तो शब्द ‘एकटा’ होता...

Submitted by किरण..... on 12 January, 2012 - 05:29

कवितेत अवेळी निजला, मुळात 'भेकडा' होता
माझाच मला ना कळला, 'तो शब्द' एकटा होता...

साथ ना त्याची त्याला, आधार ना ओठांचा,
त्यालाच सोडून झाला उच्चार शेजाऱ्याचा,
त्याच्यात गर्जला सूर, शाईने माखला नूर,
त्यानेही रंगले पान, स्वतःत उठवले रान..
नकळत मागे सुटला, स्वप्नात लाडका होता..
माझाच मला ना कळला, तो शब्द एकटा होता...

शब्द बिचारा माझा, विझता-विझता दीपला,
एकांत दाटला इतका, अबोल होऊन मिटला,
मी सुटलो आहे मागे, सांगत गेला मजला,
बोलून थकला इतका, तो कायमचा निजला..
तो बोलत होता तेव्हा संवाद वाकडा होता,
माझाच मला ना कळला तो शब्द एकटा होता...

मला ना जाणीव झाली, तो शब्द हरवला होता
कवितेत असुनी देखील माझाच राहीला नव्हता
तो निःशब्द झाला तेव्हा छंद फाटका होता,
मला कसा ना कळला, तो शब्द एकटा होता...

-किरण

गुलमोहर: 

खूप अर्थपूर्ण वाटली कविता...
पण 'शब्द एकटा होता..' ला कुठेच यमक दिसला नाही...असे का? मार्गदर्शनाची अपेक्षा
चू.भू.दे.घे

प्रिय मित्र अनाहक...
केवळ 'ट' ला 'ट' जुळविला म्हणजे कविता होत नाही...आणि तसेही 'मात्रा' महत्वाच्या असतात...
काही वेळा यमक 'व्यंजनातून' नाही तर 'स्वरांतून' देखील साधले जाते.. कृपया मराठी 'पद्य व्याकरणाचा' अभ्यास करावा...
कृपया हे सदैव स्मरणात असू द्या " 'कविता' ही 'भावना' मांडण्यासाठी लिहिली जाते, 'यमक' जुळवण्यासाठी नाही...."
तरीही आपल्या अनमोल सुचनेसाठी धन्यवाद...

छान Happy

विभाग्रज माझ्या मते "भेकडा" हा शब्द एकटा नाहीये.... मला वाटतंय आपल्याला कविता समजलेली नसावी....
दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप-खूप आभार......

खरच ईतकई छान कविता. की त्याच विडंबन करावस वाटल. किरण..... यांची माफी मागुन ही घ्या लिंक.
हे धाडस दिल़खुलास मा.बो. करांच्या भरवशावर..... http://www.maayboli.com/node/31912

'विद्या विनयेन शोभते'
किरण आपण अनाहक व विभाग्रज या प्रतिसादकांना दिलेल्या उत्तरांची भाषा उग्राहंकारी वाटली व मनाला पटली नाही.

pradyumnasantu... तुमचे बोलने मनाला पटले....
मी याबद्दल 'अनाहक' व 'विभाग्रज' यांची माफी मागतो....तसेच त्यांच्या विचारांबद्द्ल आदर व्यक्त करतो...