कलियुगातील द्रौपदी - आपले छंदमध्ये प्रकाशित

Submitted by बेफ़िकीर on 27 October, 2011 - 02:29

एक मराठी दिवाळी अंक 'आपले छंद' यात माझा खालील सहभाग प्रकाशित झाला होता.

-'बेफिकीर'!
===================================

कलियुगात द्रौपदी असती तर? कसे असते तिचे जीवन? वस्त्रहरणाप्रसंगी काय झाले असते? याबाबतचा काल्पनिक आढावा! कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा हेतू तर नाहीच, पण अनाहुतपणे तसे झाल्यास आधीच माफी मागतो.

=============================================================

कुंती - आज उकडीचे मोदक करायचे आहेत गं..

पाठमोर्‍या द्रौपदीने नाक उडवून अबोलपणे नाराजी व्यक्त केली. धर्म पेपर वाचत होता.

कुंती - बरं का गं? काय म्हणतीय मी?

द्रौपदी - ऐकलंSSSSय...

कुंती - धुसफुसायला काय झालं एवढं??

झालं! सकाळी सकाळी भडका उडाला.

द्रौपदी - धुसफुसायला काय झालं म्हणजे काय? राब राब राबतीय...

कुंती - काय राबतीयस गं? मी सहा सहा...

अचानक कुंतीने जीभ चावली.. द्रौपदी व धर्माने तिच्याकडे वळून पाहिले.

कुंती - पाच पाच मुलांचा संसार सांभाळलाय मी..

द्रौपदी - हो पण मला पाच पाच नवर्‍यांचा संसार सांभाळावा लागतोय..

धर्म - तुम्ही दोघी सकाळपासून भांडत जाऊ नका.. मला कुरुक्षेत्रावर असल्यासारखे वाटते..

द्रौपदी - मी चाललेच आहे आता भीमाकडे.. ७३ दिवस झाले इथे राबतीय..

धर्म - ७२! उद्या होतील ७३!

द्रौपदी - नुसता मेला छळ! जरा इन्टरनेट ऑन केले की उकडीचे मोदक करायचेत अन पुरणाच्या पोळ्या करायच्यात..

कुंती - तासनतास त्या फेसबुकावर काय करतेस ते सांग की??

द्रौपदी - कृष्णाशी चॅट करते.. हस्तिनापूराला बोलावणे येणार आहे म्हणतोय तो..

कुंती - बाईगं! का गं??

द्रौपदी - आता त्याच्या मनात काय ते कुणाला कळणार?

धर्म - पण... हस्तिनापूरला आपण जायचं कसं??

द्रौपदी - का??

धर्म - दहा रथ सर्व्हिसिंगला टाकलेत...

द्रौपदी - इश्य येतील की तेव्हापर्यंत...

कुंती - पण कशासाठी जायचंय तिकडे??

द्रौपदी - काहीतरी वस्त्रहरण वगैरे आहे म्हणे माझं...

धर्म - हे भीम कसा काय सहन करेल??

द्रौपदी - तुम्हाला होईल वाटते सहन ??

धर्म - छे छे... मलाही नाही होणार... पण आता आपण जर एखाद्याला शब्दच दिला तर मात्र तो पाळायला हवाच ना?

द्रौपदी - शब्द द्यायचाच नाही असला...

कुंती - मीही जाऊबाईंना भेटलीच नाहीये कित्येक वर्षात... अजून पट्टी बांधतात म्हणे डोळ्यांना..

धर्म - काय हा त्याग! नाहीतर इथे बघा.. कधी एकदा ७३ दिवस होतायत याचीच वाट पाहतात..

द्रौपदी - वर्षातले ३६५ दिवस समान विभागायचे हे तुमच्याच मातु:श्रींनी सांगीतलंय.. सासूचा शब्द प्रमाण मानायचा हे तुम्ही मला तुमचा उंबरठा ओलांडतानाच सांगितलेले तत्व होते... भीमापासून सहदेवापर्यंत उंबरठे ओलांडताना मात्र मला वेगळीच तत्वे ऐकवली गेली...

धर्माने पेपर बाजूला टाकला. कुंतीने वॉशिंग मशीन ऑफ केले. दोघेही अवाक होऊन द्रौपदीकडे पाहू लागले.

धर्म - काय तत्वे सांगीतली त्या तिघांनी तुला??

द्रौपदी - तिघे?? चौघे आहेत चौघे... म्हणे तिघे..

धर्म - तेच... पण तत्वे काय सांगितली??

द्रौपदी - जाऊ देत... बाईचा जन्मच वाईट..

कुंती - ते मला माहीत आहे... तत्वे काय सांगीतली ते सांग..

द्रौपदी - आता भीमच बघा.. म्हणे रोज सकाळी सर्व गदा पुसून ठेवायच्या...मला गदा उचलतासुद्धा येत नाही.. एवढ्या गदा कशा पुसायच्या???? रोज सकाळी बारा ऑम्लेट्स आणि एक किलो कॉर्न फ्लेक्स असा नाश्ता पाहिजे.. हा करतानाच मी इत्तकी थकते की मलाच कॉर्न फ्लेक्स खायची वेळ येते.. वर म्हणतात इन्टरनेट ऑन करायचे नाही... सेलफोन वापरायचा नाही.. आता काही इमर्जन्सी झाली.. तर हाताशी सेलफोन असलेला चांगला नाही का?? परवा तर म्हणाले म्हणे फेसबूकवर स्टेटस का अपडेट केलेस?? आता नवी गढवाल आणली म्हंटल्यावर त्यातला फोटो नको का दिसायला सगळ्यांना??

धर्म - हो पण तत्व काय सांगीतलं त्याने?

द्रौपदी - म्हणे एकदा इकडे आलीस की कुंतीमाता आणि धर्मदादा यांच्याकडे ढुंकून पाहायचे नाही..

धर्म - हे भीम म्हणाला ??

द्रौपदी - होय..

धर्म - आई.. भीमाचं हे हल्ली फार वाढायला लागलंय..

कुंती - येऊचदेत आता त्याला.. बघतेच मी..

द्रौपदी - हे तर म्हणतात...

धर्म - फक्त अर्जुनालाच तू 'हे' म्हणत जाऊ नकोस... आम्ही सगळेच तुझे 'हे' आहोत..

द्रौपदी - हो पण मला जिंकून त्यांनीच आणलंय ना?

धर्म - तरीही... आम्हा सर्वांना तू 'हे'च म्हंटले पाहिजेस..

द्रौपदी - 'हे'च आहात सगळे...

धर्म - काय बोलतेस??

द्रौपदी - मग?? चक्क माझं वस्त्रहरण करणार आहेत.. आणि पेपर वाचत बसलात??

धर्म - मग मी काय करायला पाहिजे?

द्रौपदी - सगळी मिसाईल्स तयार ठेवायला पाहिजेत... सॅटेलाईट्स कार्यान्वित करायला पाहिजेत... एक सेनादलाची तुकडी हस्तिनापूरच्या बॉर्डरवर ठेवायला हवीत..

धर्म - हे सर्व आपल्याकडे नाहीच आहे.. आपण गरीब आहोत...

द्रौपदी - मग बघा स्वतःच्या डोळ्यांनी वस्त्रहरण बायकोचे!

धर्म - आई?? तुझी काय आज्ञा आहे??

द्रौपदी - त्या काय आज्ञा देणार?? पत्नीचे वस्त्रहरण करणार म्हणतायत शत्रू आणि तुम्ही आईकडे आज्ञा मागत बसता?? म्हणूनच मला भीम आणि अर्जून यांचे पटते.. जशास तसे असतात ते..

तेवढ्यात भीम तेथे येतो. त्याच्या एका हातात स्टीलच्या दोन गदा असतात आणि दुसर्‍या हातात तीन डझन केळी!

भीम - काय ठरलंय द्रौपदी तुझं ??

द्रौपदी - दादांना सांगा तुमच्या... मला काय...

भीम - दादा... एकच दिवस उरलाय.. मी हिला घ्यायला आलोय..

धर्म - भीमा.. तयारीला लाग..

भीम - मी तयारच असतो कायम..

धर्म - ती तयारी नाही... हस्तिनापूराला जायचंय..

भीम - का?

धर्म - द्यूत खेळायचंय..

भीम - द्यूत खेळायला एवढ्या लांब कशाला जायचं?? ऑनलाईन खेळू की??

धर्म - ऑनलाईन वस्त्रहरण कसं होईल??

भीम - आपण वस्त्र नेसतो कुठे दादा? आपण फक्त एक लंगोट घालतो.. आणि वर सोवळे..

धर्म - आपलं नाही... हिचं..

भीम ताडकन उठतो. त्वेषाने गदेचा एक प्रहार एका भिंतीवर केल्याने ती भिंत पडते. त्याचा तो भयानक अवतार पाहून धर्म आणि कुंती भीतीने थरथरा कापू लागतात. आनंदीत द्रौपदी पीसी शटडाऊन करून भीमाजवळ जाऊन उभी राहते.

धर्म - क... क... क.... काय... काय झालं काय??

भीम - दादा SSSSSSS .. हे काय ऐकतोय मी??

धर्म - माझेही रक्त उसळ्या मारतच आहे भीम.. पण आपल्याला सौम्य विरोध करायला हवा..

भीम - का??

धर्म - कारण आपण द्यूत जिंकलोच तर आपण कुणाचे वस्त्रहरण करणार?? त्यांच्याकडे स्त्रीला दरबारात येऊ देत नाहीत..

भीम - का? हस्तिनापूरात तालिबानी शासनप्रणाली आहे?

धर्म - नव्हे... हस्तिनापुरात स्त्रीला खूप आदर दिला जातो.. मात्र मद्यपान करून द्यूत खेळल्या जाणार्‍या ठिकाणी स्त्रीला प्रवेश नसतो.. कारण मद्यधुंद अवस्थेत जुगारी प्रवृत्तीचे काही पुरुष तेथे बसलेले असतात.. म्हणून स्त्रीला येऊ देत नाहीत..

भीम - मग आपल्याकडे का येऊ देतात??

धर्म - कारण आपण शब्द पाळण्याच्या नावाखाली आपल्याच स्त्रीला द्यूतात लावतो.. आणि हारल्यावर तिला सर्वांसमक्ष पेश करतो... हे कलियुग आहे भीम... कलियुग आहे हे...

भीम - पण... पण... पण आपण शब्द का पाळतो??

धर्म - तोच आपला धर्म आहे भीमा.. फाळणीच्या वेळेस आपण शब्द पाळलाच की??? हिंदी चीनी भाई भाई म्हणून युद्ध टाळलेच की? मुंबई हल्यातील कसाबला काही वर्षे जिवंत ठेवलाच की? हजारो पुरावे असूनही अतिरेकी कारवाया करणार्‍या पाकिस्तानने मैत्रीचा खोटा हात पुढे केला तरी आपण त्या हातात आपला हात दिलाच की? आपण शब्द पाळणारे लोक आहोत भीमा..

भीम - हो पण... आपण आपल्या स्त्रीला काय म्हणून द्यूतात लावायचे??

धर्म - कारण आपल्याकडे स्त्री ही एक भोगवस्तू असते भीमा.. तिला मन नसते... ती असते फक्त एक शरीर.. तिच्यावर मालकी हक्क तिच्या पतीचा किंवा बापाचा असतो.. त्यामुळे पती तिला सहज द्यूतात लावू शकतो..

भीम - कशावरून हस्तिनापुरात स्त्रीला भोगवस्तू समजत नाहीत???

धर्म - अनेक उदाहरणे आहेत... माता गांधारी यांनी आजन्म आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली.. पण त्यांना कायम महाराणीचाच दर्जा मिळाला... कुणीही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही... पितामह भीष्म.. राज्य त्यागायची प्रतिज्ञा तर केलीच... पण वंश होऊ नये म्हणून आजन्म विवाह न करण्याचीही... ज्या पराक्रमाने तिन्ही लोक हादरतात अशा पराक्रमी पुरुषाच्या पायाशी सर्व वैभवे लोळण घेतील अशी परिस्थिती असतानाही त्यांनी व्रत पाळले.. एकाही स्त्रीला ते वश झाले नाहीत..

भीम - हो पण.. मग ते हिचे वस्त्रहरण कसे काय करतील??

धर्म - असे कृष्ण म्हणत आहे फेसबूकवर ! तो काहीही बोलतो... मला नाही वाटत..

द्रौपदी - माझ्या भावाबद्दल वाट्टेल ते ऐकून घेणार नाही हां??

धर्म - वाट्टेल ते नाही बोलत आहे मी! मागच्यावेळेस त्याने मला टाटाचे डेटाकार्ड घ्यायला सांगीतले.. त्याला रेंजच येत नाही जंगलात.. फुकट गेले पैसे..

द्रौपदी - तो प्रश्न कृष्णाचा नाहीये.... टॉवरचा आहे..

भीम - हो पण.. कारण काय वस्त्रहरणाचे??

धर्म - आधी ही भिंत पाडलीस ती बांध.. नाहीतर आपल्यात भाऊबंदकी आहे असे जगाला वाटेल..

भीम - भाऊबंदकी नाही आहे असे वाटण्यासाठी भिंत बांधायची का?

धर्म - अर्थात.. जे जगाला दिसावे असे आपल्याला वाटते तेच आपण दाखवायचे असते..

भीम - द्रौ... तू 'नो यूवर फॉर्च्यून डॉट कॉम' ही साईट तपास.. त्यावर कळेल..

धर्म - आई... बघ.. हा हिला फक्त 'द्रौ' म्हणतो... हे मला अजिबात पटत नाही..

द्रौपदी - तो माझा आणि ह्यांचा प्रश्न आहे... काय म्हणालात हो?? डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट नो यूवर फॉर्च्यून्स डॉट??? कॉम.....

भीम - काय आलं??

द्रौपदी - लॉगीनची विंडो आली... लॉगीन काय करायचं??

भीम - सौ द्रौपदी भीम पांडव..

धर्म - माझे याला ऑब्जेक्शन आहे.. सौ. द्रौपदी धर्म पांडव असे लॉगीन पाहिजे..

भीम - नुसतेच द्रौपदी पांडव कर...

द्रौपदी - म्हणजे सौ. पण नको??

भीम - नको... नाहीतरी तुझे स्वयंवरच झाले होते...

द्रौपदी - हं... आणि पासवर्ड??

भीम - उकडीचे मोदक..

द्रौपदी - हं... आता??

भीम - आता विचार... माझे भविष्य काय..

धर्म - माझे विचार.. मी ज्येष्ठ आहे...

द्रौपदी - हो पण वस्त्रहरण माझं होणार आहे ना?

धर्म - मग विचार... तुझं भविष्य काय??

द्रौपदी - इथे क्रेडिट कार्डचा नंबर मागतायत..

भीम - क्रेडिट कार्ड फक्त अर्जुनाकडे आहे... जा बोलाव त्याला..

काही वेळाने संतापलेला अर्जुन येतो. येतो तोच प्रत्यंचा ताणून मोजून बारा बाण सोडून प्रत्येक बाणाने कीबोर्डवरचा एक एक नंबर दाबून क्रेडिट कार्ड नंबर फीड करतो. त्याचे ते कौशल्य पाहून द्रौपदी 'अय्या.. कित्ती गोड' म्हणून हरखून त्याच्याकडे पाहते.

अर्जुन - गोड बीड कर डिलीट... आधी हा काय प्रकार आहे??

धर्म - सबूरी अर्जून?? सबूरी...

अर्जुन - यात कसली सबूरी?? कृष्णाचा नंबर सांग... मी नवा सेल फोन घेतल्यामुळे यात त्याचा नंबर नाही आहे..

द्रौपदी - नाईन एट टू टू झिरो..

अर्जुन कृष्णाला फोन लावतो..

अर्जुन - या अर्जुन हिअर! व्हॉट इज धिस नॉन्सेन्स लिंक ऑफ युअर्स ऑन फेसबूक??

कृष्ण - काय झालं बंधो??

अर्जुन - अरे बंधो काय बंधो?? हा वस्त्रहरण काय प्रकार आहे??

कृष्ण - ते होणं मस्ट आहे वत्सा.. ते विधिलिखित आहे..

अर्जुन - हे विधिलिखित कोण लिहितं कोण पण??

कृष्ण - अर्थातच मी वत्सा..

अर्जुन - मग ते इरेज का करत नाहीस??

कृष्ण - त्याशिवाय गीता या बिहेविरियल कोड ऑफ कन्डक्ट इन लाईफ या साईटची सुरुवातच होणार नाही..

अर्जुन - पण हवीय कुणाला ही साईट??

कृष्ण - पब्लिकला हवीय...

अर्जुन - कुणी वागणार आहे का त्याप्रमाणे??

कृष्ण - नाही वागले तरी कोर्टात शपथ घ्यायला आपल्या धर्मात एक तरी पुस्तक पाहिजे ना?????

अर्जुन - म्हणजे हार्ड कॉपी पण काढणार त्याची?

कृष्ण - अर्थातच...

अर्जुन - आणि प्रदुषण वाढेल ते??

कृष्ण - तेवढे मी चालवून घेईन...

अर्जुन - पण या सगळ्यासाठी वस्त्रहरण??

कृष्ण - तू चुकतोयस.... वस्त्रहरण ही केवळ एक क्षुल्लक घटना आहे.. जशी माझी सखी द्रौपदी दुर्योधनाची मयसभेतील फजिती पाहून हासली होती ना? तशीच... आणि मुळात मी वस्त्रहरण होऊच देणार नाही आहे..

अर्जुन - म्हणजे काय??

कृष्ण - ऐन वस्त्रहरणाच्या वेळेस मी तिचे संरक्षण करणार आहे...

अर्जुन - ओह... यू मीन लास्ट मिनिट चेंजेस..

कृष्ण - एक्झॅक्टली..

अर्जुन - देन इट्स ओके किशन...

कृष्ण - यॅह.. बाय..

अर्जुन - बाय...

अर्जुनाने फोन उपरण्यात गुंडाळून सर्वांकडे समाधानाने पाहात 'स्माईल' दिले.

भीम - काय झालं??

अर्जुन - नथ्थिंग! त्याला एक साईट काढायचीय गीता नावाची.. त्यासाठी नाटक आहे हे सगळं.. वस्त्रबिस्त्रहरण होणारच नाहीये...

द्रौपदी - ई! मग काय हरकत आहे?? येऊ की जाऊन सगळे? ट्रीप होईल तेवढीच! लॉन्ग व्हेकेशन झालीच नाहीये माझ्या स्वयंवरापासून!

कुंती - कशी होईल?? सासू इतकी छळते नाही का?

द्रौपदी - हे तुमचं वाकड्यात शिरणं आहे हां सासूबाई?? मी तसे काहीही म्हणालेले नाही आहे.

कुंती - ते जाऊदेत... मीही जाऊबाईंना भेटेन म्हणते... पितामहांनाही भेटायचंच आहे..

भीम - बरीच तयारी करावी लागेल.. किमान एक स्पेन्सर किंवा रिलायन्स मॉलमध्ये मावतील इतकी कॉर्न फ्लेक्सची पुडकी लागतील..

धर्म - याला दुसरं काही सुचतच नाही...

द्रौपदी - नकुल आणि सहदेवांना सांगा तरी किमान?? ते काय लिंबुटिंबू आहेत??

यावर सगळे हासतात. अर्जुन त्या दोघांना बोलावून आणतो व सर्व कथा कथन करतो. ते दोघेही प्रथम संतापतात व नंतर शांत होतात.

द्रौपदी - अहो... पण माझी एक मागणी आहे..

अर्जुन - ती कोणती प्रिये?

धर्म - थांबा... थांबा....

सगळे दचकून धर्माकडे पाहतात.

धर्म - हस्तिनापूरला निघण्याआधी आपण एक नियम करू! आजपासून द्रौपदीला कुणीही सर्वांदेखत प्रिये वगैरे हाक मारायची नाही..

भीम - का??

धर्म - आपणही स्त्रीचा यथोचीत सन्मान ठेवायला हवाच...

अर्जुन - मग तिला फक्त तिच्याच पतीबरोबर राहू दिले पाहिजे ना?

धर्म - पार्था... मातेची आज्ञा कशी मोडणार?

नकुल - मी काय म्हणतो... मला एक स्वतंत्र लग्नही करू देत ना?

तेवढ्यात धर्माच्या सेलफोनवर एसेमेस येतो. धर्म तो एसेमेस मोठ्याने वाचतो.

"यू आर कॉर्डिअली इन्व्हाईटेड फॉर प्लेयिंग रिअल लाईफ द्यूत अगेन्स्ट अस अ‍ॅट हस्तिनापूर ऑन धिस कमिंग वेनस्डे! प्लीज ब्रिन्ग यूअर लोन्ली मदर अ‍ॅन्ड ओन्ली वाईफ टू, फॉर धिस ग्रॅन्डेस्ट शो - दुर्योधन धृतराष्ट्र कौरव! "

द्रौपदी - भावजींना इंग्लीश येतं??

भीम - न यायला काय झालं? तो म्हातारा आहे ना हवे ते शिकवायला...

धर्म - भीमा... गुरू द्रोणांचा असा उल्लेख मला यापुढे चालणार नाही...

भीम - का?? डोनेशन घेऊन नापास झालेल्याला इंजिनीयर करतात ते चालतं का?? मारुती विद्यापीठ म्हणे! बाजार झालाय शिक्षणाचा नुसता असल्या लोकांमुळे! परवा एकाला म्हंटलं की दाखव बरे गदेचा ऊर्ध्वमुखी कंचनी प्रहार? तर म्हणे गूगलवर सर्च केला पण काही दिसलं नाही....

धर्म - तरीही भीमा.. क्रोध आवर... ते गुरू आहेत... त्यांनीच धनुर्विद्या..

भीमा - त्यांनीच धनुर्विद्या शिकवली ना? मग अंगठा कशाला घ्यायचा एकलव्याचा? त्याला डोनेशन देता आले नाही म्हणून??

द्रौपदी - अहो... मला एक पैठणी घ्या की वस्त्रहरणाच्या दिवशी नेसायला..

अर्जुन - बघितलं का दादा? वस्त्रहरणालाही हिला नवी साडी पाहिजे..

धर्म - द्रौपदी... अगं ती साडी वस्त्रहरणात जाणार आहे ना? मग कशाला इतकी भारीची?

द्रौपदी - काय दिवस आलेत! पाच पाच नवरे आहेत तरी हट्ट पुरवला जात नाही... नाहीतर कुठल्याही बिल्डिंगमधल्या फालतू बायका त्या होम मिनिस्टरमध्ये थयाथया नाचून अन उड्या मारून पैठणी मिळवतात...

धर्म - अर्जुना... विक तुझी दोन धनुष्ये... आणि घे हिला एक पैठणी...

अर्जुन - का? आता पैठणी घ्यायची तेव्हा मात्र एकटा मीच घेणार होय??

कुंती - ते सगळं जाऊदेत... पण मला तरी बाई भीतीच वाटली असती वस्त्रहरण होणार म्हंटल्यावर.. कृष्ण असला सोबतीला तरी काय झालं??

द्रौपदी - सासूबाई... मला यांनी जिंकून आणले.. आणि दारातूनच तुम्हाला विचारले... आई मी काय आणलंय बघ.. तेव्हा मागेही न वळून बघता तुम्ही म्हणालात... जे काय आणलयस ते पाचहीजणात वाटून घ्या... तेव्हाच माझे खरेखुरे वस्त्रहरण झाले हो? आता मला माझा कृष्ण असताना तुमच्या या पाच शूरवीर, धर्मपालन करणार्‍या आणि आईची आज्ञा म्हणून पत्नीही विभागून घेणार्‍या चिरंजीवांनी द्यूतात लावले तरी काहीच काळजी वाटत नाही बरे?

कुंती व सर्व पांडवांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

==========================

हस्तिनापूरला जाण्याची सर्व तयारी झाली तसे सातही जण रथात स्वार होऊन निघाले. आजूबाजूला कित्येक सैनिक होते. पण हे सर्व सात अक्षौहिणी सैनिक अदृष्य होते. नसलेले हत्ती ऐकू येणार नाही असा चीत्कार करून भयभीत करून सोडत होते. तो आवाज इतका भयंकर होता की नसलेले वाघ आणि सिंहही घाबरून पळत सुटलेले होते. स्वर्गातून पुष्पवृष्टी होत होती. पण ती फुले वार्‍याने चुकून पुढेच पडत होती. त्यामुळे आपण जाऊ तेथे फुले फुललेली आहेत असा भास होऊन नकुल निसर्गकविता रचू लागला होता. त्याची यमके जुळत नसल्यामुळे सहदेव त्याला मदत करतानाच हळूच एक चोरटा कटाक्ष धर्मदादाच्या रथाकडे टाकत होता. असे ठरलेले होते की दर पाच किलोमीटर्सना द्रौपदीने रथ बदलायचा. आत्ता ती धर्माच्या रथात होती. ती भीमाच्या रथात आल्यावर भीमाच्या रथात असलेल्या कुंतीमातेला धर्माच्या रथात जावे लागणार होते. अशा दोघी सरकत राहणार होत्या. 'ओपन प्रायव्हसी' या अमेरिकन संस्कृतीच्या धर्तीवर बनवलेल्या प्रणालीचा हा प्रकार होता. मात्र शेवटच्या शंभर किलोमीटर्समध्ये कुंती द्रौपदीची साडी ओढून तिला वस्त्रहरण टाळण्याचा सराव देणार होती.

तिकडे दु:शासन गूगल अर्थवर आत्ता पांडव कुठे पोचले आहेत हे बघत होता. दुर्योधन शकुनीमामाला अधिकाधिक वेळ द्यूताच्या फाश्यांचा सराव करता यावा म्हणून एकांतात ठेवून त्यावर लक्ष ठेवत होता.

धर्माच्या रथातून उतरून द्रौपदी भीमाच्या रथात आली तसे मागच्याच रथात अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य असेंबल करणे थांबवले व तो ध्यानस्थ बसून राहिला. कोणत्याही क्षणी द्रौपदी आपल्या रथात येईल व मग चित्त शुद्ध राहणार नाही म्हणून आधीच त्याने ध्यानातून चित्तशुद्धी करून ठेवायचे ठरवले.

तेवढ्यात धर्माने शंख फुंकला. इतक्यात कोणतेही युद्ध नसताना हा शंख का फुंकत असावा म्हणून सर्व अदृष्य सैनिक बावचळून उभे असतानाच धर्माने मागे वळून सांगीतले की त्याचा एक घोडा हस्तिनापूरची वाट चालू झाल्यामुळे घाबरून किंचाळला असून त्याने स्वतः अजिबात शंख बिंख फुंकलेला नाही. हा घोडा पुढे 'काळा पैसा बाहेर यावा म्हणून आमरण उपोषण करून सरकारला जेरीस आणायला बरा पडेल' या विचाराने अर्जुनाने तो घोडा वेगळा काढून ठेवला. मधेच एक घोडा कॅन्सल झाल्यामुळे धर्माच्या रथाचे संतुलन गेले व डावीकडे, डावीकडे असा ओढला जात जात तो रथ पुन्हा उलट्याच दिशेला जाऊ लागला. स्वतः राजाच उलट दिशेला फिरताना पाहून रणमदाने बेभान झालेले मात्र दिसतच नसलेले हत्ती उधळले व त्यांनी आपल्याच पायाखाली आपलेच अदृष्य सैनिक खलास केले. हे भयंकर दृष्य पाहून सर्व रथांचे घोडे खाली बसले व त्यानंतरचा प्रवास पायी सुरू झाल्यामुळे सर्वांनी आपापली अस्त्रे होती तिथेच टाकली व भार कमी केला.

द्रौपदी - नाथ.... ते काय आहे?

अर्जुन - राजघाट...

द्रौपदी - आणि ते??

अर्जुन - समाधी .. महात्मा गांधींची...

द्रौपदी - म्हणजे मुन्नाभाईची??

अर्जुन - नाही... ही खर्‍या गांधींची आहे..

द्रौपदी - आणि ती पांढर्‍या साडीतील महिला?? ती फुले वाहात आहे ती... ती कोण??

अर्जुन - ती युरोपातील एका इटली नामक प्रगत राज्यातील एक महिला आहे... सध्या येथे तिचे राज्य आहे..

द्रौपदी - का? आपल्या राज्यात असा एकही नेता नाही ज्याला त्या पदावर बसवावे?

अर्जुन - बरेच आहेत... पण त्या घराण्यातीलच माणूस असावा लागतो....

द्रौपदी - आणि हे??? हे काय आहे??

अर्जुन - हे इंडिया गेट.. येथे जे सैनिक मातृभूमीसाठी लढून शहीद झाले त्यांची समाधी आहे..

द्रौपदी - मातृभूमी म्हणजे?

अर्जुन - म्हणजे आपण जेथे जन्माला आलो ती जागा...

द्रौपदी - म्हणजे पृथ्वी?

अर्जुन - खरे तर पृथ्वीच म्हणायला हवे... पण माणसामाणसात भांडणे असतात... युद्ध होतात.. मग सीमा पाडल्या जातात...

द्रौपदी - अजून किती वेळ लागेल...

अर्जुन - काय माहीत! दादाला म्हणालो मी की दिल्लीहून थेट फ्लाईट आहे ... पण कंजूषपणा सतत..

द्रौपदी - पटलं मला..

अर्जुन - मला तर वाटतं...

द्रौपदी - काय?? काय वाटतं??

अर्जुन - तो.... तो तुझ्यावर प्रेमही कंजूषपणेच करत असेल..

द्रौपदीने लाजून मान वळवली तसा अर्जुन थबकला.

अर्जुन - तू एक क्षत्राणी आहेस... मला सांग... तुला सर्वात कोणता पती भावतो?

द्रौपदी - असं विचारणं योग्य आहे का? हा माझा अपमान नाही का?

अर्जुन - इतकेच सांग... तुला सर्वात मी आवडतो की नाही??

द्रौपदी - नाही... मला कुणीच आवडत नाही... कारण माझ्या अस्तित्वाला काही अर्थच नाही आहे...

अर्जुन - आता हे वस्त्रहरण वगैरे झालं की मी आईशी बोलणार आहे....

द्रौपदी - त्यात सासूबाईंशी काय बोलायचंय?? तुम्हाला स्वतःला काही वाटत नाही? मला तुम्ही जिंकून आणलंत ना? आणि वस्त्रहरण वगैरे काय म्हणता? काही वाटत नाही असे म्हणायला?

अर्जुन - द्रौपदी... मला हे सगळं मान्यच नाही आहे गं! पण दादाचा शब्द शेवटचा.. तू म्हणालीस तर आत्ता या चौघांशी युद्ध करून तुला पुन्हा पळवून नेऊ का वनात?

द्रौपदी - काही नको... सतत जिंकायला मी काय चँपियनशिप आहे कसली?

रमतगमत व दमतभागत प्रवास चालूच होता. शेवटी कित्येक तासांनी सगळे हस्तिनापुराच्या सीमेवर येऊन ठेपले तेव्हा एकेकजण इतका दमलेला होता की विचारायची सोय नाही.

मात्र त्यांच्या स्वागताला खुद्द दुर्योधन, दु:शासन व विदुरकाका आलेले होते. त्यांनी आणलेल्या रथात बसून सर्वजण महालात पोचले. प्रथम पितामहांचे दर्शन घेऊन मग महाराज धृतराष्ट्रांचे व माता गांधारीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्व कुरुबंधुंचेही!

हस्तिनापूरचे खरेखुरे अफाट वैभव पाहण्याआधी सर्वांनी आहार घेतला. होत असलेल्या कौतुकाने कुंतीमाता व द्रौपदी भारावून गेल्या होत्याच, पण काही क्षणांपुरता पांडवांचाही क्रोध आटोक्यात आला होता.

फेरी मारून आल्यावर सगळे गप्पा मारायला बसलेले होते.

दु:शासन - तुमचे... रथ वगैरे कुठे आहेत??

भीम - आम्ही बल्क सर्व्हिसिंग करतो... यू नो? कॉस्ट सेव्हिंग..

दु:शासन - पण या दोघींना कशाला चालवलंत इतकं? मला एक मिस्ड कॉल दिला असतात तर मी पाठवले असते की रथ घ्यायला..

धर्म - इट्स ओक्के दु:शासन.. बाकी तुझं कसं काय?

दु:शासन - एकदम फस्क्लास..

धर्म - पण असा लंगडतोयस का डाव्या पायाने?

दु:शासन - एक नवीन घोडा होता.. उसळत होता.. पडलो मी काल..

धर्म - ओह... सो सॉरी.. तुम्ही सगळे कधी येणार आमच्याकडे?

भीम - दादा... हे आपलेच राज्य आहे... हेच आपल्याकडे आलेले आहेत... आपण नाही आलोत हस्तिनापुरात..

दु:शासन - कम्मॉन यार भीम.. अजून तू तेच लहानपणीचे विचार करतोस?? कूल डाऊन बडी..

अर्जुन - उद्याचा काय प्लॅन??

अर्जुनाला काळजी उद्याची होती. सगळेच उत्सुकतेने दुर्योधनाकडे पाहू लागले.

दुर्योधन - लेट मी इन्ट्रोड्युस.. धिस इज मिस्टर शकुनी... माय मॅटर्नल अंकल... वुई विल ऑल प्ले द्यूत टुमॉरो... आमच्याबाजूने हा मामा फासे टाकेल..

धर्माने इफ्तेकार या अतीगंभीर हिंदी चित्रपट अभिनेत्याप्रमाणे अत्यंत विचारी चेहरा करून विचारले..

धर्म - बट व्हाय??

दुर्योधन - माय चॉईस..

कुंती - अगोबाई शकुनी मामा का हे? दुर्योधनाच्या मुंजीत पाहिलेवते मी...

गांधारी - मी तर माझ्या लग्नानंतर त्याला पाहिलेच नाही आहे..

कुंती - तुम्ही उगाच पट्टी बांधता जाऊबाई... भावजी जन्मापासूनच अंध आहेत...

गांधारी - आमच्यात... एकपतीव्रत आहे...

द्रौपदीने कडवट स्वरात वाक्य उच्चारले..

द्रौपदी - कळतात बरं मला टोमणे??

मग तिला सर्वांनी गांधारीमातेची माफी मागायला लावली. गांधारीने नाही तरी महाराज धृतराष्ट्र यांनी तिला माफ केले. कारण उद्या तिला त्यांना माफ करायची वेळ येणार होती.

हरीण, मोर, ससे असा अल्प आहार घेऊन व त्यानंतर दूध किंवा मद्य (आपापल्या मर्जीप्रमाणे) प्राशून सर्व जण झोपी गेले. आज मात्र द्रौपदी तिला दिलेल्या एका खास शयनगृहात एकटीच होती.

======================

उद्याचा दिवस उजाडला. द्यूताचा दिवस उजाडला. सर्वजण तयार होऊन राजदरबारात आले. पितामह भीष्म यांना सर्वांनी सादर प्रणाम केला तोवर महाराजांचेही आगमन झाले. राजदंड उंचावून पितामहांनी धृतराष्ट्रांना अभिवादन केले. त्यापाठोपाठ सर्वांनी महाराजांना अभिवादन केले व त्यांच्या नावाचा जयघोष झाला.

व्हॅन हुसेनचा नवाकोरा शर्ट व भारीतील ट्राऊझर घालून दुर्योधन बसलेला होता. त्याचे ९९ भाऊही असेच पॉश पोषाखात होते. पांडव मात्र फेडेड जीन्स व जुनाट टीशर्ट्स घालून उद्विग्न चेहर्‍याने बसलेले होते. सभागृहात एकही स्त्री नव्हती. पितामह भीष्मांनी ब्लेझर तर महाराज धृतराष्ट्रांनी थ्री पीस सूट परिधान केलेला होता.

सर्व स्थानापन्न होताच दुर्योधन उभा राहिला व बोलू लागला.

"So guys, we are basically here to enjoy DYOOT with our brothers. These are five Pandavs who are our cousins and they have one wife in them due to the disproportionate proportion of the birth of man to woman in their area. They have walked all the way to Hastinaapoor and are ready to play dyoot! I, the son of King Dhrutarashtra announce with pleasure that the game starts now. From our side, Mr Shakunee, my maternal uncle will play the FASA and from their side, Mr Yudhishthir will do the thing, being the eldest of all of us. So, Shakuneemaamaa? will you please??"

"oh sure... "

शकुनीमामांनी फासा उचलताच एकच जयघोष झाला युवराज दुर्योधनाच्या नावाने!

आणि पहिला पण लागला.

दुर्योधन - माझे तीनशे हत्ती...

धर्माने इकडे तिकडे पाहिले. त्याच्याकडे तेवढे हत्ती नसल्याने काहीसा अपमान झाल्याचा चेहरा करत तो उद्गारला...

धर्म - माझेही...

तेवढ्यात एक विचित्र प्रकार झाला. आखुड टॉप व स्कर्ट घालून अचानक द्रौपदी स्वतःच दरबारात प्रवेशली.

आणि येऊन एकदम ओरडली.

"कृष्ण इज नॉट कमिंग... त्याची फ्लाईट हायजॅक झाली... "

मोठाच प्रॉब्लेम झालेला होता. अर्जुनाने लॅपटॉप उघडून नेट कनेक्ट केले...

सर्व पांडव हादरलेले होते.

धर्म - काय झालं रे??

अर्जुन - पाकिस्तानात नेलीय फ्लाईट... दिडशे अतिरेक्यांना सोडा म्हणतायत..

दुर्योधन ते ऐकून खदाखदा हासला. त्या पाठोपाठ दु:शासन हासला व नंतर वयाप्रमाणे सर्वच कौरव तसेच हासले.

धर्म - आता रे?

अर्जुन - आता काय? द्यूतातून माघार घे आत्ताच...

दुर्योधन - आता नाही माघार घेता येणार.. यू गाईज आर अल्सो क्षत्रियज ओन्ली...

धर्म - मी अजून काहीही लावलेले नाही पणात दुर्योधना... आय कॅन स्टिल विथड्रॉ

दुर्योधन - क्षत्रिय म्हणवतोस ना स्वतःला? आता माघार घेतोस? हे जमणार नाही..

शेवटी धर्माला त्याचे म्हणणे मान्य करावेच लागले. कारण दरबारातील असंख्य प्रेक्षकांनीही घोषणा दिल्या की द्यूत हे झालेच पाहिजे.

धर्म - ठीक आहे.. लाव पण..

दुर्योधन - मी लावलाच आहे.. माझे तीनशे हत्ती लावलेत मी...

धर्म - माझे... माझे पाच ... पाच हत्ती..

द्रौपदी - हे काय?? माझा ऐरावत तुम्ही पणात लावताय? मग मी आता माहेरी कशी जाणार?

धर्म - आय अपोलोजाईझ द्रौपदी...

द्रौपदी - ते काही नाही.. चार हत्ती लावा.. माझा नाही लावायचा..

धर्म - मी एकदा शब्द दिलेला आहे... ऐरावत पणात लागलेला आहे आता..

द्रौपदी - यानंतर माझी एकही गोष्ट पणात लावण्यापुर्वी मला विचारायलाच हवंत!

धर्म - शुअर! मामा.. टाका फासा..

शकुनी मामांनी फासा टाकला व दुर्योधन जिंकला.. एकच जल्लोष झाला सभागृहात! दु:शासनाने हरभजन सिंगने युवराजला मिठी मारावी तशी मोठ्या भावाला मिठी मारली... द्रौपदी तिचा ऐरावत गेल्यामुळे तीक्ष्ण नजरेने पांडवांकडे पाहून त्यांची निर्भत्सना करत होती.

दुर्योधन - माझा पुढचा पण.. माझे सातशे घोडे...

धर्म - माझे... माझे वीस..

दुर्योधन - फक्त वीस??? हत्ती फक्त चार आणि घोडे फक्त वीस??

धर्म - जे आहे तेच लावणार मी..

दुर्योधन - ठीक आहे... मामा ... टाका फासा..

हाही पण दुर्योधन जिंकला. हे पाहून नव्याने जल्लोष झाला तसा भीम भडकला व त्याने बसल्या जागीच गदा आपटली. त्यामुळे पडलेल्या खिंडाराचा आकार बराच मोठा होता. तो पाहूनच सगळ्यांच्या उरात धडकी भरली.

एक एक करत धर्माने शेवटी सहदेव, नकुल, अर्जुन आणि भीम यांनाही पणात लावले.

आश्चर्य म्हणजे प्रत्येक डाव दुर्योधनच जिंकला. आणि सर्व पांडव आता कौरवांचे मांडलीक झाले.

तेवढ्यात धर्माला एसेमेस आला. कृष्ण वेगळ्या फ्लाईटने हस्तिनापुरापर्यंत पोचला होता. आता काहीसा निर्धास्त झालेला असल्यामुळे धर्माने आता स्वतःलाच पणात लावले.

सर्वच्या सर्व दरबार श्वास रोखून बघत असताना व धृतराष्ट्र महाराज ऐकत असतानाच शकुनी मामांनी फासा टाकला..

क्षणभर कुणाला काही कळलेच नाही..

आणि पुढच्याच क्षणी अभूतपूर्व जल्लोष झाला. पांडवांचा सर्वात ज्येष्ठ बंधू द्यूतात स्वतःच हारला होता.

कित्येक क्षण ...

कित्येक क्षण तो जल्लोष चालूच राहिला. सर्व पांडव व द्रौपदीचा चेहरा पराजयाने काळवंडलेला होता. आता पणाला लवायला तर काही राहिलेच नव्हते, पण आता मांडलिकत्व, गुलामी नशीबी आलेली होती.

कुणाच्याही नकळत सूक्ष्म रुपात दरबारात प्रवेशलेला कृष्णही आता हतबुद्ध नजरेने समोरच्या दृष्याकडे पाहू लागला होता. त्याची अडचण तिसरीच होती. द्रौपदीला पुरवायला त्याने साड्यांचा ढीग आणला होता तो पाकिस्तानात हायजॅक झालेल्या फ्लाईटमध्ये तसाच राहिला होता. आणि तेही एकवेळ चालले असते... कोणतीही वस्त्रे देऊन तिला पुरवता आलीही असती एक वेळ! पण तिने मुळातच स्कर्ट व ब्लाऊझ घातलेले असल्याने ती वस्त्रे पुरवून द्रौपदी ती वस्त्रे कशी काय परिधान करणार हा प्रश्न कृष्णाला छळत होता.

इकडे आणखीनच अजब प्रकार घडला. दुर्योधनाने धर्माला द्रौपद्ला पणात लावायचा सल्ला दिला. त्यावर दु:शासन खदाखदा हासला.

धर्म - दुर्योधना... पापी मानवा... विजयाच्या नशेत तू तुझ्या वडीलधार्‍यांचा, हस्तिनापूरच्या गादीचा, पितामहांचा, महाराजांचा आणि एका अबलेचा अपमान करत आहेस...

दुर्योधन - करणारच... तू स्वतःच माझा मांडलीक झाल्यावर तुला मी दिलेला हुकूम पाळायला लागणारच..

धर्म - मी तुला शब्द दिल्याप्रमाणे मी तुझा गुलाम झालो आहे दुर्योधना.. पण माझी... या गुलामाची एक आणि शेवटची विनंती ऐक... पांचालीला पणाला लावायचा हुकूम नको देऊस मला.....

दुर्योधन - अरे हाट?? गुलाम तो गुलाम अन वर इतका माज?? दु:शासना... आण त्या गर्विष्ठ स्त्रीच्या वेणीला धरून तिला फरफटत येथे...

दु:शासन - दादा...., अरे तिचा बॉयकट आहे रे??

दुर्योधन - अरे मग हाताला धरून आण...

दु:शासन - अरे पण ती इथेच आहे की??

दुर्योधन - मग तिला सर्वांसमोर खाली ढकलून दे जमीनीवर..

दु:शासन - अरे जमीनीवरच बसलीय ती..

दुर्योधन - अरे मग काहीतरी कर ना??????

दु:शासन - हो पण काय करू काय??

दुर्योधन - तिची वस्त्रे फेड आणि तिला तुझ्या डाव्या मांडीवर बसव..

दु:शासन - अरे काल घोड्यावरून पडल्यामुळे माझी डावी मांडी दुखावली नाही का दादा?

दुर्योधन अतिशय संतापून किंचाळला व द्रौपदीची वस्त्रे फेडण्यासाठी स्वतःच धावला..

संपूर्ण दरबार उभा राहिला... कित्येकांनी किंचाळून या घटनेची निंदा केली... पितामह तर संतापाने थरथरत होते.... खुद्द महाराज धृतराष्ट्र आज्ञा सोडत होते की दुर्योधनाला आवरा.. पण दुर्योधनाला आवरण्याची एकाही सैनिकाची हिम्मत नव्हती... सर्व पांडव दुर्योधनाला आवरण्यासाठी उसळ्या मारत असूनही धर्म त्यांना रोखत होता.. कृष्ण सूक्ष्मरुपात आता काय होणार इकडे बघत होता.. मात्र....

द्रौपदी अत्यंत शांत होती...

दुर्योधन जवळ येताच तिने एक एसेमेस केला..

.. आणि दुर्योधनाने तिच्याकडे हात करताच...

संपूर्ण सभागृह दणाणले..

दरबाराच्या दारात उभा होता... कर्ण.. तो संतापाने थरथरत होता..

आता कर्ण घंटेसारख्या नादात बोलू लागला..

"मूर्खांनो?? एका अबलेला भर दरबारात छेडता?? मला कालच द्रौपदीने सांगीतले.. तिला म्हणे कृष्णाने इमेलवर सगळे कळवलेले होते... की मी तुम्हा सर्वांचा मोठा भाऊ आहे.. दुर्योधनापेक्षा तर मोठा आहेच.. पण धर्मापेक्षाही.. आणि दुर्योधना?? माझा मित्र म्हणवून घेतोस अन हे कृत्य करतोस?? आजची द्रौपदी महाभारतातल्या द्रौपदीसारखी नाही.... ती धीट आहे.. तिलाच पणात लावणार्‍या तिच्या नवर्‍यांना ती स्वतःच अद्दल घडवते... आता ती तुम्हा सर्वांना एकमेकांचे वस्त्रहरण करायला सांगून एकमेकांची धिंडही काढायला सांगणार आहे.. आणि ते न करणार्‍यांना माझ्याशी युद्ध करायला लागेल.. कोणताही खेळ इतका महत्वाचा नाही की त्यात कुणाचा जीव जावा अथवा कुणाचे शील भ्रष्ट व्हावे.. कोणताही दिलेला शब्द इतका महत्वाचा नाही की तो पाळताना एका अबलेला वस्त्रहरणास सामोरे जावे लागावे.. द्रौपदी आज तुम्हा सर्वांना अद्दल घडवणार आहे... मी तिला सुरक्षा देणार आहे असे मी तिला दान दिले आहे... आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की.. माझ्यासारखा दानशूरही कुणी नाही आणि शूरही कुणी नाही... तेव्हा... भीमा.... उचल त्या दु:शासनाला आणि कर त्याचे वस्त्रहरण सर्वांदेखत.. द्रौपदी.. तू माता गांधारींच्या कक्षात निघून जा.. बघतोच तुला कोण अडवतो ते..."

आणि महालात एकच धुमश्चक्री झाली.. कारण कर्णाविरुद्ध जाण्याचे सामर्थ्य कुणातच नव्हते.. जो तो आता आपापल्या शत्रूवर स्वतःचा राग काढण्याच्या मागे लागला..

तुंबळ झुंज झाली महालातच.. भीमाने अनेक कौरवांना अद्दल घडवली... पितामहांनीही कौरवांना शासन केले.. धृतराष्ट्र अगतिकपणे सर्व गोंधळ ऐकत होते..

आणि.. जरी एका सामर्थ्यशाली पुरुषाचीच मदत घेऊन द्रौपदी या प्रकारातून सुटली होती...

... तरीसुद्धा ऐनवेळेस कृष्णाचा काही प्रॉब्लेम झाला तर पर्यायी मदत म्हणून ती कालच कर्णाला भेटली होती... प्रथम कर्णाने पुर्वी तिच्याकडे तसे पाहिल्याबद्दल तिची क्षमा मागीतली होती व खाली मान घालून प्रायश्चित्त मागत होता..

त्यावर द्रौपदीने त्याला सर्व कथा कथन करून त्याच्या जीवलग मित्राविरुद्ध, खुद्द दुर्योधनाविरुद्ध नुसते भडकवलेच नव्हते तर 'दान व वचन' म्हणून भर सभागृहात सुरक्षा कवच प्रदान करण्याचे प्रायश्चित्तही दिले होते.. जे कर्णाने तात्काळ स्वीकारले होते....

कलियुगातील द्रौपदी केवळ बुद्धीचातुर्यावर त्या भयानक प्रसंगातून सहीसलामत सुटली होती.
================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

Rofl

असलं सगलं यदाकदाचित मध्ये होतं तर हिंदुत्ववाद्यानी त्यांच्यावर बाँब टाकले.. आता तुमी सावध असा म्हणजे झालं.. Proud

छान

छान!!

द्रौपदी - नकुल आणि सहदेवांना सांगा तरी किमान?? ते काय लिंबुटिंबू आहेत??
>> हे अगदीच कैच्याकै.. Lol
एन्जॉईड! कल्पनाविलास आणि वास्तव, यांची सांगड आवडली Happy

आम्ही आत्ताकुठे द्वापारयुगापर्यंत पोचलोय गिरीजाबाई...
जेव्हा तुमच्यापर्यंत म्हणजे कलियुगापर्यंत पोहोचु तेव्हा त्याचाही अनुभव घेवु. हाकानाका Wink

Lol

वाट्टेल ते नाही बोलत आहे मी! मागच्यावेळेस त्याने मला टाटाचे डेटाकार्ड घ्यायला सांगीतले.. त्याला रेंजच येत नाही जंगलात.. फुकट गेले पैसे.. >>>>>:)::) सहि

Pages