगळा अनुभव घेण्याचाच भाग होता -
आता लिहिताना मजा वाटतीये पण प्रत्यक्षात काय काय गंमती झाल्या हे दुसर्‍या कोणी माझेच शूटिंग घेतले असते तर हे सगळे बोअर वाचण्यापेक्षा तुम्ही सगळे नक्कीच ती कॉमेडी फिल्म पहाण्यातच रंगून गेला असता .......

Picture 016.jpgPicture 039_0.jpg

हे फोटो काढताना माझी कशी व का "फे फे" उडत होती ते पहा -

Picture 011.jpgPicture 012.jpgPicture 019.jpgPicture 038.jpg

रागावलेली व कर्कश्श ओरडणारी पालक टिटवी -

Picture 046_0.jpg

ती पुराणात गोष्ट आहे ना त्या टिटवीची - समुद्राने गिळंकृत केलेली तिची अंडी ती कशी परत मिळवते त्याची - एका अर्थाने त्या पराकोटीच्या जिद्दीची सत्यताच पटली..........एवढासा पक्षी - पण ती अंडी जमिनीवर उबवतो काय, पुढे त्या पिलांचे संगोपन करतो काय - सारेच अशक्य कोटीतले..........

एक आगळंच समाधान मिळालं ते पक्षी, त्याची पिले व एकंदर निसर्गाची किमया पाहून.......

टिटवी म्हणजेच - Red wattled lapwing (Vanellus indicus)

माझे इतर भाग्ययोग -
http://www.maayboli.com/node/24654

http://www.maayboli.com/node/28152

http://www.maayboli.com/node/27244

http://www.maayboli.com/node/30597

गुलमोहर: 

छान लिहिलं आहे.. +१

आमच्या गावाकडेही पूर्वी मोठ्या प्रमाणावर हे पक्षी पाहायला मिळायचे.आताशा फारसे नजरेस पडत नाहीत.

छान लिहिलं आहे शशांक ! ती पिल्लं दिसुनच येत नाहीएत इतकी मिसळुन गेलीत जमिनीच्या रंगाशी. निसर्गाची कमाल !

मस्त. मी पण पाहिलय टिटवीच्या पिल्लांना ,तास्भर खिड्कीच्या पडद्यामागे लपून.

अगदी डोळे फाड-फाडून ती पिले शोधू लागलो - कारण ती पिलेही त्या टिटवीचीच ना.... - त्यांच्या आईबाबांनी - ओरडण्यातून त्यांना "जोरदार खतरा" असा इशारा केल्यावर ती लगेच आहे त्या ठिकाणी जमिनीशी अशी एकरुप व्हायची की बास - शोधूनही सापडणार नाहीत ...... >> अगदि..

सुंदर अनुभव आणि छान वर्णन.

असे योग आपल्या आयुष्यात वारंवार येवोत.

मस्त लिहिलंय नी फोटोही सुंदर.

निसर्गात काय अजब अजब चमत्कार भरलेत. आणि आपल्याला त्यातले काहीही माहित नाही.

मस्त लिहिलंय नी फोटोही सुंदर.

निसर्गात काय अजब अजब चमत्कार भरलेत. आणि आपल्याला त्यातले काहीही माहित नाही.

शशांक, खरेच भाग्ययोग.
हे बघायला मिळणे खरेच दुर्मिळ.
एवढ्याश्या पिल्लांना आईबाबांच्या सूचना कशा कळतात, ह्च आश्चर्य आहे.

छान लिहिलयं,
आणि धन्यवाद टिटवीची पिल्ल फोटोरुपाने आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल. ती पिल्लं अगदी बेमालुम रितीने मातीच्या रंगाशी मिसळुन गेलीत. Happy

अरव्हाईन मधील संत जोकीन अभयारण्यात दिसलेली हीच ती टिटवी (एप्रील २०११)

जवळच असलेल्या तिच्या घरट्याजवळ (अर्थात जमिनीवरील) लोकांनी चुकून किंवा मुद्दामून जाऊ नये म्हणुन पिवळी फीत पण लावली होती.

आशिष - काय सुरेख फोटो दिलाय या टिटवीचा, ही टिटवीही किती बेमालूम मिसळली आहे आसपासच्या परिसरात.......
सर्वांचे मनापासून आभार....

पक्षीमित्र शशांक,
लेख, फोटोद्वारे माझ्यासारख्यांच्या माहितीत भर टाकल्याबद्दल धन्यवाद.
----------------------------------------------------------
अवांतर : तसे तुम्ही पक्षीमित्रच नव्हे तर
प्राणी, कीटक-मित्र देखील आहात
हे तुमच्या आधीच्या लेखांवरून स्पष्ट होतं.

शशांक, सुरेख लेख आणि फोटो. खरच किती बेमालुम मिसळली आहेत ती पिल्लं आजूबाजूच्या वातावरणात...
व्वा... मजा आया.

Pages