तुम्ही खरं जग बघितलंय?

Submitted by सई केसकर on 11 November, 2011 - 14:18

शाळा-कॉलेजात असताना नेहमी कुणीतरी, "तुम्हाला आयुष्य सोपं वाटतंय आत्ता म्हणून हे असले नखरे करताय. तुम्ही अजून खरं जग पाहिलेलं नाहीच मुळी" असं येताजाता ऐकवायचं.
मग पी.एच.डी करताना नेहमी गाईड ऐकवायचा, "धिस इज नॉट रियल लाईफ. रियल लाईफ इज हार्ड".
अरेच्चा! कधी दिसणार मग आम्हाला खरं आयुष्य? जे दिसल्यानंतर आम्हालाही कुणालातरी, "तू अजाण आहेस" असं म्हणायचं लायसन मिळेल.
जिथे कुठल्याही पेचाला सरळ सोट उत्तर नसेल. जिथे प्रत्येक माणूस मनात एक आणि ओठावर एक ठेऊन वावरत असेल. जिथे कुणावरच विश्वास ठेवायला मन धजावणार नाही. जिथे राग, लोभ, मोह, मद-मत्सर इत्यादी नेहमी काळ्या सावलीसारखे आजूबाजूला घिरट्या घालतील. जिथे कष्ट आणि मिळणारं फळ कधीच डायरेक्ट प्रपोरशन मध्ये नसतील. जिथे शिड्या चढताना नेहमी आपण कुठेच जात नाहीयोत असं दाखवत वर जावं लागेल. असं खरं खरं आयुष्य कधी बरं दिसणार आम्हाला?
असं आयुष्य नोकरीला लागलं की दिसतं. त्याला खरं का म्हणायचं हे मात्र कोडं आहे.
नोकरीतल्या राजकारणासारखा अतिशय डोकेफिरवू पण तितकाच अगम्य विषय दुसरा नाही. ऑस्ट्रेलियात असताना कामातलं राजकारण प्रामुख्याने आपलं काम दुस-याला कसं देता येईल या भावेनेतून व्हायचं. आणि अमेरिकेतलं राजकारण हे आपलं काम दुसरा काढून घेईल का या भावनेवर आधारित असतं. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना शिड्या चढून वर वर जाऊन दिसेनासं व्हायचं असतं. आणि हो. ते प्रोफेसर झाले की दिसेनासेच होतात. कधी युरोपात, कधी ब्राझील, कधी भारत, कधी चीन असं करत करत स्वत:च्या प्रयोगशाळेत वर्षातून पाच सहा वेळा येतात झालं. ऑस्ट्रेलियातले प्रोफेसर सुद्धा दिसेनासे होतात. पण ते घरापाठीमागच्या बीचवर बियर पिताना सापडतात गरज पडलीच तर. शेवटी काय, तर दिसेनासं होण्यासाठी ही सगळी उठाठेव! पण त्या उठाठेवीत खालून वर जाणार्‍या कित्येत होतकरू प्रोफेसरांचा कॉमेडी शो बघायला मिळतो. त्याला हे "भवसागर दुस्तर आहे" च्या चालीवर गाणारे लोक "खरं आयुष्य" असं म्हणतात.
खरं सांगायचं तर या राजकारणातून कुणालाही सुटका नाही. इथे निओला मिळालेला लाल आणि निळ्या गोळीचा पर्याय नाही. पण या मायाजालात अडकल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार रूप धारण करतो. माझ्या भोवताली दिसणारी (आणि त्यात थोडी कल्पनेची फोडणी देऊन सजवलेली) काही व्यक्तिमत्व मी इथे रेखाटायचा प्रयत्न करत आहे.

१. अलिप्त

हे लोक पूर्वीच्या एखाद्या प्रेमभंगामुळे जखमी झालेल्या आणि ब-याच प्रयत्नांती मार्गावर आलेल्या मजनुसारखे असतात. मी कुणाचाही मित्र नाही आणि कुणाचाही शत्रू नाही. मी सकाळी ऑफिसला येणार आणि दिवसभर माझ्या कोपर्‍यात माझ्या हद्दीत, माझ्या अशिष्टनांबरोबर काम करून घरी जाणार. यांचे सेवकही अलिप्त असतात. आणि कमळाच्या पानावरच्या थेंबासारखे हे इकडून तिकडे सुळसुळ पळत असतात. अर्थात याचा डेटासुद्धा त्याच्या जनकासारखाच अलिप्त असतो. आणि पेपर छापून येईतो कुणालाच हे नक्की काय करतात याची काही कल्पना नसते.

२. असुरक्षित

अलिप्त आणि असुरक्षित या दोन्ही व्याक्तीमात्वांमध्ये कोंबडी आधी की अंडं आधी असं नातं आहे. असुरक्षित लोक नेहमी अलिप्त लोकांवर उचकलेले असतात. आणि अलिप्त लोक केवळ त्यांच्या रोलमुळे (आमच्याइकडे सगळे एकदम रोलमध्ये घुसतात) ते उचकलेत हे दाखवत नाहीत. असुरक्षित नेहमी तुमचं नक्की काय चाललंय याचा शोध लावण्यात दंग असतात. लहान मुलं (नको असलेले) पाहुणे आले की "काका तुम्ही कधी जाणार?" असं विचारतात तसं नोकरी सुरु केल्या केल्याच, "तुझा इथे किती दिवस काम करायचा बेत आहे?" असले प्रश्न ते तुमच्यासमोर फेकतात. या प्रश्नाला खरं उत्तर द्यायचं तर "तुला जास्तीत जास्त त्रास द्यायला जितके दिवस लागतील तितके" असं आहे. पण खर्‍याची दुनिया राहिली नाही. एखाद्या मिटिंगला तुम्हाला आमंत्रण आहे आणि यांना नाही असं यांना कळलं तर अल्लाह मालिक! तो अख्खा दिवस तुमच्यावर टाफरण्यात, तुमची हजार उणी काढण्यात आणि गरज पडली तर सगळ्यांसमोर तुमचा उद्धार करण्यात घालवतात. आणि मिटिंगहून तुम्ही परत आल्यावर, "कुणी माझ्याबद्दल विचारलं का?" असा मंदिरावर कळस ठेवायला सुद्धा कमी करत नाहीत.
"तुला प्रोफेसर व्हायचंय की इंडसट्रीत जायचंय? या प्रश्नाला "मला माहित नाही" हेच एक योग्य उत्तर आहे. हे दिल्यावर जर पुढचा माणूस, "यु आर वेल सुटेड फॉर इंडसट्री" असं म्हणाला की ओळखायचं, साहेबांना त्यांच्या प्रोफेसर होण्याच्या मार्गात कमीत कमी काटे हवेत. Happy आणि जर "यु कुड शाईन इन एकीडीमिया" असं आलं तर समजावं, साहेब इंडसट्री पार्टनरशी सूत जुळवायच्या मागे आहेत.

३. जोरू का गुलाम

हे लोक तुम्हाला घरी जेवायला बोलावतात. आणि त्यांच्या बायकोशी तुमची ओळख करून देतात. मग तुमच्या प्रोफेसरनीदेखील विचारले नसतील इतके प्रश्न ती तुम्हाला विचारते. जर तुम्ही तिच्या प्रिलीमिनरी सौंदर्य चाचणीत (ना)पास झालात तर तुमच्या चारित्र्याचा सखोल अभ्यासही करण्यात येतो (ओ काकू! तुम्हाला काय वाटतं तुमचा नवरा म्हणजे आमीर खान का?). यांच्या बायकोला ऑफिसमध्ये काय चाललं आहे याची इतकी डीटेलवार बातमी असते की तुम्हाला, "आयला, आपण काय करतो रोज इकडे जाऊन?" असं वाटायला लागतं. नव-याच्या साहेबाबद्दल तिची इतकी कडाक्याची मतं असतात की नक्की तो साहेबाकडे राबतो की ही, असा प्रश्न पडतो. तुम्ही बायकोच्या चाचणी परीक्षेत नापास झालात तर नंतर कधीच तुम्हाला जेवणाचं आमंत्रण मिळत नाही. या परीक्षेत पास व्हायचं गाईड लिहायचा मी विचार करतीये. पण एक झटपट नियम म्हणजे आपल्याला काहीही येत नाही आणि आपण म्हणजे अतिशय बोअर आहोत असा भास निर्माण केला की आपण पास होतो. रोज दुपारी लंच टाईममध्ये हेड ऑफिसचा यांना फोन येतो. मग दिवसातील घडामोडी नमूद करण्यात येतात. अशा रीतीने ऑफिसमधल्या राजकारणाची बॅकअप फाईल बायकोच्या डोक्यात स्टोर केली जाते. मग जेव्हा ती परत उघडली जाते तेवा त्याचं भलतंच प्रोसेसिंग झालेलं असतं.

४. प्रवचनकार

या लोकांना कुठल्याही संभाषणाआधी एकच प्रस्तावना वापरायची सवय असते. यात मुख्यत्वे ते कसे सचोटीने काम करतात आणि त्यांच्यावर किती अन्याय झालाय याचं वेगवेगळी उदाहरणं देऊन प्रवचन असतं. मी आलो तेव्हा या प्रयोगशाळेत फक्त मी आणि एक जखमी झुरळ होतं (हा प्रोफेसर म्हातारा तीस वर्षं नुसता बसून आहे!). मग हळू हळू हा आला, तो आला (ते सगळे माझ्या सावलीत मोठे झाले, आणि मला विसरले) आणि आत्ता जे वैभव तुला दिसतंय ते तयार झालं. या प्रवचनात, "हो. कळलंऽऽऽऽऽऽऽ! पुढे बोला", असं म्हणायची इच्छा दाबून दाबून आपल्याला हृदयविकाराचा झटका येईल का असं वाटायला लागतं. तसंच, तुम्ही जर यांच्या हाताखाली काम करत असाल तर प्रत्येक मीटिंगमध्ये एकच मत व्यक्त केलं जातं, ज्याच्या तुम्ही केलेल्या कामाशी काहीही संबंध नसतो. त्यांना त्यांच्या प्रवचनात जाण्यासाठी जे काही बोलावं लागेल तेच ते बोलतात. मग पुढची पंधरा मिनिटं आपण मस्तपैकी स्क्रीनसेवर मोडमध्ये जाऊन, भाजीला काय करायचं, नवीन बूट घ्यावेत का?, सफरचंद उरलियेत त्याचा पाय बनवावा का?, पण कोण खाणार?, मैत्रिणींना बोलवूया --असे विचार करायचे. साधारण संपायच्या वेळेला एखाधी सहानुभूती/ कौतुकपर कॉमेंट करायची आणि निघायचं.

५. श्री. किंवा सौ/कु कटकटी

हे लोक सुरुवातीला चाचपणी करून तुमच्यावर विश्वास बसला रे बसला की साहेबाची कटकट करायचं उलटीपात्र म्हणून तुमचा वापर करतात. मग एखाद्या मीटिंग नंतर तुम्हाला "बघितलस कसा बोलला तो?" वगैरे एसेमेस येतात. साहेब कसा साहेब होण्याला नालायक आहे याचं पदोपदी संदर्भासहित स्पष्टीकरण देण्यात येतं (पण शेवटी झाला न तो साहेब?). मग त्यांना बरं वाटावं म्हणून तुम्हालाही मुंडी हलवावी लागते नाहीतर कटकट तरी करावी लागते. पण अशा लोकांशी दोस्ती अबाधित ठेवण्यात विनोदबुद्धी आड येते. कारण विनोद केला की यांच्या त्रासाचे शेअर खाली जातात. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो.

६. श्री किंवा सौ/कु फेसबुक

यांच्या आयुष्यातलं महत्वाचं तत्व म्हणजे नेट्वर्किंग. कोण कुणाचं कोण लागतं, कोण कुणाला फंड्स देतं, कोणाशी चांगलं वागून फायदा आहे, कोणाचं कुणाशी शीतयुद्ध चालू आहे, कोणाला कोण पुढे जायला नको आहे. आपल्या शत्रूचे मित्र कोण आहेत, आपले मित्र आपल्या शत्रूचे छुपे मित्र आहेत काय, आपल्या मित्रांच्या शत्रूंकडे आपल्याला हवं असलेलं काही आहे का?. तसं असेल तर मित्राला न कळू देता त्याच्या शत्रूशी छुपी मैत्री करता येईल का? असल्या सगळ्या संभावना ते सतत पडताळून पाहत असतात. थोडा वेळ जाऊ दिला की सगळं ऑफिस असं कंपूमध्ये विभागलेलं दिसायला लागतं. आणि श्री फेसबुक हे सगळे कंपू ज्या बारीकशा जागेत एक होतात तिथे हात जोडून उभे असलेले आढळतात.

हे वर दिलेले प्रकार वेगवेगळ्या प्रमाणात एकाच माणसामध्येसुद्धा आढळतात. नव्हे, ते जास्त करून तसेच बघायला मिळतात. पण प्रसंगानुरूप यातला एखादा भाव जास्त प्रकर्षाने जाणवतो. पण थोडसं दुर्दैव असं की विज्ञानात खरी प्रगती करण्यासाठी जे गुण कामी येतात, जसं की कुतूहल, एकसंघ असण्याची वृत्ती, विचार मांडण्याचा आणि टीका सोसण्याचा मोकळेपणा, एकमेकांवरचा विश्वास, प्रत्येक पायरीवर काम करणा-या माणसाला देण्यात येणारं स्वातंत्र्य, चुका करायची आणि चुका होतात हे कबूल करायची तयारी, प्रत्येक रूढ पद्धत तपासून पाहण्याची इच्छा हे सगळे कधी कधी अगदीच ट्रेस लेवलला गेलेले दिसतात. सगळ्यात पहिल्यांदा संशोधन हे निव्वळ कुतूहलाने प्रेरित असलं पाहिजे. चांगला/ चांगली शास्त्रज्ञ बनण्यासाठी कुतूहल हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे असं माझं मत आहे. त्यानंतर येते ती त्या क्युरिओसिटीला शिस्त लावण्याची ताकद. त्यानंतर चौफेर वाचन, त्यानंतर मिळालेल्या माहितीला पुन्हा पुन्हा पडताळून पाहण्याची चिकाटी, त्यानंतर टीकेला सामोरं जायचा धीर. काही वेळानी आपण कुठल्या शाळेत शिकलो, कुठल्या युनिव्हर्सिटीत गेलो हे सगळे मुद्दे गौण ठरतात. आणि खूप खोलवर जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं, की एका वळणावर संशोधक आणि कलाकार एक होतात. ती जागा इतर सुंदर जागांसारखीच नाजूक असते, आणि फार कामी वेळ टिकते. आणि अहंकाराच्या कडकडीत उन्हात, किंवा असुरक्षिततेच्या भोवर्‍यात या सुंदर जागा लोप पावतात. त्यामुळे, त्यांना निदान आपल्या कामासाठी जपणं महत्वाचं वाटतं. खर्‍या जगात या आशावादी गोष्टी खोट्या वाटल्या तरी कधी कधी अगदी थोडावेळ जरी त्या खर्‍या झाल्या तरी आयुष्याला एक सोनेरी झालर लावण्याची ताकद त्यांच्यात असते.
आणि शेवटी, आपल्या हातून चांगलं काम घडून गेलं, की आपल्या पाठीमागून येणार्‍या नवीन संशोधकांना खुल्या दिलानी दिलेलं मंच हाच खर्‍या शास्त्रज्ञाचा मोक्ष असू शकतो.

ता.क. या वरील टायपांपैकी मी कोण आहे? कधी कधी मी १ आणि ५ सारखी वागू शकते. पण शक्यतो मी दुसर्‍यांचा अभ्यास करण्यातच वेळ घालवते. Happy

गुलमोहर: 

सुरेख जमलाय लेख. सकाळी वरदाच्या संशोधनाची साठा उत्तराचे कहाणी वाचली त्याला पूरक वाटला as far legacy of any research

हे वर दिलेले प्रकार वेगवेगळ्या प्रमाणात एकच माणसामध्येसुद्धा आढळतात. नव्हे, ते जास्त करून तसेच बघायला मिळतात. पण प्रसंगानुरूप यातला एखादा भाव जास्त प्रकर्षाने जाणवतो.

हे खरे आहे. म्हणून कुठलाहि माणुस अमुक प्रकारचाच आहे हे गृहित धरून वागणे बरोबर नव्हे. नि त्याहून वाईट म्हणजे तो अमुक जातीचा, धर्माचा, देशाचा आहे म्हणून तो अमुक प्रकारचाच आहे असे समजणे.

मस्त खुसखुशीत लेख आहे. यात श्री. रामुकाका (शोलेमधले.. हरकामे), श्री. गोडबोले (समोर हसमुख.. पण आतुन कुरुप) add करता येतील.

Happy खुसखुशीत. ह्याच धर्तीवर बहुधा प्रत्येक हापिसातील बॉस मंडळी, सहकारी मंडळी व मदतनीस मंडळींचेही वर्गीकरण करता येईल बहुतेक.

हायला. काय वर्णन आहे एकदम बरोबर.

ह्यातली २, ३ व ४ भेटले की समजायचं पुढे काय वाढून ठेवलय ते.

अमेरीकीचे राजकारण बरोबर ओळखलत...

तुझे काम कधी संपतेय असे पहिल्या दिवशी पोस्ट डॉक विचारलेले लोकंपण आहेत हे आठवले..

त्यांना जराही लाज नसते असा प्रश्ण विचारायाला...

चांगले लिहीलय Happy
>>> अशा रीतीने ऑफिसमधल्या राजकारणाची बॅकअप फाईल बायकोच्या डोक्यात स्टोर केली जाते. मग जेव्हा ती परत उघडली जाते तेवा त्याचं भलतंच प्रोसेसिंग झालेलं असतं. <<< Lol Lol Lol

भाssssरी!
शेवटचा पॅरा.. काय म्हणू?
.आणि खूप खोलवर जाऊन विचार केला तर असं लक्षात येतं, की एका वळणावर संशोधक आणि कलाकार एक होतात. ती जागा इतर सुंदर जागांसारखीच नाजूक असते, आणि फार कामी वेळ टिकते. आणि अहंकाराच्या कडकडीत उन्हात, किंवा असुरक्षिततेच्या भोवर्‍यात या सुंदर जागा लोप पावतात. त्यामुळे, त्यांना निदान आपल्या कामासाठी जपणं महत्वाचं वाटतं. खर्‍या जगात या आशावादी गोष्टी खोट्या वाटल्या तरी कधी कधी अगदी थोडावेळ जरी त्या खर्‍या झाल्या तरी आयुष्याला एक सोनेरी झालर लावण्याची ताकद त्यांच्यात असते.>>

सलाम!

छान.
आपल्या हातून चांगलं काम घडून गेलं, की आपल्या पाठीमागून येणार्‍या नवीन संशोधकांना खुल्या दिलानी दिलेलं मंच हाच खर्‍या शास्त्रज्ञाचा मोक्ष असू शकतो.
>> कदाचित, अजून खूप करायचं बाकी आहे अशा भावनेतून शास्त्रज्ञांना मोक्षप्राप्ती मिळत नसेल, तर ते चांगलंच आहे की! Happy

छान लिहिलं आहे. सई, काल तुझ्या अवलोकनातुन तुझ्या लिखाणाच्या सगळ्या लिंक्स मिळाल्या आणि त्या सगळ्या एक सलग वाचुन काढल्या. तुझ्या लेखनाचा शेवटचा पॅरा म्हणजे कळस असतो. तुझी लेखनशैली गुंगवुन टाकणारी आहेच, पण शेवटचा पॅरा.... मस्तच !

मस्त लेख नेहमीप्रमाणेच.

भारतीय ऑफिसातील अजून कॅटेगरीज

ऑफिस स्वामी: कायम काहीतरी धार्मिक करणार. यात्रेला जाऊन मग तिथले चिकट लाडू गूळ पाक इत्यादी प्रसाद देणार व इन्सिस्ट करणार. कामात बरे असतात पण. अय्यपा स्वामीचे किंवा तत्सम व्रत, नवरात्रीत उपास वगैरे साग्रसंगित करतात. त्यांच्या श्रद्धेचा हेवा वाट्तो कधीकधी, जेव्हा कामाचे स्वरूप घाबरवून टाकणारे असते तेव्हा.. आपल्यालाही स्वामी म्हणतात कधीकधी मॅम च्या ऐवजी. Happy

ऑफिस मंगळागौरः कायम आमचे हे, अहो किती फोन करतात क्किती प्रेम करतात रोज न्यायला येतात
असे सारखे. नव विवाहित. आणि त्याच कौतुकात मग्न. क्यूट व सांगेल ते काम करणार. नवे दागिने, साड्या, संक्रांतीला काळी साडी. काकवा हिचे पुढे ओफीसात डोजे करतात. ही लोकल ने जाते तेव्हा आपल्याला मनातून काळजी वाट्ते.

ऑफिस काकू: ऑ मं पुढे काकू होतात. मी, हे मुले संसार्,मुलाला स्कॉलरशिपच्या परिक्षेत बक्षिस मिळाले हे अन ते. कधी कधी डब्यात मस्त पदार्थ आणून आपल्याला सरप्राइज करतात. मिळवून घेतात. ऑफिसात रडू आले तर बाजूला नेउन आपले सांत्वन करतात.

ऑफिस फेमिनिस्टः कायम स्त्रीस्वातंत्र्याचा क्लोक पांघरणार, सदा भांडायला तयार. उशीरा राहून काम करणार पण ते मनात धरून बसणार. लवकर लवकर प्रमोट होउन पुढे जाणार कारण बॉसला हिला
हँडल करता येत नाही. तडफदार, उच्च शिक्षित. ( आपण होतो कधितरी असे. बिफोर बिकमिंग अ पार्ट ऑफ द सिस्टिम असा सल उत्पन्न करून देणारी. ) सेन्सिटिव. कामाशी कनेक्टेड.

ऑफिस बाबा: कमी शिक्षण पण खूप अनुभव. कुठल्याही सिच्युएशन मध्ये पूर्वी असेच झाले होते व तेव्हा काय केले होते याची पट्टी लगेच माहीत असते व ती काढून देतात. अडीनडीला नव्या एमबीए बॉसला ह्यांची मदत होते. घरून तीन पुडाचा डबा आणतात. दहिभात लिंबू लोणचे देखील. काहीतरी एक पालुपद असते. सी किंवा कानावर घालून ठेवतो अश्या प्रकारचे.

ऑफिस ही एक फ्यामिलीच आहे डिस्फंक्षनल का होइना.