घटित - अघटित

Submitted by शांकली on 27 December, 2011 - 05:19

घटित - अघटित

हॉस्पिटल मधला दिवस जसा असतो तसाच तोही एक दिवस होता. डॉक्टर्स, नर्सेस ची धावपळ, नवीन पेशंट्सची अ‍ॅडमिशन, काहींचा डिस्चार्ज तर काही पेशंट्स डॉक्टरांची प्रतीक्षा करत वेटिंग रूम मधे बसलेले.....
त्यातच 'तो' पेशंट दाखल झाला. उलट्या-जुलाबांनी त्याची हालत खूपच खराब झाली होती. अ‍ॅडमिट झाल्यावर डॉक्टरांनी त्याची तपासणी सुरु केली आणि सुरु झाली एक विलक्षण गुंता गुंतीची कहाणी.......
सकृत दर्शनी त्याला gasteroenteritis झाला आहे असे डॉ.ना वाटले, पण... त्याच्या हृदयाचे ठोके नॉर्मल पडत नव्हते. E C G सुद्धा abnormal आला होता. त्याच्यात conduction abnormality निर्माण झाली होती.
त्याला अर्थातच सी सी यु मधे दाखल करण्यात आलं.
सुरुवातीला एखाद्या व्हायरसमुळे हृदयावर परिणाम होऊन हृदयाचे ठोके मंदावले आहेत असं वाटलं. एखादे वेळेस मेंदूला सूज आल्यामुळे सुद्धा कवटीतील दाब वाढतो आणि हृदयाचे ठोके मंदावतात.
अ‍ॅडमिट व्हायच्या दिवशी सकाळीच त्याला मळमळू लागलं होतं. आणि नंतर त्याला उलट्या जुलाब सुरु झाले होते त्यामुळे डॉ. सुरेश शिंदेंना हा यलो ओलिएंडर पॉयझनचा प्रकार वाटला. यलो ओलिएंडर म्हणजे आपल्याकडे आपण ज्याला कण्हेर म्हणतो तसाच फुलझाडाचा एक प्रकार. या वनस्पतींमधे काही औषधी गुणधर्म आहेत आणि विशेषतः हृदय रोगावर हमखास गुणकारी! डिजिटॅलिस हे औषध या वनस्पतींपासून तयार करतात. परंतु याच वनस्पतींच्या कुठल्याही भागाचा अर्क प्रमाणाबाहेर जास्त झाला तर हीच वनस्पती हृदयाला मारक ठरते.
त्या वनस्पतीची नेटवरून माहिती घेत असताना डॉ. शिंदेंना एक गोष्ट समजली की श्रीलंकेत अशा केसेस कॉमन आहेत. तिकडे आत्महत्या करण्याकरता यलो ओलिएंडरच्या बिया उपयोगात आणतात. त्यावर संशोधन होऊन तिकडे डिजिटॅलिस अ‍ॅंटीबॉडीज तयार केल्या आहेत. या अँटीबॉडीज दिल्यावर पेशंट वाचतात. पण हे इंजेक्शन तिकडे उपलब्ध होते; भारतात नाही. ह्या पेशंटला हे द्यायचे तर श्रीलंकेतून मागवून त्याला देईपर्यंत वेळ गेला असता.
डॉ.सुरेश शिंदे यांनी त्या मुलाची हिस्टरी तपासायला सुरुवात केली.त्यात त्यांना असं कळालं की गेले काही महिने रोज सकाळी तो गुळवेलीचा काढा घेत होता. त्याही दिवशी त्याने काढा घेतला होता आणि त्यानंतर काही वेळातच त्याला मळमळायला लागलं होतं. इतर दिवसांपेक्षा त्या दिवशी घेतलेला काढा जरा रंगाने काळसर आणि चवीला कडू होता.काढा घेतल्यानंतर काही वेळातच त्रास सुरु झाल्यामुळे इतर काहीही पदार्थ त्याने खाल्ला नव्हता. त्यामुळे त्या काढ्यामुळेच त्रास झाला हे निश्चित झालं.
त्यातच आणखी एक धक्कादायक गोष्ट घडली - ती अशी की हा मुलगा अ‍ॅडमिट झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी आठच्या सुमारास त्याची आई पण ह्याच त्रासामुळे अ‍ॅडमिट झाली - उलट्या जुलाब आणि heart blockage! दुर्दैवाने त्या बाई कॅन्सर पेशंट होत्या......मुलाबरोबरच त्यांनीही गुळवेलीचा काढा घेतला होता. प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते म्हणून हा काढा त्या सुमारे ४-५ वर्षे घेत होत्या.
त्या बाईंना वाचवण्याची डॉ.नी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही यश आले नाही ...... अ‍ॅडमिट केल्यापासून अक्षरश: एका तासात त्या बाई मृत्युमुखी पडल्या..... पण कॅन्सरने नाही; तर कंप्लीट हार्ट ब्लॉक झाल्यामुळे. आई गेल्याचे अर्थातच मुलाला सांगितले नाही.
या सर्व घटना, डॉ.चे मुलाला वाचवण्याचे उपाय आणि त्याच बरोबर हे असं का घडलं असावं याचा शोध घेण्याची क्रिया या सर्वच गोष्टी प्रचंड वेगाने घडत होत्या. विशेष आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या मुलाची प्रकृती हळूहळू सुधारत होती आणि तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत होता. काही दिवसांतच त्याला बरं वाटू लागलं आणि त्याला घरी सोडण्यात आलं.
पण ही गोष्ट इथेच थांबली नाही........
त्या मुलावर उपचार करणार्‍या डॉ शिंदे यांना हे असं का झालं असावं याचा शोध घ्यायचं असं ठरवलं त्यामुळे त्यांनी तो मुलगा अ‍ॅडमिट झाल्यावर लगेचच त्या गुळवेलीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. वास्तविक गुळवेल ही वनस्पती विषारी नाही; तर औषधी आहे. मग तिच्याबरोबर दुसरं काही पोटात गेलं का? ह्या शंकेने डॉ. शिंदे शोध घेऊ लागले.
ह्या मुलाच्या वडिलांची जेजुरी जवळ थोडी जमीन आहे. तिथे त्यांनी पत्नीला उपयोग होईल या उद्देशाने गुळवेलीची लागवड केली होती आणि याच गुळवेलीच्या ताज्या काड्या आणून त्याचा काढा हा मुलगा आणि त्याची आई रोज घेत होते.
डॉ शिंदेंनी त्या काड्या आघारकर संशोधन संस्थेतील डायरेक्टर आणि मेडीसीनल प्लांट्स मधेच संशोधन करणार्‍या डॉ. उपाध्ये यांना दाखवल्या. गुळवेलीबरोबर आणखी दुसर्‍या कुठल्या तरी वनस्पतीच्या काड्या आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. पण नुसत्या छोट्या काड्यांवरून वनस्पती ओळखणं शक्य नाही तर ती वनस्पती प्रत्यक्षच बघायला पाहिजे असंही सांगितलं.
डॉ. शिंदेंनी प्रख्यात वनस्पती तज्ञ श्री श्रीकांत इंगळहळीकरांना ती वनस्पती ओळखायला मदत करण्याबद्दल विचारलं. श्री. इंगळहळीकर लगेच तयार झाले आणि एका सकाळी डॉ शिंदे, श्री. इंगळहळीकर, तो मुलगा व त्याचे वडील हे सगळे जेजुरीच्या त्यांच्या फार्मवर पोहोचले.
गुळवेलीचं निरिक्षण करताना ती दुसरी वेल त्यांना दिसली. त्या वेलीने गुळवेलीला वेढलं होतं. जणूकाही एखाद्या अजगराने भक्ष्याला विळखा घालावा तसं ते दिसत होतं.
ही एवढी मंडळी सकाळी सकाळी काय शोधताहेत हे बघण्यासाठी तेथील गावकरी मंडळीही जमा झाली होतीच. त्यांच्या बोलण्यातून त्या दुसर्‍या वेलीला 'कावळी' म्हणतात हे ही समजलं. या वेलीची फळं बैलाच्या शिंगांसारखी दिसतात. डॉ.शिंदे आणि श्री. इंगळहळीकर यांनी बघितलं की त्या भागात सगळीकडेच ही 'कावळी' वनस्पती माजली आहे.
त्या वनस्पतीचे फोटो आणि नमुने घेऊन ही मंडळी पुण्यात परतली. या वनस्पतीचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की या कुटुंबावर मृत्यूचं सावट याच 'कावळी' वनस्पतीमुळे पडलं होतं. या कावळीचं बोटॅनिकल नेम - Cryptolepis buchanani
गुळवेलीबरोबर ही वनस्पतीपण तोडली गेली आणि काढ्यात तिचा अर्क उतरला आणि पुढचं सगळं आक्रीत घडलं.
ऑस्ट्रेलियात या वनस्पतीने इतका हाहा:कार माजवला होता की राष्ट्रीय पातळीवर काही विशिष्ट धोरण आखून तिला नष्ट करण्याचे प्रयत्न करावे लागले.
डॉ. शिंदे यांनी ज्या संशोधक वृत्तीने या घटनेमागची कारण मीमांसा शोधून काढली त्याबद्दल त्यांना शतश: धन्यवाद द्यावेसे वाटतात. या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन असं का घडलं असावं ह्याचा शोध त्यांनी घेतला हे विशेष आहे. डॉ. शिंदे हे अतिशय ऋजू स्वभावाचे व अभ्यासूवृत्तीचे आहेत.
अशा अनेक विलक्षण वैद्यकीय घटना कोणा जिज्ञासू वाचकाला वाचायच्या असतील तर डॉ शिंदे यांच्या http://www.sushrutam.com या ब्लॉगवर वाचायला मिळतील.

डॉ. सुरेश शिंदे
dr suresh shinde.jpg

कावळी - Cryptolepis buchanani

cryptolepis buchanani 2.jpgkavali1.JPG

टीप : १) या लेखाचा उद्देश हा केवळ आपल्या आजूबाजूला काही विषारी वनस्पती असू शकतात; आणि त्यापासून योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे हे कळावे असा आहे; वरील घटनेत गुळवेलीचा प्राणावर बेतण्याशी काही संबंध नसून गुळवेल ही विषारी नाही - याची कृपया नोंद घ्यावी.

२) वरील घटना ही सत्य घटना असल्याने या घटनेशी संबंधीत कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान लिहिता तुम्ही, वाचत होतो तेव्हाच जाणवलं की ही सत्यकथा असावी .शेवटी फोटो दिलेत आणि खात्री पटली .
असं खरंखुरं लिखाण वाचायला फार आवडतं मला . विषयही माझ्या व्यवसायाशी संबंधित निघाला .धन्यवाद
अशा लेखनास अनेकानेक शुभेच्छा

बाप रे ... ह्या कावळीशी आमचा लहानपनापासून संबंध. कावळीला जी लाम्बट फळे येतात ती तोडल्यावर शेरासारखा पांढरा चीक येतो त्याला कडवट वासही येतो... आमचा स.बंध म्हनजे ह्या कावळीची फळे त्याला आम्ही 'बैल' म्हणत असू. ती फोडल्यावर त्यातून मऊ हलक्या, सावरीसारख्या म्हातार्‍या बाहेर पडत . त्यासाठी आमचा त्याच्याशी संबंध.

चांगली माहिती आहे. धन्यवाद शांकली. ज्याप्रमाणे इतर विषारी द्रव्ये / वनस्पती यांना औषधी उतारा असतो तसाच याही वनस्पतीतील विषारी द्रव्याला उतारा असेल / आहे का?

उत्तम लेख.
वनस्पती ओळखता येणे फार मह्त्वाचे आहे.
हा लेख माझ्यासाठी महत्वाचा आहे, अनेकवेळा अनुभव आलेला आहे तरी
अनोळखी वनस्पती हाताळायचा मोह मला फार प्रयत्नाने टाळावा लागतो.

सुरेख आणि माहितीपूर्ण लेख.
धन्यवाद शांकली. Happy

गावी एकदा बैलगाडीला कमान बांधण्याच्या निमित्ताने कावळीची वेल पाहिली होती. कावळीची वेल लवचिक असल्याने बैलगाडीला त्याची कमान चांगली होते.

चांगली माहिती दिली आहे शांकली.
ब्लॉगची लिंक दिल्याबद्दलही धन्यवाद. खूप अनुभव वाचायला मिळतील Happy

शुम्पी, +१

डॉ शिंदेंनी पाठपुरावा करुन ही सगळी माहीती मिळवली ह्याबद्दल त्यांचे आभार.

रच्याकने, डॉ शिंदे कोणत्या पॅथीचे डॉ आहेत?

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. कावळी ही वनस्पती विषारी असली तरीही तिचे काही औषधी गुण सुद्धा आहेत. बर्‍याच ठिकाणी संधिवातासाठी आयुर्वेदिक पोटली मसाजात तिचा बाहेरून उपयोग करतात. विषारीपणा हा त्या त्या वनस्पतीचा स्व-संरक्षणाचा भाग असतो.

डॉ. शिंदे - एम. डी. (अ‍ॅलोपॅथी), कन्सल्टिंग फिजीशिअन असून पुणे-सातारा रोडला स्वारगेटच्या पुढे- साईबाबा मंदीराच्या अलिकडे - कृष्णा चेंबर येथे त्यांचा दवाखाना आहे.

>>चांगली माहिती. पण दुर्दैवी घटना..

अनुमोदन. हा लेख लिहिल्याबद्दल आणि ब्लॉगच्या लिंकबद्दल धन्यवाद!

छान

प्रिय मायबोलीकर,

नमस्कार !
आपल्या प्रतिक्रियांबद्दल शतशः धन्यवाद ! अचूक वैद्यकीय निदान ही एक कला आहे. आपल्या आजाराचे योग्य निदान करताना आम्हाला केवल रुग्ण बरा झाला येथपर्यंत न थाम्बता हा आजार का झाला याचा ठाव घेतला तरच तो आजार पुन्हा इतरांना होणार नाही याची खात्री करावी लागते.
"पुढच्याला ठेच व मागचा शहाणा" या वृत्तीने सर्व समाज आरोग्यपूर्ण होवू शकेल.
धन्यवाद !

Created using "Hindi for iPhone" App http://bit.ly/fuTilE

बापरे !!
अश्या अनोळखी वनस्पती जपून हाताळायला पाहिजे यावर अनुमोदन.
तसेच कोणत्याही घरगुती काढा, वैगैरे उपचार करताना पुर्ण काळजी घेणे गरजेचे आहे, आपल्याकडे हा प्रकार जास्त अढळतो

Pages