टका शेर कविता, टका शेर गजल

Submitted by एम.कर्णिक on 11 January, 2012 - 06:37

(टका शेर कविता टका शेर गजला
टक्क्यात अर्ध्या माझाहि मतला)

मुशायरे तर सुमार होते म्हणून मग नाटका निघालो
"इर्शाद इर्शाद" वाले सगळे मीहि त्यात फाटका निघालो

सुटाबुटातील यार सगळे, सफ़ेद माझा विजार कुर्ता
सुमार शिवणीतल्या सुटांच्या पुढे तसा नेटका निघालो

बघून 'हाऊस फ़ुल्ल' पाटी निराश सारे परत निघाले
विचारले मी मनास माझ्या, "मुळात मी लेट का निघालो?"

भुकेजलेले सगळे जेव्हा हॉटेल बघुनी खुशाल शिरलो
शुचिर्भुतांच्या घोळक्यामधे बस् एक मी बाटका निघालो

"मै देता हूं बील" ही अहंहमिका होती जिथे चालली
चाचपताना खिश्यातल्या चिल्लरीत मी तोटका निघालो

रात्री परतीच्या रस्त्यावर कुणीतरी विव्हळत पडलेला
’मुकुंद’ नामाभिधान असुनी भिऊन कर्कोटका निघालो

गुलमोहर: 

वाह मस्त प्रयत्न............. अभिनन्दन
टका शेर कविता टका शेर गजला .............वॉव ग्रेट
या तुमच्या ओळी आहेत का खूप जबरदस्त आहेत थोडा बदल सुचलाय वृत्तासाठी. कृपया करून पहावा

टका शेर कविता टका शेर गजला
टका आरधा नेटका एक मतला

विभाग्रज आणि वैभवराव,
खूप आभारी आहे.
वैभवराव, ती ओळ गजलेच्या मुख्य प्रवाहातली नसून केवळ प्रस्तावनावजा आहे आणि आहे तशीही एका लयीत आहे त्यामुळे बदलत नाही. तरी पण तुमच्या सूचनेबद्दल पुन्हा वेगळे आभार.

गुन्हा ? अहो साधा का गुन्हा हा !! Light 1
आम्हाला आपलं बनुताई, बंटीत रमणारे आजोबाच ठाऊक होते !
इथं पाहतो तो काय , सरळ सरळ गझलच कि हो Lol

किरण,
कसचं, कसचं .... अहो काही काळापूर्वी दुसर्‍या एका वेब्साईटवर आप्ल्या 'बेफिकीर' यांच्याकडून थोड्या कानपिचक्या आणि खूपसे अनुभवसिद्ध मार्गदर्शन मिळाले होते तेव्हापासून अजून गजलेच्या प्रांतात उमेदवारीमधेच धडपडतो आहे. आणि गजल लिहायचा मोह होणे हे 'सेवन इयर्स इच' सारखेच असल्याने आजोबांनाही तो टाळता येणे दुरापास्त आहे नाही का? बाकी प्रश्न बनुताई आणि बंटीबाबांचा. तर त्यानीही मधूनमधून वहावत जायला परवानगी दिली आहे हो.
पुन्हा एकदा आभार, तुमचे आणि फालकोर यांचेही.

एम.कर्णिक | 12 January, 2012 - 21:48 नवीन
किरण,
कसचं, कसचं .... अहो काही काळापूर्वी दुसर्‍या एका वेब्साईटवर आप्ल्या 'बेफिकीर' यांच्याकडून थोड्या कानपिचक्या आणि खूपसे अनुभवसिद्ध मार्गदर्शन मिळाले होते तेव्हापासून अजून गजलेच्या प्रांतात उमेदवारीमधेच धडपडतो आहे. >>>>>

मी हे सगळे कधी व कुठे केले माहीत नाही किंवा आठवत नाही, पण हिरण्यकेशी या अक्षरगणवृत्तात यती पाळायची तितकीशी गरज नसते जसे हे हिरण्यकेशी:

http://www.maayboli.com/node/31832

Happy

तांत्रिकदृष्ट्या अलामत भंगणे व अक्षरगणवृत्त न पाळणे (किंवा एखाद्या ठिकाणी वृत्त न पाळणे) सोडून गझलसदृष रचना आहे व अभिनंदन!

-'बेफिकीर'!

बेफिकीर,
मार्च एप्रिल २००९मधे 'मराठी गजल - एक अखंड मैफल' या वेबसाईटवर माझ्या काही गजलसदृष रचनांवर तुम्ही केलेल्या टिप्पण्यांच्या संबंधी तो उल्लेख होता.

कवितेत यतिभंग आणि गजलेत अलामतभंग ही दोन्ही पापे एकाच पातळीवरची ठरावीत. यतिभंग असलेली ओळ गद्यात वाचली तर अजिबात खटकत नाही. पण मग ते पद्य रहात नाही.

अभिनंदनाचा आभारपूर्वक स्वीकार करतो.